You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑफिसमध्ये घुसून सर्वांसमोर तरुणीची हत्या, CCTV मध्ये कैद झालेली घटना चर्चेत; जाणून घ्या तरुणीची आई काय म्हणाली
- Author, सरबजीत सिंग धालिवाल
- Role, बीबीसी पंजाबी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
(इशारा: या बातमीतील काही तपशील तुम्हाला अस्वस्थ करू शकतात.)
मोहालीतील खासगी कंपनीत एका तरुणाने तरुणीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक त्या युवतीचा सहकारी होता आणि सर्व घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून मोहालीतील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही संपूर्ण घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मोहाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मृत तरुणीचे नाव डिंपल असून तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप हरजिंदर सिंग उर्फ हॅरी मान याच्यावर आहे.
महत्त्वाची माहिती
(आत्महत्या ही गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्ही तणावातून जात असाल तर भारत सरकारच्या हेल्पलाइन क्रमांक 18002333330 वर मदत घेऊ शकता. तसेच मित्र आणि नातेवाईकांशी संवाद साधणेही महत्त्वाचे आहे.)
कार्यालयातील कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद
कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. त्यानुसार, हरजिंदर सिंग उर्फ हॅरी मान चाकू घेऊन कार्यालयात आला आणि थेट डिंपलच्या जागेकडे जाऊन तिच्यावर हल्ला केला असे दिसते.
यावेळी डिंपल जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हरजिंदरने तिचा पाठलाग करत पुन्हा हल्ला केला.
मोहाली पोलिसांच्या माहितीनुसार, हरजिंदर सिंगने तरुणीवर हल्ला करताना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
त्यानंतर हरजिंदरने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आता तो मोहालीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले, तर हरजिंदर सिंगवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बीबीसी पंजाबीने आरोपीच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे कुटुंबीय अमेरिकेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर बातमीत अपडेट करण्यात येईल.
पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. त्यानंतर डिंपलच्या कुटुंबीयांनी पटियालामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
पटियालाची रहिवासी, मोहालीमध्ये काम
मोहालीचे डीएसपी हरसिमरन सिंग बल यांच्या माहितीनुसार, मृत डिंपल आणि आरोपी हरजिंदर सिंग उर्फ हॅरी मान हे दोघेही पटियाला शहरातील रहिवासी होते.
डीएसपी हरसिमरन सिंग बल यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहालीच्या फेज-11 मधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात घडली.
ते म्हणाले, "प्राथमिक तपासानुसार, संध्याकाळी संगणकावर काम करत असलेल्या डिंपलच्या जागेजवळ आरोपी गेला आणि तिच्यावर मागून हल्ला केला. जवळील कर्मचाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच डिंपल गंभीर जखमी झाली होती."
घटनेनंतर कार्यालयात गोंधळ उडाला आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती दिली.
बीबीसी पंजाबीच्या पथकाला कंपनीचे कार्यालय बंद आढळले. तेथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात होता. पोलिसांनी घटना घडलेल्या भागाला सील केले असून तपास सुरू केला आहे.
कुटुंबाने मुलीचा आरोपीशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले
संबंधित तरुणी आणि तरुण यांच्यात आधी संबंध होते आणि त्यातून ही घटना घडली असावी, असा आरोप कंपनीकडून झाल्याचे त्या तरुणीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पण हे आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी फेटाळले.
याबाबत कंपनीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
बीबीसी पंजाबीचे गुरमिंदर सिंग ग्रेवाल यांनी पटियालातून दिलेल्या माहितीनुसार, "डिंपलचे वडील राजकुमार यांनी आपल्या मुलीचा आरोपीशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे.
त्यांच्या मते, "कंपनी स्वतःच्या निष्काळजीपणावर पडदा टाकण्यासाठी चुकीची माहिती पसरवत आहे."
ते म्हणाले, "डिंपलने आम्हाला याबाबत कधीच काही सांगितले नाही. जर असा काही वाद होता किंवा तिला हल्ल्याची भीती होती, तर ती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात का गेली असती?"
मृत तरुणीचे नातेवाईक बलवंत राय यांनी सांगितले, "डिंपलला 2 मोठे भाऊ होते आणि ती त्यांची एकमेव बहीण होती. तिने पटियालातील लॉ युनिव्हर्सिटीतून एलएलबीचे शिक्षण घेतले होते आणि गेली 3 वर्षे मोहालीतील एका खासगी कंपनीत काम करत होती."
बलवंत राय यांच्या म्हणण्यानुसार, डिंपल दर शुक्रवारी पाटियालातील घरी येत असे आणि सोमवारी सकाळी पुन्हा मोहालीला कामासाठी जात असे. त्यांनी आरोपी तरुणाशी तिचा कोणताही संबंध असल्याचे ठामपणे फेटाळले.
ही घटनेतील आरोपी हरजिंदर सिंग पटियालाचा रहिवासी आहे. त्याच्या शेजारी राहणारे माजी पोलीस अधिकारी करमजित सिंग बाजवा यांनी सांगितले, "त्याचे घर बहुतेक वेळा बंद असते. एक महिला महिन्यातून 1-2 वेळा साफसफाईसाठी येते. त्याशिवाय त्या घरात कोणी येत-जाताना किंवा राहताना दिसले नाही."
कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
मृत डिंपलच्या आईने न्यायाची मागणी करत कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्या म्हणाल्या, "डिंपलने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी कुणीही तिची मदत केली नाही."
भाजपा नेत्या जइंदर कौर या डिंपलच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच कंपनीने योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
कुटुंबीयांनी संबंधित कंपनीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर बीबीसी पंजाबीने कंपनीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला पण सध्या कंपनी सील आहे आणि ही अमेरिकन बेस्ड कंपनी असल्याची माहिती हाती आली आहे.
व्यवस्थापनाने अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. ती आल्यानंतर बातमीत अपडेट करण्यात येईल.
महत्त्वाची सूचना :
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)