You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'घाम येतो पण तसाच राहतो, शरीर थंड होत नाही', किनारपट्टीवरील दमट उष्णतेचं वाढतं संकट
"उन्हात घाम खूप येतो पण शरीराला थंड वाटत नाही. आता उन्हाची सवय झालीय पण कधी कधी खूप थकवा येतो, हे खूप कष्टाचं काम आहे."
पालघर जिल्ह्यातील वडराई बंदराच्या किनाऱ्यावर भेटलेले रमेश मेहेर आम्हाला सांगत होते.
वडराईच्या बंदरावर दुपारचे दीड वाजले होते, डोक्यावर सूर्य तळपत होता, पहाटे मासेमारीला गेलेल्या बोटी एकेक करून बंदरात परतत होत्या.
कडक उन्हामुळे घामाने भिजलेल्या पण डोक्यावर कपडा बांधलेल्या बायका आपापल्या ठरलेल्या बोटींची वाट बघत उभ्या होत्या.
प्रत्येक बोटीतील मजूर हळूहळू मासे काढून, किनाऱ्यावरच्या पाण्यात धुवून घेत होते. आधी मोठ्या बोटी, मग लहान तराफे आणि शेवटी बंदरावर आणून मासे तिथे उभ्या असलेल्या महिलांच्या सुपूर्द केले जात होते.
उन्हापासून स्वतःला वाचवण्यासाठी डोक्याला कपडा बांधलेल्या शेकडो महिला बंदरावर उभ्या होत्या.
कुणी ओरडून मासळी विकत होतं, कुणी खरेदी करत होतं तर कुणी झालेल्या व्यवहाराचा हिशेब ठेवत होतं. वडराईच्या बंदरावर भर उन्हात हा मोठ्ठा बाजार भरला होता.
पण...हे सगळं भर दुपारी, तब्बल 34 डिग्री सेल्सिअस तापमानात आणि 64 टक्के आर्द्रतेच्या दमट आणि उष्ण वातावरणात घडत होतं.
हवामान तज्ज्ञांच्या मते, अशा दमट आणि उष्ण वातावरणात शरीराला स्वतःला थंड करणं कठीण होतं आणि उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
मागच्या काही दशकांमध्ये दक्षिण आशियातील देशांच्या किनारपट्टी भागात दमट उष्णता किंवा ह्युमीड हिटचं प्रमाण वाढलं आहे. उच्च तापमान आणि वाढलेल्या आर्द्रतेचा माणसाच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
भारतासारख्या साडेसात हजार किलोमीटरहून अधिक किनारपट्टी असलेल्या देशात हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
घाम सुकत नाही तेव्हा शरीरात काय घडतं?
हवामान बदलामुळे जगभरातलं तापमान वाढलं आहे हे आता आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. जगातल्या सर्वाधिक उष्ण असणाऱ्या 20 शहरांच्या यादीत भारतातली 7 शहरं आहेत.
पण दक्षिण आशिया आणि प्रामुख्याने विस्तीर्ण किनारपट्टी असणाऱ्या देशांमध्ये आणखीन एक समस्या निर्माण होते आहे.
वाढलेलं तापमान आणि त्यासोबतच वाढलेल्या आर्द्रतेमुळे दमट उष्णता किंवा ह्युमीड हिटचा धोका वाढतो आहे.
पालघरमधल्या वडराई गावात राहणारे सुजय मोरे सांगतात, "अंगावर घाम आलेला असतो पण तो सुकत नाही. म्हणजे तो बाष्पिभवन (evaporate) होत नाही. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता बाहेर पडत नाही आणि उष्माघाताचा (heat stroke) धोका वाढतो." त्यांच्या मते, किनारपट्टी भागात उष्णता आणि आर्द्रतेचं हे घातक कॉम्बिनेशन अधिक तीव्रपणे जाणवतं.
हवामान बदल, पर्यावरण आणि किनारपट्टी भागातील समुदायांवर संशोधन करणारे सौम्य दत्ता सांगतात की, माणसाचं शरीर हे फक्त तापमानावर प्रतिक्रिया देत नाही.
"शरीर स्वतःला थंड करण्यासाठी घाम निर्माण करतं. पण हवेत आर्द्रता जास्त असेल तर तो घाम वाफ बनून उडत नाही. त्यामुळे शरीर थंड होण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावते," असं ते म्हणतात.
त्यांच्या मते, तापमान तुलनेने कमी असलं तरी आर्द्रता खूप जास्त असेल तर शरीरावरचा ताण वाढू शकतो.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजी, पुणे (आयआयटीएम)चे वैज्ञानिक रॉक्सी मॅथ्यू कोल सांगतात की, या बदलामागे समुद्राचं वाढतं तापमान हा महत्त्वाचा घटक आहे.
"ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेपैकी 90 टक्क्यांहून अधिक उष्णता समुद्र शोषून घेत आहेत. हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे जगातील सर्वात वेगाने तापणाऱ्या समुद्री भागांपैकी आहेत," असं ते सांगतात.
त्यांच्या मते, किनारपट्टीजवळ राहणाऱ्या लोकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
दमट उष्णता कशी मोजली जाते?
किनारपट्टी भागांमध्ये वाढणाऱ्या दमट उष्णतेचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी केवळ तापमान पुरेसं नसतं. तर वाढलेल्या पाऱ्यासोबतच वाढलेल्या आर्द्रतेचा देखील अभ्यास करावा लागतो.
हवेतली आर्द्रता वाढली की शरीराला जाणवणारी उष्णता प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तीव्र असू शकते. त्यामुळे हवामानशास्त्रज्ञ वेट बल्ब टेम्परेचर (Wet-Bulb Temperature) आणि हिट इंडेक्स (Heat Index) सारख्या मापकांचा वापर करतात.
सौम्य दत्ता सांगतात, "दमट उष्णतेचे परिणाम समजून घेण्यासाठी वेट बल्ब टेम्परेचर (Wet bulb temperature) हा अधिक चांगला निर्देशक आहे. कारण तो शरीराला प्रत्यक्षात किती उष्णता जाणवते हे दाखवतो. माणसाचं शरीर हे दगडाचा तुकडा किंवा धातू नाही.
त्यामुळे ज्या पद्धतीने तापमान वाढलं की दगड किंवा एखादी निर्जीव वस्तू गरम होते तसं माणसाच्या शरीराचं नसतं. मानवी शरीर तापमानावर कशी प्रतिक्रिया देईल हे हवेतल्या आर्द्रतेवरही अवलंबून असतं."
त्यांच्या मते, शरीराला थंड ठेवण्यासाठी घामाचं बाष्पीभवन होणं आवश्यक असतं. पण हवेत आर्द्रता जास्त असेल तर घाम सुकत नाही आणि शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही.
ते पुढे सांगतात की, "ग्लोबल वॉर्मिंगमुळे मागच्या दोन दशकांपासून जगभरात ह्युमीड हिटच्या घटना वाढत आहेत. यामागचं मोठं कारण म्हणजे समुद्राचं वाढलेलं तापमान. पृथ्वीच्या सुमारे 70 टक्के भागावर समुद्र आहे आणि 2022 नंतर समुद्राच्या तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे."
सौम्य दत्ता सांगतात की, "वेट बल्ब टेम्परेचर (WBT) मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्मामीटरमध्ये ओलसर कापडाचा वापर केला जातो.
हवेत आर्द्रता कमी असेल तर त्या कापडावरचं पाणी लवकर वाफ बनून उडतं आणि तापमान कमी दाखवतं. पण आर्द्रता जास्त असेल तर बाष्पीभवन कमी होतं आणि शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेचा परिणाम अधिक तीव्र होतो."
"सामान्यतः 32 डिग्री तापमान फार धोकादायक वाटत नाही. पण जर हवेतली आर्द्रता 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीत शारीरिक काम करणं जीवघेणं ठरू शकतं," असं दत्ता यांनी सांगितलं.
NOAA (National Oceanic and Atmospheric Administration) च्या Heat Index तक्त्यानुसार तापमान आणि आर्द्रता वाढली की शरीरावरचा उष्णतेचा ताण वेगाने वाढतो.
काही अभ्यासांनुसार भारतातील 90 टक्क्यांहून अधिक भाग वर्षातील काही काळ 'अति धोका' (extreme caution) किंवा 'धोकादायक' (danger) श्रेणीत जातात.
रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते, हवामान बदलामुळे समुद्राचं वाढतं तापमान आणि वातावरणात वाढणारी आर्द्रता यामुळे किनारपट्टी भागात दमट उष्णतेच्या घटना अधिक तीव्र होऊ शकतात.
"हिंद महासागर आणि अरबी समुद्र हे जगातील सर्वात वेगाने तापणाऱ्या समुद्री भागांपैकी आहेत. त्याचा थेट परिणाम किनारपट्टीजवळ राहणाऱ्या लोकांवर होत आहे," असं ते सांगतात.
'दुपारी काम केलं नाही तर जगायचं कसं?'
वडराईच्या बंदरात मासेमारी करणारे रमेश मेहेर म्हणतात की, "उन्हामुळं माणूस काळा पडतो हे एवढंच माहितीय. बाकी उन्हाचे परिणाम, आर्द्रता, दमट उष्णता असे शब्द कधीतरीच कानावर पडतात.
बरं आता सरकार म्हणतं की दुपारी घराबाहेर पडू नका पण आमचा बाजारच दुपारी भरतो, भर उन्हात, खोल समुद्रात मासेमारी करावी लागते, खाडा करून चालत नाही कारण मला माझ्यासोबतच माझ्या बोटीवर अवलंबून असणाऱ्या इतरांचं पण पोट भरायचंय."
दुपारच्या उन्हात थेट समुद्रावर काम करणारे मच्छीमार, मासळी उतरवणारे मजूर आणि बंदरावर मासे विकणाऱ्या महिला या वाढत्या दमट उष्णतेच्या सर्वाधिक झळ सहन करणाऱ्यांपैकी आहेत.
हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेदरम्यान दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण किनारपट्टी भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो लोकांसाठी हे शक्य नसल्याचं स्थानिक सांगतात.
वडराई बंदरावर मासळी विकणाऱ्या एका महिलेनं सांगितलं, "उन्हाचा त्रास होतो, पण काम तर करावंच लागतं. आमचं पोटपाणी त्याच्यावरच आहे."
सुजय मोरे यांच्या मते, दमट उष्णतेचा परिणाम केवळ समुद्रावर काम करणाऱ्या लोकांपुरता मर्यादित नाही.
"ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे फॅन, एसी किंवा नियंत्रित वातावरण असू शकतं. पण समुद्रात मासेमारी करणारे मजूर, मासळी विकणाऱ्या महिला किंवा टोपल्या वाहून नेणारे कामगार यांना तसं वातावरण मिळत नाही.
आपल्याला एका सुरक्षित वातावरणात काम करायची सवय असते पण असा पर्याय सगळ्यांकडेच असेल असं नाही." त्यांच्या मते, वाढती उष्णता ही केवळ हवामानाची समस्या नसून सामाजिक विषमतेचाही प्रश्न आहे.
मोरे पुढे सांगतात की, अनेक किनारपट्टी भागांमध्ये लोक लहान, दाटीवाटीच्या किंवा पत्र्याच्या घरांमध्ये राहतात. "उन्हात काम केल्यानंतर शरीराला थंड होण्यासाठी वेळ आणि योग्य जागा मिळणं आवश्यक असतं.
पण अनेक घरांमध्ये पुरेशी हवा देखील येत नाही. त्यामुळे शरीरावर होणारा ताण दीर्घकाळ टिकून राहू शकतो," असं ते म्हणतात.
हवामान तज्ज्ञांच्या मते, दमट उष्णतेचा धोका पुढच्या काळात आणखी वाढू शकतो. पण या धोक्याबद्दलची जागरूकता, आरोग्य यंत्रणांची तयारी आणि किनारपट्टी भागांमधील स्थानिक उपाययोजना यावर अजून पुरेसं काम झालेलं नाही.
दमट उष्णतेचा सामना करण्यासाठी काय व्हायला हवं?
दमट उष्णतेचा धोका वाढत असताना केवळ तापमानाचा आकडा सांगणाऱ्या हवामान इशाऱ्यांपेक्षा अधिक सविस्तर आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त यंत्रणांची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
विशेषतः किनारपट्टी भागांमध्ये तापमानासोबत आर्द्रतेचाही विचार करून इशारे देणं आवश्यक असल्याचं हवामान अभ्यासक सांगतात.
सौम्य दत्ता यांच्या मते, सध्याच्या हवामान इशारा प्रणालींमध्ये अनेक मर्यादा आहेत. "बहुतेक वेळा लोक मोबाईलवर दिसणारं तापमान पाहतात. पण प्रत्यक्षात शरीराला जाणवणारी उष्णता वेगळी असू शकते.
उष्णतेची लाट जाहीर झाली की लोकांना दुपारी बाहेर पडू नका असं सांगितलं जातं. पण रोज समुद्रावर किंवा बाहेर काम करणाऱ्या लोकांनी नेमकं काय करायचं याचं स्पष्ट उत्तर नसतं," असं ते सांगतात.
त्यांच्या मते, हवामान इशारे केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता स्थानिक पातळीवर, विशेषतः किनारपट्टी भागात काम करणाऱ्या समुदायांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.
"ज्यांना प्रत्यक्ष झळ बसते त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आणि प्रशासनिक पातळीवरही याबाबत पुरेशी तयारी दिसत नाही," असं दत्ता सांगतात.
रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते, हवामान बदलाचे परिणाम आता दीर्घकालीन नियोजनाचा भाग बनवावे लागतील.
"किनारपट्टी भागांमध्ये वाढती उष्णता आणि आर्द्रता लक्षात घेऊन आरोग्य व्यवस्था, स्थानिक पायाभूत सुविधा आणि कामाच्या पद्धतींमध्ये बदल करावे लागतील," असं ते सांगतात.
त्यांच्या मते, हवामानाशी जुळवून घेण्यासाठी (adaptation) स्थानिक पातळीवर अधिक गुंतवणूक आणि नियोजनाची गरज आहे.
तज्ज्ञांच्या मते, वाढत्या दमट उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी सावलीची ठिकाणं, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विश्रांतीची व्यवस्था आणि स्थानिक पातळीवरील उष्णता कृती आराखडे (Heat Action Plans) अधिक महत्त्वाचे ठरत आहेत.
मात्र भारतातील अनेक किनारपट्टी भागांमध्ये अशा उपाययोजना अजून प्राथमिक टप्प्यातच आहेत.
एका बाजूला जगभरात हवामान बदलासंदर्भात चर्चासत्रं, प्रशिक्षणं आणि वेगवेगळे कार्यक्रम होत असताना दुसऱ्या बाजूला वडराईच्या बाजारातली लगबग आता ओसरू लागली होती.
मासळीच्या टोपल्या डोक्यावर घेऊन महिला बाजाराच्या दिशेनं चालत होत्या, तर काही बोटी पुन्हा समुद्राच्या दिशेनं निघत होत्या. हवेतला दमटपणा अजूनही तसाच होता. घाम सतत येत होता पण शरीर मात्र थंड होत नव्हतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.