गुंगीची औषधं देत 13 वर्षे लैंगिक अत्याचार; अनोळखी पुरुषांनाही बोलावत होता पती, स्वतः बनवायचा व्हीडिओ

फोटो स्रोत, Reuter
- Author, बेथ क्रुस
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
(सूचना: या बातमीत हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारांचं वर्णन आहे.)
--------------------------------------
जोआन यंगला जेव्हा जाग आली, तेव्हा ती पलंगाला बांधलेल्या अवस्थेत होती. बेशुद्ध असताना तिच्यासोबत काय भयानक घडलं होतं, याची तिला काहीच माहिती नव्हती.
त्यावेळी तिचा पती असलेल्या फिलिप यंगने आणखी कोणाला तरी 'खाली वाकायला' सांगताना तिने ऐकलं. तेव्हा बेडरूममध्ये त्यांच्याशिवाय आणखी एक व्यक्ती असल्याचं तिच्या लक्षात आलं.
जोआनला याची काहीच कल्पना नव्हती. यंगने इंटरनेटवर जाहिराती टाकून इतर पुरुषांना तिच्यावर अत्याचार करण्यासाठी बोलावलं होतं.
त्यानंतर त्याने तिला गुंगीचं औषध दिलं आणि अनेक अनोळखी पुरुषांना तिच्या बेडरूममध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करू दिले.
हे सगळं मागील 13 वर्षांपासून सुरू होतं.
बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासह अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्याने ब्रिटनमधील न्यायालयाने गुरुवारी (19 नोव्हेंबर) 4 पुरुषांना दोषी ठरवलं.
तिच्या माजी पतीनेही बलात्काराच्या अनेक आरोपांची आधीच कबुली दिली होती.

फोटो स्रोत, Swindon Advertiser
यंग हा कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा माजी नगरसेवक होता. त्याने आणि डीन हॅमिल्टन नावाच्या आणखी एका व्यक्तीने यापूर्वीच बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली होती.
या गटातील पुरुष वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे होते. त्यापैकी एक जण ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अण्वस्त्र संरक्षण प्रकल्पांवर काम करत होता, तर दुसरा 1980 च्या दशकात रेडक्रॉसचे ट्रक घेऊन रोमानियाला जात असे.
जोआनच्या प्रकरणाचं फ्रान्समधील गिसेल पेलिकॉट यांच्यावर वारंवार झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाशी बरंच साम्य आहे. हा गुन्हा 'अत्यंत गंभीर आणि अमानुष' असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
इंटरनेटवर टाकली होती जाहिरात
यंगने इंटरनेटवर या प्रकाराचं वर्णन एका वेगळ्या लैंगिक इच्छेचा भाग म्हणून केलं होतं. याला 'ककल्डिंग' म्हणतात. म्हणजे, आपल्या जोडीदाराचे इतर व्यक्तींसोबत लैंगिक संबंध सुरू असताना ते पाहण्यात लैंगिक आनंद मिळवणे.
क्रेगलिस्ट आणि ग्राइंडर यांसारख्या वेबसाइटवर टाकलेल्या जाहिरातींमध्ये जोआनचे फोटो वापरले होते. या फोटोंमध्ये ती पलंगाला बांधलेल्या अवस्थेत निपचित पडलेली दिसत होती.
क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसचे (सीपीएस) विशेष सरकारी वकील जेम्स फॉस्टर यांनी सांगितलं की, यंग पत्नीला गुंगीचं औषध (अमली पदार्थ) देत असे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हीडिओ चित्रित करत असे. तसेच, पत्नीवर अत्याचार करण्यासाठी तो इतर पुरुषांनाही आपल्या घरी बोलावत असत.
या जाहिरातीला प्रतिसाद देणाऱ्यांपैकी डीन हॅमिल्टन हा एक होता. 46 वर्षीय हॅमिल्टनने 2015 मध्ये जोआनवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.

फोटो स्रोत, Wiltshire Police
जोआनवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या इतर पुरुषांमध्ये 32 वर्षीय कॉनर सँडरसन-डॉयल, 62 वर्षीय रिचर्ड विल्किन्स, 48 वर्षीय नॉर्मन मॅक्सोनी आणि 38 वर्षीय मोहम्मद हसन यांचा समावेश आहे. जोआनला जाग आली तेव्हा यंगने हसनलाच खाली वाकायला सांगितलं होतं.
या पुरुषांनी न्यायालयात सांगितलं की, जोआन आणि यंग या दोघांचीही यासाठी संमती आहे, असं त्यांना वाटत होतं. जोआन झोपल्याचं नाटक करत आहे, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. परंतु, प्रत्यक्षात तिला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं जात असत.
फॉस्टर म्हणाले, "या सगळ्या अत्याचारांदरम्यान एकदाही कोणी जोआन यंग यांना त्यांची इच्छा काय आहे, हे विचारलं नाही. त्यांच्या इच्छेचा विचार करण्याचीही कोणी गरज वाटून घेतली नाही किंवा रस दाखवला नाही."
कायद्यानुसार, लैंगिक संबंधांसाठी संमती तेव्हाच ग्राह्य धरली जाते, जेव्हा संबंधित व्यक्ती स्वतःच्या इच्छेनं होकार देते आणि हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य व क्षमता तिच्याकडे असते.
तक्रारदार महिलेची संमती मिळवण्यासाठी आरोपीने काही प्रयत्न केले होते का आणि केले असतील तर कोणते, याची चौकशी करण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले जातात.

फोटो स्रोत, Wiltshire Police
ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठाच्या प्राध्यापिका मरियान हेस्टर म्हणाल्या की, जोआन 'स्पष्टपणे' नकार देण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्या पुढे म्हणाल्या, "महिला झोपलेल्या असताना लैंगिक संबंधांसाठी संमती देऊ शकत नाहीत."
त्या पुढे म्हणाल्या, "एखाद्या महिलेला गुंगीचं औषध देऊन पूर्णपणे बेशुद्ध केलं असेल, तरीही ती लैंगिक संबंधांसाठी संमती देऊ शकत नाही. कारण अशा स्थितीत ती स्वतः निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसते."
महिलांवरील हिंसाचाराचा अनेक वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या हेस्टर म्हणाल्या की, अशा प्रकरणांमुळे महिला आणि लैंगिक संबंधांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनाबाबत अनेक मोठे प्रश्न उपस्थित होतात.
त्या म्हणाल्या, "पुरुषांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. लैंगिक संबंध ठेवताना कोणत्या गोष्टी योग्य आहेत, असं त्यांना वाटतं आणि लैंगिक संबंधांच्या नावाखाली होणाऱ्या अशा अत्याचारांना ते सामान्य कसं मानतात, याचा विचार व्हायला हवा. ही अतिशय गंभीर समस्या आहे."
हेस्टर पुढे म्हणाल्या, "काही वेबसाइट्सवर यापूर्वीच तपास सुरू करण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये अशाच प्रकारे अत्याचार करणाऱ्या काही व्यक्तींची ओळखही पटली आहे."
"त्यामुळे अशा प्रकारची आणखी अनेक प्रकरणं घडत असण्याची शक्यता आहे," असंही त्या म्हणाल्या.
'अनेक प्रकरणांपैकी आणखी एक प्रकरण'
या प्रकरणामुळे अशा अत्याचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्सच्या भूमिकेबाबतही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
यूकेमधील पोर्ट्समाउथ विद्यापीठातील सायबर गुन्हे आणि लिंगविषयक अभ्यासाच्या प्राध्यापिका लिसा सुगियुरा यांच्या मते, महिलांवरील हिंसाचाराला सामान्य मानणारा मजकूर म्हणजेच आशय ऑनलाइन प्लॅटफॉर्मनी रोखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
त्या म्हणाल्या, "अशा वेबसाइट्सवर अनेकदा महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि त्यांच्याविरोधात अत्यंत हिंसक भाषा वापरली जाते. मग प्रश्न पडतो की, अशा वेबसाइट्सवर कोणाचंही नियंत्रण नसताना आणि कोणालाही जबाबदार धरलं जात नसताना, त्या इतक्या मोकळेपणाने कशा चालू शकतात?"
त्या पुढे म्हणाल्या, "एखादा पुरुष स्वतःच्या आणि पत्नीच्या वतीने बोलत असल्याचा दावा करतो, तेव्हा त्याच्या बोलण्यावर सरळ विश्वास ठेवायचा का, हा प्रश्नही आधी विचारायला हवा."

फोटो स्रोत, Manon Cruz/REUTERS
ब्रिटनमध्ये सध्या अशाच प्रकारच्या शेकडो संभाव्य गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं.
नॅशनल क्राइम एजन्सीने (एनसीए) हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर हाताळण्याची 'तातडीची गरज' असल्याचं म्हटलं आहे.
एनसीएच्या तपास अधिकाऱ्यांनी एका ऑनलाइन फोरमशी आणि त्यातून तयार झालेल्या इतर ग्रुपशी संबंधित 270 हून अधिक लोकांची ओळख पटवली आहे.
सरकारी वकिलांच्या मते, अशा प्रकारचे गुन्हे हे तपास अधिकाऱ्यांसमोर उभं राहिलेलं एक नवीन आव्हान आहे.
फॉस्टर म्हणाले, "पतीने पत्नीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करणं आणि इतर पुरुषांकडूनही तिच्यावर अत्याचार घडवून आणणं, हा एक वेगळ्या प्रकारचा आणि नव्याने समोर येणारा गुन्हा असल्याचं दिसून येतं."

सुगियुरा यांच्या मते, अशा प्रकारचे गुन्हे नवीन नाहीत. परंतु, इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे असे अत्याचार करणं आणि ते लपवणं खूप सोपं झालं आहे. असे गुन्हे कदाचित अनेक वर्षांपासून घडत असावेत, असंही त्या म्हणतात.
त्या म्हणाल्या, "तंत्रज्ञानामुळे लोकांना आपली खरी ओळख लपवता येते. इंटरनेटवर वेगळं रूप दाखवून प्रत्यक्ष आयुष्यात चांगली प्रतिमा ठेवता येते आणि त्याच वेळी ऑनलाइन असे भयानक गुन्हेही करता येतात."
त्या पुढे म्हणाल्या की, असे गुन्हे करणारे लोक अनेकदा मोठ्या ऑनलाइन ग्रुपमध्ये सक्रिय असतात. या ग्रुपमध्ये महिलांचा द्वेष करणाऱ्या विचारांना प्रोत्साहन दिलं जातं आणि महिलांवरील अत्याचारांचे फोटो व व्हीडिओ शेअर केले जातात.
"अशा घटना नेहमीच एखाद्या व्यक्तीपुरत्या किंवा एकट्याने घडलेल्या नसतात," असं त्या म्हणाल्या.
"अशा लोकांचे मोठे ऑनलाइन ग्रुप असू शकतात. या ग्रुपमध्ये ते एकमेकांना असे गुन्हे करण्याचे सल्ले देतात, प्रोत्साहन देतात आणि महिलांवरील अत्याचारांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ शेअर करतात."
"अशा आणखी अनेक घटना लवकरच समोर येऊ शकतात, असं मला वाटतं," असंही त्या पुढे म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





















![[ photo caption- पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक' झाल्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/660/cpsprodpb/7d68/live/83f8e360-e4c6-11f1-99a1-253766e7ad8b.jpg.webp)




