दोन वेळा प्राणघातक इंजेक्शन देऊनही मृत्युदंड झालेली क्रिस्टा वाचली, आता पुढे काय होणार?

क्रिस्टा पाइक
फोटो कॅप्शन, क्रिस्टा पाइक
    • Author, जेम्स फिट्झगेराल्ड
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेत हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या क्रिस्टा पाइकला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी टेनेसी प्रशासनाने प्राणघातक इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर क्रिस्टा पाइकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, आता तिचा 'जीव वाचवण्यासाठी उपचार' सुरू आहेत.

ज्या क्रिस्टा पाइकला मृत्युदंड देण्याच्या प्रयत्नावर आधीच मोठा कायदेशीर वाद झाला होता, या प्रकरणामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यात मृत्युदंड देताना नेमकं काय चुकलं, आता पुढे काय होणार आणि मृत्युदंडाची प्रक्रिया फसल्यास कैद्याला किती त्रास सहन करावा लागू शकतो, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

सध्या 50 वर्षीय असलेल्या क्रिस्टा पाइकला 1996 मध्ये 19 वर्षांच्या कोलीन स्लेमरच्या हत्येप्रकरणी मृत्युदंड सुनावण्यात आला होता. त्यावेळी पाइकने तिचा तत्कालीन प्रियकर टॅडारिल शिप याच्यासोबत मिळून कोलीनवर हल्ला केला होता.

तिला स्थानिक वेळेनुसार बुधवारी (30 सप्टेंबर) सायंकाळी मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येणार होती. या प्रकरणात बराच काळ कायदेशीर लढा सुरू होता. अखेर शेवटच्या क्षणी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तिला प्राणघातक इंजेक्शन देण्यास परवानगी दिली होती.

 पाइक आणि तिच्या प्रियकराने कोलीन स्लेमरचा छळ करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.
फोटो कॅप्शन, पाइक आणि तिच्या प्रियकराने कोलीन स्लेमरचा छळ करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.

पाइकला पेंटोबार्बिटल या औषधाची दोन इंजेक्शन्स देण्यात आली होती. पण, तिच्या वकिलांनी सांगितलं की, या इंजेक्शननंतरही तिच्या हृदयाचे ठोके सुरू होते आणि ती घोरत असल्याचा आवाजही ऐकू येत होता.

टेनेसीच्या तुरुंग विभागाने मृत्युदंड देण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचा बचाव केला. विभागाने सांगितलं की, या पद्धतीनुसार बुधवारी सायंकाळी करण्यात आलेल्या प्रक्रियेनंतर आणखी कोणतीही प्रक्रिया करायला परवानगी नाही.

एपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दुसरं इंजेक्शन दिल्यानंतरही कैदी जिवंत राहिल्यास पुढे काय करायचं, याबाबत राज्याच्या नियमांमध्ये (प्रोटोकॉल) स्पष्ट माहिती नाही.

पाइकला दिलेल्या औषधाच्या डोसमुळे तिचा मृत्यू का झाला नाही, याचं अधिकृत कारण प्रशासनाने अद्याप सांगितलेलं नाही. परंतु, वैद्यकीय तज्ज्ञांनी यामागची काही संभाव्य कारणं सांगितली आहेत.

एमोरी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. जोएल झिव्होट यांनी बीबीसीला सांगितलं की, पाइकच्या वकिलांनी त्यांना वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून या प्रकरणात सहभागी करून घेतलं होतं.

त्यांच्या मते, पाइकच्या रक्तात पेंटोबार्बिटलचं पुरेसं प्रमाण पोहोचलं नसावं. त्यामुळे तिचा श्वास थांबला नाही आणि हृदयाचं कामही बंद पडलं नसावं.

पुढे काय होणार?

पाइकला उपचारासाठी तुरुंगाबाहेरील एका वैद्यकीय केंद्रात नेण्यात आलं आहे, असं राज्याच्या कारागृह विभागाने सांगितलं आहे.

रुग्णालयात पाइकचा जीव वाचवण्यासाठी उपचार सुरू आहेत, असं तिच्या एका वकिलाने सांगितलं.

गुरुवारी (1 ऑक्टोबर) सकाळपर्यंत तिची प्रकृती नेमकी कशी आहे, हे स्पष्ट झालेलं नव्हतं.

झिव्होट यांनी बीबीसीला ई-मेलद्वारे सांगितलं, "तिच्यावर उपचार सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे तिच्या मेंदूला इजा झाली असण्याची शक्यता आहे."

कोलीन स्लेमरची आई
फोटो कॅप्शन, कोलीन स्लेमरची आई
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राज्याचे गव्हर्नर बिल ली यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी असंही सांगितलं की, या वर्षातील आणखी एका कैद्याची होणारी ही मृत्युदंडाची शिक्षा आता नियोजित वेळेनुसार होणार नाही.

पाइकला मृत्युदंड देण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या कोलीन स्लेमरची आई मे मार्टिनेझ यांनी या सगळ्या प्रकारात खूप 'गोंधळ' झाला आहे, असं एनबीसी न्यूजला सांगितलं.

मृत्युदंडाला विरोध करणाऱ्यांनीही या घटनेवर लगेचच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय कायदेशीर संस्था 'रिप्रीव्ह'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी माया फोआ यांनी म्हटलं की, नेमकं काय चुकलं हे आपण सांगू शकत नाही. प्राणघातक इंजेक्शन (लीथल इंजेक्शन) देण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर गोपनीयता ठेवली जाते, जेणेकरून राज्याकडून एखाद्या व्यक्तीचा जीव घेताना होणारी हिंसा लपवता येईल.

पाइकला पुन्हा मृत्युदंड देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे की नाही, हे प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. पण, यापूर्वीही मृत्युदंड शिक्षा झालेल्या कैद्यांना दुसऱ्यांदा शिक्षा देण्याचा प्रयत्न झाल्याची काही उदाहरणं आहेत.

पेंटोबार्बिटल हे औषध काय आहे?

पेंटोबार्बिटल हे एक शक्तिशाली गुंगी आणणारं औषध आहे. यामुळे शरीराची आणि मज्जासंस्थेची हालचाल मंदावते. काही आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर हे औषध वापरतात. पण, जास्त प्रमाणात दिल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि मृत्युदंड देण्यासाठीही प्राणघातक इंजेक्शनच्या स्वरुपात याचा वापर केला जातो.

गेल्या वर्षी प्राणघातक इंजेक्शनमध्ये पेंटोबार्बिटलच्या वापरावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले. जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात झालेल्या अमेरिकन सरकारच्या एका आढाव्यात, या औषधामुळे अनावश्यक वेदना आणि त्रास होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती.

बायडन यांच्या सरकारने फेडरल स्तरावरील मृत्युदंडात या औषधाच्या वापरावर बंदी घातली होती. परंतु, टेनेसीसारख्या राज्यांना ही बंदी लागू होत नाही. अशा राज्यांना मृत्युदंडाची पद्धत स्वतः ठरवता येते.

अलीकडच्या काळात मृत्युदंडाच्या इंजेक्शनसाठी लागणारी काही औषधं मिळवणं राज्यांना कठीण झालं आहे. कारण औषध कंपन्या त्यांच्या औषधांचा मृत्यूसाठी वापर करण्यास विरोध करत आहेत.

टेनेसीच्या तुरुंग विभागाने पाइकच्या वकिलांनी केलेल्या या आरोपावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. वकिलांचा दावा आहे की, शिक्षेसाठी वापरलेलं पेंटोबार्बिटल 'खराब झालेलं' होतं. औषधाची मुदत संपल्यामुळे किंवा त्याची ताकद कमी झाल्यामुळे ते खराब होऊ शकतं.

तुरुंग विभागाने मात्र मृत्युदंडाच्या या पद्धतीचा बचाव केला. विभागाने एका निवेदनात म्हटलं, "या प्रक्रियेत वापरलं जाणारं प्राणघातक औषध नेहमीच प्रभावी ठरलं आहे."

असं या आधीही घडलं आहे का?

2026 मध्ये टेनेसीमध्ये मृत्युदंड देण्याचा प्रयत्न अयशस्वी होण्याची ही पहिलीच घटना नाही.

1994 मध्ये 3 जणांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या टोनी कॅरुथर्सला मे महिन्यात मृत्युदंड देण्यात येणार होता. परंतु, प्राणघातक इंजेक्शन देण्यासाठी त्याच्या शरीरातील नस सापडली नाही. त्यामुळे मृत्युदंड पुढे ढकलण्यात आला. गव्हर्नर बिल ली यांनी त्याला एक वर्षाची मुदतवाढ दिली.

2004 मध्ये घेतलेला क्रिस्टा पाइकचा फोटो
फोटो कॅप्शन, 2004 मध्ये घेतलेला क्रिस्टा पाइकचा फोटो

अमेरिकेतील इतर राज्यांमध्येही मृत्युदंडाची प्रक्रिया अयशस्वी ठरण्याच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

डेथ पेनल्टी इन्फॉर्मेशन सेंटर (डीपीआय) या मृत्युदंडाबाबत आकडेवारी आणि संशोधन करणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार, 2022 मध्ये अमेरिकेतील एक-तृतीयांशपेक्षा जास्त मृत्युदंडाची शिक्षा देताना काही ना काही गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. डीपीआय मृत्युदंडाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेत नाही.

डीपीआयच्या मते, प्राणघातक इंजेक्शनद्वारे मृत्युदंड देण्याची प्रक्रिया अयशस्वी होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.

2014 मध्ये ओक्लाहोमामध्ये घडलेल्या एका घटनेची विशेष चर्चा झाली होती. क्लेटन लॉकेटला मृत्युदंड देताना 3 औषधांचं प्राणघातक इंजेक्शन देण्यात आलं. मात्र, त्याची एक नस फुटल्यामुळे इंजेक्शन नीट काम करू शकलं नाही. त्यामुळे 20 मिनिटांनंतर मृत्युदंडाची प्रक्रिया थांबवण्यात आली. यादरम्यान लॉकेट तडफडत होता आणि तो अनियंत्रितपणे थरथरू लागला होता.

अमेरिकेतील 50 पैकी 27 राज्यांमध्ये मृत्युदंड कायद्यानुसार अस्तित्वात आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेचे समर्थन करणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी मृत्युदंडावरील स्थगिती उठवली. त्यामुळे आता अमेरिकेच्या फेडरल सरकारलाही मृत्युदंडाची शिक्षा देता येते. पण, त्यानंतर आतापर्यंत फेडरल सरकारने प्रत्यक्षात कोणातीही मृत्युदंडाची अंमलबजावणी केलेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)