You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देशभरात एकाचवेळी अनेकांच्या मोबाईलवर अलर्ट का आला? जाणून घ्या कारण
भारतात एकाचवेळी अनेकांच्या मोबाईलवर एक मेसेज अलर्ट आल्यानं खळबळ उडाली.
काही सेकंद मोबाईलच्या स्क्रीनवर अचानक आलेल्या 'Extremely Severe Alerts' या अलर्टनं काहीसं भीतीचं वातावरणही निर्माण केलं. मात्र, भीतीचं कोणतंच कारण नाही.
भारत सरकारनं 29 एप्रिल 2026 रोजीच अशा प्रकारच्या मेसेजबाबत माहिती दिली होती. भारत सरकारनं काय सांगितलं होतं, हे आपण सविस्तर जाणून घेऊच. तत्पूर्वी, आता मेसेज काय आला होता, हे पाहूया.
संपूर्ण देशात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत एकाचवेळी सगळ्यांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज आला. त्यात लिहिलं होतं :
"India, launches Cell Broadcast using indigenous technology, for instant disaster alerting service for its citizens. Alert citizens, safe nation. No action is required by the public upon receipt of this message. This is a test message. -Government of India."
भारत सरकारनं काय म्हटलं होतं?
आपत्तीचा इशारा जलदगतीने देण्यासाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणालीची देशव्यापी चाचणी सुरू असल्याचं 29 एप्रिल 2026 रोजी भारत सरकारकडून सांगण्यात आलं होतं. तसंच, चाचणीच्या काळात मोबाईल फोनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील संदेश प्राप्त होऊ शकतात; त्यामुळे संदेशानुसार कोणतीही कारवाई न करण्याचे नागरिकांना आवाहनही करण्यात आलं होतं.
हे संदेश एका नियोजित देशव्यापी चाचणी सरावाचा भाग असून नागरिकांकडून कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं होतं.
भारत सरकारनं काढलेल्या पत्रकात म्हटलं, "नागरिकांपर्यंत आपत्ती संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर पोहोचेल, याची खात्री करण्यासाठी दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांच्या सहकार्याने देशभरात मोबाईल-आधारित आपत्ती संचार प्रणाली अधिक सक्षम करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे."
दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) ने विकसित केलेली एकात्मिक इशारा प्रणाली (सॅशे) एनडीएमए ने यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली सध्या भारतातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून भौगोलिकदृष्ट्या लक्ष्यित क्षेत्रांमधील मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित इशारे पोहोचवते.
"या प्रणालीचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. या प्रणालीमुळे नैसर्गिक आपत्ती, हवामानाचे इशारे आणि चक्रीवादळांच्या वेळी 19 हून अधिक भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत 134 अब्जाहून अधिक एसएमएस इशारे प्रसारित करणे शक्य झाले आहे," असाही सरकारनं या पत्रकातून दावा केला होता.
"त्सुनामी, भूकंप, वीज कोसळणे तसेच गॅस गळती किंवा रासायनिक धोके यांसारख्या मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींसारख्या वेळेच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिस्थितीत सूचनांचा प्रसार अधिक मजबूत करण्यासाठी, एसएमएस सोबत सेल ब्रॉडकास्ट (सीबी) तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. सेल ब्रॉडकास्ट प्रणालीमध्ये एका निश्चित भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी इशारे प्रसारित केले जातात. यामुळे इशारे त्याच क्षणी पोहोचण्याची खातरजमा होते," असंही अलर्टबाबत अधिक माहिती देताना सरकारनं म्हटलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)