You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
येत्या 24 तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता, केरळमध्ये कधी येणार?
येत्या 24 तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचू शकतो.
मान्सूनचा हाच वेग कायम राहिला तर 25 ते 26 मे दरम्यान तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
मात्र, पुढचे काही दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट अशी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, कोकण-गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
तसंच पुढचा आठवडाभर ईशान्य भारतात, पुढच्या 3-4 दिवसांत तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे तसंच दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आठवडाअखेर मान्सूनचं आगमन
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आता नैऋत्येकडून वारे वाहू लागले आहेत. निकोबार बेटांच्या आसपास मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. 16 मे पर्यंत इथे 'मान्सून ऑनसेट' म्हणजे मान्सूनचं आगमन होऊ शकतं, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
एखाद्या ठिकाणी वाऱ्यांची दिशा 2-3 दिवसांतील पावसाचं प्रमाण आणि तापमान याचा विचार करून तिथे मान्सूनचं आगमन झाल्याचं हवामान विभाग जाहीर करत असतो.
अंदमानमध्ये हे निकष 16 मेपर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
मॉन्सून ऑनसेट म्हणजे काय?
भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतात. सामान्यतः अंदमान-निकोबार बेटांवर 15 ते 20 मे दरम्यान आणि केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांतच पाऊस पडायला सुरुवात होते.
पण फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नाही. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.
पुढचे 4 आठवडे हवामान कसं असेल?
दर गुरुवारी भारतीय हवामान विभाग पुढच्या 4 आठवड्यांसाठीचा अंदाज जाहीर करतं.
यावेळेसच्या अंदाजानुसार 15 ते 21 मे आणि 22 ते 28 मे या दोन आठवड्यांत विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमान 42 अंश सेल्सियसच्या आसपास राहिल. तर त्यानंतरच्या 2 आठवड्यांत तापमानात घट अपेक्षित आहे.
पुढच्या 4 आठवड्यांत दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे.
22 ते 28 मे दरम्यान राज्याच्या सर्वच भागांत पावसाला सुरुवात होईल. त्यानंतरच्या दोन्ही आठवड्यांतही विशेषतः कोकणात पावसाची शक्यता आहे,
हवामानाविषयीचे ताजे अपडेट्स आणि मान्सूनविषयीची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीला फॉलो करत राहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)