PPF वर तुम्हाला मिळू शकतं कर्ज, 'या' आहेत अटी; जाणून घ्या

पीपीएफ कर्ज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
वाचन वेळ: 5 मिनिटे

पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक प्रकार आहे, हे तर तुम्हाला माहीत असेलच. मात्र, आवश्यकता असल्यास पीपीएफमधून तुम्हाला कर्जदेखील मिळू शकतं, हे फार थोड्या लोकांना माहीत असतं. शिवाय हे कर्ज अतिशय कमी व्याजदरानं मिळतं.

ही सुविधा काय आहे आणि त्यासाठीचे नियम काय आहेत याबद्दल जाणून घेऊया.

पीपीएफवर कर्ज घेण्याची सुविधा आणि त्यासाठीचे नियम

आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा पैशांची तत्काळ गरज असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केलेली असेल, तर ते पैसे तुमच्या कामी येऊ शकतात.

पीपीएफमध्ये एकरकमी गुंतवणूक केली जाऊ शकते किंवा संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये 12 महिन्यांमध्ये दरमहादेखील गुंतवणूक केली जाऊ शकते. पीपीएफमध्ये किमान 500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

बहुतांश लोकांना हे माहित आहे की पीपीएफ हा कर बचतीचा आणि बचतीचा एक चांगला पर्याय आहे. मात्र अडचणीच्या वेळेस पीपीएफवर कर्जदेखील मिळू शकतं, हे फार थोड्याच लोकांना माहित असतं. शिवाय यावरचा व्याजदरदेखील खूपच कमी असतो.

महत्त्वाची बाब म्हणजे पीपीएफवर कर्ज घेण्यासाठी कोणत्याही मोठ्या प्रक्रियेची आवश्यकता नसते. याची प्रक्रिया खूपच सोपी असते. तसंच त्यासाठीचे नियमदेखील खूपच सोपे आहेत.

पीपीएफवर कर्ज घेण्यासाठीच्या अटी

स्टेट बँक ऑफ इंडियानुसार, पीपीएफवर कर्ज सुरुवातीच्या वर्षांमध्येच मिळतं. म्हणजे, तिसऱ्या आर्थिक वर्षापासून ते सहाव्या आर्थिक वर्षापर्यंत ते मिळतं.

उदाहरणार्थ, जर तुम्ही 2023-24 मध्ये पीपीएफचं खातं सुरू केलं असेल तर 2025-26 ते 2028-29 दरम्यानच पीपीएफवर कर्ज मिळू शकतं.

पीपीएफवरील कर्जाला शॉर्ट टर्म म्हणजे अल्पकालावधीचं कर्ज म्हणतात. या कर्जाची परतफेड 36 महिन्यांमध्ये करावी लागते.

पीपीएफवर कर्ज मिळवण्याच्या अटी काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

पीपीएफवर मिळणाऱ्या कर्जाची जास्तीत जास्त म्हणजे कमाल रक्कम या गोष्टींवर अवलंबून असते की तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात किती पैसे जमा केले आहेत. तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवलेल्या किंवा जमा केलेल्या एकूण रकमेच्या 25 टक्के इतक्याच रकमेचं कर्ज घेऊ शकता.

समजा तुम्ही पीपीएफ खात्यात 2 लाख रुपये असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकेल.

पीपीएफवरच्या कर्जासाठी किती व्याजदर आकारला जातो?

यावर आकारला जाणारा व्याजदर बराच कमी असतो. स्टेट बँक ऑफ इंडियानुसार, वार्षिक 1 टक्का प्रभावी व्याजदर (इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट) यावर द्यावा लागतो.

यात 1 टक्काच व्याजदर आकारला जातो, कारण जोपर्यंत तुमचं कर्ज सुरू असतं, तोपर्यंत तुमच्या पीपीएफ खात्यात तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या रकमेवरील व्याज जमा केलं जात नाही.

पीपीएफ

फोटो स्रोत, Getty Images

याला अधिक सोप्या भाषेत समजून घेऊया.

सध्या पीपीएफवर मिळणारा वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे. जर तुम्ही पीपीएफवर कर्ज घेतलं तर त्या कर्जावरील व्याजदर 8.1 टक्के असेल. म्हणजेच तुम्हाला प्रभावीपणे फक्त 1 टक्का व्याजदरानं व्याज भरावं लागेल.

तीन वर्षात परतफेड न केल्यास दंड

पीपीएफवरील कर्जाची परतफेड 36 महिने म्हणजे 3 वर्षांच्या कालावधीत करावी लागते. यात आधी मुद्दलाची परतफेड करावी लागते. ती एकरकमी किंवा हफ्त्यांमध्ये केली जाऊ शकते. जसजस तुम्ही कर्जाच्या रकमेची परतफेड करत जाल, तसतसं तुमच्या पीपीएफ खात्यात ही रक्कम क्रेडिट किंवा जमा होत जाईल.

यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही 3 वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करू शकला नाहीत, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागतो. तुम्ही ज्या रकमेचं कर्ज घेतलं आहे, त्यावर 6 टक्क्यांपर्यतचं व्याज तुम्हाला भरावं लागू शकतं.

हे व्याज कधीपासून भरावं लागू शकतं? तर ज्या दिवशी तुम्ही हे कर्ज घेतलं असेल, त्याच्या पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला हे व्याज भरावं लागेल.

आर्थिक तज्ज्ञ काय सांगतात?

या कर्जासंदर्भातील एक आणखी नियम म्हणजे, एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच कर्ज घेता येतं. तुम्ही कर्ज घेतलेलं असल्यास जोपर्यंत त्याची पूर्ण परतफेड होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढील कर्ज घेता येणार नाही.

यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात की पीपीएफची रचना बचतीला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे पीपीएफमधील तुमची गुंतवणूक दीर्घकालावधीसाठी राहील याची काळजी घ्या. जेणेकरून तुम्हाला या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. त्यामुळे खूपच गरज असल्यावरच पीपीएफवर कर्ज घ्या.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे नेमकं काय?

खरंतर पीपीएफ म्हणजे 'पब्लिक प्रोविडंट फंड' म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा अतिशय उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

कारण बचतीसोबत कर सुद्धा वाचवणारी म्हणजेच दुहेरी फायदा देणारी ही योजना आहे.

पीपीएफ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संकल्पनात्मक छायाचित्र

भारत सरकारने लोकांच्या दीर्घकालीन बचतीसाठी सुरू केलेल्या या योजनेमुळे, निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखकर घालवण्यासाठी, थोडीफार रक्कम हाताशी जमा करून ठेवण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा एक सुरक्षित मार्ग आहे.

यात तुम्ही गुंतवलेली रक्कम सुरक्षित तर राहतेच पण त्यावर आकर्षक व्याजदेखील मिळते. शिवाय, गुंतवलेली रक्कम करमुक्त असते आणि व्याज दरही बाजारातील अन्य योजनांच्या तुलनेत चांगला असतो.

त्यामुळे, दीर्घकालीन बचतीसाठी आणि निवृत्तीनंतरच्या काळासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पीपीएफ हा नक्कीच एक आदर्श पर्याय आहे.

खातं उघडण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. त्यामुळे कोणत्याही वयाची व्यक्ती खातं उघडू शकते. भारत सरकार दर तीन महिन्याला पीपीएफ आणि इतर बचत योजनांवर व्याजदराची घोषणा करत असते.

पीपीएफचे नियम

पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे काही नियम असतात.

पीपीएफमध्ये दरवर्षी कमीत कमी 500 रूपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. या योजनेवर सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

हे खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते. अनेक जण 15 वर्षांनंतर पैसे काढून खर्च करतात. तर काही पीपीएफची मुदत वाढवून घेतात.

तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहिन्याला पैसे टाकू शकता किंवा वर्षभराची सगळी रक्कम एकदाच भरू शकता.

पीपीएफ खाते 15 वर्षांचे असते, म्हणजे हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे सगळे पैसे काढू शकता.

पण तुम्हाला कोणत्याही कारणासाठी अचानक पैसे लागले तर सहा वर्षानंतर पीपीएफ खात्यातील काही पैसे काढू शकता.

पैसे काढताना तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, यावर पैसे काढण्याची मर्यादा ठरत असते.

जर तुम्ही तुमचं पीपीएफ खातं मॅच्युरिटीपुर्वीच बंद केलं, तर तुम्हाला मिळणारं व्याज कमी होऊ शकतं. त्यामुळे पैसे काढण्याआधी नीट विचार करूनच ठरवा. हे पैसे काढण्यासाठी, तुम्हाला संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो.

पीपीएफ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तुम्ही पीपीएफचं जॉइंट अकाउंट काढू शकत नाही, कारण पीपीएफ खातं हे एकच व्यक्ती फक्त तिच्याच नावानं काढू शकते. अल्पवयीन व्यक्तीचं पीपीएफ खातं हे त्याच्या एका पालकासोबत उघडता येतं.

तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यासाठी कोणालाही नॉमिनेट करू शकता. तुमचं पीपीएफ खातं एका पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेतून दुसऱ्या शाखेतही हस्तांतरित करता येतं.

15 वर्षांपूर्वी खाते बंद करण्यासाठी, खाते 5 वर्षे चालवणे आवश्यक आहे. दरवर्षी तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात कमीत कमी 500 रूपये जमा नाही केले तर तुमचं खातं बंद होऊ शकतं.

मात्र, दंड भरून ते तुम्हाला पुन्हा चालू करता येतं. खात्यात जमा केलेली रक्कम, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळालेली रक्कम करमुक्त असते.

पीपीएफ खात्यातील रक्कमेवरून तुम्हाला तिसऱ्या वर्षापासून कर्ज घेण्याची सुविधा मिळते, मात्र यात काही अटी असतात.

(हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)