You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमिनीच्या वादातून सहा जणांची हत्या; पोलीस तपासात समोर आली दहावर्षांपूर्वीची 'ही' माहिती
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या चडचण तालुक्यातल्या गोविंदपूर गावात 29 मे रोजी झालेल्या हत्याकांडात 6 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा हिंसाचार घडला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे.
एकूण 28 जणांना हा हल्ला केला आणि त्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हा परिसर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत भीमा नदीच्या काठी आहे. चडचण तालुका हा कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात आहे.
घटना कशी घडली?
विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता गोविंदपूरमधील शेतजमिनीवर काही मजूर आणि जमीनधारक काम करत होते. त्यावेळी मोटारसायकलींवरून आलेल्या हल्लेखोरांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले.
मृतांमध्ये दुंडप्पा रेवणसिद्ध निराळे, शिवपुत्र रेवणसिद्ध निराळे, चंद्रकांत उर्फ चंदू रेवणसिद्ध निराळे, रेवणसिद्ध उर्फ राहुल दुंडप्पा निराळे, समर्थ शिवपुत्र निराळे आणि शब्बीर बाबुसाब अत्तार यांचा समावेश आहे.
तक्रारीत काय म्हटलं आहे?
या प्रकरणात मृत दुंडप्पा निराळे यांचा मुलगा चैतन्यकुमार दुंडप्पा निराळे यांनी चडचण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेत आपले वडील, काका, भाऊ आणि चुलतभाऊ यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्याचबरोबर शेतीचं काम करण्यासाठी आलेले शब्बीर बाबूसाब अत्तार यांचाही या घटनेत मृत्यू झाला.
तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी गोविंदपूर परिसरातील जमीन कायदेशीरररीत्या खरेदी केली होती.
तक्रारदाराचा आरोप आहे की जमीन खरेदीनंतर काही व्यक्तींनी त्या जमिनीवर हक्क सांगण्यास सुरुवात केली.
शेतातील कामांना विरोध, धमक्या आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये आक्षेप नोंदवण्याचे प्रयत्न होत होते.
तक्रारीनुसार, 29 मे रोजी सकाळी जमिनीवरील साफसफाईचं काम सुरू असताना कल्लणगौडा पाटील यांच्यासह 28 जण मोटरसायकलवरुन आले आणि जमिनीवरील काम थांबवावे असे सांगत त्यांच्यावर दमदाटी केली. त्यानंतर ते निघून गेले.
त्यानंतर हे लोक पुन्हा दुपारी आले. त्यांच्याकडे तलवारी, कोयते, चाकू, काठ्या आणि इतर धारदार शस्त्रांसह घटनास्थळी आले. या लोकांनी डोळ्यांत तिखटपूड फेकून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले.
हल्ला केला म्हणून कल्लणगौडा ईश्वरगौडा पाटील, त्यांचे नातेवाईक आणि साथीदार यांचा तक्रारीत समावेश आहे.
कल्लणगौडा पाटील आणि त्यांच्यासह असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या वकिलांची बाजू घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर बातमी अपडेट केली जाईल.
'विवाहाला विरोध' आणि जमिनीचा वाद
पोलिसांच्या मते, या प्रकरणाची पार्श्वभूमी जवळपास दशकभरापूर्वीच्या एका खून प्रकरणाशी जोडलेली दिसते.
संबंधित जमीन मूळतः तेली कुटुंबाच्या मालकीची होती. हे कुटुंब निवरगी गावात राहत होतं. या कुटुंबातील मुलीचा विवाह 2015 साली कल्लणगौडा पाटील यांच्या कुटुंबातील शिवानंद नावाच्या मुलाशी झाला होता. या विवाहाला कल्लणगौडा आणि त्यांच्या कुटुंबाची परवानगी नव्हती.
विवाहानंतर शिवानंदची हत्या करण्यात आली होती. त्या आरोपात पाटील यांच्या कुटुंबातील चार जणांना अटक झाली होती. 2024 साली त्यांची वरिष्ठ न्यायालयाद्वारे सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या घटनेनंतर सुमारे 25 ते 30 एकर जमीन अनेक वर्षे पडिक राहिली. स्थानिक पातळीवर वाद असल्यामुळे ही जमीन खरेदी करण्यासही अनेकजण तयार नव्हते.
सुमारे 6 महिन्यांपूर्वी चडचण येथील निराळे कुटुंबाने ही जमीन खरेदी केली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून झाडं-झुडपं हटवून शेतीसाठी जमीन तयार करण्याचं काम सुरू होतं.
निराळे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की ही जमीन वादातील असल्यामुळे निराळे कुटुंबीयांनी कल्लणगौडा यांची जमीन खरेदीसाठी परवानगी घेतली होती. जमीन खरेदी करण्यास काही हरकत नाही असे त्यांनी म्हटले होते, पण नंतर त्यांनी हरकत घेतली.
तपास कुठपर्यंत आला आहे?
पोलीस सध्या जमिनीच्या मालकीसंबंधी कागदपत्रं, दोन्ही बाजूंमधील जुने वाद, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासत आहेत.
पोलिसांनी सांगितलं तक्रारीतील सर्व आरोप हे तक्रारदाराच्या निवेदनावर आधारित आहेत.
घटनेमागील नेमकं कारण, आरोपींची भूमिका आणि हल्ल्याचं स्वरूप याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
पुढील तपास, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांनंतरच घटनेचं संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)