होर्मुझमध्ये भारतीय जहाज बुडाले, गुजरातच्या खलाशाचा मृत्यू; जहाज मालकानं काय सांगितलं?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

होर्मुझ सामुद्रधुनीत गुजरातमधील एका जहाजावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

जहाजाच्या मालकाच्या माहितीनुसार, माल चढवून हे जहाज पर्शियन आखातातील दुबई बंदरातून येमेनमधील अल मुकल्ला बंदराकडे निघाले होते. मात्र युद्धानंतर जहाजांच्या हालचालीसाठी अत्यंत धोकादायक बनलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पोहोचताच त्यावर हल्ला झाला आणि ते 'काही क्षणांतच बुडाले'.

जहाज उलटताच त्यावरील 18 खलाशी समुद्रात उडी मारून बाहेर पडले. मालकाच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यादरम्यान त्यांपैकी पाच जण आधीच गंभीर जखमी झाले होते. त्यातील एक अल्ताफ केर याच्यापर्यंत मदत पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

परिस्थिती लक्षात घेऊन मृत खलाशाच्या कुटुंबाने त्याचे पार्थिव दुबईतच दफन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारीही झाला एका जहाजावर हल्ला

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या आणखी एका जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हा प्रकार 'अस्वीकारार्ह' असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयानं या जहाजाचं नाव 'हाजी अली' असल्याची माहिती दिली आहे.

ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी सकाळी भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर झालेला हल्ला अस्वीकारार्ह आहे, असं गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

व्यावसायिक जहाजं आणि नाविकांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचा आम्ही निषेध करतो, असं निवेदनात म्हटलं आहे.

मंत्रालयाने पुढं सांगितलं की, जहाजावर असलेले सर्व भारतीय चालक दलाचे सदस्य सुरक्षित आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी ओमान प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

शिपिंग मंत्रालयाने काय सांगितले?

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनीही या घटनेबाबत माहिती दिली आहे.

ते सांगतात, "मी एका दुर्दैवी घटनेची माहिती देतो आहे. 'हाजी अली' नावाचे लाकडी बांधकाम असलेलं आणि मोटरवर चालणारं जहाज सोमालियाहून संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाहकडे जात होतं. 13 मे 2026 रोजी सकाळी ओमानच्या समुद्री हद्दीत या जहाजावर कथित हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि नंतर ते बुडलं."

मुकेश मंगल सांगतात, "जहाजावर असलेले चालकदलाचे सर्व 14 सदस्य ओमान कोस्ट गार्डने सुरक्षितपणे वाचवलं असून त्यांना ओमानमधील डिब्बा बंदरावर नेण्यात आले आहे. चालकदलातील सर्वजण सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे."

या घटनेव्यतिरिक्त मागील 72 तासांत कोणत्याही भारतीय जहाजावर किंवा भारतीय चालकदल असलेल्या जहाजावर अन्य कोणतीही घटना घडल्याची माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सर्व भारतीय आणि अन्य जहाजांवर कार्यरत असलेले भारतीय नाविक सुरक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे?

वृत्तसंस्था एएफपीने समुद्री सुरक्षाविषयक कंपनी वेंगार्डच्या हवाल्याने सांगितले आहे की या 14 सदस्यीय चालक दलाच्या मालवाहू जहाजाचे नाव 'एमएलनी हाजी अली' असे आहे.

कंपनीनुसार, ओमानच्या लिमाह किनाऱ्याजवळ या जहाजात स्फोट झाला आणि त्यानंतर ते बुडलं. ही जागा होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिणेला आहे.

वेंगार्डने सांगितले, हे जहाज सोमालियातील फुटीरतावादी क्षेत्र सोमालीलँडमधील बेरबेरा बंदरातून संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाहकडे पशुधनाची वाहतूक करत होतं.

याच दरम्यान 'हाजी अली' नावाच्या या जहाजावर ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संशयित स्फोट झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वेंगार्डनुसार जहाजाला आग लागल्यानंतर चालक दलाला जहाज सोडावं लागलं आणि त्यानंतर जहाज बुडलं

इंडिया टुडेच्या माहितीनुसार 'हाजी अली' या जहाजाची गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील सलाया बंदरावर नोंदणी करण्यात आलेली आहे. हे जहाज पहाटे साडेतीनच्या सुमारास ओमानच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळील लीमा परिसरातून जात असताना त्याला स्फोटक वस्तूने धडक दिली.

स्फोटानंतर जहाजाला आग लागली आणि त्याचा तोल बिघडला. त्यानंतर हे जहाज बुडलं.

याआधीही जहाजांवर हल्ले झाले आहेत

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर आतापर्यंत किमान दोन अन्य भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर हल्ले झाले आहेत.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताने मागील महिन्यात नवी दिल्लीतील इराणच्या राजदूताला पाचारण करून तीव्र चिंता व्यक्त केली होती.

इराणमधील संघर्षामुळे गल्फमधील व्यावसायिक जहाजांसाठी धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून अनेक जहाजांवर हल्ले झाले आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे.

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात रोखली आहे.

8 एप्रिलपासून लागू असलेल्या शस्त्रसंधीनंतर अमेरिकेने इराणी बंदरांवर आपली नौदल नाकेबंदी कायम ठेवली आहे.

गल्फमधील समुद्री मार्ग आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील या अडथळ्यांमुळे तेल आणि वायू बाजारात चढउतार वाढले आहेत.

याचा फटका भारतासारख्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशांना बसत आहे.

ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आलेले इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी या हल्ल्याचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, इराणी नौदलाशी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)