घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार, तेव्हा उत्पन्न होतं महिन्याला अडीच हजार रुपये

फोटो स्रोत, Getty Images
कलिता माझी यांनी कधीकाळी मदतनीस करून आपले घर चालवले आहे. त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये मिळत असत. आता त्या पश्चिम बंगालच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि आसाम ही राज्ये देखील होती.
या दोन्ही राज्यांमध्ये भाजपानं मोठा विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचादेखील भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधी लोकसभेत 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मतदानानंतर फेटाळलं गेलं. हे विधेयक महिला आरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणण्यात गेलं होतं.
मात्र डीलिमिटेशन आणि संसदेतील जागा वाढवल्या जाण्याशी ही दुरुस्ती जोडल्यामुळे विरोधी पक्षांनी याला विरोध केला. त्यामुळे हे सुधारणा विधेयक मंजूर झालं नाही.
त्यानंतर निवडणूक प्रचारात, विशेषकरून पश्चिम बंगालमध्ये भाजपानं स्वत:ला महिला समर्थक आणि विरोधी पक्षांना महिलाविरोधी दाखवत प्रचार केला होता.
तृणमूल काँग्रेस (टीएमसी)सह इतर पक्षांनी भाजपावर महिला विरोधी असण्याचा आरोप केला होता. असं म्हणता येऊ शकतं की महिला-कल्याण हा निवडणुकीच्या प्रचारातील मुख्य मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता.
किती महिला उमेदवार होत्या?
एनडीटीव्ही इंडियाच्या एका वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक 2026 मध्ये फक्त 385 महिला उमेदवार (13 टक्के) निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर 2021 च्या निवडणुकीत 2130 उमेदवारांपैकी 240 उमेदवार महिला (11 टक्के) होत्या.
'द प्रिंट'च्या वृत्तानुसार, आसाममधील या निवडणुकीत एकूण उमेदवारांमध्ये महिलांची संख्या फक्त 8.17 टक्के होती. तर आसाममधील 2021 च्या निवडणुकीत 74 महिला उमेदवार होत्या. मात्र यावेळेस ही संख्या कमी होत 59 वर आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
आसामच्या 35 पैकी 16 जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. मात्र निवडणुकीतील महिला उमेदवारांची संख्या फक्त 59 होती.
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये निवडून आलेल्या प्रमुख महिला उमेदवारांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महिलांमध्ये सर्वात पहिलं नाव पानीहाटी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार रत्ना देबनाथ यांचं आहे. त्या 28836 मतांनी जिंकल्या आहेत. त्यांना 87977 मतं मिळाली आणि त्यांनी टीएमसीचे तीर्थसंकर घोष यांचा पराभव केला.
रत्ना देबनाथ या आरजी कर रेप-मर्डर प्रकरणात मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरच्या आई आहेत. भाजपानं त्यांना पानीहाटी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणूक प्रचारात न्याय आणि महिलांची सुरक्षा यासारख्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवलं होतं.
बैरकपूरजवळच्या उत्तर 24 परगणाच्या शहरी औद्योगिक भागातील पानीहाटी मतदारसंघ, 2011 पासून तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतरच्या उमेदवार आहेत कलिता माझी. आसग्राम (एससी) मतदारसंघातून कलिता माझी निवडून आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या गेल्या दोन दशकांपासून घरकाम करायच्या. घराघरांत काम करून त्यांना महिन्याला जवळपास 2,500 रुपयांचं उत्पन्न मिळत होतं.
त्यांनी आसग्रामच्या मतदारसंघातून निवडणूक लढवत तृणमूल काँग्रेसचे श्यामा प्रसन्ना लोहार यांचा 12,535 मतांनी पराभव केला. कलिता यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. त्यांना एकूण 107692 मतं मिळाली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपानं त्यांना तिकिट दिलं होतं. त्यावेळेस त्यांना जवळपास 41 टक्के मतं मिळाली होती. मात्र 12000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
आता श्यामपुकुर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पूर्णिमा चक्रबर्ती यांच्याविषयी जाणून घेऊया. पूर्णिमा यांनी तृणमूल काँग्रेसच्या शशी पांजा यांचा 14633 मतांनी पराभव केला आहे.
पूर्णिमा चक्रबर्ती यांना 60248 मतं मिळाली आहेत. तर शशी पांजा यांना 45615 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या झुमा दास असून त्यांना 7356 मतं मिळाली आहेत.

फोटो स्रोत, ANI
पूर्णिमा चक्रबर्ती यांचा विजय महत्त्वाचा असण्याचं कारण म्हणजे टीएमसीच्या मंत्री शशी पांजा या तृणमूलच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी आहेत. श्यामपुकुर मतदारसंघातून त्या तीनवेळा आमदार बनल्या होत्या. पूर्णिमा यांनी त्यांना पराभूत केलं आहे.
निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान 60 लाख मतदारांना ॲडज्युडिकेशन यादीमध्ये टाकले होते. त्यामध्ये शशी पांजा यांचाही समावेश होता. त्यांचे नाव मतदार यादीत पुन्हा टाकण्यात आले आणि मग त्यांनी निवडणूक लढवली.
सुजापूर मतदारसंघातदेखील असाच महत्त्वाचा आहे. तिथे तृणमूल काँग्रेसच्या सबीना यास्मीन यांचा 60,287 मतांनी मोठा विजय झाला आहे. त्यांना 1,12,795 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार अब्दुल हन्नान यांना 52,508 मतं मिळाली.
या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अभिजीत रजक चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना फक्त 20066 मतं मिळाली.
सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार रूपा गांगुली यांना 1,28,970 मतं मिळाली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अरुंधती मैत्रा (लवली) यांचा 35,782 मतांनी पराभव केला. तर टीएमसीच्या उमेदवाराला 93,188 मतं पडली.
दूरदर्शनवर 90 च्या दशकात येणाऱ्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत रूपा गांगुली यांनी द्रौपुदीची भूमिका केली होती. त्यामुळे त्यांची देशभरात ओळख निर्माण झाली होती. त्याव्यतिरिक्त बंगाली चित्रपटांमध्ये त्या अभिनय करत राहिल्या.
त्या 2015 पासून भाजपामध्ये आहेत. तसंच 2016 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्याच वर्षी राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती.
याव्यतिरिक्त रेखा पात्रा यांचाही उल्लेख आवश्यक आहे. त्या हिंगलगंज मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. भाजपानं त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या उमदेवाराचा 5,000 मतांनी पराभव केला आहे.
आसाम
गोलाघाट मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार अजंता नियोग यांनी 43,759 मतांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांना 102212 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार बिटुपान सैकिया यांना 58,453 मतं मिळाली.
अंजता नियोग 5 वेळा आमदार राहिल्या आहेत. त्या 2021 मध्ये निवडून आल्यानंतर हिंमता बिस्वा सरकारमध्ये अर्थ मंत्री झाल्या होत्या.
बोंगाईगाव मतदारसंघात आसाम गण परिषदेच्या दीप्तिमय चौधरी विजयी झाल्या. त्यांना 72247 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसचे गिरीश बरुआ यांचा 24998 मतांनी पराभव केला. बरुआ यांना 47249 मतं मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
दीप्तिमय चौधरी दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. त्यांचे पती फणी भूषण चौधरी 2024 मध्ये बारपेटा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर बोंगाईगावची जागा रिक्त झाली होती. त्यावेळेस दीप्तिमय चौधरी यांनी पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता आणि त्या पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या.
मग भाजपानं विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकिट दिलं. यावेळेस त्या पुन्हा निवडून आल्या आहेत.
धुबरी मतदारसंघातून काँग्रेसच्या बेबी बेगम यांनी 68,661 मतांनी मोठा विजय मिळवला. त्यांना 1,18,362 मतं मिळाली. त्यांनी एआययूडीएफच्या नजरुल हक यांचा पराभव केला. हक यांना 49,701 मतं मिळाली. भाजपाच्या उत्तम प्रसाद यांना 49,654 मतं मिळाली, ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
धुबरी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे पक्षाला 9 वेळा विजय मिळाला आहे. हा मुख्यत: एक ग्रामीण मतदारसंघ आहे. तिथले 74.03 टक्के मतदार गावांमध्ये राहतात. तिथल्या मतदारांमध्ये मुस्लीम मोठ्या संख्येनं आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























