हवामान बदलाच्या परिणामामुळे मानवाची उंची कमी होईल का?

ग्लोबल वॉर्मिंगमुळे (जागतिक तापमानवाढ) मुलांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
फोटो कॅप्शन, ग्लोबल वॉर्मिंगमुळे (जागतिक तापमानवाढ) मुलांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
    • Author, फर्नांडो डुआर्टे
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

गेल्या सुमारे 150 वर्षांत मानवाची उंची लक्षणीयरित्या वाढली आहे. पण ही वाढ कदाचित थांबू शकते, असे काही संकेत दिसत आहेत.

यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक संभाव्य कारण म्हणजे हवामान बदल असू शकतं.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे (जागतिक तापमानवाढ) हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. उष्णतेच्या लाटा (हीटवेव्ह) वाढत आहेत.

अशा परिस्थितीमुळे बाळ जन्माला येण्याआधीच त्याच्या विकासाला अडथळा येऊ शकतो, असं अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटलं आहे.

या टीमने दक्षिण आशियातील पाच वर्षांखालील सुमारे 2 लाख मुलांचा अभ्यास केला आहे.

संशोधकांचा असा अंदाज आहे की, ज्या बाळांना आईच्या गर्भात असताना गर्भावस्थेच्या प्रत्येक तिमाहीत 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि जास्त आर्द्रतेचा सामना करावा लागला, तर त्यांची उंची अपेक्षेपेक्षा सुमारे 13 टक्क्यांनी कमी असू शकते.

जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत बाळाची उंची वाढणं हे त्याच्या एकूण आरोग्य आणि विकासाचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

शेवटी आपण किती उंच वाढू शकतो हे प्रामुख्याने आपल्या जनुकीय गुणधर्मांवर, तसेच पोषण आणि आरोग्य यांसारख्या इतर घटकांवर अवलंबून असते.

या संशोधनाच्या प्रमुख लेखिका केटी मॅकमेहन यांनी सांगितलं की, "या अभ्यासातून असं दिसतं की, हवामान बदलामुळे वाढत असलेली उष्णता आणि आर्द्रता दक्षिण आशियातील पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या सरासरी उंचीवर परिणाम करू शकते आणि उंची कमी होण्याचा धोका निर्माण होतो."

त्या म्हणतात की, "जागतिक पातळीवरील चित्र अद्याप स्पष्ट नाही म्हणजेच अजून अनिश्चितता आहे. पण असं मानणं चुकीचे ठरणार नाही की, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या इतर देशांमध्येही असेच परिणाम दिसू शकतात, प्रामुख्याने ज्या भागांमध्ये आधीपासूनच तापमान आणि आर्द्रता जास्त असते."

जागतिक बँकेच्या वर्गीकरणानुसार, सुमारे 120 देश कमी आणि मध्यम उत्पन्न गटात येतात.

माणसाच्या उंचीवर परिणाम करणारा 'कॉन्सर्टिना इफेक्ट'

शास्त्रज्ञांना माहीत आहे की, मानवी इतिहासाच्या वेगवेगळ्या काळात लोकांच्या सरासरी उंचीत लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. विशेषतः मोठे बदल होत असताना, जसं की सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी शिकारी जीवनशैलीतून शेतीकडे वळताना, सुरुवातीला लोकांची सरासरी उंची कमी झाल्याचे (नकारात्मक परिणाम) काही संशोधनात दिसून आले आहे.

अलीकडेच, 2004 मध्ये अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड स्टेकेल यांनी एक महत्त्वाचं संशोधन प्रसिद्ध केलं. त्यांनी उत्तर युरोपमधील कबरींमधून मिळालेल्या 9व्या ते 19व्या शतकातील हजारो सांगाड्यांच्या उंचीच्या माहितीचे विश्लेषण केलं.

त्यातून असं दिसून आलं की, त्या काळात लोकांच्या सरासरी उंचीत चढ-उतार होत गेले. 17व्या शतकात ते सर्वात खालच्या पातळीवर गेले होते.

त्या काळात युरोप अनेक बदलांमधून गेला. शहरांची वाढ झाली आणि त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसारही वाढला. शेती उत्पादनातही बदल झाले. त्याचबरोबर 'लघु शीत युग' आले, म्हणजेच 16व्या ते 19व्या शतकादरम्यान दीर्घकाळ थंडीचे हवामान राहिले.

Caption- दक्षिण आशियामध्ये वाढत असलेली उष्ण हवा आणि वाढती आर्द्रता मुलांच्या उंचीच्या वाढीवर परिणाम करत आहे.
फोटो कॅप्शन, दक्षिण आशियामध्ये वाढत असलेली उष्ण हवा आणि वाढती आर्द्रता मुलांच्या उंचीच्या वाढीवर परिणाम करत आहे.

प्रोफेसर स्टेकेल यांनी आपल्या संशोधनात लिहिलं की, "1700 च्या दशकापर्यंत उत्तर युरोपमधील पुरुषांची सरासरी उंची सरासरी 2.5 इंचने (6.4 सेमी) कमी झाली होती. ही घट 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पूर्णपणे भरून आली नव्हती."

डॉ. अँड्रिआ रॉड्रिग्ज मार्टिनेझ या ब्रिटनमधील इम्पीरियल कॉलेज लंडनमध्ये लोकसंख्या आरोग्य संशोधक आहेत. त्यांनी मानवाच्या उंचीतील बदलांवर अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. हवामान बदलामुळे आजच्या लोकसंख्येवरही असाच परिणाम होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.

त्या सांगतात की, "संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अंदाजानुसार जगभरातील सुमारे 1 अब्ज मुले हवामान बदलामुळे 'अत्यंत धोकादायक' परिस्थितीत आहेत. त्यामुळे असं म्हणता येईल की, हवामान बदलामुळे मुलांच्या वाढीवर आणि आरोग्यावर अनेक गंभीर धोके निर्माण होतात."

डच लोकांची उंची वाढणं थांबलं आहे

20व्या शतकाकडे पाहिल्यास हे स्पष्ट होतं की जीवनातील परिस्थितींचा लोकांच्या उंचीवर परिणाम झाला आहे.

2017 मध्ये जगभरातील आरोग्य शास्त्रज्ञांच्या एका नेटवर्कने 1896 ते 1996 या काळात जन्मलेल्या 200 देशांतील पुरुष आणि महिलांच्या बायोमेट्रिक डेटाचे (शारीरिक मोजमाप) विश्लेषण प्रकाशित केले आहे.

कतारमध्ये झालेल्या 2022 च्या फिफा पुरुष विश्वचषकादरम्यान पेनल्टी शूटआऊटच्या वेळी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीसमोर डच फुटबॉलपटू आंद्रियस नोपर्ट उभा होता. त्याची उंची 203 सेमी इतकी आहे.
फोटो कॅप्शन, कतारमध्ये झालेल्या 2022 च्या फिफा पुरुष विश्वचषकादरम्यान पेनल्टी शूटआऊटच्या वेळी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीसमोर डच फुटबॉलपटू आंद्रियस नोपर्ट उभा होता. त्याची उंची 203 सेमी इतकी आहे.

या अंदाजानुसार, त्या काळात पुरुषांची जागतिक सरासरी उंची 162 सेमी वरून 171 सेमी झाली. महिलांची उंची 151 सेमी वरून 159 सेमी पर्यंत वाढली.

काही देशांमध्ये ही वाढ इतर देशांच्या तुलनेत जास्त होती. उदाहरणार्थ, इराणमधील पुरुषांची उंची 16.5 सेमीने वाढली आणि दक्षिण कोरियातील महिलांची उंची 20.2 सेमीने वाढली.

याउलट, मादागास्करच्या महिलांची उंची संपूर्ण शतकात केवळ 1.5 सेमीने वाढली आणि पाकिस्तानमधील पुरुषांची उंची फक्त 1.27 सेमीने वाढली.

इतका फरक का?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. मार्टिनेझ सांगतात की, "उंचीतील फरक प्रामुख्याने जनुकीय कारणांमुळे म्हणजे अनुवांशिकतेद्वारे समजावता येते, पण ते पोषण, पर्यावरण आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती या घटकांशीही जोडलेले असतात."

यामध्ये पौष्टिक अन्न आणि स्वच्छ पाणी मिळणे, त्याचबरोबर आजारांशी लढण्यासाठी मदत करणाऱ्या वैद्यकीय प्रगतीचा समावेश होतो, ज्यामुळे रोगांशी लढण्याची आपली क्षमता सुधारली आहे.

असे काही आकडेही आहेत जे सूचित करतात की, माणसांची सरासरी उंची आता वाढण्याऐवजी स्थिर होत आहे, किमान जगातील सर्वात उंच लोकसंख्या असलेल्या काही देशांमध्ये.

डच लोक जगातील सर्वात उंच लोक आहेत. यामागे इतिहासात सुधारित राहणीमान, चांगलं अन्न मिळणे आणि वैद्यकीय प्रगती यांसारखी कारणे आहेत.

नेदरलँड्सच्या वॅजेनिंगेन विद्यापीठातील आरोग्य आणि समाज विषयाच्या प्राध्यापक क्रिस्टीना थॉम्पसन सांगतात की, "यातून दिसून येतं की ज्या ठिकाणी राहण्याचे वातावरण चांगले आणि आरोग्यदायी असते, तेथील लोक जास्त निरोगी आणि उंच असतात."

परंतु, नेदरलँड्सच्या सांख्यिकी ब्युरोनुसार (सीबीएस) तिथे सरासरी उंची कमी झाली आहे. 1980 मध्ये जन्मलेल्या पुरुषांची उंची 19 वर्षांपर्यंत सरासरी 183.9 सेमी होती, पण 2001 मध्ये जन्मलेल्या पुरुषांची ती 182.9 सेमी झाली.

डच महिलांची सरासरी उंचीही 170.7 सेमीवरून 169.3 सेमी इतकी कमी झाली.

सीबीएसच्या एका विधानानुसार, यामागे एक कारण म्हणजे 'कमी उंची असलेल्या नवीन लोकांचं स्थलांतर आणि त्यांची इथे जन्मलेली मुले असू शकतात.' परंतु, त्याचबरोबर असंही दिसून आलं आहे की, मूळ डच वंशाच्या असलेल्या पालकांच्या मुलांची उंचीही कमी झाली आहे.

थॉम्पसन म्हणतात की, "ही घट किंवा घसरण का होत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. आहाराची गुणवत्ता कमी झाली आहे का? की बालपणातील लठ्ठपणा उंची वाढण्यामध्ये अडथळा आणत आहे?"

'उंचीचं रहस्य'

त्यामुळे जगातील अधिक विकसित देश जागतिक उंचीच्या क्रमवारीत वरच्या स्थानांवर असतात, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

पण ही क्रमवारीही बदलू शकते.

एनसीडीच्या आकडेवारीनुसार, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच लोक असलेला देश होता. परंतु, आज मात्र अमेरिकेचा पहिल्या 20 देशांमध्येही समावेश नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अमेरिकन लोकांची उंची कमी झालेली नाही. 1996 मध्ये जन्मलेले अमेरिकन पुरुष 100 वर्षांपूर्वी जन्मलेल्या त्यांच्या पूर्वजांपेक्षा सरासरी 6 सेमीपेक्षा जास्त उंच होते. पण जगाच्या इतर भागांमध्ये उंची अधिक वेगाने वाढली आहे.

अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ जॉन कॉमलोस यांना मानव शरीराच्या मापांचा इतिहास (अँथ्रोपोमेट्रिक हिस्ट्री), म्हणजे शतकानुशतके मानवी शरीराच्या आकाराचा अभ्यासाचे प्रवर्तक मानले जातात.

उंचीतील बदलाचे कारण देशातील वाढलेली सामाजिक आणि आर्थिक असमानता असल्याचे ते म्हणतात. विशेषतः अलीकडच्या काळात सर्वांना समान प्रमाणात वैद्यकीय सेवा न मिळणे, हे ते सांगतात.

"ज्या देशांमध्ये कल्याणकारी व्यवस्था आहे आणि गरीब लोकही आपल्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतात, अशा देशांच्या मागे अमेरिका पडली," असं ते सांगतात.

20व्या शतकाच्या मध्यापासून अमेरिकेत वाढलेला लठ्ठपणा, विशेषतः मुले आणि किशोरवयीनांमध्ये तो वाढला. प्रा. कॉमलोस यालाही जबाबदार ठरवतात.

सरकारी आकडे सांगतात की, गेल्या 20 वर्षांत अमेरिकेत खाण्याच्या सवयी सुधारल्या आहेत, तरीही 18 वर्षांखालील निम्म्याहून अधिक मुलं पुरेसा आणि योग्य पोषण आहार घेत नाहीत.

ते पुढे सांगतात की, "भूतकाळ आपल्याला सांगतो की एखाद्या लोकसंख्येची उंची वाढावी किंवा वाढत राहावी असं वाटत असेल, तर सर्वात आधी त्यांना योग्य आणि पुरेसं अन्न मिळणं खूप महत्त्वाचं आहे."

दोन कोरियन आणि दोन जर्मनींची कहाणी

उंचीच्या वाढीवर जीवन परिस्थितींचा प्रभाव दाखवणारे आणखी एक आश्चर्यकारक उदाहरण कोरियन लोकांचं आहे. ते 1950 च्या दशकात युद्धामुळे उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये विभागले गेले होते.

2011 मधील एका अभ्यासात सियोलच्या सुंगक्युंक्वान विद्यापीठातील संशोधकांना आढळून आलं की, उत्तर कोरियामध्ये जन्मलेल्या लोकांची उंची त्यांच्यापेक्षा अधिक समृद्ध असलेल्या दक्षिण कोरियातील लोकांपेक्षा सरासरी 8 सेमीने कमी होती.

असंच काहीसं पण कमी प्रमाणात जर्मनीमध्येही दिसून आलं. 1949 ते 1990 या 41 वर्षांत, जेव्हा जर्मनी दोन भागांत विभागला होता, त्या काळात जन्मलेल्या लोकांमध्ये हा फरक दिसून आला.

पश्चिम जर्मनीतील लोक पूर्व जर्मनीतील लोकांपेक्षा सरासरी सुमारे 1 सेंटीमीटरने जास्त उंच होते.

आपली उंची वाढणं थांबलं आहे का?

काही विकसित देशांमध्ये मानवाचा विकास आता कमाल पातळीवर पोहोचला आहे किंवा स्थिर झाल्याचे काही पुरावे आढळून आले आहेत. परंतु, विकसनशील देश जसजसे पुढे जातील तसतसा हा फरक कमी होऊन संतुलन निर्माण होऊ शकते.

आपल्या सर्वांची उंची किती असेल हे मुख्यत्वे आनुवंशिकता आणि पोषण यावर अवलंबून असते.
फोटो कॅप्शन, आपल्या सर्वांची उंची किती असेल हे मुख्यत्वे आनुवंशिकता आणि पोषण यावर अवलंबून असते.

जगातील काही मागास भागांमध्ये सामाजिक-आर्थिक परिस्थिती अजून सुधारू शकते. पण मानवामुळे होणारा हवामान बदल या सुधारणांच्या मार्गात अडथळा ठरू शकतो, अशी भीती वाढत आहे.

केटी मॅकमेहन सांगतात की, "जे लोक सर्वात जास्त आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या उष्णता आणि आर्द्रतेमध्ये राहतात, त्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यात सर्वाधिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो."

"जे लोक बाहेर काम करतात, जसं की शेतीत काम करणारे, आणि ज्यांच्याकडे एअर कंडिशनिंगची सुविधा कमी किंवा अजिबातच नाही, त्यांच्यासाठी हवामानातील बदल आधीच दिसत असलेल्या नकारात्मक परिणामांना आणखी वाढवू शकतात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)