ऋतुमानानुसार होणाऱ्या हंगामी ॲलर्जीने हैराण असाल तर, या 9 टिप्स येतील तुमच्या कामी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमांडा रुगेरी
- Role, बीबीसी फ्युचर
- वाचन वेळ: 6 मिनिटे
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतुंमध्ये बदल झाले की अनेकांना ॲलर्जीचा त्रास सुरू झालेला पाहायला मिळतो.
अशा प्रकारचे त्रास कमी करण्यासाठी कोणती औषधं प्रभावी ठरतात आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? यासाठीचे काही विज्ञानाधारित सल्ले याठिकाणी देत आहोत.
वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली की कदाचित तुम्हालाही जगभरातील कोट्यवधी लोकांसारखं सर्दी, खोकला, डोळ्यातून पाणी येणं असे त्रास सुरू होत असतील.
जागतिक पातळीवर जवळपास 4 कोटी लोकांना 'ॲलर्जिक रायनायटिस'चा त्रास होतो. प्रामुख्यानं हवेतील परागकण आणि ॲलर्जीसाठी कारणीभूत असणारे काही घटक यामुळे नाकात जळजळ होत असते, त्याला 'ॲलर्जिक रायनायटिस' म्हणणात. काही भागांत याला 'हे फिव्हर' असंही म्हटलं जातं.
या त्रासामुळं आजारी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यासाठी मुख्यतः हवामान बदल हे कारण असल्याचं मानलं जातंय.
सुदैवाने आता असा खोकला आणि शिंका याचा त्रास सहन करण्याची गरज नाही.
गेल्या काही वर्षांत 'हे फिव्हर'ने त्रस्त लोकांसाठी अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत. ते पूर्वीपेक्षा प्रभावीही आहेत.
या विषयावरील सखोल संशोधनामुळं हे उपचार नक्की कधी आणि कसे करावेत याबद्दल उत्तम मार्गदर्शन आता उपलब्ध झालं आहे.
त्यामुळं अशा प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास कमी करण्यासाठी या 9 खास टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. तसंच डॉक्टरांकडे कधी जायला हवं हेही जाणून घ्या.
1. गोळ्यांऐवजी नेझल कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा अँटीहिस्टामाइन स्प्रेचा वापर
सर्दीची लक्षणं दिसताच आपण सहसा क्लॅरिटीन किंवा बेनाड्रिलसारख्या तोंडावाटे घेण्याच्या औषधांचा वापर करतो. मात्र, या गोळ्यांपेक्षा नेझल स्प्रे अधिक उपयुक्त ठरतात. कारण त्यांची कार्यपद्धती वेगळी असते.
औषध घेतल्यावर गोळी असेल तर पोटात जाऊन विरघळते आणि मग रक्तावाटे शरीरात पसरते. यामुळं नाकाच्या ज्या भागात औषधाची गरज असते तिथे त्या हव्या त्या प्रमाणात औषध पोहोचत नाही. याउलट स्प्रे थेट नाकावर काम करत असल्याने जास्त आराम मिळतो.
याउलट, नेझल स्प्रे थेट नाकाच्या आतल्या भागावर काम करतात. गोळ्यांप्रमाणं ते संपूर्ण शरीरात न पसरता थेट नाकाच्या थेट सूज येण्याच्या प्रक्रियेवर काम करतात. यामुळं नाक चोंदणं, सतत शिंका येणं अशा त्रासांपासून अधिक आराम मिळतो.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व कारणांमुळे आता डॉक्टर अशा ॲलर्जीसाठी लहान मुलं आणि प्रौढ दोघांसाठीही गोळ्यांऐवजी नेझल स्प्रे वापरण्याचा सल्ला देतात.
स्प्रेमध्येही 'कॉर्टिकोस्टेरॉइड्स' सर्वात प्रभावी ठरतात. त्यानंतर 'अँटीहिस्टामाइन्स'चा क्रमांक लागतो. परंतु, गेल्या साधारण 10 वर्षात विकसित झालेला सर्वात उत्तम पर्याय म्हणजे 'कॉर्टिकोस्ट्रॉइड-अँटीहिस्टामाइन' असलेला एकत्रित स्प्रे.
दोन वेगवेगळी औषधं एकत्र केलेला हा स्प्रे सर्वात जास्त प्रभावी ठरला आहे. याचे कोणतेही गंभीर दुष्परिणामही दिसून आलेले नाहीत.
बऱ्याचदा नाकाचा स्प्रे वापरल्याने डोळ्यांचा त्रासही कमी होतो. पण जर डोळ्यांना सतत खाज येत असेल तर 'ओलोपाटाडाइन' घटक असलेले आयड्रॉप्स वापरणे फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला इम्पेरियल कॉलेज लंडन आणि यूकेमधील रॉयल ब्रॉम्पटन हॉस्पिटलचे ॲलर्जी आणि रेस्पिरेटरी मेडिसिनचे निवृत्त प्राध्यापक स्टीफन डरहम यांनी दिला आहे.
2. 'डिकंजेस्टंट' स्प्रे टाळा
सगळेच नेझल स्प्रे सारखे नसतात. नाक चोंदल्यावर आराम मिळावा म्हणून आपण अनेकदा 'डिकंजेस्टंट' स्प्रे वापरतो. पण ते अंगलट येऊ शकतं.
या स्प्रेमुळं (ज्यात ऑक्सीमेटाझोलिन किंवा फिनाइलफ्रीन सारखे घटक असतात) रक्तवाहिन्या आकुंचन पावून नाकातील सूज कमी होते. त्यामुळं श्वास घेणं सोपं होतं.
मात्र, यांचा सलग वापर (साधारणपणे 5 दिवसांपेक्षा जास्त) केल्यास रक्तवाहिन्या या औषधावर अवलंबून राहू शकतात.
तसंच औषध न वापरल्यास त्या पुन्हा जास्त सुजतात त्याला 'रिबाउंड कंजेशन' म्हणतात. यामुळं रुग्णाला या स्प्रेचं व्यसन लागण्याची आणि नाकाचं कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती असते.
3. अँटीहिस्टामाइन गोळ्या घेणार असाल तर हे लक्षात ठेवा
जर तुम्ही ॲलर्जीवर गोळी घेणार असाल तर सिट्रिझिन (Zyrtec), लोराटॅडाइन (Claritin) किंवा फेक्सोफेनाडाइन (Allegra) सारख्या 'सेकंड जनरेशन' पर्यायांची निवड करा.
ही नवीन प्रकारची औषधं जास्त गुणकारी असतात. शिवाय, डायफेनहायड्रॅमाइन (Benadryl) किंवा डॉक्सिलामाइन सारख्या जुन्या म्हणजेच 'फर्स्ट जनरेशन' औषधांच्या तुलनेत या गोळ्यांमुळे गुंगी येण्याचे प्रमाण खूपच कमी असते.
कधी कधी गोळ्या आणि स्प्रे दोन्हीचा अवलंब करण्याची इच्छा होऊ शकते. पण ते पैसे वाया घालवण्यासारखं आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
4. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच उपचार सुरू करा
नेझल स्प्रे वापरण्यासाठी लक्षणं दिसण्याची वाट पाहत बसू नका. हंगाम सुरू होण्यापूर्वी काही आठवडे आधी उपचार सुरू केल्यास त्याचे सर्वात चांगले परिणाम दिसून येतात.
एका वैद्यकीय चाचणीत असं दिसून आलं की, ज्या रुग्णांनी परागकणांचा काळ सुरू होण्यापूर्वी 4 आठवडे आधी 'इंटरानेझल कॉर्टिकोस्टिरॉइड्स' वापरण्यास सुरुवात केली होती त्यांना इतर लोकांच्या तुलनेत कमी त्रास झाला.
5. औषध रोज घ्या, अगदी त्रास होत नसला तरीही
प्राध्यापक डरहम यांच्या मते, "जेव्हा लोक म्हणतात की या औषधांचा गुण येत नाही तेव्हा त्याला दोन कारणं असू शकतात. एक तर ते औषध घेण्याची पद्धत चुकीची असते किंवा औषध घेताना त्यात नियमितता नसते."

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हाला लक्षणं जाणवत असो वा नसो दररोज एका ठरलेल्या वेळीच औषध घ्या.
औषध किती वेळा घ्यायचं या नियमाचं पालन करणंही गरजेचं आहे. संशोधनात असं दिसून आलं आहे की, ज्यांनी दिवसातून एकदा ऐवजी 2 वेळा स्प्रे वापरला त्यांना ॲलर्जीच्या त्रासातून जास्त आराम मिळाला.
6. नेझल स्प्रेच्या योग्य पद्धतीने वापराची खात्री करा
आपण एखादा चांगला स्प्रे निवडला तरी आपल्यापैकी बरेच जण तो चुकीच्या पद्धतीने वापरतात. वारंवार होणारी एक चूक म्हणजे काही लोक, स्प्रे नाकात खूप आतपर्यंत घालतात. डोकं मागे झुकवतात आणि औषध जोरात आत ओढतात.
यामुळं औषध नाकात राहण्याऐवजी थेट घशात जातं. मात्र, औषधाचा प्रभाव होण्यासाठी ते नाकाच्या आतल्या भागात राहणं गरजेचं असतं.
स्प्रे मारताना नाकपुडी किंचित वर करा आणि बाटलीचं टोक त्याच बाजूच्या कानाच्या दिशेला तिरपं ठेवा.
यासाठी विरुद्ध हाताचा वापर करणं अधिक सोयीचं पडतं. बाटली नाकात फक्त पाव इंच (6 मिमी) इतकीच आत सरकवा.
त्यानंतर डोकं थोडं पुढं झुकवून स्प्रे मारा. स्प्रे मारल्यानंतर लगेच नाक शिंकरणं टाळा. यामुळं औषध नेमक्या ठिकाणी पोहोचतं आणि लगेच बाहेर न पडता तिथेच टिकून राहतं.
7. आयड्रॉप्स वापरण्याची योग्य पद्धत
अनेक लोक डोकं मागे झुकवून औषध थेट डोळ्याच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे औषध लगेच बाहेर सांडतं किंवा डोळ्याच्या संपूर्ण भागावर नीट पसरत नाही.
त्याऐवजी, डोकं एका बाजूला झुकवा. औषध डोळ्याच्या आतील कोपऱ्यात टाका आणि पापण्यांची उघडझाप करा, असा सल्ला स्कॅडिंग आणि डरहम देतात.
यामुळं औषध डोळ्यात सगळीकडं व्यवस्थित पसरतं.
8. ॲलर्जी वाढवणाऱ्या गोष्टी टाळा
केवळ औषधोपचार पुरेसे नसून ॲलर्जी वाढवणाऱ्या घटकांपासून दूर राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
परागकण घरात येऊ नयेत म्हणून खिडक्या बंद ठेवा. अगदी रात्रीच्या वेळीही. तसेच बाहेर जाताना डोळ्यांवर चष्मा आणि तोंडाला मास्क लावा.
बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे किंवा शक्य असल्यास आंघोळ करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर बाहेरून आलेली ॲलर्जी तुमच्या केसांवाटे किंवा त्वचेवाटे बेडवर आणि सोफ्यावर पसरू शकते आणि तुमचा त्रास वाढू शकतो.
9. त्रास कमी झाला नाही तर डॉक्टरांना भेटा
आपल्यापैकी अनेकजण बदलत्या हवामानामुळे असं होत असेल म्हणून ॲलर्जीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं चुकीचं आणि आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
या त्रासाचा परिणाम आपल्या आरोग्यावर, श्वसनसंस्थेवर आणि झोपेवर होतो. मुलांच्या बाबतीत तर त्यांच्या अभ्यासावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेतील बाल ॲलर्जी तज्ज्ञ बॅरी कोहेन म्हणतात, "अनेकदा लोक याला 'फक्त नाक वाहणे' समजून सोडून देतात. पण जर तुम्हाला वर्षातील 3 महिने जरी हा त्रास होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे."

फोटो स्रोत, Getty Images
जर तुम्ही सर्व उपाय योग्य प्रकारे करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल तर त्वरित तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
काही प्रकरणांमध्ये हा त्रास केवळ ॲलर्जीचा नसून अस्थमा (दमा) किंवा श्वसनसंस्थेचा इतर एखादा आजार असू शकतो.
जर ती साधी ॲलर्जी असेल तरीही काही रुग्णांना 'ॲलर्जीन इम्युनोथेरपी' सारख्या प्रगत उपचारांचा फायदा होऊ शकतो.
यामुळे दरवर्षी होणारा हा त्रास थांबतो आणि तुम्हाला मोकळेपणाने फिरता येते.
(या लेखातील मजकूर केवळ माहितीसाठी आहे. डॉक्टर किंवा वैद्यकीय सल्ल्याचा तो पर्याय मानला जाऊ नये. या मजकुराच्या आधारे केलेल्या कोणत्याही निदानासाठी बीबीसी जबाबदार नाही. सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही बाह्य इंटरनेट साइट्सच्या मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंकवरील कोणत्याही मजकुराची जबाबदारी बीबीसीची नाही. आरोग्याबाबत काळजी वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























