अहमदाबाद प्लेन क्रॅश : विमान जिथं कोसळलं तिथं आताची परिस्थिती काय आहे? पाहा 9 फोटो

- Author, रॉक्सी गगाडेकर छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अहमदाबादमध्ये 12 जून, 2025 रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले. त्या अपघाताला एक वर्ष पूर्ण होईल. या अपघातात विमानातील 241 जणांसह एकूण 260 जणांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेच्या वर्षभरानंतर, बीबीसीने घटनास्थळाला भेट दिली आणि तेथील सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हे 'अतुल्यम 1' या इमारतीचं दृश्य आहे. या संकुलातील प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार याच इमारतीजवळ होतं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या संकुलातील सर्व इमारतींपैकी याच इमारतीमधील सर्वाधिक लोकांना या आपत्तीतून स्वतःचा बचाव करता आला. या परिसरामध्ये आजही जळालेली झाडे दिसून येतात.

वरील इमारत 'मेस'च्या इमारतीपासून सर्वात जवळ आहे. विमानाचा उजवा पंख या इमारतीसमोरील रस्त्यावर फेकला गेला होता. आजही या इमारतीची स्थिती पूर्वीसारखीच आहे. अपघाताच्या वेळी या वसतिगृहाच्या इमारतीत 92 विद्यार्थी राहत होते.

IGP कंपाऊंडजवळील रस्ता FSL चौकाकडे जातो. एकेकाळी रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाड्यांच्या रांगांच्या आवाजाने दुमदुमलेला हा रस्ता आता दैनंदिन वाहतुकीसाठी वापरला जातो. तरीही, अनेक लोक त्या पडक्या इमारतीचे फोटो काढण्यासाठी तिथे येतात आणि थांबतात.

एकेकाळी विद्यार्थ्यांच्या कोलाहलानं गजबजलेली ही वसतिगृहाची इमारत अपघातानंतर जवळपास वर्षभरापासून ओस पडली असून, तिच्या आसपास रानटी वनस्पतींचं साम्राज्य पसरलेलं दिसतं.

हे ठिकाण आयजीपी (IGP) परिसराच्या पूर्णपणे बाहेर आहे. एआय 171 या विमानाचा उजवा पंख इथे पडला होता. एका स्थानिक चहा विक्रेत्याचा 15 वर्षांचा मुलगा फुटपाथवर विसावा घेत असताना हा जळता पंख त्याच्या अंगावर पडला. यामुळे तिथल्या एका अन्य सरकारी इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आणि जवळची झाडंही पडली. ती भिंत अजूनही त्याच अवस्थेत आहे.

ही सुरक्षा चौकी मेसची इमारत आणि 'अतुल्यम' इमारत यांच्या दरम्यानच आहे. या चौकीच्या एका बाजूला पोलीस हॉर्स कॅम्प आहे आणि दुसऱ्या बाजूला मेसची इमारत आहे. विमानाचा जळालेला बहुतांश भाग अजूनही याच सुरक्षा चौकीजवळ ठेवलेला आहे.

इथे 'अतुल्यम'च्या चारही इमारती दिसत आहेत. विमानाचे अवशेष हटवण्याव्यतिरिक्त, इतर सर्व गोष्टी जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. इमारतीबाहेर पडलेला गंजलेला एलपीजी गॅस सिलिंडरही आम्हाला दिसला. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी पारिख यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर आणि पोलिसांची मंजुरी मिळाल्यावर, आम्ही या परिसरात वसतिगृहासाठी नवीन निवासी इमारती बांधू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाला भेट दिली. 'अतुल्यम' इमारतीच्या पायाच्या खांबाजवळ कोसळलेल्या विमानाचे अवशेष हटवण्यात आलं आहेत. मात्र, इमारतीची स्थिती तशीच आहे. इमारतीच्या सुरक्षेसाठी इथे बी.जे. मेडिकल कॉलेजचे खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























