पायलटनेच केला सहकाऱ्यावर चाकूने हल्ला? दुबई-इस्रायल विमानात नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हफ्सा खलील
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
दुबईहून इस्रायलला जाणारं एक विमान वैमानिकांमधील वादानंतर सौदी अरेबियात उतरवण्यात आलं.
विमानातील एका इस्रायली प्रवाशाने पत्रकारांना सांगितलं की, क्रूने प्रवाशांकडे मदत मागितली. त्यानंतर प्रवाशांनी एका वैमानिकाला (पायलट) ताब्यात घेऊन त्याला बांधून ठेवण्यासाठी मदत केली.
फ्लाय दुबईचं हे विमान बुधवारी (30 सप्टेंबर) सकाळी रवाना झालं होतं. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडार24 नुसार, उड्डाणानंतर सुमारे 2 तासांनी विमानाने आपत्कालीन संदेश (इमर्जन्सी कोड) दिला.
काही मिनिटांनी विमानाचा हा कोड बदलून अपहरण म्हणजे हायजॅकिंगचा कोड करण्यात आला. मात्र, त्यानंतर पुन्हा तो सामान्य आपत्कालीन संकेतामध्ये बदलण्यात आला.
नाव न सांगण्याच्या अटीवर इस्रायली अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला केला. त्यांच्या मते, या पायलटचा उद्देश विमान हायजॅक करायचं होतं किंवा ते पाडायचं होतं.
परंतु, या हल्ल्यामागचा पायलटचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. याबाबत अधिकृत माहितीही अद्यापही समोर आलेली नाही.
इस्रायली प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, विमानात पायलट आणि को-पायलट यांच्यात भांडण झालं. त्यानंतर विमानातून आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला. त्यामुळे काही काळासाठी विमान हायजॅक झाल्याची शक्यता निर्माण झाली.
फ्लाइट FZ1073 ने संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. या विमानात सुमारे 150 ते 180 प्रवासी होते. यातील बहुतांश प्रवासी हे इस्रायली नागरिक होते.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट 'फ्लाइटरडार24' नुसार, उड्डाणानंतर साधारण 2 तासांनी विमानाने आधी 'स्क्वॉक कोड 7700' हा कोड पाठवला. हा सामान्य आपत्कालीन स्थितीचा संकेत असतो. काही मिनिटांनी विमानाने 7500 कोड पाठवला. हा विमान हायजॅक झाल्याचा किंवा त्यात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचा संकेत असतो. त्यानंतर विमानाने पुन्हा 7700 कोड पाठवला.

फोटो स्रोत, LightRocket via Getty Images
विमानाचा कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर जखमी
फ्लाय दुबई कंपनीने सांगितलं आहे की, या घटनेत कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.44 वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरला विमानाच्या आपत्कालीन लँडिंगचा संदेश मिळाला.
यानंतर सुमारे एक तासानंतर विमान सुरक्षितपणे रनवेवर उतरले.
प्रवाशांनी इस्रायली प्रसारमाध्यमांना सांगितलं की, सौदी अरेबियाकडे विमान वळवण्यापूर्वी एका पायलटला चाकूने जखमी करण्यात आलं होतं.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
यास्मिन नावाच्या एका महिलेनं सांगितलं की, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात तिची मुलगीही होती.
तिच्या मुलीने फोन करून सांगितलं की, विमानात कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. एक पायलट मदतीसाठी हाक मारत होता.
यास्मिन यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितलं, "विमानावरचं नियंत्रण सुटल्यासारखं वाटू लागलं. सर्व प्रवासी ओरडू लागले. आता आपला जीव वाचणार नाही, असं त्यांना वाटलं."
यास्मिन यांनी रॉयटर्सला सांगितलं की, इतर दोन पायलटांनी विमानाचा ताबा घेतला. त्याच वेळी काही प्रवासी चाकू हातात असलेल्या एका व्यक्तीच्या दिशेने धावले.
"एक मोठा आणि गंभीर अपघात टळला", असं एका इस्रायली अधिकाऱ्याने चॅनेल 12 सांगितलं.
'द जेरुसलेम पोस्ट'नेही एका निनावी इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'एक मोठा अपघात थोडक्यात टळला' असल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Jack GUEZ/AFP via Getty Images
फ्लाइटरडार24च्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीमध्ये विमानाने अचानक दिशा बदलली आणि ते वेगाने खाली येऊ लागलं. दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात विमान 17 हजार फूट म्हणजेच 5 हजार मीटरपेक्षा जास्त खाली आलं.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.21 वाजता हे विमान 34 हजार फूट उंचीवर उड्डाण करत होते.
अचानक खाली आल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी विमानाने 7 मिनिटांपर्यंत आपत्कालीन संदेश पाठवला.
सकाळी 5.40 वाजता विमान काही वेळासाठी जॉर्डनच्या हवाई हद्दीत गेलं. काही मिनिटांनी ते पुन्हा सौदी अरेबियाच्या दिशेने वळलं आणि त्यानंतर खाली उतरण्यास सुरूवात केली.
विमानाला तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर उतरायचं होतं. पण, ते उत्तर-पूर्व (ईशान्य) सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर उतरलं.
प्रवाशांनी नंतर स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं की, विमान अचानक खाली येऊ लागल्याने त्यांना आपल्या जीवाची भीती वाटू लागली होती.
'हायजॅकचा प्रयत्न नाही'
एका इस्रायली अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, पायलटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर दोघांनीही आपत्कालीन सिग्नल पाठवले होते.
पण हा सिग्नल दोघांपैकी कोणत्या पायलटने जाणूनबुजून पाठवला होता की नाही, हे लगेचच स्पष्ट झालेलं नाही.
इस्रायली वृत्तवाहिनी एन12 न्यूजचे मुख्य राजकीय विश्लेषक अमित सेगल यांनी 'एक्स'वर लिहिलं की, उड्डाणादरम्यान दोन्ही पायलटांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून येतं. यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.
सेगल यांची पोस्ट रिपोस्ट करताना इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माइक हकबी यांनी म्हटलं की, या घटनेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये, विशेषतः इस्रायलमध्ये, लोक आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पण, ही घटना यापेक्षा गंभीर निघाली नाही, हे चांगलं झालं, असंही त्यांनी म्हटलं.
'जेरुसलेम पोस्ट'च्या वृत्तानुसार, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी इस्रायली हवाई दलाने सतर्कतेचा आपला स्तर वाढवला होता.
या घटनेकडे विमान हायजॅक झाल्याचं म्हणून पाहिलं जात नाही, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
याआधी इस्रायलच्या 3 सुरक्षा अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं होतं की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या विमानाच्या घटनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
इस्रायली लष्कराने सांगितलं की, लष्करप्रमुख अयाल जमीर यांनी हवाई दलाचे कमांडर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला.
फ्लाय दुबईच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "विमानाला प्रवासादरम्यान एका घटनेला सामोरं जावं लागलं. याबाबत आणखी माहिती मिळताच ती दिली जाईल."
"आमच्या टीम्स संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत," असं प्रवक्त्यांनी सांगितलं.
फ्लाय दुबई, दुबई आणि तेल अवीवदरम्यान दररोज विमानसेवा चालवते. हा मार्ग इस्रायली नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























