पोटाची चरबी ते हृदयापर्यंत: पुरुषांनी वयाच्या 40 नंतर या आरोग्य चाचण्या करणे का आहे महत्त्वाचे?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील 45 वर्षीय जय पारेख हे आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक. ते रुग्णांना नियमित तपासणी, लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य याबाबत सतत मार्गदर्शन करत होते. मात्र त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. कामाचा ताण, प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे त्यांनी आरोग्य तपासणी पुढे ढकलत राहिले. त्यांना कोणतीही लक्षणेही दिसत नव्हती. ना छातीत दुखणं, ना श्वास लागणं, ना थकवा.
पण त्यांच्या आजाराची माहिती अगदी नाट्यमय आणि अपघाती स्वरुपात झाली. रक्ताचा नमुना घेण्याच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी स्वतःचा नमुना दिला. तेव्हा HbA1c चाचणीत त्यांची साखरेची पातळी 8.8 आढळली. ही पातळी अनियंत्रित मधुमेहाकडे बोट दाखवते.
यानंतर त्यांनी सखोल तपासण्या केल्या आणि त्यात त्यांच्या कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण खूप जास्त आढळले. CT स्कॅनमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लाक साचल्याचं दिसलं, तर अँजिओग्राफीमध्ये दोन मोठे ब्लॉकेज जवळपास 90% असल्याचं स्पष्ट झालं.
तत्काळ उपाय म्हणून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. विशेष म्हणजे ही गंभीर समस्या कोणतीही लक्षणं नसताना हळूहळू वाढत होती. हीच बाब या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आहे. अनेक आजार कोणतीही स्पष्ट चिन्हं न देता शरीरात वाढत असतात.
जय यांच्या उदाहरणावरुन 40 वर्षांवरील व्यक्तींनी, विशेषतः जोखमीचे घटक असतील तर, नियमित आरोग्य तपासण्या करणे अत्यावश्यक आहे हे लगेच समजतं. कारण कधी कधी मोठा धोका कोणतीही पूर्वसूचना न देता समोर येतो.

फोटो स्रोत, Getty Images
जय पारेख यांच्या आजाराचे निदान करणाऱ्या मुंबईतील एन. एम. मेडिकल सेंटरच्या डॉ. पल्लवी नागरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली.
डॉ. पल्लवी म्हणाल्या, "जय पारेख सीटी कोरोनरी अँजिओग्राफीसाठी आले तेव्हा त्यांचं कॅल्शियम 571.8 असल्याचं दिसलं. हे अतिशय धोकादायक आहे. नंतर हृदयाजवळच्या LAD म्हणजे लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरीमध्ये 80 ते 90 टक्के नॅरोइंग दिसलं. तेही अतिशय महत्त्वाच्या जागेवर म्हणजे ती जिथून सुरू होते तिथं हे दिसलं. तसंच ओएमटू आर्टरीमध्येही लक्षणीयरित्या नॅरोइंग दिसलं. 44 वर्षांच्या माणसाला एवढं लक्षणीय नॅरोइंग असणं धक्कादायक आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या, सुशिक्षित व्यक्तीला इतक्या पुढच्या स्तरावरचा आजार दिसून येणं हे कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे आपल्या लक्षात येतं."
जीवनशैली, खाण्याबद्दलची जागरुकता, व्यायामाचं अतिशय महत्त्व आहे. बाहेरचं खाणं टाळणं, नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण हे पैसे कमवण्यासाठी लागणाऱ्या मेहनती इतकंच महत्त्वाचं आहे, असं डॉ. पल्लवी सांगतात.
वयानं चाळीशीत प्रवेश करणं म्हणजे फक्त 40 हा आकडा पार करणं नसतं. याच काळात पुरुषाच्या सवयी, त्याचं खाणं-पिणं, व्यायाम, जीवनशैली यांचा त्याच्या शरीरावर परिणाम दिसत असतो.
हायपरटेन्शन, डायबेटिस, कॉलेस्ट्रॉल वाढलेले असणं किंवा कार्डिओव्हस्क्युलर आजारांची लक्षणंही डोकं वर काढत असतात. एकेकाळी हे आजार पन्नाशी, साठी उलटलेल्या लोकांमध्ये दिसत असत. मात्र गेल्या दोन दशकात हे प्रमाण पस्तिशी ते चाळीशीच्या लोकांमध्ये आलेलं दिसतं. याच काळात शरीराची तपासणी केली तर अनेक संभाव्य संकटं टाळली जाऊ शकतात.
मी फिट आहे, मी फिट दिसतो असे समज बहुतांश पुरुष बाळगत असतात. पण या समजुती योग्य आहेत की अयोग्य हे या शारीरिक तपासण्यांमधूनच लक्षात येतं.
तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी तपासण्या केल्यास हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतात आणि त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. नियमित हेल्थ चेक-अपमुळे केवळ आजार ओळखणं नाही, तर जीवनशैली सुधारण्याचीही संधीही मिळते. त्यामुळे वयाच्या 40 नंतर पुरुषांनी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या दुर्लक्ष न करता नियमितपणे करून घेणे गरजेचे आहे. ही काळजीच पुढील आयुष्य निरोगी आणि सक्रिय ठेवण्याची किल्ली ठरू शकते.
तपासण्या का आवश्यक?
वयाच्या 40 नंतर काही विशिष्ट तपासण्या नियमित करण्यावर तज्ज्ञांचा विशेष भर आहे. सर्वप्रथम रक्तदाब तपासणी महत्त्वाची मानली जाते, कारण उच्च रक्तदाबाचा कोणताही ठोस इशारा आधी मिळत नाही.
त्याचबरोबर उपाशीपोटी आणि जेवणानंतरची रक्तातील साखर तपासणी मधुमेहाचा धोका ओळखण्यासाठी आवश्यक ठरते.
कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी समजण्यासाठी लिपिड प्रोफाइल ही चाचणी वर्षातून एकदा करणे फायदेशीर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हृदयविकाराचा धोका लक्षात घेता स्ट्रेस टेस्ट आणि 2D इकोकार्डिओग्राफी या तपासण्याही उपयोगी ठरतात. याशिवाय किडनीचे कार्य तपासण्यासाठी सिरम क्रिएटिनिन, तसेच यकृत आणि प्रोस्टेटची अल्ट्रासाऊंड तपासणी लवकर बदल ओळखण्यात मदत करते. 40 नंतर प्रोस्टेटसंबंधित समस्यांसाठी PSA चाचणी देखील महत्त्वाची मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, केवळ वजनावर अवलंबून न राहता कंबरेचा घेर आणि शरीरातील चरबीचे प्रमाण लक्षात ठेवणे अधिक उपयुक्त ठरते. कारण पोटावरील वाढलेली चरबी ही मधुमेह, हृदयविकार आणि इतर आजारांचा इशारा असू शकते. त्यामुळे नियमित तपासण्या आणि जीवनशैलीत योग्य बदल हे निरोगी राहण्यासाठी अत्यावश्यक मानले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील इंटर्नल मेडिसिन अँड एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप विभागाचे कन्सल्टंट डॉ. संदीप दोशी यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
ते सांगतात, "हेल्दी वाटणं आणि खरंच हेल्दी असणं यात फरक असू शकतो. चाळीशीच्या पुढच्या प्रत्येक पुरुषानं रक्तदाब, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल, मूत्रपिंडाची कार्य कशी सुरू आहेत हे पाहाणाऱ्या चाचण्या केल्या पाहिजेत. तसेच युरिक अॅसिड, टेस्टोस्टोरॉन यांची चाचणी केली पाहिजे. हृदयाच्या आरोग्याचा विचार करता, स्ट्रेस टेस्ट, टुडी इको करणं योग्य ठरेल. प्रोस्टेट, किडनी, लिव्हर यांच्यासाठी अल्ट्रासाऊंड चाचण्या केल्यास काही आजारांची लक्षणं आहेत का हे समजेल."
रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल या चाचण्या किती काळाने परत केल्या पाहिजेत असं विचारल्यावर डॉ. दोशी म्हणाले, "चाळीशी उलटलेल्या पुरुषआंनी दर तीन महिन्यांनी रक्तदाब तपासला पाहिजे. रक्तातील साखर आणि लिपिड प्रोफाइल या चाचण्या वर्षातून एकदा केल्या पाहिजेत. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसिरॉईडची पातळी समजल्यास जीवनशैलीत बदल करण्यास तसेच हृदयाला होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो."

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व चाचण्यांबरोबर एक महत्त्वाची चाचणी करणं आवश्यक आहे ती म्हणजे टेस्टोस्टोरॉन. चाळीशीमध्ये टेस्टोस्टोरॉनची पातळी कमी होण्याचा कल वाढतो. वय वाढणं, ताण. वजन वाढणं, चयापचयातील बदल होणं सुरू झालं की सतत थकवा येणं, स्नायूचं आकारमान कमी होणं, कामेच्छा कमी होणं, लिंगताठरता कमी होणं, स्टॅमिना कमी होणं, मूड स्विंग अशी लक्षणं दिसल्यास टेस्टोस्टॉरनची पातळी तपासणं आवश्यक आहे. जर ती अपेक्षेपेक्षा कमी असेल तर त्याचे उपचार घेता येतील.
बहुतांश लोक फक्त वजन हा एकमेव मापदंड डोक्यात ठेवतात. पण वजनाच्या आकड्यातून तुमच्या पूर्ण शरीराची काय स्थिती आहे हे लक्षात येत नाही. पोटाभोवती असणारा मेद, कंबरेचा घेर हे तपासल्यास तुमच्या चयापचयाची स्थिती काय आहे हे लक्षात येतं.
वजनासह या सर्व बदलांचा इन्शुलिन रेझिस्टन्स, टाइप-टू डायबेटिस, फॅटी लिव्हर, किडनीचे आजार, हृदयविकार, आणि न्यूरोपॅथी यांचा जवळचा संबंध असतो.
शरीरातील फॅटचे प्रमाण आणि विशेषतः मध्यवर्ती स्थूलता (central obesity) यावर लक्ष ठेवणे म्हणजे भविष्यात कोणत्या आरोग्य समस्यांचा धोका असू शकतो याची लवकर कल्पना देणारा महत्त्वाचा इशारा ठरतो. यामुळे वेळेवर जीवनशैलीत बदल करण्याची संधी मिळते.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. दोशी सांगतात, चाळीशीनंतर कॅन्सरबद्दलच्या तपासण्या वैद्यकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाच्या ठरू लागतात. PSA, CEA, CA 19-9 आणि अल्फा-फेटोप्रोटीन यांसारख्या रक्तचाचण्या कोणाला अधिक तपासणीची गरज आहे हे ओळखण्यास मदत करू शकतात. 45 वर्षांनंतर कोलोनोस्कोपी ही पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाची तपासणी मानली जाते, कारण ती मोठ्या आतड्यातील पॉलिप्स आणि कोलोरेक्टल कॅन्सर लवकर अवस्थेतच शोधून काढू शकते, जेव्हा त्यावर उपचार करणे तुलनेने सोपे असते. धूम्रपान करणाऱ्या किंवा जास्त जोखमीच्या गटात असलेल्या व्यक्तींनी फुफ्फुसांच्या उच्च-रिझोल्यूशन सीटी स्कॅनबद्दल डॉक्टरांशी चर्चा करणेही योग्य ठरते."

फोटो स्रोत, Getty Images
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका पाहाता डॉ. सौरभ पाटील विशेष सल्ला देतात. ते मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये युरोलॉजी आणि युरोऑन्कोलॉजी विभागात सिनियर कन्सल्टंट आहेत.
ते सांगतात, प्रोस्टेटशी संबंधित नियमित समस्या साधारणपणे वयाच्या 50-55 वर्षांनंतर दिसू लागतात, तर प्रोस्टेट कर्करोगाचे निदान बहुतेकदा 60-65 वर्षांनंतर होते. मात्र, ज्यांच्या कुटुंबात प्रोस्टेट कर्करोगाचा ठळक इतिहास आहे किंवा ज्यांच्या अगदी जवळच्या (फर्स्ट डिग्री) नातलगांना प्रोस्टेट, स्तन किंवा अंडाशयाचा कर्करोग झाला आहे, अशा पुरुषांनी वयाच्या 45 पासून किंवा संबंधीत जोखीम घटकांनुसार त्याहूनही आधी तपासणीचा विचार करावा."
डॉ. सौरभ सांगतात, यासाठी शिफारस केलेल्या तपासण्यांमध्ये प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटिजेन (PSA) रक्त चाचणी, त्यासोबत युरोलॉजिस्टकडून सल्लामसलत व शारीरिक तपासणी यांचा समावेश होतो. अतिरिक्त जोखीम घटक नसलेल्या पुरुषांसाठी नियमित PSA तपासणी साधारणपणे 50-55 वर्षांपासून सुरू करता येते. प्रारंभिक PSA निकाल सामान्य असल्यास, दर दोन ते तीन वर्षांनी पुन्हा तपासणी करणे साधारणतः पुरेसे ठरते."
चाळीशीपर्यंत एखाद्या पुरुषानं कधीच समग्र आरोग्य चाचणी केली नसेल तर?
40 वर्षांनंतर प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व वाढते, यामागचं मुख्य कारण म्हणजे बसून राहण्याच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा वाढता धोका. मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, हृदयरोग, लठ्ठपणा आणि काही प्रकारचे कर्करोग हे आजार अनेकदा या वयात विकसित होऊ लागतात आणि बहुतेक वेळा त्यांची स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत.
लवकर तपासणी केल्यास हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतात. त्या काळात त्यांचे प्रभावी व्यवस्थापन, नियंत्रण, पूर्णपणे उलटवणे किंवा उपचार शक्य असतात. याशिवाय,
चाळिशीतील अनेक पुरुष व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार वाढत जातात आणि वैद्यकीय मदत घेईपर्यंत मोठी हानी होऊ शकते. म्हणूनच, लक्षणं नसली तरी, कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास असो किंवा नसो, 40 व्या वर्षी मूलभूत आरोग्य तपासणी करून घेण्याची शिफारस केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
तरीही एखाद्या व्यक्तीनं चाळीशी येईपर्यंत आरोग्याची कधीच समग्र तपासणी केली नसल्यास काय करावं हा प्रश्न राहातो. त्यावर डॉ. सौरभ पाटील सांगतात, "अशावेळेस प्राधान्याने मूलभूत आरोग्य तपासण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये रक्तातील साखरेची पातळी, लिपिड प्रोफाइल, रक्तदाब तपासणी, मूत्रपिंड आणि यकृताची कार्य तपासणाऱ्या चाचण्या तसेच नियमित मूत्र तपासणी यांचा समावेश असावा."
ते पुढं सांगतात, "या तपासण्यांमुळे जीवनशैलीशी संबंधित सामान्य आजार आणि अनेकदा लक्षणं न दाखवणाऱ्या आरोग्य समस्या शोधता येतात. हे आजार साधारणतः चाळीशीच्या आसपास दिसतात या चाचण्यांमुळे ते लवकर ओळखता येतात आणि गुंतागुंत टाळता येते."
चाळीशीनंतर डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची?
40 व्या वर्षी जरी कोणतीही लक्षणं नसली आणि दृष्टी व्यवस्थित वाटत असली तरी, अमेरिकन ॲकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी (AAO) नुसार या वयात 'baseline' म्हणजेच प्रारंभिक संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. कारण ग्लुकोमा, मोतीबिंदू, मॅक्युलर डीजेनेरेशन आणि डायबेटिक रेटिनोपॅथीची सुरुवातीची चिन्हं याच काळात दिसू लागतात. ही लक्षणं बहुतांशवेळा कोणतीही लक्षणं न दिसता विकसित होत असतात.
डॉ. हिमांशू शेखर हे एएसजी आय हॉस्पिटलचे ग्रुप चिफ स्ट्रॅटेजी & क्लिनिकल ऑफिसर आहेत. ते सांगतात डोळ्यांची तपासणी तुमचं वय आणि तुम्हाला असलेला संभाव्य धोका (रिस्क फॅक्टर) यावर अवलंबून आहे.
यासाठी ते वयोगटानुसार चाचण्या सुचवतात.
- वय 40–54 वर्षे, कोणताही धोका नसल्यास: प्रत्येक 2–4 वर्षांनी
- वय 55–64 वर्षे: प्रत्येक 1–3 वर्षांनी
- वय 65 वर्षे आणि पुढे: प्रत्येक 1–2 वर्षांनी
- उच्च जोखिम असलेले पुरुष: दरवर्षी किंवा 1–2 वर्षांनी
(उच्च जोखीम असलेल्या रुग्णांत डायबेटीस, उच्च रक्तदाब, कुटुंबात ग्लुकोमा किंवा AMD चा इतिहास असलेल्या पुरुषांचा समावेश होतो.)

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. हिमांशू शेखर सांगतात, चाळीशीनंतरच्या पुरुषांनी जीवनशैलीतल्या बदलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ते सांगतात, रक्तदाब 130/80 पेक्षा कमी ठेवावा, नियमित व्यायाम करावा, UV संरक्षण असलेले सनग्लासेस वापरावेत तसेच वजन नियंत्रणात ठेवावे."
ते पुढं म्हणाले, "अचानक 'फ्लोटर्स' किंवा प्रकाश चमकणे, दृष्टीसमोर काळा पडदा किंवा सावली येणं, एका डोळ्याची अचानक दृष्टी जाणं, तीव्र डोळेदुखी, उलटी, दिव्याभोवती वलय दिसणं, सरळ रेषा वाकडी दिसणं, बाजूची दृष्टी हळूहळू कमी होणं, अचानक दुहेरी दिसणं, हळूहळू धूसर दिसणं (मोतीबिंदूची लक्षणं) अशा गोष्टी झाल्यास डॉक्टरांना तात्काळ दाखवून तपासणी केली पाहिजे."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























