उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका; अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत कथित वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी केली होती अटक

उदयनिधी स्टॅलिन आणि तृषा कृष्णन
फोटो कॅप्शन, उदयनिधी स्टॅलिन आणि त्रिशा कृष्णन
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

द्रमुकचे नेते आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सोडलं.

पोलिसांनी त्यांना मंगळवारी (4 ऑगस्ट) रोजी चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री त्यांची सुटका करण्यात आली.

पीटीआय वृत्तसंस्थेनी सांगितले की मद्रास हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर स्टॅलिन यांची सुटका करण्यात आली.

सोमवारी (3 ऑगस्ट) उदयनिधी यांनी त्यांच्या सभेदरम्यान तामिळ अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याविरोधात कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने या प्रकरणात पोलिसांकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) तक्रार दाखल केली होती.

उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई (दक्षिण) चे अतिरिक्त पोलीस आयुक्त नरेंद्रन नायर यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

यापूर्वी सकाळी उदयनिधी स्टॅलिन यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

त्यानंतर एम. सुब्रमण्यम, ई.व्ही. वेलू, एन.आर. इलंगो आणि परंथमन यांच्यासह द्रमुकचे अनेक पदाधिकारी आणि समर्थक उदयनिधी यांच्या घरी पोहोचले.

उदयनिधी यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने द्रमुक कार्यकर्ते जमल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, अभिनेत्री त्रिशाबद्दल अवमानजनक वक्तव्य, तामिळनाडूचे विरोधीपक्ष नेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

संपूर्ण प्रकरण काय आहे?

बीबीसी तमिळनुसार, कावेरी प्रश्नावरून सोमवारी तंजावर येथे द्रमुकने टीव्हीके सरकारविरोधात आंदोलन केलं होतं.

आंदोलनादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांना कावेरी प्रश्नाबाबत चिंता नसल्याचा आरोप केला.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

ते म्हणाले, "त्यांना फक्त द्रमुकविरोधात गुन्हे दाखल करण्याचीच चिंता असते."

भाषणादरम्यान जमावाकडून घोषणा दिल्यानंतर उदयनिधी यांच्या काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला.

केवळ टीव्हीकेच नव्हे, तर इतर राजकीय पक्षही याला मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा अपमान मानत आहेत.

टीव्हीके सरकारमधील मंत्री एन. आनंद यांनी प्रश्न उपस्थित केला की, नम्रता आणि आत्मसंयम नसलेली व्यक्ती तामिळनाडूची उपमुख्यमंत्री कशी होऊ शकते? उदयनिधी हे द्रमुकच्या पूर्वीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

एन. आनंद म्हणाले की, जनता सगळं पाहत आहे. त्याचप्रमाणे अधव अर्जुना आणि राजमोहन यांच्यासह अनेक मंत्र्यांनीही उदयनिधी स्टॅलिन यांच्या भाषणाचा निषेध केला.

भाजपच्या वरिष्ठ नेत्या तामिळिसाई सौंदरराजन आणि तामिळनाडू काँग्रेसचे नेते मणिकम ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर टीका केली.

उदयनिधी यांची प्रतिक्रिया

पोलीस वाहनात नेत असताना उदयनिधी स्टॅलिन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "मी जे बोललोच नाही, ते कापून-छाटून आणि जोडून माझ्या नावाने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आज माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करण्यात आली आहे."

"मी याला घाबरणार नाही. मी कलैग्नर (करुणानिधी) यांचा वारसदार आहे, द्रमुक कुटुंबाचा सदस्य आहे आणि नेते स्टॅलिन यांचा मुलगा आहे. त्या आंदोलनात मी जवळपास 22 मिनिटं भाषण केलं होतं."

उदयनिधी म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, आपली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत आणि मेकेदातू धरणाच्या बांधकामाविरोधात आवाज उठवलेला नाही. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे."

"मी हेही म्हटलं होतं की एम.के. स्टॅलिन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. सध्या टीव्हीके लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या कामात गुंतली आहे. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री फक्त रील्सच्या दुनियेत जगत आहेत."

तंजावर (पूर्व) पोलीस ठाण्यात तक्रार

तंजावर (पूर्व) पोलीस ठाण्यात तक्रार
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टीव्हीकेकडून उदयनिधी यांच्याविरोधात कारवाईची मागणी करत तंजावर (पूर्व) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

टीव्हीकेच्या तंजावर जिल्हा महिला आघाडीच्या समन्वयक भैरवी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आंदोलनादरम्यान उपस्थित लोकांच्या घोषणांना उत्तर देत असल्याचा दावा करत उदयनिधी यांनी 'द्वयर्थी संकेत' असलेली आणि 'अपमानास्पद' वक्तव्यं केली.

तक्रारीत असंही म्हटलं की, द्रमुकच्या आयटी विंगने उदयनिधी यांच्या भाषणाचा 2 मिनिटं 39 सेकंदांचा व्हीडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या पेजवर प्रसारित केला.

तक्रारीत सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपावरून उदयनिधी स्टॅलिन आणि व्हीडिओ प्रसारित करणाऱ्या द्रमुक आयटी विंगच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर पोलीस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

द्रमुकचे कोषाध्यक्ष डी.आर. बालू यांनी उदयनिधी यांच्यावरील आरोप फेटाळून लावत म्हटलं, "उदयनिधी यांनी कोणत्याही विशिष्ट महिलेबद्दल काहीही म्हटलेलं नाही आणि माध्यमांमध्ये संपूर्ण प्रकरणाचं चुकीचं चित्रण केलं जात आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)