दिवसभर बसून काम करता? डॉक्टरांनी सांगितली 5 मिनिटांची सोपी ट्रिक

ऑफिसमध्ये अधिक आनंदी राहायचं आहे का? मग पाच मिनिटांचा वॉक घ्या

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल आरोग्य संपादक
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

ईमेल्सना उत्तर द्यायचं असो की व्हीडिओ कॉल करायचे असो, ऑफिसमधील बहुतांश काम खुर्चीवर बसूनच केलं जातं.

मात्र, सतत बसून राहण्याच्या या सवयीचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे. दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे वजन वाढणं, ह्रदयविकार होणं आणि टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञ म्हणतात.

काम करत असताना स्क्रीनपासून ब्रेक घेणं म्हणजे थोडा वेळ दूर राहणं फायदेशीर असतं हे आपल्याला माहिती आहे.

मात्र, कामावर परिणाम न होता किंवा कामातील उत्पादकता कायम राखून नेमक्या किती वेळा आपण खुर्चीतून उठून हालचाल केली पाहिजे, याबद्दल मात्र पुरेशी स्पष्टता नाही.

'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मॅगेझिन'मध्ये एक नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे.

या अभ्यासानुसार, दर तासाला 5 मिनिटांचा ब्रेक घेणं किंवा 'मूव्हमेंट स्नॅक्स' घेणं अर्थात थोडा वेळ हालचाली करणं कार्यक्षमता कमी न होऊ देता आरोग्यात सुधारणा करण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात व्यवहार्य किंवा सोयीस्कर मार्ग आहे.

कामातील उत्पादकता, मनस्थिती आणि सतर्कतेमध्ये वाढ

मुख्य संशोधक कीथ डायझ यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, बहुतांश प्रौढ लोक आता त्यांच्या जागेपणातील तीन-चतुर्थांश वेळ बसून किंवा कोणतीही हालचाल न करताच घालवतात.

'कमी बसा आणि जास्त हालचाल करा' हा एक सर्वसामान्य सल्ला बरोबर असला तरी त्याचं नेमकं किती प्रमाण असावं हे लोकांना माहित असलं पाहिजे, असं ते पुढे म्हणाले.

"यातील आनंदाची गोष्ट म्हणजे दर तासानं 5 मिनिटं चालल्यास ते मनस्थिती सुधारण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी पुरेसं ठरतं. लोकांना हे वास्तववादी आणि साध्य करता येण्यासारखं वाटतं," असं डायझ म्हणाले.

ऑफिस वॉक

फोटो स्रोत, Getty Images

कामाच्या वेळेस चालण्याचा ब्रेक घेण्यावरील संशोधन

कोलंबिया विद्यापीठानं अमेरिकेतील 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण केलं. त्यातील बहुतांश जण ऑफिसमध्ये नोकरी करणारे आणि 8 ते 9 तासांच्या शिफ्टमध्ये काम करणारे होते.

पहिल्या आठवड्यात या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येनुसार काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांना आलेला थकवा, त्यांची मनस्थिती आणि कामातील कामगिरी याबाबतच्या दैनंदिन सर्वेक्षणांमध्ये माहिती भरली.

ऑफिस वॉक

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतरच्या 2 आठवड्यांमध्ये त्यांना कामामध्ये दर अर्ध्या तासानं, दर तासानं किवा दर 2 तासांनी 5 मिनिटांचा ब्रेक घेण्यास सागितला. त्यानंतर सर्वेक्षणात माहिती भरण्यास सांगितली.

दर अर्ध्या तासानं चालणं हे मनस्थिती सुधारण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी फायदेशीर होतं.

मात्र, त्यामुळे दैनंदिन कामात व्यत्यय आला. तर दर 2 तासांनी ब्रेक घेणं हे अजिबात न चालण्यापेक्षा अधिक चांगलं होतं.

मात्र, संशोधकांना आढळलं की दर तासानं 5 मिनिटांचा ब्रेक घेऊन चालल्यास कामातील उत्पादकता, मनस्थिती आणि सतर्कता वाढण्यामध्ये व्यवहार्य स्वरुपाची सुधारणा झाली.

चालण्यामुळे कार्यक्षमतेत वाढ

तासनतास बसून राहण्याची सवय मोडून काढणं कठीण गोष्ट असू शकते, असं डायझ म्हणाले. काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या या ब्रेकबद्दल त्यांचे बॉस किंवा त्यांचे सहकारी काय विचार करतील, याची चिंता वाटत होती.

"हालचाल करण्यासाठी ब्रेक घेणं हे विरोधाभासाचं वाटत असलं तरीदेखील त्यामुळे कामातील कामगिरी खरोखरंच सुधारू शकते. त्यामुळे कामातील कार्यक्षमता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे लोकांना अधिक आरामशीर आणि ताजंतवानं वाटतं," असं डायझ म्हणाले.

ऑफिस वॉक

फोटो स्रोत, Getty Images

चालणं कमी खर्चाची गोष्ट आहे. त्यासाठी काम करणं थांबवावंच लागेल असं नाही, असं ते म्हणाले. तसंच त्यांनी चालता चालता मीटिंग घेण्याचं किंवा फोनवर बोलताना फेरफटका मारण्याचं उदाहरण दिलं. मग ते घराबाहेर असो की ऑफिसमध्ये किंवा त्याच्या परिसरात असो.

एमिली मॅकग्रा, ब्रिटिश हार्ट फाउंडेशनमध्ये वरिष्ठ हृदयरोग परिचारिका यांनी संशोधनातील निष्कर्षांचं स्वागत केलं. त्या म्हणाल्या की, "दैनंदिन आयुष्यात छोट्या-छोट्या शारीरिक हालचालींचा समावेश केल्यास आपल्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते."

मात्र, त्या सावधगिरीचा इशारा देत म्हणाल्या, "हा अभ्यास स्वत: नोंदवलेल्या माहितीवर आधारित होता आणि तो थोड्या कालावधीसाठी होता. त्यामुळे या गोष्टीच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची खातरजमा करण्यासाठी दीर्घकालीन संशोधन करण्याची आवश्यकता आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)