पालीच राहिल्या नाही तर निर्माण होऊ शकतं 'हे' संकट? संशोधकांना अभ्यासात काय आढळलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, के. सुभगुनम
- Role, बीबीसी तामिळ
- वाचन वेळ: 6 मिनिटे
उत्तर चेन्नईमधील एक उकाड्याची दमट रात्र होती. कविता (34 वर्षे) त्यांच्या 6 वर्षांच्या मुलाला झोपवायचा प्रयत्न करत होत्या. खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला होता. त्यामुळे विजेच्या पंख्यांच्या घरघरचा मोठा आवाज घुमू लागला होता. नेहमीप्रमाणेच, ट्युबलाईटभोवती कीटकांचा थवा जमू लागला होता.
"माझा मुलगा अचानक ओरडला... 'आई!' आणि त्याच्या अगदी डोक्यावरच भिंतीला चिकटून बसलेल्या एका पालीकडे त्यानं बोट दाखवलं."
एक पिवळसर पाल भिंतीला, अगदी छताच्या शेजारी चिकटून बसली होती.
"मी झाडूच्या मदतीनं त्या पालीला तिथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पालीनं भिंतीवर बसलेला एक डास पकडला आणि खाऊन टाकला," असं कविता म्हणाल्या.
"त्याच दिवशी सकाळी मी ऐकलं होतं की, आमच्या परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. ती पाल डास पकडून खात असल्याचं पाहिल्यावर, मी क्षणभर अडखळले," असं कविता पुढे म्हणाल्या.
सॅमसन किरुबाकरन, मदुराईमधील वन्यजीवप्रेमी आहेत. त्यांनीदेखील असाच अनुभव सांगितला.
"एक दिवस मी शांतपणे बसलेलो होतो. मी माझ्या विचारांमध्ये मग्न होतो. तेव्हा एक पाल आली आणि ती हळूहळू माझ्या पायावर चढली. मला चावत असलेले काही डास तिनं एकेक करून खाऊन टाकले.
मग ती काही वेळ माझ्या पायाभोवती घिरट्या घालत राहिली. त्यानंतर ती खाली उतरली आणि निघून गेली," असं सॅमसन म्हणाले.
धोकादायक शत्रूला रोखणारा जीव
वन्यजीव कार्यकर्ते सॅमसन किरुबाकरन म्हणतात की, डासांपासून आपलं संरक्षण करणारी ही एक यंत्रणा आपल्या घरांमध्ये शांतपणे कार्यरत आहे.
त्यांच्या मते, डास आणि झुरळांसारख्या रोगांचा संसर्ग पसरवणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यात पाली महत्त्वाची भूमिका बजावतात.
शहरांमध्ये डासांचं प्रमाण वाढण्यामागच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे पाली नाहीशा होणं, असं ते म्हणाले.
कीटकांची शिकार करणाऱ्या पाली
डॉ. ए. थानिगाव्यल, अगस्त्यमलाई पीपल्स नॅचरल रिसोर्स कॉन्झर्व्हेशन सेंटरमध्ये संशोधक आहेत.
घरांमध्ये राहणाऱ्या पाली सहसा पिवळ्या रंगाच्या असतात. पालींच्या या प्रजातीनं मानवी वस्त्यांच्या वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतलं आहे, असं डॉ. ए. थानिगाव्यल म्हणतात.
"पाली आक्रमक नसतात. त्या अतिशय संवेदनशील असतात. त्या नेहमीच माणसांपासून दूर राहणं पसंत करतात. मात्र, घराभोवती असणाऱ्या कीटकांची शिकार करणाऱ्या सर्वात कार्यक्षम शिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. ए. थानिगाव्यल यांच्या मते, डास, माश्या, मुंग्या किंवा झुरळं, यासारख्या विजेच्या दिव्यांकडे आकर्षित होणाऱ्या कोणत्याही कीटकांची पाली शिकार करतात.
"शहरी भागातील बदलत्या जीवनशैलीमुळे, पालींसाठी अनुकूल असलेले अधिवास कमी होत चालले आहेत. त्यामुळे आता मानवी वस्त्यांमध्ये पाली क्वचितच आढळतात.
विजेच्या दिव्यांकडे आकर्षित होणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी सहसा पाली येतात. मात्र आता त्यांना लपण्यासाठीच्या सोयीच्या जागा पूर्वीइतक्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, हीदेखील एक समस्या आहे," असं त्यांनी पुढे सांगितलं.
फक्त कीटकच नव्हे, तर पालींची संख्या वाढली, तर मोठ्या पाली छोट्या पालींना खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतील, असं डॉ. थानिगाव्यल म्हणतात.
शहरी भागात एरवी घरांमध्ये पालींसाठी आढळणारे अधिवास मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. त्यामुळे आता पालींची संख्यादेखील कमी होते आहे, असं त्यांनी नमूद केलं.
निसर्गाचा समतोल राखण्यातील पालींची भूमिका
पालींचं दिसणं, त्यांचं वर्तन आणि त्यांच्या आवाजामुळे, सर्वसामान्यपणे काही लोकांना त्या घरात असणं आवडत नाही. मात्र काही तज्ज्ञांच्या मते, पाली नैसर्गिक कीड नियंत्रकाचं काम करतात.
इंडोनेशियातील, आयपीपी विद्यापीठातील डॉ. अचमद फरेला यांनी गेल्या वर्षी एक संशोधन केलं होतं.
त्यात त्यांना आढळलं की जर पालींची संख्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आली तर, कीड नियंत्रक म्हणून निसर्गाचा समतोल राखण्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान डॉ. अचमद यांचं म्हणणं आहे की, पालींमुळे रोग पसरतात हे गृहितक अद्याप सिद्ध झालेलं नाही.
मलाया विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासातून आढळलं की 20 - 60 टक्के पालींच्या आतड्यांमध्ये 'साल्मोनेला' हा जिवाणू असतो.
मात्र सॅमसन यांचं म्हणणं आहे की या जिवाणूचा मानवावर कदाचित तत्काळ परिणाम दिसून येणार नाही.
तसंच ज्या अन्नाला पाल स्पर्श करते किंवा ज्यावर ती पडते, ते अन्न खाल्ल्यानंतर एखादी व्यक्ती लगेचच आजारी पडते किंवा तिला संसर्ग होतो, हे दाखवणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही.
त्याचप्रमाणे, अन्न दूषित होण्याचा मुख्य धोका पालींपासून नसून, तो व्यवस्थित न शिजवलेल्या कच्च्या अन्नपदार्थांपासून असतो, या गोष्टीला जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन या संस्थांनी दुजोरा दिला आहे.
शहरांची नैसर्गिक रचना
विविध शहरांमध्ये डासांच्या समस्येमुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यासारख्या गंभीर आजारांचा प्रादूर्भाव होतो आहे.
बेडूक, टोड आणि पाल यासारख्या प्रजाती, ज्या धोकादायक डासांच्या नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहेत, अशा प्रजातींची कमी होत जाणारी संख्या ही एक चिंतेची बाब आहे, असं सॅमसन म्हणाले.

"विशेषकरून पाली फक्त डासांवरच नाही, तर झुरळांसारख्या इतर कीटकांवरदेखील नियंत्रण ठेवतात. नैसर्गिक स्वच्छतेसाठी पालींचं अस्तित्व अत्यंत आवश्यक आहे," असं ते म्हणाले.
पालींमुळे डास पूर्णपणे नष्ट होत नसले, तरीदेखील लाखो घरांमधील डासांचा एकूणच प्रभाव कमी करण्यास पालींची मदत होते, असं तज्ज्ञ म्हणतात.
"एखाद्या घरातील एका पालीपुरता हा प्रश्न नाही. तर, प्रत्येक शहरातील, प्रत्येक घरात हजारो पाली जी नैसर्गिक सेवा देत असतात, त्याचा हा प्रश्न आहे," असं ते म्हणाले.
शहरं ही आधुनिक इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था आहेत. ज्या काँक्रीट, प्रकाश आणि मानवी हालचाली यांच्या सहअस्तित्वावर आधारित असतात.
उदाहरणार्थ, चेन्नईसारख्या शहरांमध्ये जवळपास वर्षभर हवा दमट असते. तिथे अशाप्रकारचे इको-झोन म्हणजे पर्यावरणीय क्षेत्रं, अत्यंत सक्रिय असतात.
साचलेलं पाणी, उघड्या गटारी, डबकी आणि बांधकामाच्या ठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग या गोष्टींवर कीटक मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे पालींसारखे जीव त्यांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रित करतात.
घरात पाल नसल्यास काय होईल?
जर घरात पाली नसतील, तर कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
"पाली नाहीशा किंवा नामशेष झाल्यामुळे निर्माण झालेलं संकट किंवा त्याचे परिणाम लगेच जाणवणार नाहीत. माणसांमध्ये कीटकांमुळे पसरणारे आज रोखण्यामध्ये पालींची मोठी भूमिका असते.
जेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया थांबेल, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील", असं सॅमसन म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"पालीबद्दल वाटणारी किळस आणि भीती जरी अजिबात कमी झालेली नसली, तरीदेखील त्यांना पाहताच, त्यांना हुसकावून लावण्याचा विचार मी आता सोडून दिला आहे," असं कविता म्हणाल्या.
"माझा मुलगा आता पालींना घाबरत नाही. मात्र पाली ज्याप्रकारे कीटकांची शिकार करतात, ते पाहून तो थक्क होतो. इकोसिस्टमसाठी पालींचं अस्तित्व कसं महत्त्वाचं आहे, हे आता तो मला समजावून सांगतो," असं कविता म्हणाल्या.
"मानव आणि इतर जीवांचं सह-अस्तित्व म्हणजे, आमच्यासारख्या लोकांच्या मनातून त्यांच्याबद्दलची भीती किंवा तिटकारा नाहिसा होईल, असं अजिबात नाही.
इथे आपण फक्त आपली समज वाढवण्याची आवश्यकता आहे. आता माझ्या हे लक्षात आलं आहे की आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालींचं अस्तित्व अत्यंत महत्त्वाचं आहे," असं त्या म्हणाल्या.
डास आणि इतर कीटकांच्या समस्येवर मात करण्यासाठी कीटकनाशकांसारख्या अनेक आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. मात्र या पद्धतींचे अनेक दुष्परिणामदेखील आहेत, असं डॉ. थानिगाव्यल म्हणाले.
"कीटकांमध्ये कीटकनाशकांविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते. याचा अर्थ, आता कीटकनाशकांचा कीटकांवर परिणाम होत नाही. तर दुसऱ्या बाजूला हे कीटक खाणाऱ्या किंवा त्यांची शिकार करणाऱ्या जीवांना देखील कीटकनाशकांमुळे अपाय होतो. बेडूक आणि पाली यांचं अस्तित्व हा एक नैसर्गिक उपाय आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत," असं डॉ. थानिगाव्यल म्हणाले.
"सर्व घरांमध्ये, मग ते गर्दीच्या शहरांमधील फ्लॅट असो किंवा ग्रामीण भागातील शेतांशेजारी असणारी घरं असो, पालींसारख्या काही जीवांनी मानवी वस्त्यांशी जुळवून घेत तिथे वास्तव्य केलं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही," असं ते पुढे म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























