जीवघेणी भीती, किंकाळ्या आणि रक्त; प्रवाशांनी सांगितलं, दुबई-इस्रायल विमानात नेमकं काय घडलं

फोटो स्रोत, Getty Images
'फ्लायदुबई'चं FZ1073 विमान दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जात असताना अवघ्या दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात 17 हजार फूट (सुमारे 5,200 मीटर) खाली आलं.
त्यानंतर विमान सौदी अरेबियाकडे वळवण्यात आलं आणि तिथं उतरवण्यात आलं. विमानात नेमकं काय घडलं, हे त्या क्षणी तरी नीटसं कळलं नाही. मात्र, विमान उतरल्यानंतर प्रवाशांनी आतील घटनांचं वर्णन केलं.
एका प्रवाशानं सांगितलं की, संपूर्ण विमानात भयानक किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यानंतर तीन ते पाच जणांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला ताब्यात घेतलं.
दुसऱ्या एका प्रवाशानं सांगितलं की, त्यांनी चाकू घेऊन हल्ला करणाऱ्या हल्लेखोराकडून विमानाचा ताबा घेतला. दरम्यान, मागच्या बाजूला असलेले इतर दोन वैमानिक पुढे आले आणि त्यांनी विमान सुखरूपपणे लँड करण्याची जबाबदारी स्वीकारली.
इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.
तिथं 'फ्लायदुबई'च्या विमानातून परतलेल्या प्रवाशांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती.
लोकांनी इस्रायली झेंडे फडकवले आणि टर्मिनलमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचं उत्साहानं स्वागत केलं.
'हे रक्त त्याचं आहे का?'
विमानात घडलेल्या घटनेबद्दल प्रवाशांनी अनेक हृदयद्रावक गोष्टी सांगितल्या आहेत.
'बीबीसी न्यूजनाइट'शी बोलताना, विमानातच असलेल्या अल्मोग इटाली यांनी विमानाच्या वेगानं खाली उतरण्याच्या अनुभवाची तुलना रोलरकोस्टर राईडच्या अनुभवाशी केली.
"अचानक विमान रोलरकोस्टरप्रमाणे खूप वेगानं खाली पडू लागलं होतं, जणू काही त्यावर प्रचंड 'जी-फोर्स'चा परिणाम होत होता," असं इटालीनं सांगितलं.
त्यांनी म्हटलं की, "विमान 20 ते 30 सेकंद वेगानं खाली पडत होतं. यानंतर विमान काही काळासाठी पुन्हा स्थिर झालं आणि मग पुन्हा खाली पडू लागलं."

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा विमान दुसऱ्यांदा खाली येऊ लागलं, तेव्हा त्यांनी काही लोकांना 'कॉकपिटच्या दिशेनं धावताना' पाहिलं.
"एका पायलटनं दुसऱ्याला थांबवलं आणि काही प्रवासी व क्रू सदस्यांनी त्याच्यावर मात करून त्याला खाली पाडलं, असं वाटतंय," असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी म्हटलं की, "फक्त तीन-चार प्रवासी जे पायलटला ताब्यात घेत होते, ते जखमी झाले. त्यामुळेच, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसल्या असतील. पण इतर प्रवासी जखमी झाले नाहीत. त्या तीन-चार अत्यंत धाडसी लोकांनाही फक्त किरकोळ जखमा झाल्या आहेत, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही."
"ते खूपच शूर आहेत. त्यांनी अक्षरशः आमचे प्राण वाचवले," इटाली म्हणाली.
हाइम लाझारोविच नावाच्या आणखी एका प्रवाशानं पत्रकारांना सांगितलं की, "सुदैवानं मी जिवंत आहे. या विमानप्रवासातील सर्वात भीतीदायक क्षण तो होता, जेव्हा पायलटचं विमानावरचं नियंत्रण सुटलं."
इस्रायलच्या रुग्णवाहिका सेवेतील एका पॅरामेडिकनं बीबीसीला सांगितलं की, विमानातून उतरताना अनेक लोक "खूप भावुक झाले होते आणि रडत होते".
पंतप्रधान नेतान्याहू यांनी प्रवाशांपैकी एक असलेल्या यानिव यांची भेट घेतली.
यानीव कॉकपिटमध्ये दाखल झाले होते. नेतान्याहू यांनी त्यांना 'हिरो' म्हटलं.
नेतान्याहू यांनी आपल्या शर्टवरील रक्ताच्या डागाकडे बोट दाखवून विचारलं, "व्वा, हे त्याचं रक्त आहे का?" यानिवनं उत्तर दिलं, "हो, हे त्याचंच आहे."
"तुम्ही जे केले आहे ते खरोखरच अविश्वसनीय आहे," असं नेतान्याहू म्हणाले.
स्मित मच्छर यांचं धाडस
यानिव यांनी सांगितलं, "ज्या पायलटवर चाकूनं हल्ला झाला होता, तो दरवाजाच्या अगदी जवळ होता. त्यामुळे आम्हाला दरवाजा उघडणं कठीण जात होतं. मात्र, खाली कोसळण्यापूर्वी स्मित मच्छर दरवाजा उघडण्यात यशस्वी झाले होते."
ते म्हणाले, "मी आत गेलो, तेव्हा दोन्ही सीट्सच्या मध्ये हल्लेखोर दिसला. पायलट त्यांच्या जागेवर नव्हते."
"एकजण खाली पडला होता, तर दुसरा विमानातील उपकरणांजवळ होता. आणखी एक व्यक्ती माझ्यासोबत आत आली. मी हल्लेखोराला पकडले, त्याची मान पकडली आणि सर्वात आधी त्याला बाहेर ओढून आणले."
यानिव यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर विमान निकामी करण्यासाठी त्यातील उपकरणे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता.
त्यानंतर त्यांनी विमानातील इस्रायली प्रवाशांना मदतीसाठी हाक मारली. सर्वांनी मिळून हल्लेखोराला पकडून ठेवले, जेणेकरून त्याला नियंत्रणात ठेवता येईल.
यानिव यांनी विमानाचा ताबाही स्वतःकडे घेतल्याचे सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
नेतान्याहू यांना त्यांनी सांगितलं, "मी 'एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन' हा कार्यक्रम पाहतो. विमान हळूहळू सरळ होऊ लागले. त्यानंतर पायलटने मला सांगितलं की, आता तो पुन्हा विमानाचे नियंत्रण स्वतःकडे घेत आहे."
आणखी एक प्रवासी झ्विका मेनेस यांनीही हल्लेखोराला पकडण्यात मदत केल्याचे सांगितले.
ते म्हणाले, "मी आणि अन्य दोन जणांनी हल्लेखोराला त्याच्याच झिप टाय आणि मल्टिमीडिया हेडफोनच्या साहाय्यानं बांधून ठेवलं."
आणखी एक प्रवासी ओरान कोएन यांनी विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, विमानातील हा प्रसंग कदाचित पाच मिनिटं चालला असेल; मात्र तो अत्यंत भयावह होता.
विमान खाली येण्यापूर्वी त्यांनी "अल्लाहू अकबर" अशी आरोळी ऐकल्याचे सांगितले. विमान उतरण्याच्या नियोजित वेळेच्या सुमारे एक तास आधी हा प्रकार घडला होता. मात्र, ही आरोळी नेमकी कोणी दिली, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
ते म्हणाले, "त्या क्षणी मला काय वाटत होते, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी 18 वर्षांचा आहे. तो अत्यंत कठीण क्षण होता. कदाचित हा प्रसंग पाच मिनिटांचा असेल, पण जणू नरकयातना सुरू होत्या. माझ्या मागे माझा भाऊ ओरडत होता की, आपण मरणार आहोत."
हे सांगताना ते भावुक झाले. त्यांनी या प्रसंगाचे वर्णन "अत्यंत वाईट क्षण" असे केले.
रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना हाइम लाझारोविच यांनी सांगितले की, ते पत्नी आणि लहान मुलासोबत विमानात होते. या प्रसंगात त्यांना आपल्या जीवाची भीती वाटत होती.
ते म्हणाले, "देवाचे आभार, मी जिवंत आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























