रायगडमध्ये 3 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीला अटक

महिला अत्याचार

फोटो स्रोत, iStock

वाचन वेळ: 2 मिनिटे

रायगड जिल्ह्यातील पेण लगतच्या आदिवासी वाडीतील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. पेण पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात अलिबाग तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलीस स्टेशन आणि ग्रामिण रुग्णालयाबाहेर संतप्त नागरिकांनी गर्दी केली.

तीन वर्षीय मुलीच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमनंतर बलात्कार आणि हत्या झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे.

रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी सांगितले, "आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून चौकशी सुरू आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याच्याविरोधात चार विविध गुन्ह्यांची नोंद आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आरोपी आदेश मधुकर पाटील याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली.

पेण प्रायव्हेट हायस्कूल शाळेजवळ मळेघरवाडी या आदिवासी वाडीत राहणाऱ्या चिमुकलीवर 29 डिसेंबरला रात्रीच्या वेळी बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी झोपेत असताना राहत्या घरातून तिला 200 मीटर अंतरावर नेण्यात आले. त्याठिकाणी बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली.

मुलगी घरात नाही हे पाहून पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळपास एक तास शोधले. त्यानंतर पोलीस तक्रार केली.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा- अदिती तटकरे

या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.

अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

फोटो स्रोत, Twitter/Aditi Tatkare

अदिती तटकरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, " बुधवारी (30 डिसेंबर) पहाटेच्या वेळी ही घटना घडली. पीडितेची वैद्यकीय तपासणी पार पडली आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला ओळखले असून आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी दहा पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे."

याप्रकरणी आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

"या प्रकरणाचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात लागावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबाला समाज कल्याणविभागाअंतर्गत मदत मिळेल," असे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले.

विरोधकांची सरकारवर टीका

राज्यात महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून राज्य सरकारला गुन्हेगारी कमी करण्यात अपयश येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, Facebook/Anil Deshmukh

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले, "गेल्या सहा महिन्यात कोव्हिड सेंटरपासून ते ग्रामीण भागांपर्यंत अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढत झाली आहे. पण राज्य सरकार या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही."

त्या पुढे सांगतात, "कोरोना काळात आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती केली होती. त्यांनी न्यायालयाला महिलांच्या संबंधी गुन्ह्यात आरोपींना पॅरोल किंवा जामिनावर सोडण्यात येऊ नये असे पत्र द्यावे. पण राज्य सरकारने त्याचा पाठपुरावा केलेला दिसत नाही. लातूरमध्ये 60 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली. राज्यात महिला सुरक्षेचा विषय केवळ भाषणात आहे."

20 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ झाल्याच्या तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)