You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रिजमधलं पाणी की एसी आणि पंख्याची हवा? घसादुखीचं खरं कारण समजून घ्या
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
रात्री पंख्याखाली झोपलो, सकाळी गळा खवखवू लागला. खूप थंड पाणी प्यायलं आणि दुसऱ्याच दिवशी घसा दुखायला लागला. हा अनुभव तुम्हीही घेतलाय ना. त्यामुळे या उन्हाळ्यात फ्रिजमधलं पाणी पिऊ नको, फॅनखाली अगदी जवळ बसू नका, एसी एकदम थंड करुन बसू नका असे सल्ले तुम्हाला घरात ऐकायला येत असतील.
हे सल्ले काही याच उन्हाळ्यात दिले जात नाहीयेत तर पिढ्यानपिढ्या याच समजुती तयार झालेल्या आहेत. पण घशाच्या संसर्गाला म्हणजे 'थ्रोट इन्फेक्शन'ला या गोष्टी कारणीभूत आहेत की तो केवळ योगायोग असतो याची माहिती इथे घेऊ.
वैद्यकीय भाषेत 'सोअर थ्रोट' म्हणजे घशाच्या आतील आवरणाला येणारी सूज. ही सूज बहुतांश वेळा व्हायरल संसर्गामुळे येते. जसं सर्दी, फ्लू किंवा कोव्हिडसारख्या आजारांमध्ये होतं तसंच होत असतं.
काही वेळा जीवाणूंचा संसर्ग (उदा. स्ट्रेप थ्रोट) कारणीभूत ठरतो. ॲलर्जी, धूळ‑प्रदूषण, सिगारेटचा धूर किंवा कोरडी हवा हीदेखील घशाला त्रास देऊ शकते.
मग थंडी आणि हवा यांची यामध्ये भूमिका नेमकी काय असते? पंखा किंवा एसी थेट जंतूसंसर्ग घडवतो का? थंड पाणी प्यायल्यावर लगेच त्रास का जाणवतो? आणि काही लोकांना थंडीचा जास्त त्रास का होतो?
या लेखात आपण घसादुखीमागचं वास्तव विज्ञानाच्या आधारे समजून घेणार आहोत.
फॅन, एसी आणि थंड पाणी
सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर फॅनची हवा, एसी किंवा थंड पाणी हे स्वतःहून घशाचा संसर्ग 'तयार' करत नाहीत.
सोअर थ्रोट होण्यासाठी व्हायरस किंवा जीवाणूंना शरीरात आधी प्रवेश करावा लागतो. मात्र तरीही लोकांना या गोष्टींनंतर त्रास का जाणवतो, यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत.
पंखा किंवा एसी चालू असताना हवा कोरडी होते. ही कोरडी हवा घशाच्या आतील ओलसर आवरणातील आर्द्रता कमी करते. त्यामुळे घसा कोरडा, खवखवतोय असं वाटतं आणि आधीच सुरू असलेली सूज अधिक ठळक होते. म्हणजेच लक्षणं वाढतात, त्यामुळे आजार 'निर्माण' होत नाही.
थंड पाणी प्यायल्यावरही असंच घडतं. जर घशात आधीच सौम्य सूज किंवा संसर्ग असेल तर थंड तापमानामुळे संवेदी मज्जातंतू (सेन्सरी नर्व्हज) अधिक संवेदनशील होतात आणि दुखणं अचानक जाणवतं. यामुळे 'थंड पाण्यामुळेच त्रास झाला' असा गैरसमज बळावतो.
सोअर थ्रोटमध्ये ही आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. संसर्ग झाल्यानंतर लक्षणं दिसायला 1-3 दिवस लागू शकतात. याच काळात फॅनखाली झोपणं, एसी किंवा थंड पाण्याचं पिणं घडलं, की कारण त्याच्यावर ढकललं जातं.
थोडक्यात थंड हवा-थंड पाणी हे आजाराचं मूळ नाही. तर ते हा आजार वाढवण्याला कारणीभूत ठरतात.
नाक आणि घसा संसर्गाविरोधात कसं लढत असतात?
इन्फेक्शन म्हणजे संसर्गाविरुद्ध आपलं नाक आणि आपला घसा लढत असताो.
नाक आणि घसा एक सतत आणि संयुक्तरीत्या संरक्षण यंत्रणा म्हणून काम करत असतात. आपण श्वास घेतो तेव्हा नाक हे त्याचं पहिलं तपासणी केंद्र असतं. ते धूळीचे कण, जंतू आणि प्रदूषक यांना फिल्टर करतं.
त्यामुळे ही हवा घशापर्यंत पोहोचते तेव्हा त्यातील हानिकारक घटक मोठ्या प्रमाणात कमी झालेले असतात. त्यानंतर घशामध्ये रोगप्रतिकारक ऊती असतात, त्या आक्रमक जंतूंना ओळखून शरीराची प्रतिक्रिया सुरू करतात.
ही अनेक पातळीवर चालणारी संरक्षण प्रणाली श्वसनमार्गात जंतूंचा प्रवेश कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
आपल्या नाकात सिलिया ही अतिशय सूक्ष्म केसांसारखी रचना नाकाच्या आतील भागात असते. त्यामुळे श्लेष्मासह अडकलेले कण बाहेर ढकलले जातात. ही रचना श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कोरड्या वातावरणात त्यांची हालचाल मंदावू शकते, त्यामुळे तिचं काम तितक्या प्रभावीरीत्या होत नाही.
नाकातील श्लेष्मा (म्युकस) म्हणजे सोप्या शब्दांत शेंबूड हा केवळ स्त्राव नसून एक संरक्षणात्मक पडदा आहे.
त्याच्या कार्याबद्दल ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे इंटर्नल मेडिसिन विभागात संचालक असणारे डॉ. अमित सराफ यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "म्युकसची रचना चिकट असल्यामुळे त्यात विषाणू, जीवाणू आणि सूक्ष्म कण अडकतात. ते हळूहळू नाकातून बाहेर टाकले जातात किंवा गिळले जातात, तिथे पोटातील आम्ल त्यांना निष्प्रभ करतं. या प्रक्रियेमुळे घशात संसर्ग होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते."
नाक आणि घशाची रचना का महत्त्वाची आहे हे सांगताना डॉ. सराफ म्हणाले, "नाकाच्या आतील अस्तरात भरपूर रक्तवाहिन्या असतात, त्या हवेला शरीराच्या तापमानापर्यंत आणण्यासाठी उबदार करतात. त्याचवेळी नाकातील ओलावा हवेला आर्द्र बनवतो. हे अत्यंत आवश्यक आहे कारण घसा आणि खालचे श्वसनमार्ग उबदार व ओलसर हवेत उत्तम प्रकारे कार्य करतात. कोरडी किंवा थंड हवा या अस्तराला त्रास देऊ शकते, ज्यामुळे ते अधिक संवेदनशील आणि कमी प्रभावी बनते."
पंखा किंवा एसीच्या कोरड्या हवेशी दीर्घकाळ संपर्क आल्यास काय परिणाम होतो?
कोरड्या हवेशी जास्त वेळ संपर्क आल्यास नाक आणि घशातील नैसर्गिक ओलावा कमी होतो.
त्यामुळे तिथं असलेल्या संरक्षक अस्तराला जंतूंना अडकवणं आणि बाहेर काढणं कठीण होतं. अशावेळी कोरडेपणा, जळजळ किंवा खवखव जाणवू शकते. हे थेट संसर्गाचे कारण नसलं तरी घसा अधिक संवेदनशील होतो आणि आधीच्या लक्षणांना तीव्र करू शकतो.
तसंच तोंडानं श्वास घेतल्यास हवा नाकातून फिल्टर किंवा नीट आर्द्र होत नाही. त्यामुळे कोरडी हवा थेट घशात जाते. यामुळे घशात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते. कालांतरानं हे घशाची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी करू शकते.
डॉ. सराफ सांगतात, "थंड हवा किंवा थंड पेयांमुळे घशातील रक्तवाहिन्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे घसा अधिक संवेदनशील झाल्यासारखा वाटू शकतो. कधीकधी यामुळे घसा खवखवण्यासारखी भावना निर्माण होते. मात्र, हे बदल तात्पुरते असतात आणि ते थेट संसर्ग निर्माण करत नाहीत."
ते पुढं सांगतात, "झोपेदरम्यान, विशेषतः एसी किंवा पंख्याच्या वापरामुळे, हवा अधिक कोरडी होते. त्याचवेळी गिळण्याची प्रक्रिया कमी होते, त्यामुळे घशाला लागणारा नैसर्गिक ओलावा कमी मिळतो. या दोन्ही कारणांमुळे सकाळी उठल्यावर घसा कोरडा, खवखवणारा वाटू शकतो."
घसादुखीची सर्वात सामान्य वैद्यकीय कारणं कोणती?
घसादुखी हा स्वतःमध्ये एक आजार नाही, तर ते एक लक्षण आहे. त्यामागच्या सामान्य कारणांबद्दल डॉ. माला कनेरिया यांनी अधिक माहिती दिली.
डॉ. कनेरिया या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट इन्फेक्शियस डिसिज म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितलेल घसा दुखण्याची सर्वसामान्य कारणं पुढीलप्रमाणे
1) व्हायरल संसर्ग (सर्वात सामान्य कारण)
घसादुखीच्या बहुतांश प्रकरणांमध्ये व्हायरल संसर्ग कारणीभूत असतो. उदाहरणार्थ:
सार्दीतला सर्दी‑खोकला (Common cold), इन्फ्लुएंझा (फ्लू), कोव्हिड‑19, ॲडिनोव्हायरस, इन्फेक्शस मोनोन्युक्लिओसिस (EBV). यात नाक वाहणं, खोकला, ताप, अंगदुखी, आवाज घोगरा होणं अशी लक्षणं दिसतात.
व्हायरस घशाच्या आतील आवरणात सूज निर्माण करतात आणि रोगप्रतिकारक प्रणाली सक्रिय झाल्यामुळे वेदना व जळजळ जाणवते.
2) जीवाणूजन्य संसर्ग
यामध्ये सर्वात ओळखीचा प्रकार म्हणजे स्ट्रेप्टोकोकल फरिंजायटिस (स्ट्रेप थ्रोट) हा आहे. यात अचानक तीव्र घसादुखी, ताप, टॉन्सिल्सवर सूज आणि कधी कधी पांढरे डाग किंवा पू, मानेतील लिम्फ ग्रंथी सुजून दुखणं आणि सहसा खोकला नसणं, अशी लक्षणं दिसतात.
3) संसर्ग नसलेली (नॉन‑इन्फेक्शस) कारणं
घसादुखी ही संसर्गाव्यतिरिक्त कारणांमुळेही होऊ शकते, पण ही कारणं अनेकदा दुर्लक्षित राहतात. यामध्ये ॲलर्जी, ॲसिड रिफ्लक्स (GERD), तोंडातून श्वास घेण्याची सवय, धूम्रपान/व्हेपिंग, प्रदूषण, कोरडी हवा, आवाजाचा अतिवापर आणि नाकातून घशात स्राव जाणं (पोस्टनेझल ड्रिप) यांचा समावेश होतो.
खरं तर अनेक प्रौढांमध्ये वारंवार होणाऱ्या "घशाच्या संसर्गामागे" प्रत्यक्षात ॲसिड रिफ्लक्स किंवा ॲलर्जिक त्रास हे मुख्य कारण असतं.
डॉ. कनेरियासुद्धा म्हणतात, "फक्त थंड हवा स्वतःहून असा थेट कोणताही संसर्ग निर्माण करत नाही. संसर्ग होण्यासाठी व्हायरस, जीवाणू किंवा अन्य कोणता तरी जंतू आवश्यक असतात. फक्त पंखा चालू असल्यामुळे कोणाला स्ट्रेप थ्रोट किंवा व्हायरल सर्दी होऊ शकत नाही. मात्र थंड किंवा कोरडी हवा घशाला त्रास देऊ शकते. ती घशाच्या आतील श्लेष्मल (म्युकस) आवरणाला कोरडं करते, तिथं आधीपासून असलेली सूज वाढवू शकते आणि त्यामुळे लक्षणं अधिक तीव्रपणे जाणवू शकतात."
काही लोकांना गार पाणी प्यायल्यावर लगेच घसादुखी सुरू झाल्यासारखं का वाटतं?
काही लोकांना गार पाणी प्यायलं की नेहमीच हा त्रास सुरू झाला असं वाटतं. पण यामागे अनेक शक्यता असू शकतात. उदाहरणार्थ, आधीच असलेला सौम्य संसर्ग अधिक ठळकपणे जाणवू लागणं ही एक शक्यता आहे.
डॉ. कनेरिया सांगतात, "यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक व्हायरल संसर्ग 1 ते 3 दिवस (कधी कधी त्याहून अधिक काळ) कोणतीही लक्षणं न देता शरीरात वाढत राहतात. अशा वेळी एखादी व्यक्ती आधीच संसर्गबाधित असू शकते आणि लक्षणं दिसण्याच्या अगदी आधी थंड पाणी पिते. परिणामी मेंदू या दोन घटनांमध्ये संबंध जोडतो आणि घसादुखीचं कारण थंड पाणी असल्याचा निष्कर्ष काढतो. प्रत्यक्षात मात्र त्या वेळी लक्षणं दिसायला आधीपासूनच सुरुवात होणार असते. हा गैरसमज टिकून राहण्याचं हे कदाचित सर्वात मोठं कारण आहे."
याशिवाय, थंड तापमानामुळे संवेदनशील ऊतींना तात्पुरता त्रास होऊ शकतो. थंड पेयं घशातील स्नायू आकुंचन पावायला कारणीभूत ठरू शकतात, मज्जातंतूंना उत्तेजित करतात आणि आधीच असलेली जळजळ अधिक जाणवू शकते.
ज्यांना ॲलर्जी, ॲसिड रिफ्लक्स, दीर्घकालीन फरिंजायटिस किंवा पोस्टनाझल ड्रिपचा त्रास असतो, त्यांना हे परिणाम अधिक तीव्र जाणवतात.
तसेच थंड पेयांमुळे म्युकसच्या (स्रावाच्या) घट्टपणात तात्पुरता बदल होऊ शकतो. त्यामुळे वारंवार घसा खाकरावा लागणं, खवखव किंवा अस्वस्थता जाणवते. हे सगळं प्रत्यक्षात संसर्ग नसला तरी "आजारी पडलो" असं वाटायला लावतं.
मग घशाची काळजी कशी घ्यायची?
घसादुखी टाळायची असेल तर पहिला उपाय म्हणजे संसर्गाचा धोका कमी करणं. यात हातांची स्वच्छता राखणं, आजारी व्यक्तींच्या जवळचा संपर्क टाळणं, घरात किंवा बंद जागेत चांगलं वायूविजन (व्हेंटिलेशन) असणं, तसेच गरजेनुसार फ्लू किंवा कोव्हिडसारख्या आजारांची लस घेतलेली असणं या उपायांमुळे संसर्ग होण्याचा धोका कमी करता येतो.
दुसरं म्हणजे घसा आणि नाकाच्या आतील आवरणाचं संरक्षण करणं. यात पुरेसं पाणी पिणं, धूम्रपान किंवा व्हेपिंग टाळणं, हवा खूप कोरडी असल्यास ह्युमिडिफायर वापरणं, ॲलर्जीवर उपचार करणं, ॲसिड रिफ्लक्स नियंत्रणात ठेवणं आणि आवाजाचा अतिवापर टाळणं हे उपाय घशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली एकूणच प्रतिकारशक्ती बळकट करणं यासाठी पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव कमी ठेवणं याची गरज आहे. यामुळे शरीराची एकूण रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
डॉक्टरकडे कधी जायचं?
श्वास घ्यायला त्रास होणं, तोंडातून लाळ गळणं किंवा गिळता न येणं, मानेत सूज येणं, आवाज भरकटलेला किंवा दबलेला वाटणं, तसेच तीव्र डिहायड्रेशन होणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
डॉ. माला कनेरिया सांगतात, "काही लक्षणं ही सामान्य सर्दी नसून जीवाणूजन्य संसर्ग (उदा. स्ट्रेप थ्रोट) असू शकतात. यामध्ये प्रचंड ताप, टॉन्सिल्सवर पू किंवा पांढरे डाग, एका बाजूला तीव्र घसादुखी, मानेतील लिम्फ ग्रंथी सुजणं आणि घसादुखी असूनही खोकला नसणं यांचा समावेश होतो."
त्या सांगतात, "याशिवाय, 1-2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारी लक्षणं, वारंवार तीव्र घसादुखी, कारण न समजणं वजन घटणं, लाळेत रक्त येणं किंवा दीर्घकाळ आवाज बसलेला राहणं. अशी लक्षणं आढळल्यास घरगुती उपाय किंवा स्वतः औषध घेण्याऐवजी डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)