500 किलोची मगर, मानवी अवयव आणि धाडसी शोधमोहीम; आफ्रिकेतील नदीतला थरारक अनुभव

फोटो स्रोत, South african police service
- Author, जोसेफ विंटर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
दक्षिण आफ्रिकेत पोलिसांनी एक शोध मोहीम चालवली होती. गेल्या आठवड्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यावसायिकाचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. पोलिसांना यात मानवी अवयव सापडले आहेत.
या शोध मोहिमेत, मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असलेल्या कोमाटी नदीत हेलिकॉप्टरच्या मदतीनं एका पोलीस अधिकाऱ्याला खाली उतरवण्यात आलं होतं.
हा व्यावसायिक पुराच्या पाण्यात वाहून गेला होता आणि त्याला ज्या मगरीनं भक्ष्य केलं असावं असं वाटतं, त्या मगरीला ठार करण्यात आलं. कॅप्टन जोहान पॉटगीटर हा अधिकारी धाडस करत त्या मगरीपर्यंत पोहोचला.
तो जेव्हा मगरीकडे गेला तेव्हा त्याला अस्वस्थतापूर्ण उत्साह जाणवत होता, असं त्यांनी सांगितलं.
"मगरीजवळ तिच्या तोंडाच्या बाजूनं जाणं, ही अजिबात सुरक्षित गोष्ट नसते," असं ते न्यूज 24 या वेबसाईटला म्हणाले.
कोमाटी नदीमध्ये मगरीला दोराच्या साहाय्यानं बांधून ठेवण्यात आलं. मग पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्या दोघांनाही वर ओढून घेतलं. मगरीला नदीतून बाहेर काढल्यानंतर, तिच्या पोटात काही मानवी अवयव सापडले. ते अवयव पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या व्यावसायिकाचे आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जाणार आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
गेल्या आठवड्यात नदीला पूर आलेला होता. त्यावेळेस एक छोटा पूल ओलांडत असताना, त्या व्यावसायिकाची कार पाण्यात अडकली होती.
पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ती कार रिकामी होती. त्यातून तो व्यावसायिक पुराच्या पाण्यात वाहून गेला असावा अशा संशय पोलिसांना आला, असं कर्नल मावेला मासोंडो यांनी एसएबीसी या राष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितलं. ते म्पुमालांगा प्रांतीय पोलिसांचे प्रवक्ते आहेत.
कॅप्टन जोहान पॉटगीटर, पोलिसांच्या पाणबुडी पथकाचे कमांडर आहेत. पॉटगीटर यांनी सांगितलं की, या शोधमोहिमेत ड्रोन आणि हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. त्यावेळेस मगरी नदीतील एक छोट्या बेटावर उन्हात पहुडलेल्या दिसून आल्या.
त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे या मगरींची पाहणी केली. त्यातून यातील एका मगरीनं नुकतंच काहीतरी खाल्लेलं असावं असं त्यांनी निश्चित केलं, असं त्यांनी सांगितलं.
'तिला नीट खाताही येत नव्हतं आणि हालचालही करता येत नव्हती'
"मगरीचं पोट इतकं तट्ट भरलेलं होतं की वर ड्रोन आणि हेलिकॉप्टर्सचा वावर सुरू असतानाही, ती जागेवरून हलत नव्हती किंवा तिनं नदीच्या पाण्यात शिरण्याचा प्रयत्नही केला नाही," असं पॉटगीटर न्यूज24 ला म्हणाले.
मग पोलिसांनी त्या मगरीला ठार केलं. त्यानंतर ती मगर बाहेर काढून तिला ताब्यात घेण्यासाठी त्यांनी एक अतिशय धोकादायक आणि गुंतागुंतीची मोहीम राबवली, असं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ती मगर आकारानं महाकाय होती. ती जवळपास 4.5 मीटर लांब होती आणि तिचं वजन 500 किलो होतं.
या मगरीला जवळच्याच 'क्रुगर नॅशनल पार्क'मध्ये नेण्यात आलं. तिथे तिच्या आतड्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात मानवी अवशेषांचे काही भाग आढळून आले.
या मानवी अवशेषांबरोबरच, मगरीच्या पोटात सहा वेगवेगळ्या प्रकारचे बूट होते, असं पॉटगीटर यांनी सांगितलं.
मगरींनी यापूर्वीही इतरांना मारलं असावं किंवा मगरी काहीही गिळू शकत असल्यामुळे त्या तिथे असण्याची शक्यता आहे, असं पॉटगीटर यांना वाटतं.
दक्षिण आफ्रिकेचे प्रभारी (ॲक्टिंग) पोलीस प्रमुख, लेफ्टनंट जनरल पुलेंग डिम्पेन यांनी पॉटगीटर यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























