पॅसिफिक महासागरात शक्तिशाली चक्रीवादळ तयार, भारताला त्यापासून किती धोका?

फोटो स्रोत, Reuters
- Author, छाया काविरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
पॅसिफिक महासागराच्या वायव्येला दुजुआन हे एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण झालंय.
21 सप्टेंबर 2026 रोजी या चक्रीवादळाने जपानच्या पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीकडे वाटचाल केली.
त्यामुळे तिथल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाल्याचं जपानच्या हवामान खात्याने सांगितलं.
या चक्रीवादळाचा जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 वरही परिणाम झालाय.
चक्रीवादळाची तीव्रता बघता खेळांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, IMD
तर मेक्सिकोच्या किनाऱ्याजवळही एक चक्रीवादळ तयार झालंय. त्याला पोलो असं नाव देण्यात आलंय.
पॅसिफिक महासागरातलं या हंगामातलं हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरलंय. हे चक्रीवादळ पाचव्या श्रेणीतलं अत्यंत तीव्र आणि धोकादायक चक्रीवादळ आहे.
साधारण 285 प्रतितास वेगाने ते पुढे सरकतंय. हे चक्रीवादळ मेक्सिकोच्या नैऋत्य किनाऱ्यावरून पुढे सरकेल, त्यामुळे मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळण्याचा इशारा या भागात देण्यात आला आहे.
या चक्रीवादळांचा भारताला धोका आहे का? तर नाही. या चक्रीवादळांचा भारताला धोका नाही.
मात्र, बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन निर्माण झालं आहे. परतीच्या पावसाचाही प्रवास सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, IMD
24 सप्टेंबरला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे. म्हणजे पावसाच्या तुरळक सरी या जिल्ह्यांमध्ये बरसण्याची शक्यता आहे.
तर, 25 सप्टेंबरलाही पावसाचा जोर विदर्भात असणार आहे.
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये आहे. तर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, परभणी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर इथे पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
25 सप्टेंबरला नंदूरबार, धुळे उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत कुठेही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























