सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण झालीय, तरीही लोक खरेदी का करत नाहीयेत?

सोने खरेदी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अजित गढवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इराण आणि अमेरिका यांच्यात तात्पुरती शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या.

आखाती देशांत युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद अनेकदा बंद केली. तसंच असे प्रकार भविष्यातही घडू शकतील या भीतीमुळे कच्चे तेल, सोने आणि चांदीच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या.

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याचं 14 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आहे. पण याबाबतच्या अटी-शर्तींबाबत आणि 60 दिवस चर्चा सुरू राहणार आहे.

दरम्यान या घोषणनंतर आता कच्चे तेल, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झालीय.

बुधवारी (24 जून) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात गेल्या सात महिन्यांतील सर्वात मोठी घसरण झाली. चांदीच्या दरातही जानेवारीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने घट झाली आहे.

सध्या दोन्ही धातूंच्या किमती गेल्या नोव्हेंबर 2025पासूनच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटवरील माहितीनुसार, गुरुवारी (25 जून) 99.9 टक्के शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1लाख 40 हजार रुपये, तर एक किलो चांदीचा भाव 2 लाख15 हजार रुपये नोंदवला आहे.

पण यावर्षी म्हणजे जानेवारी 2026च्या अखेरीस 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 2 लाख रुपयांवर पोहोचला होता.

त्याचप्रमाणे, एक किलो चांदीचा भाव 4 लाख रुपयांहून अधिक झाला होता. तेव्हापासून दोन्ही दर सातत्याने घसरत आहेत.

जानेवारी 2026 अखेरपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जानेवारी 2026 अखेरपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला होता.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, गेल्या बुधवारी (24जून) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला. एक औंस (28.35 ग्रॅम) सोन्याचा भाव 4 हजार डॉलरच्या खाली घसरला. तर बुधवारी एकाच दिवशी सोन्याच्या भावात 3.3 टक्क्यांची घसरण झाली.

दरम्यान अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे, डॉलर वगळता इतर चलनांमध्ये सोन्याची खरेदी पूर्वीपेक्षा महाग झाली आहे.

सोन्या-चांदीच्या किमतींवर नेमका कशाचा प्रभाव?

सोने ही एक गुंतवणूकीची वस्तू मानले जाते. त्यावर कोणतेही व्याज किंवा नियमित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे, जेव्हा अमेरिकन बँकांचे व्याजदर वाढतात, तेव्हा सोन्यातील गुंतवणूक लोकांसाठी कमी आकर्षक ठरते.

जानेवारीत सोन्याचा भाव प्रति औंस 5 हजार 594 डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. त्याच्या तुलनेत आता सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे 1,600 डॉलरने घसरला आहे.

ही परिस्थिती समजून घेण्यासाठी, बीबीसीने दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

त्यांच्या मते, अमेरिकेतील व्याजदर वाढीचा या धातूंच्या किमतींवर मोठा परिणाम होतो.

गेल्या दोन दिवसांत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 6 हजार रुपयांपर्यंत घट झाली आहे.

तर चांदीच्या दरातही साडेपंधरा हजार रुपयांपर्यंत घट झाली आहे.

या संदर्भात, HDFC सिक्युरिटीजचे कमोडिटी मार्केट तज्ज्ञ सौमिल गांधी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "गेल्या आठवड्यात यूएस फेडरल बँकेची बैठक झाली. यामध्ये नवीन अध्यक्ष केविन वॉर्श यांनी व्याजदरांवर कठोर भूमिका घेतली आहे."

भारताने सोन्याची आयात कमी करण्यासाठी अलीकडेच त्यावरील करांमध्ये लक्षणीय वाढ केलीय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताने सोन्याची आयात कमी करण्यासाठी अलीकडेच त्यावरील आयात शुल्कात लक्षणीय वाढ केलीय.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गांधी पुढे म्हणाले, "गेल्या पाच वर्षांपासून अमेरिकेत महागाई उच्च पातळीवर राहिली आहे. त्यामुळे, महागाई नियंत्रणात ठेवणे हे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याच कारणास्तव अमेरिकेची फेडरल बँक या वर्षी एक किंवा दोनदा व्याजदर वाढवू शकते. व्याजदर वाढण्याच्या संकेतांमुळे गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत."

दरम्यान, डॉलर निर्देशांक सध्या 13 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. यामुळे सोने, चांदी आणि इतर औद्योगिक धातूंमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाल्याचंही, गांधी सांगतात.

बाजारातील अंदाजानुसार, अमेरिकेची मध्यवर्ती बँक यावर्षीच्या सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवू शकते.

सौमिल गांधी म्हणाले की, सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही जानेवारी महिन्यात गाठलेल्या विक्रमी पातळीनंतर मोठी घसरण झाली आहे.

ते म्हणाले, "अमेरिका आणि इराण यांच्यात 60 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे. मात्र, ती किती काळ टिकेल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे बातम्या आणि परिस्थितीनुसार येत्या काही दिवसांत सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात."

सराफांची परिस्थिती कशी आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर भारतात सोन्याची विक्री वाढेल का, या प्रश्नावर अहमदाबादच्या 'चोक्सी महाजन' या सराफ संघटनेचे सदस्य हेमंत साथवारा म्हणाले की, सोने-चांदीच्या दरात घट होऊनही सध्या ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत नाहीये.

ते म्हणाले, "सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात मंदी आहे. शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे लोकांनी आपल्या बचतीचा मोठा भाग शाळेची फी, पुस्तके आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर खर्च केला आहे. यामुळेच सध्या किरकोळ बाजारात सोन्याची विक्री कमी आहे."

सोन्यावरील आयात शुल्कातील वाढीचा या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोन्यावरील आयात शुल्कातील वाढीचा या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे.

त्यांनी असेही सांगितले की, सोने आणि चांदीच्या वाढत्या किमती तसेच त्यांच्यावरील आयात शुल्कातील वाढीमुळे व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे.

हेमंत साथवारा म्हणाले की, डॉलरच्या मजबुतीमुळे गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत.

ते म्हणाले, "जर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले, तर सोन्या-चांदीच्या किमती घसरतात. मात्र, जर व्याजदर कमी केले, तर या धातूंच्या किमती वाढतात."

लोकांना खरेदी करण्यात कमी रस का आहे?

हेमंत साथवारा यांच्या माहितीनुसार, 25 जून 2026 रोजी अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 44 हजार रुपये होता, तर एक किलो चांदीचा भाव 2 लाख19 हजार रुपये नोंदवला गेला.

याशिवाय, खरेदीच्या वेळी ग्राहकांना या किमतींवर 3 टक्के जीएसटीही भरावा लागत होता.

साथवारा पुढे म्हणाले, "सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात नवीन ऑर्डर येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सोन्याचे दागिने खरेदी करणे टाळण्याचे आवाहन केल्यापासून सोन्याच्या दागिन्यांचा खप लक्षणीयरीत्या घटला आहे. अशा परिस्थितीत, लहान दागिने उत्पादकांनाही कामाची कमतरता भासत आहे."

सहसा जेव्हा सोन्याचे भाव घसरतात तेव्हा बाजारात व्यवहार वाढतो, पण यावेळी तसे दिसत नाही, असंही निरीक्षण हेमंत साथवारा यांनी नोंदवलं.

गुंतवणुकीसाठी सोने खूप महत्त्वाचे आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुंतवणुकीसाठी सोने खूप महत्त्वाचे आहे. पण त्यातून आपल्याला नियमित व्याज किंवा परतावा मिळत नाही.

ते म्हणाले की, जेव्हा मंदीचा परिणाम इतर क्षेत्रांवरही होत आहे, तेव्हा दागिने उद्योग त्यापासून वाचू शकत नाही.

ऑगस्टमध्ये सुरू होणारा आणि दिवाळीपर्यंत चालणारा सणासुदीचा काळ व्यवसायाला चालना देऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, सध्या त्यांना सणांसाठी कोणतीही आगाऊ मागणी मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

चांदीचा भाव का घसरण्याचं नेमकं कारण काय?

यावर्षी चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. पण, आता त्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

यामागील एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता.

याशिवाय, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यामुळे चांदीवरील अतिरिक्त जोखीम प्रीमियम कमी झाला आहे.

सोन्याच्या विपरीत चांदीवरही कोणतेही निश्चित व्याज किंवा नियमित उत्पन्न मिळत नाही. त्या तुलनेत, अमेरिकी सरकारी रोखे अधिक चांगला परतावा देतात.

याच कारणामुळे अधिक नफ्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी चांदीतून पैसे काढून रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)