अमेरिका-इराण डीलबाबत दावे-प्रतिदावे, ट्रम्प म्हणतात 'युद्धाचा शेवट जवळ', इराण म्हणतं 'काहीच ठरलं नाही'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओलिव्हिया आयर्लंड
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीचा प्रारंभिक करार जवळ आल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर इराणवरचे हल्ले रद्द केल्याचंही सांगितलं.
"आम्ही इराणसोबतच्या युद्धाचा एक उत्कृष्ट तोडगा काढला आहे," असं त्यांनी गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितलं.
मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सरकारी टीव्हीला सांगितलं, कराराच्या बातम्या 'तर्काधारित' आहेत आणि 'काहीच पक्कं ठरलेलं नाही'.
दोन्ही देश कराराच्या खूप जवळ आले आहेत, असा दावा ट्रम्प यांनी आधीही केला होता. या घोषणेच्या काही तास आधी ट्रम्प यांनी इराणवर 'खूप मोठा हल्ला' करण्याची धमकी दिली होती.
28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती भागातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले आणि जगातील तेल व द्रवरूप नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेला होर्मुझचा सामुद्रधुनी भाग बंद केला.
एप्रिलमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाल्यानंतरही अमेरिका आणि इराण यांच्यात मधूनमधून चकमकी सुरू राहिल्या असून या आठवड्यात प्रत्युत्तरादाखल दोनदा हल्ले झाले.
त्याचबरोबर ट्रम्प सतत कराराच्या शक्यतांबाबत सकारात्मक विधानं करत राहिले आहेत.
ट्रम्प यांच्या ताज्या विधानांनंतर ब्रेंट कच्च्या तेलाचा दर सुमारे 89 डॉलर प्रति बॅरल (66 पौंड) इतका घसरला, हा त्या दिवशी 4.4% नी कमी होता.
"आमच्याकडे असा करार आहे की इराणकडे कधीही आण्विक शस्त्रं असणार नाहीत आणि हेच आमच्या कारवाईचं मूळ कारण होतं. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे", असं ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
दस्तावेज अंतिम झाल्यावर "बहुधा युरोपमध्ये कधीतरी स्वाक्षरी होईल," असंही ते म्हणाले आणि ते "लवकरच पूर्ण व्हावं" अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यांनी सांगितलं की दस्तावेज "बर्यापैकी अंतिम टप्प्यात आहेत, त्यामुळे पाहूया".
करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीही खुली होईल, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.
ट्रम्प यांनी आपण आखाती भागातील नेत्यांशी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली असून "संपूर्ण मध्यपूर्वेचा प्रदेश या गोष्टीने आनंदी आहे" असा दावा केला.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने या चर्चेची पुष्टी केली, मात्र इस्रायल "या सामंजस्य कराराचा भाग नाही" असं स्पष्ट केलं.
या निवेदनात असं म्हटलं आहे की, नेतान्याहूंनी अंतिम करारासाठी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं.
यात 'युरेनियम हटवणं, त्याच्या संवर्धनाची यंत्रणा नष्ट करणं, क्षेपणास्त्र उत्पादनावर मर्यादा आणणं आणि इराणकडून प्रादेशिक कट्टरतावादी गटांना दिला जाणारा पाठिंबा थांबवणं' यांचा समावेश असेल.

फोटो स्रोत, Getty Images
इराणचे प्रवक्ते बघाई यांनी सांगितलं की सामंजस्य कराराचा बहुतांश मजकूर आधीच 'अंतिम' करण्यात आला आहे, मात्र अमेरिकेने 'अतिरिक्त मागण्या' केल्या असून 'नवीन अटी' घातल्या आहेत.
इराण आपल्या 'ठरवून दिलेल्या किमान मर्यादेपासून' मागे हटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ट्रम्प यांनी याआधीही अनेक वेळा कराराची वेळ सांगितली आहे, मात्र अद्याप कोणताही औपचारिक करार झालेला नाही.
कराराबाबतचे दावे
- 20 एप्रिल – ट्रम्प म्हणाले, इराणसोबतचा करार "लवकरच" होईल
- 6 मे – त्यांनी युद्ध "लवकर संपेल" असा अंदाज व्यक्त केला आणि 14 मुद्द्यांच्या सामंजस्य करारावर दोन्ही बाजू जवळ आल्याचं सांगितलं
- 23 मे – ट्रम्प म्हणाले, शांतता करार "मोठ्या प्रमाणावर चर्चेतून तयार झाला" असून तपशील लवकरच जाहीर होतील
- 27 मे – ट्रम्प म्हणाले, ते कराराच्या अटींबाबत "समाधानी नाहीत"
- 28 मे – उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले, करार "खूप जवळ" आहे, पण अंतिम नाही
- 29 मे – ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चांवर "अंतिम निर्णयासाठी" बैठक घेतली, पण कोणताही करार जाहीर झाला नाही
- 11 जून – ट्रम्प म्हणाले, अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी "एक उत्कृष्ट तोडगा" काढला आहे आणि काही दिवसांत करार होईल

फोटो स्रोत, Getty Images
या आताच्या ताज्या विधानांपूर्वी काही तास आधी ट्रम्प म्हणाले होते, "अमेरिका आज रात्री इराणवर जोरदार हल्ला करेल" आणि त्यांनी खार्ग बेटासह इतर तेलसंबंधित ठिकाणांवर नियंत्रण घेण्याची धमकी दिली होती.
आखाती प्रदेशाच्या उत्तरेकडील खार्ग बेट हे इराणचं प्रमुख तेल निर्यात केंद्र आहे, जिथून जवळपास 90% निर्यात होते.
अमेरिका "व्हेनेझुएलामध्ये केल्याप्रमाणे" तेल आणि वायू बाजारांवर "पूर्ण नियंत्रण" मिळवेल, असंही ट्रम्प यांनी लिहिलं आहे.
इराणच्या लष्कराने इशारा दिला की पुढील हल्ले झाल्यास "यापूर्वीपेक्षा अधिक तीव्र प्रतिसाद" दिला जाईल.
"अमेरिकेच्या अलीकडील धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, तेल आणि वायू निर्यात सर्वांसाठी असेल नाहीतर कुणासाठीच नसेल," असं निवेदनात म्हटलं.
इराणचे मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनीही इशारा दिला. ते म्हणाले, "चुकीच्या धोरणांमुळे आणि उतावळ्या निर्णयांमुळे तुम्ही अनेक वर्ष अडकून राहाल अशा दलदलीची निर्मिती होईल."
संयुक्त राष्ट्रांचे आवाहन
सोमवारी आखातात अमेरिकी अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर दोन्ही देशांनी परस्परांवर हल्ले केले.
बुधवारी अमेरिकेच्या सेंटकॉमने सांगितलं की दक्षिण इराणमध्ये लष्करी, देखरेख आणि रडार प्रणालींवर लक्ष केंद्रित करून हल्ले पूर्ण करण्यात आले.
त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बहरीन, कुवैत आणि जॉर्डनमधील अमेरिकी तळांवर हल्ले केल्याचं सांगितलं. बहरीनमध्ये इराणी ड्रोन हल्ल्यात 11 वर्षांच्या मुलीला दुखापत झाली असून घरं आणि वाहनांचं नुकसान झालं असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जॉर्डनने सुमारे 20 इराणी क्षेपणास्त्रं पाडल्याचा दावा केला, तर कुवैतच्या लष्कराने "शत्रूच्या हवाई लक्ष्यांवर" कारवाई केल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, ओमानच्या आखातात एका जहाजावर झालेल्या अमेरिकी हल्ल्यात तीन भारतीय खलाशी मृत्युमुखी पडल्याची खात्री झाल्यानंतर भारतानं अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनयिकाला समन्स बजावलं. या जहाजाने इराणी बंदरांवरील बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या घटनेत 21 जणांना वाचवण्यात आलं.
आतापर्यंत अमेरिकन सैन्याने एकूण नऊ जहाजांवर गोळीबार केला असून त्यापैकी तीन या आठवड्यात केले गेले. ही नाकेबंदी इराणच्या तेल निर्यातीवर परिणाम करून त्याला आर्थिक फायदा होऊ नये यासाठी आहे.
या ताज्या हल्ल्यांनंतर तणाव कमी करण्याच्या आवाहनाला जोर आला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याने गुरुवारी माहिती प्रसिद्ध केली आहे. यात सरचिटणीस मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाबद्दल "गंभीर काळजीत" आहेत, असं सांगण्यात आलं.
"सर्व पक्षांनी युद्धविरामाचा पूर्णपणे सन्मान करावा आणि परिस्थिती आणखी बिघडू देऊ नये," असं त्यांनी आवाहन केलं.
पाकिस्तान, रशिया, चीन, तुर्की, भारत आणि सौदी अरेबिया यांनीही तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























