You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवा, म्हणणं कितपत योग्य? डॉक्टर काय सांगतात?
- Author, पारा पुद्दैचा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सध्या सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ते लोकांना उष्णतेपासून वाचण्यासाठी खिशात कांदा ठेवण्याचा सल्ला देताना या व्हीडिओत दिसतात.
परंतु, हा सल्ला दिल्ल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. अनेकांनी या सहन न होणाऱ्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कांदा कसा उपयोगी ठरू शकतो, असा प्रश्न विचारला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे नुकतेच मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात 3 दिवसीय दौऱ्यावर होते. त्यांनी 26 एप्रिल रोजी त्यांच्या गुना लोकसभा मतदारसंघातील पिचोर शहरात तालुका कार्यालयाचे उद्घाटन केले.
यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
ते म्हणाले, "तुम्ही खिशात कांदा ठेवा, त्याचा काही त्रास होणार नाही. मी माझ्या गाडीत एसी वापरत नाही आणि एसीच्या वातावरणात बसतही नाही."
"मे-जून महिन्यात तापमान 51 अंश सेल्सियस असलं तरी मी असाच राहतो. जर कोणी विचारलं तर मी म्हणतो, ही चंबळची कातडी आहे."
26 एप्रिल रोजी पिचोरमध्ये तापमान 44 अंश सेल्सियस नोंदवले गेलं होतं. त्या दिवशी या भागात तीव्र उष्णता राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला होता.
उन्हाळ्यातील उष्णतेपासून शरीर वाचण्यासाठी खिशात कांदा ठेवणे उपयुक्त ठरतं आणि हे जुने घरगुती उपाय आहेत, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं.
सभेला संबोधित करताना ते म्हणाले, "मी जरी तरुणासारखा दिसत असलो, तरी माझे विचार जुन्या काळातील व्यक्तीसारखे आहेत. आयुर्वेदाचा विकास होत आहे, आपण ते विसरू नये."
ज्योतिरादित्य शिंदे जेव्हा त्यांच्या खिशातून कांदा काढून दाखवत होते, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीनेही आपल्या खिशातून कांदा काढून त्यांना दाखवला.
त्यांनी याचा व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, "आजच्या आधुनिक युगात प्रत्येकजण फोन घेऊन फिरतो."
इंटरनेटवर लोक या व्हीडिओला ट्रोल करत आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे हे सोशल मीडियावर त्यांच्या मंत्रालयाच्या बैठकांचे व्हीडिओ पोस्ट करत असतात. अशाच एका पोस्टमध्ये एसीसारख्या वातावरणातील फोटोवर एक युजरने म्हटले, "ते कांदा घेऊन उष्णतेची तयारी करत आहेत."
कुंदनसिंह नावाच्या युजरने म्हटलं, "मी तुम्हाला 5 ते 10 किलो कांदे पाठवतो. कृपया तुमच्याकडे असलेला एसी माझ्या घरी पाठवा."
शैलेंद्रसिंह नावाच्या युजरने पोस्ट केलं, "आमच्या घरी 2 किलो कांदे आहेत आणि या 45 अंश तापमानात मी जम्मू-काश्मीरमध्ये आहे, असं मला वाटतं."
डॉक्टर काय म्हणतात?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितलं की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये तापमान नेहमीपेक्षा जास्त नोंदलं जात आहे.
डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, खिशात कांदा ठेवण्यासारख्या गोष्टींनी उन्हाळ्याच्या उष्णतेपासून संरक्षण होणार नाही. दिवसाचे तापमान वाढले की, काळजी घ्यावी लागते, अन्यथा उष्माघाताचा गंभीर धोका उद्भवू शकतो.
हैदराबादचे डॉ. रमणय्या यांनी बीबीसीला सांगितलं की, खिशात कांदा ठेवण्याचा सूर्याशी काहीही संबंध नाही. सूर्य शरीरावर सर्व बाजूंनी परिणाम करतो. सूर्याची तीव्रता वाढली की, शरीरातील पाणी घामाद्वारे कमी होते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणं आवश्यक आहे. पाणी न पिल्याने किडनी स्टोन आणि इतर आरोग्य समस्या जाणवू शकतात.
'खिशात कांदे ठेवल्यास सूर्याचा शरीरावर परिणाम होत नाही' हा दावा चुकीचा आहे, असं युनानी आणि होमिओपॅथिक डॉक्टरही सांगतात.
होमिओपॅथिक डॉक्टर शगुफ्ता यांनी बीबीसीला सांगितलं, "ग्रामीण भागात अशा अनेक समजुती आहेत. खिशात कांदा ठेवल्याने सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळतं याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. उन्हाळ्यातील सनबर्नसारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे."
त्या म्हणाल्या, "एक म्हण आहे की, कांद्याचं काम आईसुद्धा करू शकत नाही, पण तो फक्त स्वयंपाकात उपयोगी आहे, उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी नाही. उन्हाळ्यात त्वचा जळू नये याची काळजी घ्यावी लागते. विशेषतः डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचं आहे."
युनानी डॉक्टर तस्नीम यांनी बीबीसीला सांगितलं, "युनानी वैद्यकशास्त्रात कांद्याचा उपयोग सर्दी-तापामुळे होणाऱ्या खोकल्याच्या उपचारासाठी केला जातो. कफ असलेल्या खोकल्यासाठी तो औषध म्हणून वापरला जातो. पण, खिशात कांदा ठेवल्याने उष्णता कमी होते हा एक चुकीचा समज आहे."
उष्णतेची लाट म्हणजे काय?
जर एखाद्या भागात हवामान विभागाने सांगितलेल्या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले आणि ते काही दिवस सतत राहिले, तर त्याला 'उष्णतेची लाट' म्हणतात.
भारतीय हवामान विभागानुसार, 'उष्णतेची लाट' म्हणजे साधारण 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान. ही परिस्थिती साधारण 5 दिवसांपर्यंत टिकते.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम माणसांसह अनेक प्राण्यांवरही होतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या आणि पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात.
अत्यंत तीव्र तापमानामुळे हृदयाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
उन्हात त्वचा जळाली तर काय करावे?
दिवसा तीव्र उन्हामुळे सनस्ट्रोक झाला तर रुग्णाला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेणं खूप महत्त्वाचं आहे, असं डॉक्टर सांगतात.
ज्यांना सनबर्न झाला आहे म्हणजे उन्हामुळे त्वचा भाजली असेल, तर तो भाग थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करावा आणि सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो.
डॉ. रमणय्या सांगतात की, ज्यांना सनबर्न झाला आहे, त्यांना लगेच डॉक्टरांकडे घेऊन जावं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)