इराणनं हेलिकॉप्टर पाडल्यानंतर प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचा हल्ला; संघर्ष पुन्हा चिघळेल?

हेलिकॉप्टर पाडल्याचा आरोप करत अमेरिकेचा इराणवर हल्ला

फोटो स्रोत, US Navy

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत एक अमेरिकन हेलिकॉप्टर पाडलं आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत इराणवर हल्ले सुरू केले आहेत.

हेलिकॉप्टर पाडल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकन सैन्याने मंगळवारी (9 जून) भारतीय वेळेनुसार रात्री 2.30 वाजता हल्ले सुरू केले, असं अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम)ने सांगितले आहे.

सेंटकॉमने एका निवेदनात म्हटले आहे, "हे मिशन इराणच्या अनावश्यक आक्रमकतेला दिलेलं संतुलित उत्तर आहे."

मात्र, एका अमेरिकन अधिकाऱ्याने अमेरिकेत बीबीसीच्या सहयोगी सीबीएस न्यूजला सांगितले की, ड्रोनने जाणीवपूर्वक हेलिकॉप्टरवर हल्ला केला होता की नाही, हे स्पष्ट नाही.

इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या ताज्या हल्ल्यांबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, "लढाईत पराभव झाल्यानंतरही अमेरिकेने आमच्या ठाम भूमिकेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमची शक्तिशाली सेना कोणत्याही हल्ल्याला किंवा धमकीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जर सुरक्षित राहायचे असेल, तर आमच्या प्रदेशातून निघून जा."

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

यापूर्वी सेंटकॉमने सांगितलं होतं की, पाडण्यात आलेल्या अमेरिकन अपाचे हेलिकॉप्टरमधील दोन क्रू सदस्यांना एका अमेरिकन सी-ड्रोनने सुरक्षितपणे वाचवलं.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिलंय की, "या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. दोघेही सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तरीही या हल्ल्याला उत्तर देणे अमेरिकेसाठी आवश्यक आहे."

'अॅक्सिओस' या अमेरिकन माध्यमसंस्थेनं एका अमेरिकन अधिकाऱ्याचा संदर्भ देत म्हटलंय की, अमेरिकेने इराणच्या अनेक संरक्षण आणि रडार प्रणालींवर हल्ला केला आहे.

दरम्यान, इराणीच्या सरकारी टीव्हीचं म्हणणं आहे की, काही लोकांनी पर्शियन आखाताच्या किनारपट्टीवर स्फोट आणि हवाई संरक्षण यंत्रणांच्या हालचालींची माहिती दिली आहे. यामध्ये बंदर अब्बास, केश्म आणि सीरिक या भागांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी एबीसी न्यूजला सांगितलं की, इराणवरील प्रत्युत्तरादाखल हल्ले अतिशय कठोर आणि शक्तिशाली असतील, कारण इराणने एक अमेरिकन हेलिकॉप्टर पाडले होते.

फोनवरील मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल अमेरिकेने प्रत्युत्तर देणे "आवश्यक" आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "आम्ही सध्या प्रत्युत्तर देत आहोत. त्यांनी आमच्या हेलिकॉप्टरबाबत जे केले, त्यालाच हे उत्तर आहे. माझ्या मते हे उत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असले पाहिजे. आणि तसेच होत आहे."

ताज्या हल्ल्यांमुळे काय होईल?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल कारवाईत इराणच्या संरक्षण यंत्रणांनाही लक्ष्य केलंय.

मात्र, प्रश्न असा आहे की, युद्धविरामाच्या काळात घडलेल्या या ताज्या घटनांमुळे परिस्थितीत काही बदल होणार का?

मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका विभागासाठीच्या युरेशिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक फिरास मकसद यांनी बीबीसीला सांगितलं की, आजच्या घटना अमेरिका आणि इराण यांच्यातील "जशास तसे" स्वरूपाच्या आहेत आणि त्या पूर्ण युद्धात रूपांतरित होण्याची चिन्हे नाहीत.

ते म्हणाले, "मला वाटत नाही की लगेचच युद्ध पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे. अमेरिकेची कारवाई अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. त्यांनी इराणी किनारपट्टीवर आणि होर्मूझ सामुद्रधुनीच्या आसपास केवळ रडार आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यापलीकडे काही केलेले नाही."

"हा एक नियंत्रित संघर्ष आहे. दोन्ही पक्षांना अलीकडील मोठ्या युद्धासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी असे वाटत नाही."

फिरास मकसद यांनी सांगितलं की, इराणी नेतृत्वाचे मत आहे की ट्रम्प यांच्याकडे आता फारसे अतिरिक्त लष्करी पर्याय उपलब्ध नाहीत.

दुसरीकडे, ट्रम्प अमेरिकन जनतेला सतत सांगत आले आहेत की, करार होण्यास आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे.

मकसद म्हणाले, "हे स्पष्ट आहे की ट्रम्प घाईत नाहीत. ते आर्थिक दबावाची रणनीती वापरत आहेत. ते नाकेबंदी कायम राहू देत आहेत. इराण नेहमीप्रमाणे दीर्घकालीन खेळी खेळत आहे, अमेरिकेच्या संयमाची परीक्षा घेत आहे आणि अमेरिकेकडून वेळोवेळी काही सवलती मिळतील अशी अपेक्षा ठेवत आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)