You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'दिव्य शक्ती असल्याचं सांगून इमामानं माझं लैंगिक शोषण केलं', अनेक मुली आणि महिलांवरील अत्याचाराचं भयानक प्रकरण
- Author, कॅथरीन वॉएट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(इशारा: या लेखामध्ये असलेलं लैंगिक शोषण आणि बलात्काराचं वर्णन वाचकांना विचलित करू शकतं.)
'आरिया' (बदललेलं नाव) 13 वर्षांची होती, तेव्हा एका इमामानं तिचं लैंगिक शोषण केलं होतं. इमामानं तिला सांगितलं होतं की तो तिला 'बरं' करतो आहे.
अब्दुल हलीम खान हा लंडनच्या पूर्व भागातील एका मशिदीतील एक प्रतिष्ठित धर्मगुरू होता. तो अल्पवयीन, तरुण मुली आणि त्यांच्या आईवडिलांना सांगायचा की 'दुष्ट आत्म्यां'पासून बचाव करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे.
त्यानं मुलींना इशारा दिला होता की, जर त्यांनी याबाबतीत कोणालाही सांगितलं, तर ते तथाकथित उपचार निष्फळ ठरतील.
त्यांच्याबरोबर वाईट घडू शकतं किंवा काळी जादू किंवा जादूटोण्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अपाय होईल.
"त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे, असं मला खरोखरंच वाटत होतं," असं आरिया म्हणाली.
आरियानं सांगितलं की, खान तिला म्हणाला होता की, जर ती कधीही या गैरवर्तनाबद्दल बोलली तर "माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या बाबतीत काहीतरी खूप वाईट घडेल".
या प्रकाराला सामोरं जाणारी ती एकटीच नव्हती.
अनेक महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार
खाननं 11 वर्षांमध्ये 7 महिला आणि मुलींचं याच प्रकारे लैंगिक शोषण केलं.
खाननं ज्या महिला आणि मुलींवर याप्रकारे अत्याचार केले किंवा शोषण केलं, त्यामध्ये सर्वात लहान मुलगी फक्त 12 वर्षांची होती.
एखादा फ्लॅट किंवा कारसारख्या एखाद्या निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी खान त्यांचं मन वळवत असे.
तिथे तो जिन्न म्हणजे अलौकिक शक्ती असलेल्या आत्म्याचं नाटक करत त्यांच्यावर बलात्कार करायचा किंवा लैंगिक शोषण करायचा.
खाननं यासाठी खिडक्यांना रंगीत काचा असलेल्या कार निवडल्या. एका सर्व्हायवरला फोन दिला. म्हणजे तो त्यांना संपर्क करू शकेल.
तर दुसऱ्या सर्व्हायवरला त्यानं तिच्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडून भेटण्यासाठी राजी केलं.
आरियावर लैंगिक अत्याचार कसे झाले?
आरियाच्या शाळेत समस्या निर्माण झाल्यानंतर तिच्या आईनंच तिची भेट खानशी घालून दिली होती.
तिनं आरियाला सांगितलं होतं की, इमाम तिला मार्गदर्शन करतील.
जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा खान तिला त्याच्या कारमध्ये बसण्यास सांगितलं.
"त्याचवेळेस त्यांनी मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला," असं आरिया म्हणाली.
"माझे डोळे बंद होते आणि ते म्हणाले की, कारच्या खिडकीवर कोणीतरी ठोठावत असल्याचा आवाज येईल," असं आरिया म्हणाली.
"आणि मग मी खरोखरंच ते आवाज ऐकले. मात्र मी फक्त 13 वर्षांची होती. त्यामुळे मी खूप घाबरले होते," असं आरिया पुढे म्हणाली.
खानला (54 वर्षे) या भयानक गुन्ह्यांसाठी आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात किमान 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
त्याच्यावर बलात्काराच्या 9 प्रकरणांसह स्थानिक मुस्लीम समुदायातील 7 सर्व्हायवरचं लैंगिक शोषण आणि बाल शोषणाचे इतर गुन्हेदेखील नोंदवण्यात आले आहेत.
खाननं 2004 ते 2015 दरम्यान या मुलींवर आणि महिलांवर हे लैंगिक अत्याचार केले. असं करताना त्यानं त्याची ताकद आणि प्रभावाचा वापर करून या सर्व्हायवरला गप्प राहण्यास भाग पाडलं.
जेव्हा सर्वात कमी वयाच्या सर्व्हायवरनं 2018 मध्ये तिच्या शाळेतील थेरेपिस्टला या अत्याचार आणि शोषणाबद्दल सांगितलं, तेव्हा पोलिसांना खानच्या गुन्ह्यांबद्दल माहिती मिळाली.
त्याच्याविरोधात आरोप निश्चित होण्यासाठी आणखी 5 वर्षे गेली.
बीबीसीनं खाननं अत्याचार झालेल्या 2 सर्व्हायवरशी त्यांच्या अनुभवांबद्दल संवाद साधला.
'माझ्या कुटुंबानं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही'
फराहची (नाव बदलण्यात आलं आहे) इमान खानबरोबर लहानपणी भेट झाली होती. त्यानं फराहच्या आईला पटवून दिलं होतं की, तिच्या मुलीला उपचारांची आवश्यकता आहे.
तिचं म्हणणं आहे की, खाननं तिच्या कुटुंबाचा गैरफायदा घेतला.
तो खोट्या, कपोलकल्पित कथा सांगायचा. तो म्हणायचा, "मला दिसतं आहे की काही गोष्टी तुझ्याकडे येत आहेत, तुला सुरक्षेची आवश्यकता आहे. मला तुझ्या मुलीचं रक्षण करायचं आहे."
खाननं फरहाचं लैंगिक शोषण केलं आणि सांगितलं की हा 'उपचारा'चा भाग होता.
ती म्हणते की खाननं केलेले अत्याचार त्यावेळेस माझ्या लक्षात आले नाहीत.
"मी स्वत:ला सांगितलं की हे चुकीचं आहे. तुम्हाला माहीत आहे की याप्रकारे स्पर्श करता कामा नये. मी खूप गोंधळलेले होते. मात्र मी माझ्या कुटुंबाला हे सांगू शकत नव्हते. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता," असं फराह म्हणाली.
शेवटी फराह किशोरवयीन झाल्यानंतर तिनं तिच्या आईवडिलांना सर्व सांगितलं.
मात्र ती म्हणते की, त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मग ती घर सोडून निघून गेली.
"माझ्या कुटुंबानं माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ज्या लोकांकडून मला सुरक्षा आणि पाठिंब्याची अपेक्षा होती, त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली. त्यांनी मलाच दोष दिला आणि आजपर्यंत ते असंच करत आहेत," असं ती म्हणाली.
"मला असं वाटतं की, मी जणूकाही हरवले आहे. मी माझ्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारते, मी कोण आहे? मी कुठली आहे?" असं ती पुढे म्हणाली.
धमकी आणि ब्रेनवॉश
या प्रकरणात क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिससाठी काम करणाऱ्या तज्ज्ञ सरकारी वकील मेलिसा गार्नर म्हणतात की, खाननं तरुण मुलींवर आणि महिलांवर जे अत्याचार केले, तसं त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही.
त्या म्हणाल्या की, त्यानं सर्व्हायवरला धमकावलं आणि त्यांना अशाप्रकारे ब्रेनवॉश केलं की त्यांना खरोखरंच वाटू लागलं की त्यांच्यावर दुष्ट आत्म्यांचं-भुतांचं सावट आहे किंवा त्यांना भुतानं पछाडलेलं आहे.
"हे खूपच धक्कादायक होतं. तुम्ही जेव्हा सर्व्हायवरचे जबाब पाहता, तेव्हा ते खूपच अस्वस्थ करणारे असतात," असं त्या पुढे म्हणाल्या.
आयशा के गिल ब्रिस्टल विद्यापीठात गुन्हेगारीशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. तसंच या प्रकरणाच्या धार्मिक पार्श्वभूमीवर साक्ष देणाऱ्या तज्ज्ञ आणि फिर्यादी पक्षाच्या साक्षीदार आहेत.
आयशा के गिल यांचं म्हणणं आहे की, पुराणमतवादी किंवा पारंपारिक इस्लामी शिक्षण काळी जादू किंवा जादूटोण्याला पाठिंबा देत नाही. मात्र तरीदेखील याचा 'महत्त्वाचा सांस्कृतिक प्रभाव' कायम आहे.
"सर्व्हायवरला असं पटवून देण्यात आलं होतं की, भयानक अलौकिक हानीपासून फक्त खानच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो. त्याच्या नियंत्रणातून बाहेर पडल्यास त्यांना विनाशकारी परिणामांना सामोरं जावं लागेल," असं प्राध्यापक गिल पुढे म्हणाल्या.
त्यांचं म्हणणं आहे की, लैंगिक हिंसेबद्दल सांगणं मुस्लीम महिलांसाठी गंभीर जोखमीची बाब ठरू शकते.
"अनेक महिलांवर सामाजिकदृष्ट्या अशाप्रकारचे संस्कार केलेले असतात की, खासगी गोष्टींबद्दल त्यांनी कुटुंबाबाहेर बोलू नये आणि त्यामुळे वास्तविकपणे गुन्हेगारी स्वरुपाची असणारी ती लज्जा त्या स्वत:मध्ये सामावून घेतात," असं त्या पुढे म्हणाल्या.
खोलवर परिणाम
फराहचं म्हणणं आहे की, तिचं बालपण सर्वसामान्य नव्हतं. त्याउलट ती सहन करायला शिकली.
"बचावणं किंवा टिकून राहणं कमकुवतपणा नाही. त्यातून उलट तुमची ताकद दिसून येते," असं ती म्हणाली.
आरियावर जेव्हा हे अत्याचार झाले होते, तेव्हा ती फक्त एक किशोरवयीन मुलगी होती. मात्र ती जेव्हा 20 वर्षांची झाली, तेव्हा ती कोलमडली आणि तिनं तिच्या आईला याबद्दल सांगितलं.
या अत्याचाराचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला आहे, असं ती सांगते.
"जर माझ्याबरोबर ही घटना घडली नसती, तर मी कशाप्रकारची माणूस असते? हा प्रश्न कधी-कधी माझ्या मनात येतो," असं ती नमूद करते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)