You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हर्टिगो : झोपेतून उठताना येणारी चक्कर धोक्याची घंटा असते? जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून
अचानक आजूबाजूचं जग सगळं फिरायला लागलंय, शरीरावरचा ताबा सुटतोय, चालताना डगमगायला होतंय असा अनुभव काही लोकांना आलेला असतो. त्यातही सकाळी उठल्यावर हा अनुभव येतो अशी तक्रार हे लोक करत असतात.
हे फक्त गरगरणं असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण काही वेळा हे साधं चक्कर येणं नसून मेंदूशी संबंधित गंभीर आजारांचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. त्यामुळेच आपण व्हर्टिगो या आजाराची माहिती घेणार आहोत.
व्हर्टिगो हा एक अनेक लक्षणांचा समूह आहे. तो कानातील आपल्या शरीराचा तोल राखणारी यंत्रणा, मेंदूतील संतुलन नियंत्रण केंद्रं किंवा दोन्हींच्या समन्वयातील बिघाडामुळे होऊ शकतो.
बहुतेक रुग्णांमध्ये व्हर्टिगोचं कारण 'इनर इयर' (जसं की BPPV) असतं आणि ते तुलनेनं सौम्य व बरे होणारं असतं.
मात्र काही प्रकरणांमध्ये व्हर्टिगोचा उगम मेंदूत विशेषतः मेंदूचा खालचा भाग (ब्रेनस्टेम, सेरेबेलम) असतो, तसेच स्ट्रोक, TIA (Transient Ischaemic Attack), Vestibular Migraine, Multiple Sclerosis किंवा इतर न्यूरोलॉजिकल विकारांमुळे होऊ शकतो. अशा वेळी उपचारांना उशीर झाल्यास धोका वाढू शकतो.
आणखी एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्ष केला जाणारा विषय म्हणजे चिंतारोग-चिंताविकार अर्थात अँग्झायटी, पॅनिक अटॅक आणि व्हर्टिगो यांचा परस्पर असलेला संबंध.
काही रुग्णांमध्ये स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असूनही आजूबाजूला दीर्घकाळ अस्थैर्य आहे... आजूबाजूचं जग फिरत असल्याची भावना आणि भीती टिकून राहते. याला मेंदूच्या प्रक्रियात्मक बदलांचा आणि Anxiety‑related Mechanisms चा मोठा वाटा असतो.
त्यामुळे व्हर्टिगो म्हणजे काय, त्याचं निदान कधी करायचं, उपचार हे नेमकं समजून घेणं अत्यावश्यक ठरतं.
व्हर्टिगो म्हणजे काय?
व्हर्टिगो म्हणजे स्वतःच फिरत असल्याची किंवा सभोवतालचं जग फिरत असल्याची व्यक्तीला होणारी खोटी जाणीव किंवा आभास. ही 'सर्व काही' फिरत असल्याची भावना प्रत्यक्ष हालचाल करत नसतानाही येते.
अनेकदा लोक कोणत्याही चक्कर येण्याला 'व्हर्टिगो' म्हणतात; पण वैद्यकीयदृष्ट्या सर्व प्रकारचं गरगरणं म्हणजे व्हर्टिगो नसतं. लाईट-हेडेडनेस, भोवळ येईल असं वाटणं किंवा चालताना अडखळणं यामागची कारणं वेगळी असू शकतात.
व्हर्टिगोची कारणं मुख्यतः दोन गटात विभागली जातात. पहिला गट म्हणजे पेरिफेरल (कानातील समतोल यंत्रणा/व्हेस्टिब्युलर नर्व्ह) आणि दुसरा सेंट्रल (मेंदूशी संबंधित).
साधारणतः BPPV, Ménière's disease किंवा vestibular neuritis ही पेरिफेरल कारणं सर्वाधिक आढळतात आणि योग्य व्यायाम/मॅन्युव्हर्सने बहुतेक वेळा बरी होतात.
मात्र, सेंट्रल व्हर्टिगोमध्ये मेंदूचा ब्रेनस्टेम, सेरेबेलम किंवा त्यांना पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा सहभाग असतो.
स्ट्रोक किंवा TIA मध्ये अचानक, वेगाने वाढणारा व्हर्टिगो, दुहेरी दिसणं, बोलण्यात अडचण, हात‑पाय अशक्त होणं, चालता न येणं अशी लक्षणं दिसू शकतात आणि ती वैद्यकीय क्षेत्रात आणीबाणीची वेळ समजली जाते.
याशिवाय Vestibular Migraine, anxiety‑related dizziness आणि functional disorders मध्ये स्कॅन नॉर्मल असूनही लक्षणं टिकू शकतात. त्यामुळे व्हर्टिगो समजून घेताना केवळ स्कॅन नव्हे, तर तपशीलवार इतिहास आणि न्यूरोलॉजिकल तपासणी तितकीच महत्त्वाची ठरते.
व्हर्टिगो म्हणजे नेमकं काय? आणि साधारण चक्कर येणं म्हणजे काय आणि त्या दोन्हीत काय फरक आहे? असं विचारल्यावर मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात न्यूरोलॉजी कन्सल्टंट म्हणून कार्यरत असणारे डॉ. तुषार राऊत म्हणाले,
"व्हर्टिगो हा चक्कर येण्याचा एक विशिष्ट प्रकार आहे. यात व्यक्तीला आपण स्वतः किंवा आजूबाजूचा परिसर फिरतोय, हालचाल करतोय असा अनुभव येतो. प्रत्यक्षात आपण स्थिर असतानाही व्यक्तीला तसा अनुभव येतो. याचं कारण बहुतेक वेळा कानातील आपला तोल सांभाळणारी यंत्रणा (इनर इअर) किंवा मेंदूतील समतोलाशी संबंधित भागांमध्ये झालेला बिघाड हे असतं.
याउलट, सर्वसाधारण चक्कर हा एक व्यापक शब्द आहे. यात हलकेपणा जाणवणे, भोवळ येण्यासारखं वाटणं, तोल जाणं किंवा अस्थिर वाटणं अशा वेगवेगळ्या अनुभूती येऊ शकतात. अशा चक्कर येण्यामागे शरीरातलं पाणी कमी होणं, रक्तदाब कमी असणं, चिंता तसेच ताणतणाव अशी अनेक कारणं असू शकतात. मात्र व्हर्टिगो आढळल्यास तो सहसा व्हेस्टिब्युलर सिस्टीमशी (तोल राखणारी यंत्रणा) संबंधित समस्यांकडे निर्देश करतो."
व्हर्टिगोची सर्वात सामान्य कारणं कोणती?
व्हर्टिगोचं सर्वात सामान्य कारण म्हणजे बेनाइन पॅरॉक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो (BPPV). यात कानाच्या आतील भागातील अतिशय सूक्ष्म कॅल्शियमचे कण त्यांच्या जागेवरून सरकतात आणि शरीराच्या तोल राखण्याच्या संबंधित संकेतांमध्ये गोंधळ निर्माण करतात.
याशिवाय इतर कारणांमध्ये:
- व्हेस्टिब्युलर न्युरायटिस यात बहुतेकदा व्हायरल संसर्गानंतर येणारी कानातील नसांची सूज कारणीभूत असते.
- मेनियर्स डिसीजमध्ये कानातल्या द्रवाच्या असंतुलनामुळे होणारा त्रास; यासोबत ऐकू कमी येणं आणि कानात आवाज (टिनिटस) येणं शक्यय असतं.
- मायग्रेनशी संबंधित व्हर्टिगोही असतात.
- क्वचित प्रसंगी स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा मेंदूतील समतोल मार्गांवर परिणाम करणारे ट्यूमर यांसारख्या न्यूरोलॉजिकल आजारांमुळेही व्हर्टिगो होऊ शकतो.
अनेकांना झोपेतून उठताना किंवा मान वळवताना व्हर्टिगो का जाणवतो? हा एक अतिशय सामान्यपणे येणारा अनुभव आहे. याबद्दल लोकांच्या मनात भरपूर शंका असतात.
त्याबद्दल डॉ. तुषार राऊत सांगतात, "हे प्रामुख्याने BPPV मध्ये घडते. कानाच्या आतील भागात जागा बदललेले कॅल्शियम कण डोक्याच्या विशिष्ट हालचालींमुळे हलतात. व्यक्ती अचानक बसते, झोपते किंवा मान वळवते तेव्हा हे कण समतोल सेन्सर्सना चुकीच्या पद्धतीने उत्तेजित करतात.
यामुळे शरीराच्या स्थितीबाबत मेंदूकडे विसंगत संकेत जातात आणि काही सेकंदांपासून एक मिनिटापर्यंत आजूबाजूचं जग फिरत असल्याची भावना येते. ही अनुभूती भीतीदायक वाटली, तरी हा प्रकार बहुतेक वेळा निरुपद्रवी (benign) आणि उपचाराने नीट करण्याजोगा असतो."
डॉ. तुषार राऊत सांगतात, जर व्हर्टिगो अचानक सुरू झाला आणि त्यासोबत खालील लक्षणं दिसली, तर तो तातडीने मदत घेतली पाहिजे
- तीव्र डोकेदुखी
- हात किंवा पाय अशक्त होणं
- बोलण्यात अडचण येणं
- दुहेरी दिसणं
- शुद्ध हरपणं
- चालताना तोल जाणं
ते सांगतात, "ही लक्षणं स्ट्रोक किंवा इतर गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराची चिन्हं असू शकतात. तसेच नवीन ऐकू कमी येणं किंवा वारंवार व तीव्र उलट्या होणारा व्हर्टिगो असल्यास तात्काळ तपासणी गरजेची आहे".
हा त्रास कानाचा कधी आणि मेंदूचा कधी? कसं ओळखायचं?
व्हर्टिगो म्हणजे केवळ 'कानाचा त्रास' अशी सर्वसाधारण समजूत असली, तरी अनेकवेळा त्यामागे मेंदू किंवा मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर कारणं असू शकतात.
स्ट्रोक, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA), मल्टिपल स्क्लेरोसिस, मेंदूतील गाठी किंवा व्हेस्टिब्युलर मायग्रेन यांसारख्या स्थितींमध्ये व्हर्टिगो हा मेंदूतील संतुलन नियंत्रित करणाऱ्या केंद्रांमधील बिघाडामुळे निर्माण होतो.
स्ट्रोक किंवा TIA मध्ये येणारा व्हर्टिगो अचानक सुरू होतो, कधी तो तीव्र असतो आणि त्याबरोबर चालताना तोल न सावरणं, दुहेरी दिसणं, बोबडं बोलणं किंवा अंगातील अशक्तपणा अशी धोक्याची लक्षणे दिसू शकतात.
याउलट, बेनाइन पॅरॉक्सिस्मल पोजिशनल व्हर्टिगो (BPPV)सारख्या सौम्य प्रकारांत लक्षणं डोक्याची स्थिती बदलल्यावर येतात आणि न्यूरोलॉजिकल त्रास असल्याची चिन्हं आढळत नाहीत. हा फरक ओळखणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
परळ इथल्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी, स्ट्रोक आणि न्युरोक्रिटिकल केअर विभागाचे डायरेक्टर डॉ. पंकज अग्रवाल यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
ते म्हणाले "व्हर्टिगो प्रत्येकवेळी कानाशीच संबंधित असेल असं नाही. हे लोकांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. अचानक तीव्र व्हर्टिगो झाला आणि त्यासोबत चालताना तोल जात असेल, बोलणं अडखळत असेल किंवा डोळ्यांसमोर दुहेरी दिसत असेल, तर ते स्ट्रोकचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं."
त्यानंतर डॉ. अग्रवाल सांगतात, "आमच्याकडे ज्याप्रकारचे रुग्ण येतात त्यांचा अभ्यास करता अनेकदा मेंदूच्या मागील भागात ब्रेनस्टेम किंवा सेरेबेलममध्ये झालेल्या स्ट्रोकमध्ये फक्त व्हर्टिगो आणि चालण्यात अडचण हीच प्रमुख लक्षणं दिसतात."
"अशा रुग्णांमध्ये 'कानाचा त्रास असावा' म्हणून वेळ वाया घालवणं धोकादायक ठरू शकतं. वेळेत निदान झालं, तर स्ट्रोकचे परिणाम मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतात. त्यामुळे व्हर्टिगोसोबत कोणतीही न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसत असतील, तर ते वैद्यकीय आणीबाणीची स्थिती म्हणूनच पाहायला हवं."
अँग्झायटी आणि 'नॉर्मल स्कॅन'चा गोंधळ
अनेक रुग्ण एमआरआय किंवा सीटीस्कॅन पूर्णपणे नॉर्मल असतानाही महिनोन्महिने व्हर्टिगोचा त्रास सहन करत असतात, आणि त्यामुळे गोंधळ व भीती वाढते.
व्हेस्टिब्युलर मायग्रेन किंवा पर्सिस्टंट पोस्टुरल‑परसेप्चुअल डिझिनेस (PPPD) यांसारख्या स्थितींमध्ये मेंदू संतुलनाशी संबंधित माहितीवर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करतो, पण त्याचे ठोस संरचनात्मक बदल स्कॅनमध्ये दिसून येत नाहीत.
याशिवाय, कानामध्ये दोष नसला तरी अँग्झायटी आणि पॅनिक अटॅक मेंदूच्या संवेदनक्षमतेत वाढ करून फिरत असल्याची तीव्र भावना निर्माण करू शकतात.
त्यामुळे अशा रुग्णांमध्ये तपासणी बरोबरा लक्षणांचा कालावधी, ट्रिगर्स ओळखणं आणि मानसिक घटक समजून घेणं हेच योग्य निदानाची किल्ली ठरते.
डॉ. पंकज अग्रवाल सांगतात, "स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे रुग्णाचा त्रास खरा नाही, असा समज अजिबात करू नये. व्हेस्टिब्युलर मायग्रेन किंवा PPPD मध्ये प्रश्न हा मेंदूच्या वायरिंगचा आणि प्रक्रिया‑पद्धतीचा असतो, यात छायाचित्रात दिसणाऱ्या जखमेचा नसतो.ठ
ठअनेक रुग्ण सतत 'फिरत असल्याची' किंवा 'अस्थिर असल्याची' भावना अनुभवतात, आणि त्यामागे अँग्झायटी म्हणजे चिंता ही मोठी भूमिका बजावत असते. पॅनिक अटॅकमुळे श्वसनाचा वेग वाढतो, मेंदू अतिउत्तेजित होतो आणि संतुलनाच्या संकेतांचा गोंधळ उडतो. अशा वेळी केवळ औषधं देण्यापेक्षा रुग्णाला आजाराचं स्वरूप समजावून सांगणं, जीवनशैलीतील बदल सुचवणं आणि व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन देणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. योग्य मार्गदर्शन मिळालं, तर असे रुग्ण पुन्हा पूर्ण क्षमतेनं काम करू शकतात आणि व्हर्टिगोनं त्यांचं आयुष्य झाकोळून जात नाही ."
कोणत्या चाचण्या करणं आवश्यक?
बहुतेक प्रकरणांमध्ये व्हर्टिगोचे निदान हे सविस्तर वैद्यकीय तपासणी आणि काही सोप्या बेडसाइड चाचण्यांच्या आधारे करता येते. यामध्ये डिक्स–हॉलपाइक मॅन्युव्हर आणि हेड इम्पल्स टेस्ट यांसारख्या चाचण्यांचा समावेश असतो.
MRI किंवा CT स्कॅनसारख्या तपासण्या नियमितपणे आवश्यक नसतात. लक्षणं नेहमीपेक्षा वेगळी असतील, अतिशय तीव्र असतील किंवा मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित कारणांचा संशय येत असेल, तेव्हाच अशा स्कॅनचा सल्ला दिला जातो.
मॅन्युव्हर्स, व्यायाम आणि औषधोपचार
BPPV सारख्या अनेक प्रकारच्या व्हर्टिगोवर योग्य रिपोझिशनिंग मॅन्युव्हर्सने प्रभावी उपचार करता येतात आणि अनेकदा ते पूर्णपणे बरे होतात. काही रुग्णांमध्ये पुन्हा त्रास होऊ शकतो, पण तोही सहसा पुन्हा उपचारांनी नियंत्रणात येतो.
मात्र मेनियर्स डिसीज किंवा व्हेस्टिब्युलर मायग्रेनसारख्या काही स्थितींमध्ये दीर्घकालीन व्यवस्थापन आवश्यक असू शकतं. याचा निर्णय तुमचे डॉक्टरच घेऊ शकतात.
यात जीवनशैलीतील बदल, औषधं आणि व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन यांचा समावेश होतो. योग्य निदान आणि उपचार झाल्यास बहुतांश रुग्ण आपली लक्षणं नियंत्रणात ठेवून जीवनमान सामान्य ठेवू शकतात.
व्हर्टिगोच्या उपचारांबाबत आम्ही पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. अभिजित मंत्री यांच्याकडून माहिती घेतली.
रीपोजिशनिंग मॅन्युव्हर्स (Repositioning manoeuvres) आणि व्हेस्टिब्युलर व्यायाम औषधांच्या तुलनेत किती प्रभावी असतात? असे विचारल्यावर डॉ. मंत्री म्हणाले, रीपोजिशनिंग मॅन्युव्हर्स जसं की एप्ली मॅन्युव्हर (Epley manoeuvre) हे BPPV (Benign Paroxysmal Positional Vertigo) साठी अत्यंत प्रभावी मानले जातात. अनेक रुग्णांना केवळ एक-दोन सत्रांमध्येच वेगवान आणि दीर्घकाळ टिकणारा दिलासा मिळतो.
व्हेस्टिब्युलर व्यायाम हे दीर्घकालीन सुधारणा आणि शरीराचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात."
"त्याच्या तुलनेत, औषधं ही प्रामुख्याने लक्षणांवर तात्पुरता आराम देतात; ती व्हर्टिगोचे मूळ कारण दूर करत नाहीत आणि त्यामुळे ती इलाज (cure) ठरत नाहीत."
डॉ. अभिजित मंत्री पुढे म्हणाले, "अनेक रुग्ण फक्त औषधांवर अवलंबून राहतात, हालचाल पूर्णपणे टाळतात, किंवा योग्य मार्गदर्शनाशिवाय चुकीचे सेल्फ‑मॅन्युव्हर्स करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे लक्षणं वाढू शकतात किंवा बरं होण्यास उशीर होतो.
तसंच, योग्य निदान आणि तज्ज्ञ मार्गदर्शन न मिळाल्यामुळे व्हर्टिगोचं नेमकं कारण ओळखलं जात नाही. परिणामी, चक्कर दीर्घकाळ टिकू शकते, वारंवार परत येण्याचा धोका वाढतो, आणि रुग्णाचा बरं होण्याचा काळ लांबतो."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)