विजय यांना काँग्रेसचा पाठिंबा, तरीही सरकार स्थापनेचा पेच कायम; काय आहेत पर्याय?

फोटो स्रोत, ANI
- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमला (टीव्हीके) काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांचा टीव्हीके सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना 108 जागा मिळाल्या आहेत.
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. विजय यांच्या पक्षाला बहुमताचा हा आकडा गाठण्यासाठी 10 जागा कमी पडत आहेत. तामिळनाडूमध्ये काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने विजय यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही विजय यांना सरकारस्थापनेसाठी पाच जागा कमी पडत आहेत.
तामिळनाडू विधानसभेची मुदत 10 मे रोजी संपत आहे. तत्पूर्वी बहुमत मिळवणे आवश्यक आहे, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे आता विजय यांच्याकडे सरकार स्थापनेचे नेमके कोणते पर्याय आहेत, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, AICC
सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर विजय यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारून 15 दिवसांत विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकणं आवश्यक असेल, असे कायदेतज्ज्ञ सांगतात.
सरकार स्थापन करण्याचे मार्ग कोणते?
10 मे पूर्वी तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन करणं आवश्यक आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे वकील कृष्णमूर्ती सांगतात. ते टीव्हीकेच्या कायदेशीर टीममध्ये पदाधिकारीही आहेत.
बीबीसीशी बोलताना कृष्णमूर्ती म्हणाले की, "तामिळनाडू विधानसभेची मुदत 10 मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुमतासाठी लागणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे टीव्हीकेला राज्यपालांकडे सादर करावी लागतील."

फोटो स्रोत, Getty Images
बहुमत मिळवण्यासाठी फारच कमी वेळ असल्यामुळे, टीव्हीके दुसरा मार्ग वापरू शकते, असं वकील कृष्णमूर्ती सांगतात. त्यांच्या मते, 10 मे पूर्वी विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारावीत आणि त्यानंतर 15 दिवसांत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घ्यावा, असा पर्यायही शक्य आहे.
काँग्रेस व्यतिरिक्त कोणाचा पाठिंबा मिळेल?
यासाठी कोणतीही विशेष प्रक्रिया न करता, बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे घेऊन विजय हे राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात, असं पत्रकार कुपेंद्रन म्हणतात.
डीएमके आघाडीत 'उदयसूर्य' चिन्हावर न लढलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसव्यतिरिक्त व्हीसीके- 2, कम्युनिस्ट पक्ष- 4 आणि डीएमडीके- 1 अशा एकूण 12 आमदारांचा पाठिंबा विजय यांना मिळण्यात कोणती अडचण येईल असं वाटत नाही, असं ते म्हणाले.
त्याचवेळी, द्रमुक आघाडीतील पक्षांव्यतिरिक्त पीएमके आणि एएमएमके यांसारखे पक्षही विजय यांच्यासोबत युती करण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ पत्रकार शिवप्रियन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्टॅलिन यांचा डीएमके, एआयएडीएमके, आणि भाजप यांसारख्या पक्षांनी पाठिंबा दिला तरीही विजय तो स्वीकारण्याची शक्यता नाही, असंही शिवप्रियन म्हणतात.
"विजय यांनी आधीच जाहीरपणे आघाडी सरकारची घोषणा केलेली आहे. काँग्रेसही सातत्याने ही मागणी करत आहे," असं पत्रकार कुपेंद्रन सांगतात.
ते पुढे म्हणाले की, "जर विजय यांनी भाजपला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट केले, तर इंडियन युनियन मुस्लिम लीगचे 2 आमदारही टीव्हीकेला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावापूर्वीच पाठिंब्याची पत्रे देऊन विजय सरकार स्थापन करू शकतात. ही पुढील लोकसभा निवडणुकीसाठीच्या आघाडीची नांदी ठरू शकते."
इंडियन युनियन मुस्लिम लीगने शिडी चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला असला तरी, त्यांनी डीएमके आघाडीतच राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
इतर पक्षांची भूमिका काय आहे?
पत्रकारांशी बोलताना लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळनाडूचे नेते थोल थिरुमावलवन म्हणाले की, "आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी कटिबद्ध आहोत. आम्ही डीएमके आघाडीतच राहणार आहोत. विजय यांच्याकडून आम्हाला कोणतंही निमंत्रण आलेलं नाही आणि आमची अशी कोणती योजनाही नाही."
हेच मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव षण्मुगम आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव वीरपांडियन यांनीही व्यक्त केलं आहे. ते आणि डीएमकेचे राज्यसभा सदस्य सुदीश यांनी मंगळवारी (5 मे) डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पण काँग्रेस पक्षाकडून कोणीही डीएमके कार्यालयात आलं नाही.
"आम्ही धर्मनिरपेक्ष आघाडीत आहोत. मी नेहमीच विजय यांना 'आमच्या घरचा मुलगा' असं म्हटलं आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत," असं विरुधाचलममधून विजयी झालेल्या डीएमकेच्या नेत्या प्रेमलता यांनी पत्रकारांना सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























