PF काढणं होणार सोपं; UPI-ATM बरोबर नवे अपडेट्स जाणून घ्या

सरकार गेल्या वर्षीपासून ईपीएफओ 3.0 लागू करण्याबद्दल बोलत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सरकार गेल्या वर्षीपासून ईपीएफओ 3.0 लागू करण्याबद्दल बोलत आहे.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच भविष्य निर्वाह निधीचे पैसे (प्रॉव्हिडंट फंड) काढण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. लवकरच ईपीएफओ 3.0 लागू होणार आहे.

ईपीएफओमधून पैसे काढताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे या प्रक्रियेसाठी होणारा विलंब.

आतापर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खूप वेळ लागत होता, परंतु आता पैसे काढणं अधिक सोपं होणार आहे.

ईपीएफओमधून पैसे काढताना सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याला होणारा उशीर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ईपीएफओमधून पैसे काढताना सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याला होणारा उशीर.

ईपीएफओमध्ये असे बदल केले जाणार आहेत की, यूपीआय पेमेंट गेटवेच्या माध्यमातून तुमचे पीएफचे (प्रॉव्हिडंट फंड) पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे कागदपत्रांची प्रक्रिया कमी होईल आणि पैसेही लवकर मिळतील.

आता यूपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून पीएफचे पैसे त्वरीत काढता येतील आणि ही सुविधा पुढील महिन्यापासून सुरू होईल, अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतीच एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

ईपीएफओच्या अनेक सदस्यांना प्रश्न असतो की, ते आपल्या पीएफ खात्यातून किती पैसे काढू शकतात आणि त्यांना संपूर्ण 100 टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे का?

ईपीएफओ 3.0 मध्ये नवीन काय असेल?

ईपीएफओ 3.0 ची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार गेल्या वर्षीपासून चर्चा करत आहे. आधी याची सुरूवात जानेवारी 2026 मध्ये होणार होती, नंतर मे महिन्याच्या अखेरीस लागू होईल असं सांगण्यात आलं. आता कामगार मंत्र्यांनी म्हटलं आहे की, ती जूनमध्ये लागू केली जाईल. परंतु, अद्यापही प्रणाली प्रत्यक्षात सुरू झालेली नाही.

ईपीएफओ 3.0 मध्ये होणाऱ्या बदलांमुळे पैसे काढण्याची प्रक्रिया पेपरलेस म्हणजेच कागदपत्रांविरहित होणार आहे.

खातेधारक यूपीआय किंवा यूपीआय-सक्षम एटीएमच्या माध्यमातून त्यांच्या पीएफ बॅलन्समधील 50 ते 75 टक्के रक्कम काढू शकतील.

ईपीएफओ 3.0 मध्ये नवीन काय असेल?

फोटो स्रोत, Getty Images

यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जसं की तुमच्या खात्यात तुमच्या ईपीएफ योगदानातील 25 टक्के रक्कम नेहमी बफर (राखीव रक्कम) म्हणून ठेवावी लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकूण ईपीएस निधीपैकी फक्त 50 ते 75 टक्के रक्कमच काढू शकता.

याशिवाय, कोणत्याही तातडीच्या कामासाठी पैशांची गरज असेल तर आता ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, शिक्षण, विवाह किंवा घर खरेदी अथवा बांधकामासाठी लागणारी रक्कम 3 दिवसांच्या आत काढता येईल.

ईपीएफओमधून पैसे काढणं सोपं कसं होईल?

ईपीएफ खातेधारक आपल्या खात्यातील किती रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर करता येईल हे पाहू शकतील. ही माहिती त्यांना उमंग ॲपद्वारे पाहता येईल.

त्यानंतर एक क्यूआर कोड तयार होईल, ज्याच्या मदतीने पीएफची रक्कम थेट बँक खात्यात ट्रान्सफर करता येईल. ही रक्कम नंतर एटीएममधूनही काढता येईल.

पूर्वी पीएफमधून पैसे काढण्यासाठी नोकरीच्या कालावधीबाबत वेगवेगळे नियम होते. काही श्रेणींसाठी 7 वर्षांपर्यंत सेवेची अट होती. परंतु, आता हा कालावधी कमी करून सर्व श्रेणींसाठी केवळ 12 महिने करण्यात आला आहे.

कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओ 3.0 ची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होईल असं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Mansukh Mandaviya/X

फोटो कॅप्शन, कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओ 3.0 ची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होईल असं सांगितलं आहे.

याआधी केवळ कर्मचाऱ्याच्या योगदान आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाची (50 ते 100 टक्केपर्यंत) रक्कम काढता येत होती. पण आता नियोक्त्याच्या (एम्प्लॉयर) योगदानासह त्यावरील व्याजही काढता येणार आहे.

पूर्वीच्या नियमांमध्ये पीएफची रक्कम काढण्यावर अनेक मर्यादा होत्या. परंतु आता 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम कधीही काढता येते.

आधी बेरोजगार व्यक्ती फक्त अंशतः पीएफ रक्कम काढू शकत होती. पण आता नोकरी गमावल्यानंतर लगेचच पीएफ बॅलन्समधील 75 टक्केपर्यंत रक्कम काढता येईल.

उर्वरित 25 टक्के रक्कम बेरोजगार झाल्यास 12 महिन्यांनंतर काढता येऊ शकेल.

याआधी निवृत्तीनंतरच संपूर्ण पीएफ रक्कम काढता येत होती. परंतु, नवीन नियमांनुसार 55 वर्षांनंतर, अपंगत्व, नोकरीवरून काढल्यावर, व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) किंवा कायमस्वरूपी देश सोडल्यास संपूर्ण रक्कम काढता येईल.

जुनी प्रणाली आणि ईपीएफओ 3.0 मधील फरक

ईपीएफओ 3.0 लागू करण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे यामुळे खातेधारकांचा वेळ वाचेल.

सध्याच्या प्रक्रियेनुसार पीएफ काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाइटवर किंवा कार्यालयात क्लेम करावा लागतो. त्यानंतर केवायसी पडताळणी केली जाते आणि नियोक्त्याच्या मंजुरीची वाट पाहावी लागते.

या संपूर्ण प्रक्रियेला किमान 10 दिवस लागतात. 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास मॅन्युअल तपासणी केली जाते. जर कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली तर प्रक्रियेला आणखी उशीर होऊ शकतो.

एटीएएममधून पीएफचे पैसे काढता येण्याचे दिवस आता फार दूर नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एटीएएममधून पीएफचे पैसे काढता येण्याचे दिवस आता फार दूर नाहीत.

ईपीएफओ 3.0 ची अंमलबजावणी झाल्यानंतर किती रक्कम काढता येईल हे उमंग ॲपवर पाहता येईल. त्यानंतर क्यूआर कोड तयार होईल आणि यूपीआयद्वारे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर होतील.

5 लाखांपर्यंतची रक्कम त्वरित सेटल केली जाईल आणि बँक खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होणार नाही.

परंतु, यासाठी तुमचे सर्व तपशील, म्हणजेच आधार, पॅन नंबर आणि बँक खात्याची योग्यरित्या केवायसी पूर्ण होणे आवश्यक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)