सिंधू संस्कृतीतील ही रहस्यमयी 'नर्तकी' कोण आहे? ती पाकिस्तानातून भारतात कशी आली?

फोटो स्रोत, NCERT
- Author, शकील अख्तर
- Role, बीबीसी उर्दू, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मोहेंजोदडोत सापडलेली ही 'नर्तकी'ची मूर्ती सध्या चर्चेत आहे.
कांस्य धातूपासून बनलेली नर्तकीची नग्न मूर्ती सिंधू संस्कृतीतील प्रमुख पुरातन वस्तूंपैकी एक मानली जाते.
अलीकडेच नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी)नं 'मधुरिमा' हे कलेचं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं.
यामध्ये साडेचार हजार वर्षे जुन्या या कांस्य मूर्तीच्या फोटोतील नग्न शरीराचं धड आणि वरच्या भागाला डिजिटल शेडिंग आणि रंगांचा वापर करून धुसर करण्यात आलं होतं.
त्यानंतर या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती.
कला आणि इतिहासाच्या तज्ज्ञांनी केलेल्या टीकेनंतर एनसीईआरटीनं हा फोटो त्याच्या मूळ रुपात ठेवण्याचं जाहीर केलं.
ही नक्की नर्तकी आहे की नाही?
मोहेंजोदडोच्या 'नर्तकी'ची ही छोटीशी मूर्ती जवळपास 10 सेंटीमीटर उंचीची आहे.
कांस्य धातूपासून बनलेली ही मूर्ती एका किशोरवयीन तरुणीची आहे. तिच्या डाव्या हातात बांगडी आहे. तर उजवा हात कमरेवर आहे. तिचे दोन्ही पाय गुडघ्यात पुढच्या बाजूस किंचित वाकलेले किंवा दुमडलेले आहेत.
कदाचित मूर्तीच्या याच शैलीमुळे पुरातत्वशास्त्रज्ञ जॉन मार्शल यांनी त्याला 'नृत्य करणारी मुलगी' (नर्तकी) असं नाव दिलं होतं.
साडेचार हजार वर्षानंतर देखील या मूर्तीची ओळख हे गूढच बनून राहिलं आहे.
यासंदर्भात लाहोर म्युझियमचे क्युरेटर एहतशाम अजीज म्हणाले, "या मुलीची मूर्ती पाहिल्यावर वाटतं की ती नृत्य करते आहे. नृत्य हे धार्मिक विधींचा एक भाग राहिलं आहे, विशेषकरून हिंदू धर्मात त्याचं महत्त्व आहे. चित्रकला, शिल्पकलेत अनेक देव नृत्य करताना दिसतात किंवा अशाच मुद्रांमध्ये असतात. नृत्य हा धार्मिक श्रद्धांचा एक भागच आहे."

फोटो स्रोत, ANI
इतिहासकार ग्रेगरी एल पॉसेल यांनी 'द इंडस सिव्हिलायझेशन' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की ही मूर्ती कोणत्याही नर्तकीचं प्रतिनिधित्व करत नाही. इतर अनेक इतिहासकारांनी देखील याला नर्तकी मानण्यास नकार दिला आहे.
'अ न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया'चे लेखक आर मुखर्जी, शोभिता पुंजा आणि टोबी सिंक्लेयर यांनी लिहिलं आहे, "मुलीच्या या मूर्तीला कदाचित तिच्या उभं राहण्याच्या शैलीच्या आधारे 'नर्तकी' म्हटलं गेलं. मात्र तिची खरी ओळख आजही इतिहासकारांसाठी एक कोडंच आहे, हे सत्य आहे."
प्रसिद्ध इतिहासकार ए एल बाशम यंनी 'द वंडर दॅट वॉज इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "काही इतिहासकारांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, ही नर्तकी मंदिरांमधील नर्तकी किंवा वेश्या वर्गाचं प्रतिनिधित्व करते. मात्र ही बाब ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध केली जाऊ शकत नाही."
"ही मुलगी खरोखरंच नर्तकी आहे की नाही हे स्पष्ट नाही. मंदिरातील नर्तकी असण्याचा दावा तर आणखीच अविश्वसनीय आहे."
ही मूर्ती भारतात कशी आली?
नर्तकीची ही मूर्ती सध्या नवी दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये ठेवलेली आहे. मर्टिमर व्हीलर 1944 ते 1948 दरम्यान भारताच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख होते.
त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी मोहेंजोदडो आणि हडप्पामधून जवळपास 12 हजार पुरातन वस्तू आणि नमुने प्रदर्शनात मांडण्यासाठी लाहोरच्या म्युझियममधून दिल्लीत आणले होते.
भारताची फाळणी झाल्यानंतर मोहेंजदडो आणि हडप्पासारखी प्राचीन ठिकाणं पाकिस्तानात गेली. तर गुजरातमधील लोथल, राजस्थानातील कालीबंगन आणि धोलावीरासारखी हडप्पा संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी काही ठिकाणं भारतात आली.

फोटो स्रोत, DeAgostini/Getty Images
पंजाब विद्यापीठातील इतिहासकार आशीष कुमार यांनी त्यांच्या एका शोधनिबंधात लिहिलं आहे, "फाळणीच्या वेळेस सिंधू संस्कृतीतील बहुतांश पुरातन वस्तू दिल्लीत ठेवलेल्या होत्या. या सर्व वस्तू पाकिस्तानातील प्रदेशात शोधण्यात आलेल्या असल्यामुळे पाकिस्ताननं या वस्तू परत मागितल्या. त्यानंतर 1950 च्या दशकात मर्टिमर व्हीलर यांच्या मदतीनं यातील निम्म्या पुरातन वस्तू पाकिस्तानला देण्याबाबत सहमती झाली."
त्यांनी लिहिलं आहे की पाकिस्तानला 'प्रिस्ट किंग' (पुजारी राजा) आणि 'नर्तकी'च्या मूर्ती परत हव्या होत्या. मात्र त्यातील फक्त एकच मूर्ती पाकिस्तानला देण्यास भारताने परवानगी दिली.
काही इतिहासकारांच्या मते, नर्तकीची नग्न मूर्ती वादग्रस्त ठरू शकते हा विचार करून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 'पुजारी राजा'ची मूर्ती घेण्याचा निर्णय घेतला.
मात्र हे प्रकरण तिथेच संपलं नाही.
पाकिस्तानातून मूर्तीवर नव्यानं करण्यात आलेला दावा
लाहोर उच्च न्यायालयात 2016 साली एक याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेत न्यायालयाला विनंती करण्यात आली की पाकिस्तान सरकारला ती नर्तकीची मूर्ती भारतातून परत आणण्याचे निर्देश देण्यात यावेत.
याचिकेत म्हटलं होतं की ही मूर्ती 1926 मध्ये मोहेंजोदडो इथं सापडली होती. त्यामुळे या प्राचीन वारशाचा खरा वारस पाकिस्तान आहे.
त्यावेळेस भारतातील काही इतिहासकारांनी युक्तिवाद केला की एकटा पाकिस्तानच हडप्पा संस्कृतीचा वारसदार नाही. तर हा संपूर्ण दक्षिण आशियाचा संयुक्त किंवा सामायिक वारसा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ऑड्री ट्रश्के यांनी 'इंडिया: फाईव्ह थाउझेंड इयर्स ऑफ हिस्ट्री' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'सिंधू संस्कृती ही प्राचीन काळातील इजिप्त, मेसोपोटामिया आणि चीनबरोबरच्या चार मोठ्या संस्कृतींपैकी एक होती. भौगोलिकदृष्ट्या सिंधू संस्कृतीचा विस्तार इजिप्त आणि मेसोपोटामियाच्या एकत्रित क्षेत्रापेक्षा मोठा होता. कदाचित सिंधू संस्कृतीमधील लोकसंख्यादेखील अधिक होती.'
त्यांनी लिहिलं आहे की सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या हजारो वस्तूंवर अज्ञात लिपीत शिलालेख किंवा माहिती लिहिलेली आहे. त्या काळातील मुद्रांवर लिहिलेली माहिती आजवर उलगडलेली नाही.
या सर्व वादांसह सिंधू संस्कृतीप्रमाणेच ही नर्तकीदेखील एक गूढ बनून राहिली आहे.
ती कोण होती, तिला कोणी बनवलं, ती कोणाचं प्रतिनिधित्व करायची आणि ती खरोखरंच नर्तकी होती का?
हे प्रश्न आजदेखील अनुत्तरित आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























