पावसाचा जोर ओसरला, जाणून घ्या महाराष्ट्रात पुढील 24 तास हवामान कसं राहील

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रात 3-4 जुलैला बरसलेला मान्सून आठवडाभरात जणू गायब झाला आहे. तो कधी परतेल? तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 24 तास हवामान कसं असेल आणि हवामान विभागानं काय इशारे दिले आहेत? जाणून घेऊयात.

12 जुलैला दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये महाराष्ट्रावर कुठेच मान्सूनचे दाट ढग अजिबातच दिसत नाहीयेत.

काही ठिकाणी ढगांचं केवळ विरळ आवरण आहे. मान्सूनमध्ये तसा दरवर्षी काही काळ खंड पडतो, पण ऐन जुलैमध्ये असं चित्र क्वचितच दिसतं.

सध्या हवामान इतकं कोरडं आहे, की फक्त मुंबईच नाही, तर एरवी पावसानं भिजलेल्या घाटमाथ्यावरही अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये अजिबातच पाऊस झाला नाही.

राजस्थानमध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी त्यात भर पडू शकते.

ढग आणि पाऊस गायब झाल्यानं राज्यात अनेक भागांमध्ये तापमानात थोडी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास राहू शकतं.

पण रात्रीचं किमान तापमान मात्र बऱ्याच ठिकाणी 26-27 अंशांच्या वर जाऊ शकतं.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी वेदरच्या फोरकास्टनुसारही, पुढच्या 24 ते 48 तासांत घाटात तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात इतर बहुतांश ठिकाणी हवामान कोरडंच राहील, तर कोकण आणि घाटात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील.

त्यामुळेच 12 आणि 13 जुलैसाठी हवामान विभागानं कुठल्याही जिल्ह्यात कोणताच अलर्ट दिलेला नाही.

पाऊस नसला, तरी वारा आहे आणि काही ठिकाणी वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटरच्या आसपास जातो आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

एकंदरीत मान्सूनची अरबी समुद्रातली शाखा सध्या थंड पडली आहे, पण बंगालच्या उपसागरातली शाखा मात्र सक्रीय आहे आणि तिच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, याचा संबंध चीनला धडकलेल्या बावी या टायफूनशी आहे. पॅसिफिक महासागरात हे महाकाय चक्रीवादळ तयार होत गेलं. तसं भारताकडून पूर्वेला आग्नेय आशियाच्या भागात बाष्प जमा झालं, असं दिसतं.

हा परिणाम किती काळ राहू शकतो, मान्सून पुन्हा कधी सक्रीय होईल, हे सांगता येत नाही. सध्या तरी हवामान विभागानं इतकंच स्पष्ट केलंय की, पुढचे 5-6 दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडेच राहण्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)