जगातील सर्वात मोठ्या डिस्काउंट सीझनची गोष्ट; 'ब्लॅक फ्रायडे सेल'मध्ये खरोखरच सूट मिळते का?

भरघोस ऑफर्स पाहून बऱ्याचदा लोक अशा वस्तूही खरेदी करतात ज्या घेण्याचा त्यांचा आधी कोणताही विचार नसतो. (प्रतीकात्मक फोटो)
फोटो कॅप्शन, भरघोस ऑफर्स पाहून बऱ्याचदा लोक अशा वस्तूही खरेदी करतात ज्या घेण्याचा त्यांचा आधी कोणताही विचार नसतो. (प्रतीकात्मक फोटो)
    • Author, मजदी अल-कसूस
    • Role, बीबीसी न्यूज अरेबिक
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

आपल्याला पाहिजे असते एकच वस्तू म्हणून दुकानात जातो खरं, पण बिलिंग काउंटरपर्यंत पोहोचेपर्यंत ट्रॉलीत 10 वस्तू कधी जमा होतात हे कळतही नाही. असं का होतं याचा आपण साधा विचार तरी करतो का?

तर याचं उत्तर आहे, दुकानात मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेला 'सेल' हा शब्द! तो दिसला की आपला ताबा सुटतोच. पण यात तुमची काहीच चूक नाही. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर उगाच शंका घेऊ नका. कारण आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेण्यासाठीच हा सीझन म्हणजे खरेदीचा हंगाम खूप विचारपूर्वक तयार केला गेला आहे.

दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी अरब देशांतील लाखो ग्राहकांच्या नजरा दुकानांकडे आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सकडे लागलेल्या असतात. कंपन्या 'व्हाईट फ्रायडे'च्या नावाखाली ज्या मोठ्या ऑफर्स आणि सवलती जाहीर करतात, त्याचीच ते आतुरतेने वाट पाहत असतात.

या काळात काही वस्तूंवर तर तब्बल 70 टक्के किंवा त्याहूनही जास्त सूट मिळते. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी या भागातील वेगवेगळ्या देशांतील दुकानं आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्समध्ये जणू काही एकमेकांशी चढाओढच लागलेली असते.

खरं तर हाच काळ जगातील प्रसिद्ध शॉपिंग सीझन म्हणजेच 'ब्लॅक फ्रायडे'च्या सोबत येतो. याला जगातील सर्वात मोठ्या सेल आणि विक्रीच्या पर्वणींपैकी एक मानलं जातं. पण अमेरिकेत ज्याला 'ब्लॅक फ्रायडे' म्हणतात, त्यालाच बहुतांश अरब बाजारपेठांमध्ये 'व्हाईट फ्रायडे' का म्हटलं जातं? आणि हा खरेदीचा सीझन जगभरात इतका मोठा कसा काय बनला?

कशी सुरू झाली ही कहाणी?

अरब बाजारपेठांमध्ये आज 'व्हाईट फ्रायडे' हे नाव चांगलंच लोकप्रिय झालं असलं तरी याची खरी सुरुवात जगभरात 'ब्लॅक फ्रायडे' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शॉपिंग सीझनपासूनच झाली होती.

याची पाळंमुळं अमेरिकेत आहेत. याचा थेट संबंध 'थँक्सगिव्हिंग'च्या दुसऱ्या दिवसाशी आहे जो दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या शुक्रवारी येतो. मग अरब देशांत याचं नाव का बदललं? तर तिथल्या काही दुकानांनी आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्म्सनी 'ब्लॅक फ्रायडे' ऐवजी 'व्हाईट फ्रायडे' हे नाव जाणीवपूर्वक निवडलं.

तिथली सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना अधिक आपलंसं आणि योग्य वाटेल असं नाव देण्यासाठी हा बदल केला गेला. अर्थात यामागची व्यावसायिक संकल्पना मात्र तीच ठेवण्यात आली.

मात्र या अमेरिकन नावाची गोष्ट खरेदीच्या या पर्वापेक्षाही खूप जुनी आहे. 'ब्लॅक फ्रायडे' या शब्दाचा सर्वात पहिला वापर 1869 मध्ये झाला होता. त्या वेळी अमेरिकेच्या सोन्याच्या बाजारपेठेत एक मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं.

2 सट्टेबाजांनी संपूर्ण बाजारपेठ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांचा हा डाव फसला आणि त्यामुळे तिथे मोठी आर्थिक उलथापालथ झाली होती.

कसं पडलं 'ब्लॅक फ्रायडे' नाव?

'ब्लॅक फ्रायडे' या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे.
फोटो कॅप्शन, 'ब्लॅक फ्रायडे' या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या नावाचा खरेदीशी संबंध अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात 1950 च्या दशकात जोडला गेला. त्या काळात 'थँक्सगिव्हिंग'च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शहरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळासाठी तिथल्या पोलिसांनी पहिल्यांदा 'ब्लॅक फ्रायडे' हा शब्द वापरला होता.

कारण या दिवशी खरेदीदार आणि पर्यटक मोठ्या संख्येने शहरात जमायचे. त्यातच नेमका याच काळात अमेरिकन लष्कर आणि नौदलामध्ये दरवर्षी होणारा फुटबॉलचा सामनाही असायचा. त्यामुळे गर्दीत आणखी भर पडायची.

1960 च्या दशकात हा शब्द चांगलाच लोकप्रिय होऊ लागला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी या नकारात्मक वाटणाऱ्या नावाला सकारात्मक अर्थ देण्याचा प्रयत्न केला.

दुकानदारांच्या हिशोबाच्या वह्यांमध्ये 'काळ्या' शाईने लिहिलेले आकडे हे नफ्याचे मानले जातात, तर 'लाल' शाई तोट्याचं प्रतीक मानलं जातं. त्याच हिशोबाशी त्यांनी या नावाची सांगड घातली.

ही गोष्ट पुढे खूप गाजली आणि लोकांच्या पसंतीसही उतरली. पण या नावाची खरी ऐतिहासिक सुरुवात मात्र यातून झालेली नव्हती.

व्यापाऱ्यांनी नंतरच्या काळात लावलेला हा एक निव्वळ व्यावसायिक अर्थ होता. त्यामुळे हे नाव लोकप्रिय होण्यास मोठी मदत झाली.

अशा प्रकारे सुरुवातीला ज्या 'ब्लॅक फ्रायडे'ची ओळख आर्थिक संकट आणि तुफान गर्दीशी जोडलेली होती तोच दिवस हळूहळू जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक पर्वणींपैकी एक बनला.

जगभरात हा इतका मोठा ट्रेंड कसा बनला?

सेलचा हा हंगाम आता जगभरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतो.
फोटो कॅप्शन, सेलचा हा हंगाम आता जगभरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतो.

'ब्लॅक फ्रायडे'ची सुरुवात अमेरिकन बाजारपेठेशी जोडलेली असली, तरी हा ट्रेंड फार काळ केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिला नाही.

आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा विस्तार, शॉपिंग मॉल्सची वाढती संख्या आणि त्यानंतर ऑनलाइन खरेदीचा झालेला वेगवान विकास या सगळ्यामुळे खरेदीचा हा हंगाम जगाच्या कानाकोपऱ्यातील बाजारपेठांपर्यंत जाऊन पोहोचला.

हाच ट्रेंड जेव्हा अरब देशांत पोहोचला तेव्हा तिथल्या अनेक दुकानांनी आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्म्सनी याला 'व्हाईट फ्रायडे' हे नाव दिलं. मात्र याचं व्यावसायिक स्वरूप मूळ संकल्पनेसारखंच कायम राहिलं.

या काळात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणं आणि कपड्यांवर अक्षरशः थक्क करून सोडणाऱ्या ऑफर्स आणि भरघोस सूट दिली जाते.

अरब देशांमध्ये हा ट्रेंड खऱ्या अर्थाने रुजवला तो ई-कॉमर्स कंपन्यांनी. दुकानांच्या लांबच लांब रांगांत उभं राहण्याची कटकट टळली. कुठे काय स्वस्त मिळतंय हे एका क्लिकवर तपासता येऊ लागलं आणि घरबसल्या खरेदीचा नवा पर्याय ग्राहकांच्या पसंतीस उतरला.

अरब देशांमध्ये हा ट्रेंड खऱ्या अर्थाने रुजवला तो ई-कॉमर्स कंपन्यांनी. दुकानांच्या लांबच लांब रांगांत ताटकळण्यापेक्षा वेगवेगळ्या ऑफर्स पाहत किमतींची तुलना करणं आणि घरबसल्या खरेदी करणं लोकांना जास्त सोयीचं वाटू लागलं.

आता हा सेल फक्त एका शुक्रवारपुरती उरलेली नाही. अनेक ठिकाणी हे ऑफर्स कित्येक दिवस तर काही वेळा आठवडाभर चालतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि या खरेदीच्या उत्साहाचा फायदा उचलण्यासाठी, अनेक कंपन्या ठरलेल्या दिवसाच्या आधीच आपल्या सेलला सुरुवात करतात.

खरोखरच सूट मिळते का?

कंपन्यांकडून दाखवल्या जाणाऱ्या ऑफर्सच्या खरेपणाबाबत अनेकदा शंका उपस्थित केली जाते.
फोटो कॅप्शन, कंपन्यांकडून दाखवल्या जाणाऱ्या ऑफर्सच्या खरेपणाबाबत अनेकदा शंका उपस्थित केली जाते.

अरब देशांमध्ये 'व्हाइट फ्रायडे'ची व्याप्ती जशी वाढत चालली आहे तशीच तिथल्या सरकारी यंत्रणांची करडी नजरही वाढली आहे.

ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या बोगस ऑफर्सना आळा घालण्यासाठी अनेक देशांनी तपासणी आणि जनजागृती मोहीम तीव्र केली आहे.

सवलती आणि ऑफर्सबाबत घालून दिलेल्या नियमांचं दुकानदार काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही, याची पडताळणी या मोहिमेतून केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन आणि यूएई या देशांचा समावेश आहे.

'ब्लॅक फ्रायडे' किंवा 'व्हाइट फ्रायडे'च्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र या सवलती खरंच किती खऱ्या आहेत यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

यामागचं मुख्य कारण म्हणजे काही दुकानदारांची भुलवणारी मार्केटिंगची पद्धत. यामुळे ग्राहकांना आपल्याला खूप मोठी बचत होत असल्याचा भास होतो पण प्रत्यक्षात मात्र त्यांना तितका फायदा होत नाही.

ब्रिटनमधील ग्राहक हक्क संरक्षण संस्था 'Which?' ने 24 नोव्हेंबर 2026 रोजी एक अभ्यास प्रसिद्ध केला. या अभ्यासात संस्थेने घरगुती उपकरणं, टेक्नॉलॉजी आणि आरोग्यविषयक साहित्यासह एकूण 756 उत्पादनांच्या किमतींचा बारकाईने अभ्यास केला.

ही पाहणी 8 ऑनलाइन स्टोअर्सवर करण्यात आली असून 2025 च्या 'ब्लॅक फ्रायडे' सीझनमध्ये तब्बल 2.5 लाखांहून अधिक किमतींतील चढ-उतारांवर लक्ष ठेवण्यात आलं होतं.

या अभ्यासातून असं समोर आलं की, केवळ 22 टक्के वस्तूंच्या किमतीच 'ब्लॅक फ्रायडे'च्या काळात वर्षभरातल्या सर्वात कमी होत्या. तर 44 टक्के वस्तूंचे दर हे त्या वर्षातील इतर महिन्यांतल्या सर्वात कमी दरांइतकेच होते.

इतकंच नाही तर 'ब्लॅक फ्रायडे'नंतरच्या पुढच्या 6 महिन्यांतही 62 टक्के वस्तूंच्या किमती सेलच्या काळातील दरांइतक्याच किंवा त्याहूनही कमी होत्या, असं या अभ्यासात आढळून आलं.

ग्राहकांवर खरेदीचा दबाव टाकण्याचे मार्ग

सेल सीझनमध्ये ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या जाहिरातींचा अक्षरशः भडिमार केला जातो (प्रातिनिधिक फोटो)
फोटो कॅप्शन, सेल सीझनमध्ये ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या जाहिरातींचा अक्षरशः भडिमार केला जातो (प्रातिनिधिक फोटो)

मार्च 2026 मध्ये युरोपियन आयोगाने केलेल्या एका पाहणीतूनही या निष्कर्षांना दुजोरा मिळाला आहे. या पाहणीत 25 देशांतील 314 ऑनलाइन स्टोअर्सचा आढावा घेण्यात आला. यामध्ये युरोपियन महासंघातील 23 देशांसह आइसलँड आणि नॉर्वेचाही समावेश होता.

"या पाहणीतून असं समोर आलं की, 30 टक्के ऑनलाइन स्टोअर्सनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार मूळ किमतीच्या आधारे सवलतीची मोजणी केली नव्हती. तर 18 टक्के स्टोअर्सनी ग्राहकांवर घाईघाईत खरेदी करण्याचा दबाव टाकला.

'ऑफर काही क्षणांत संपेल' असा टाइमर लावणं किंवा 'मोजकाच माल शिल्लक आहे' असं दाखवणं, असे प्रकार या कंपन्यांनी केले. यातले निम्म्याहून अधिक दावे खोटे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे होते."

युरोपियन नियमांनुसार जेव्हा दुकानदार एखाद्या वस्तूवर सवलतीची जाहिरात करतात, तेव्हा त्यांना गेल्या 30 दिवसांतील त्या वस्तूची सर्वात कमी किंमत सांगणं बंधनकारक असतं.

सेलच्या आधी किमती वाढवून ठेवायच्या आणि नंतर त्या कमी करून मोठी सूट दिल्याचा देखावा करायचा. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा नियम केला आहे.

मात्र स्पेनच्या ग्राहक संरक्षण संस्थेने (OCU) केलेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे की, 2026 च्या ब्लॅक फ्रायडेपूर्वी ज्या किमतींची पाहणी केली गेली, त्यातील केवळ 6 टक्के ऑफर्सच खऱ्या असल्याचं आढळून आलं.

या पाहणीत 55 ऑनलाइन वेबसाइट्सवरील सुमारे 3,000 उत्पादनांच्या किमती तपासल्या गेल्या. यातून असं समोर आलं की, 24 टक्के उत्पादनांच्या किमती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सर्वात कमी दरांपेक्षा कमी होत्या.

पण 43 टक्के उत्पादनं त्याच काळात यापेक्षाही स्वस्तात मिळू शकले असते. कंपन्यांनी किमती सरासरी 13 टक्क्यांनी वाढवल्या, पण प्रत्यक्षात सवलत मात्र सरासरी केवळ 7 टक्केच दिली.

ऑफर्सच्या जाळ्यातून कसं वाचाल?

खरेदी करण्यापूर्वी वस्तूच्या किमती आणि इतर गोष्टी नीट तपासून पाहणं हा शॉपिंगचा उत्तम मार्ग आहे.
फोटो कॅप्शन, खरेदी करण्यापूर्वी वस्तूच्या किमती आणि इतर गोष्टी नीट तपासून पाहणं हा शॉपिंगचा उत्तम मार्ग आहे.

सेलच्या काळात धोका केवळ फसव्या किमती आणि बनावट वेबसाइट्सपुरताच मर्यादित नसतो. यामध्ये अशा मार्केटिंग तंत्रांचाही समावेश असतो जे ग्राहकांना विचार करायला वेळ न देता घाईघाईत खरेदी करायला भाग पाडतात.

लंडनमधील 'इन्स्टिट्यूट ऑफ मनी अँड मेंटल हेल्थ'चे प्रवक्ते ब्रायन सिम्पल यांनी याआधी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ऑनलाइन शॉपिंग करताना अशा गोष्टींना विरोध करणं जास्त कठीण होतं. कारण प्रत्यक्ष दुकानांच्या तुलनेत ऑनलाइन व्यापाऱ्यांना ग्राहकांवर खरेदीचा दबाव टाकणारे डावपेच वापरणं अधिक सोपं असतं.

या जाळ्यात अडकण्यापासून वाचण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. एखादी ऑफर पाहून लगेच खरेदी करण्याऐवजी संबंधित उत्पादनाची नीट माहिती घ्यावी आणि वेगवेगळ्या दुकानांवर त्याच्या किमतींची तुलना करावी असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच 'ही संधी पुन्हा मिळणार नाही' असं भासवणाऱ्या ऑफर्सच्या मागे लागून घाईघाईत खरेदी करू नये.

याशिवाय गरजेपेक्षा जास्त किंवा अविश्वसनीयरीत्या कमी असलेल्या किमतींबाबतही सावध राहायला हवं. खरेदी करण्यापूर्वी संबंधित ऑनलाइन स्टोअर खरोखर विश्वासार्ह आहे का याची खात्री करावी आणि स्वतंत्र आणि खात्रीशीर प्लॅटफॉर्म्सवर त्या उत्पादनांचे रेटिंग आणि रिव्ह्यू नक्की तपासावेत.

तुम्ही शॉपिंगसाठी इतरांचा सल्लाही घेऊ शकता, यामुळे त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. (प्रातिनिधिक फोटो)
फोटो कॅप्शन, तुम्ही शॉपिंगसाठी इतरांचा सल्लाही घेऊ शकता, यामुळे त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. (प्रातिनिधिक फोटो)

जर खरेदीचा निर्णय घेताना मनात काही शंका असेल तर दुसऱ्या कोणाचं तरी मत नक्की विचारात घ्यावं. तसंच पैसे भरताना ग्राहकांना संरक्षण देणाऱ्या पद्धतींचा वापर करणं अधिक हिताचं ठरतं. यामध्ये क्रेडिट कार्डसारख्या पर्यायांचा समावेश होतो.

आर्थिक व्यवहार नेहमी अधिकृत प्लॅटफॉर्म्स आणि ओळखीच्या पेमेंट माध्यमांद्वारेच करावेत. अनोळखी लिंक्स किंवा संशयास्पद मेसेजेसद्वारे कार्डची माहिती किंवा वैयक्तिक डेटा शेअर करणं टाळावं.

थोडक्यात काय तर, सेलमध्ये आपले पैसे वाचतील या विचाराने तुम्ही खरेदीला जाल खरे, पण हातात बिल आल्यावर कळेल की तुम्ही स्वतःचे पैसे वाचवले नाही, तर फक्त दुकानदाराचा एक ग्राहक गमावण्यापासून वाचवला आहे!

'ब्लॅक फ्रायडे' किंवा 'व्हाइट फ्रायडे' ही तुम्हाला खरोखर गरज असलेल्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची एक संधी नक्कीच असू शकते.

मात्र या निमित्ताने अशाही गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतात ज्यांची तुम्हाला गरज आहे हे याआधी तुमच्या ध्यानीमनीही नव्हतं.

त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्वतःला नक्की विचारा. तुम्हाला खरोखरच या वस्तूची गरज आहे की केवळ डिस्काउंटच्या मोहामुळे 'ही वस्तू हवीच' असं तुम्हाला वाटू लागलं आहे?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)