'डोंगर आमचा राजा, त्याला हात लावू देणार नाही'; पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी अजिंठा डोंगररांगांत 2.5 लाख झाडं तोडणार?

फोटो स्रोत, Kiran Sakale
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"डोंगर आमचा राजा, त्याला हात लावू देणार नाही नाही. एका झाडाला सुद्धा हात नाही लावू देणार. शेत बी देणार नाही", अजिंठा डोंगररागांच्या पायथ्याशी बसून मीराबाई सोनवणे ठणकावून सांगत होत्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठ्याच्या डोंगररांगा जगप्रसिद्ध आहेत. या डोंगररागांमधील कन्नड आणि सोयगाव तालुक्यांच्या सीमेवर एक जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे.
या प्रकल्पासाठी 1325 एकर इतकी जमीन बाधित होणार आहे. यापैकी 742 एकर वनजमीन असून 582 एकर शेतजमीन असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास अडीच लाख वृक्षांची कत्तल करावी लागेल, असा वन विभागाचा अंदाज आहे.
'ग्रीनको एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड'चा पंप्ड स्टोरेज प्रकल्प इथं प्रस्तावित आहे. जुलै 2025 मध्ये राज्य सरकारनं 'ग्रीनको'सोबत एक सामंजस्य करार केला होता.
त्यानुसार, या पंप्ड स्टोरेज प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 2,000 मेगावॅट इतकी आहे. 9,600 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून 6,000 जणांना रोजगार मिळेल, असा राज्य सरकारचा दावा आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे.
'आम्ही जंगलचे अधिकारी'
वडोद गावच्या मीराबाई सोनवणे म्हणतात, "डोंगर आमचा राजा आहे, आम्ही आदिवासी लोक आहोत. आम्ही त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. इथं आमच्या शेळ्या,मेंढ्या, ढोरं, वासरं, प्राणी वाघ, सिंह सगळे आहे आमच्याकडे. प्रकल्प झाल्यावर कुठे जातील ते प्राणी?"
"आमचा नकार आहे. ते जिथं असतील तिथून त्यांनी चालल्या जायचं, वापिस यायचं नाही. आले तर मग, एकच बुक्का आणि आदिवासी शिक्का. एकच ठेवू मग. मणका पाहून दणका देऊ चांगला निब्बर," मीराबाई निर्धार व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Kiran Sakale
मीराबाईंच्या शेजारीच बसलेल्या गीताबाई पवार म्हणतात, "प्रकल्पासाठी जंगल बी देणं नाही आणि शेत बी देणं नाही. आमचं सारं त्याच्यावरच आहे. आम्ही जंगलचे अधिकारी. आम्हाला जंगलच लागतो."
अजिंठा डोंगररांगाच्या पायथ्याशी असलेल्या नायगाव, वडोद, वाडी सुतोंडा आणि जंगली कोठा या 4 गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
या प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमींनी 15 नोव्हेंबर रोजी एकत्र येत मानवी साखळी उभारत आंदोलन केलं. जंगल वाचावं, या भावनेतून आंदोलन केल्याचं स्थानिक सांगतात.

फोटो स्रोत, Dr. Santosh Patil
लाखो झाडांच्या कत्तलीनंतर वन्यप्राणी गावातच येणार
डॉ. संतोष पाटील हे अजिंठा वन संरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. अजिंठा डोंगररांगातील जंगल दाखवताना ते इथल्या जैवविवधतेबद्दल भरभरुन बोलतात.
ते सांगतात, "या प्रकल्पाला 29 मे 2026 रोजी Terms of Reference (ToR)ची मंजुरी मिळालेली आहे. आता फक्त एक पाऊल आपण पुढे आहोत.
त्यांना जर या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी (Environment clearance) मिळाली तर मग आपण काही करू शकणार नाही. हे आपण आता जे करतो आहेत ते आपल्या पुढच्या लढ्याची तयारी आहे. लोकांना जागृत करणं गरजेचं आहे."
प्रकल्प प्रस्तावित असलेल्या या जंगलात सुमारे 50% झाडं सागाची आहेत. या घनदाट जंगलातून फिरताना 40 ते 50 फूट उंचीची सागाची झाडं लक्ष वेधून घेतात.
पळस, मोहा, सलई अशा 800 प्रकारच्या झाडांच्या प्रजाती इथं आढळतात. पक्षी-प्राण्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. तसेच पाण्याचे जिवंत झरेही नजरेस पडतात.

फोटो स्रोत, Dr. Santosh Patil
डोंगररागांच्या पायथ्याशी आमची भेट सुभाष बोरसे यांच्याशी झाली. ते वाडी सुतोंडा गावात राहतात.
ते सांगतात, "इथल्या जंगलातील झाडांचं मार्कआऊट करूच शकत नाही, इतकी झाडं जाणार आहेत. इथं अशा दऱ्या आहेत, की झाडांचं मार्कआऊट करायला पण त्यांना तिथपर्यंत जाता येणार नाही.
ते दीड-दोन लाख झाडं सांगत असतील, पण 4 ते 5 लाखांच्या पुढे झाडांची कत्तल होणार आहे. ती झाल्यानंतर वन्यप्राणी कुठे जातील, मग ती गावाकडेच येतील ना?"
स्थानिक प्रशासन काय म्हणतंय?
स्थानिकांच्या या विरोधाविषयी कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही 'ग्रीनको एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड'शी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जिल्हा प्रशासनाच्या मते, या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हा प्रकल्प सध्या चर्चेच्या पातळीवर आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. स्थानिक लोक आणि संबंधित इतर विषयांवर चर्चा करुन शासन याबाबत निर्णय घेईल."
तर, "हा प्रकल्प प्रस्तावित असून सध्या तो छाननीच्या टप्प्यावर आहे. त्याला मंजुरी मिळालेली नाही. हा विषय वनविभाग संवेदनशीलपणे हाताळत आहे," असं छत्रपती संभाजीनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Kiran Sakale
अजिंठा डोंगररांगांमधील या परिसरात चांगला पाऊस पडतो. परिसरात सुपीक शेतजमीन दिसते, त्यामुळे इथल्या शेतीतून चांगलं उत्पन्न येत असल्याचं शेतकरी सांगतात. सदाशिव जाधव यांची डोंगराजवळच शेती आहे. सरकारने आधी गरजेच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं ग्रामस्थाचं म्हणणं आहे.
वडोदचे सदाशिव जाधव आपल्या सूर्यफुलाच्या शेतात काम करत होते. ते सांगतात, "आमच्या गावात रस्ता नाही, शाळा नाही, दवाखाना नाही. अरे साधी बस येत नाही. एक साधी बस आमच्या गावाला माहिती नाही. सरकारनं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे."
या परिसरात जैवविविधता असल्याच्या नोंदी आहेत. तसंच औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर मिळतात.
वाघ, बिबट्या, भारतीय लांडगा, अस्वल, खवल्या मांजर अशा वन्यप्राण्यांचा अधिवासही इथे आहे. विकासाच्या व्याख्येत निसर्ग ओरबाडून टाकणं बसत नाही, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
गुंतवणूक झाली म्हणजे विकास झाला का?
पर्यावरण अभ्यासक दिलीप यार्दी यांच्या मते, "गुंतवणूक झाली म्हणजे विकास झाला, असं मी म्हणणार नाही. पण, त्या गुंतवणुकीचा फायदा कोणाला होणार आहे? त्याचा पर्यावरणाला किती फायदा होणार आहे.
मी माणसाला म्हणत नाहीये. तुम्ही जितका पर्यावरणाचा नाश करणार आहात, त्याची हानी कशी भरुन काढणार आहात? याचं गणित मांडायला पाहिजे."
"खरोखरच त्या भागात एवढ्या वीज निर्मितीची गरज आहे का हे पाहायला पाहिजे. जर 2000 मेगावॉट एवढ्या वीजनिर्मितीची गरजच आहे, तर ती एकदाच एका ठिकाणी केली पाहिजे का, त्या भागात अजूनही काही ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत. त्याचा वापर करुन ही वीज निर्मिती तुकड्या तुकड्यामध्ये करता येते का, तेही पाहायला हवं," असं यार्दी पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Kiran Sakale
पंप्ड स्टोरेज प्रकल्पात एक डोंगरावर आणि दुसरा खाली असे दोन जलाशय तयार केले जातात. गेल्या 2 वर्षांत महाराष्ट्र सरकारनं राज्यात पंप्ड स्टोरेज प्रकल्पांसाठी 55 सामंजस्य करार केले आहेत.
यातून राज्यात सुमारे 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
मात्र या प्रकल्पांसाठी होणारं विस्थापन, डोंगरफोड, वृक्षतोड आणि पर्यावरणाची हानी याबद्दल गावकरी आणि पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करतायत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





























