एकेकाळी विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेलं गोवा मागे पडतंय, जाणून घ्या कारण

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- Author, निखिल इनामदार
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
डोळे दिपवणारा कडक उन्हाचा तडाखा आणि तीव्र उकाडा असतानाही गोव्यातील पालोलेम बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. प्रचंड उष्णतेतही पर्यटक समुद्रात आंघोळ करण्याचा आनंद घेताना दिसतात.
'भारताची पार्टी राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातील बीचलगतच्या शॅक्स आणि स्वस्त बॅकपॅकर्स हॉटेल्समध्ये अजूनही पर्यटकांची गर्दी कायम आहे.
परंतु, काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत येथे आता एक मोठा बदल दिसत आहे. गोव्याला येणारे युरोपियन आणि रशियन पर्यटक कमी होत आहेत.
एकेकाळी पालोलेमसह गोव्याच्या किनारपट्टीवरील गावांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असायची, पण आता तसं चित्र फारसं दिसत नाही.
इथे दिसून येणारी बहुतांश गर्दी आता स्थानिक पर्यटकांचीच असते. यावरून विदेशी पर्यटकांमध्ये गोव्याचं आकर्षण पूर्वीसारखं राहिलेलं नाही, हे लक्षात येतं.
दुसरीकडे, स्थानिक पर्यटकांची मोठी गर्दी पाहता देशभरात गोव्याची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येते.
सरकारी आकडे काय सांगतात?
गोवा पर्यटन विभागाच्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट होतं. 2017 मध्ये सुमारे 9 लाख विदेशी पर्यटक गोव्यामध्ये आले होते. मात्र 2025 पर्यंत ही संख्या कमी होऊन जवळपास 5 लाखांवर आली आहे.
याउलट, 2016 मध्ये सुमारे 68 लाख स्थानिक म्हणजेच देशांतर्गत पर्यटक गोव्यात आले होते. ही संख्या 2025 पर्यंत वाढून 1 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळेही विदेशी पर्यटकांच्या येण्यावर परिणाम होत असल्याचे राज्याच्या पर्यटन विभागाने अलीकडेच सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुढील योजना आखताना आपल्याला नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही दृष्टिकोन ठेवावे लागतील, असं गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मात्र, गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या कमी होण्याची सुरुवात नुकत्याच सुरू असलेल्या जागतिक संघर्षांपूर्वीच झाली होती. त्यामुळे प्रश्न असा पडतो की, 1960–70 च्या दशकातील 'हिप्पी युगा'पासून आजपर्यंत विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले गोवा आता त्यांच्यासाठी कमी आकर्षक का ठरत आहे?
विदेशी पर्यटक काय म्हणत आहेत?
रशियाच्या बॅले डान्सर सोफी या पाचव्यांदा गोव्याला फिरायला आल्या आहेत.
त्या म्हणाल्या, "लोक सध्या आर्थिक अडचणीत आहेत. आधी कोरोना आला, मग युक्रेन युद्ध आणि आता आखाती देशातील परिस्थितीमुळे फ्लाइट्स खूप महाग झाल्या आहेत."
"त्यामुळे पैसा हा मोठा मुद्दा बनला आहे. माझे काही मित्र या वर्षी गोव्याऐवजी तुर्की किंवा इजिप्तला जात आहेत, कारण ती ठिकाणं त्यांच्या घरापासून जवळ आणि स्वस्त आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
रिको गेल्या 20 वर्षांपासून गोव्यात येतात. युरोपियन पर्यटक आता पूर्वीसारखे गोव्यात येत नाहीत, असं त्यांचंही मत आहे.
ते म्हणतात, "माझ्या देशातील लोकांकडे सध्या परदेशात फिरायला जाण्यासाठी पैसे कमी आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ते बहुतेक सुट्ट्या आपल्या देशातच घालवण्यास प्राधान्य देत आहेत."
पर्यटकांची संख्या कमी होण्यामागे व्हिसा प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि गुंतागुंतीची असणे, तसेच 5 वर्षांच्या व्हिसा फीमध्ये झालेली वाढ ही कारणे आहेत, असं बीबीसीशी बोललेल्या सुमारे अर्धा डझन विदेशी पर्यटकांनी सांगितलं.
स्थानिक लोक काय सांगतात?
गोवा पर्यटन विभागाच्या समितीचे सदस्य आणि एका मोठ्या ट्रॅव्हल चार्टर कंपनीचे संचालक अर्नेस्ट डायस म्हणतात की, स्वस्त हॉटेल्स आणि सहज मिळणारा ऑन-अरायव्हल व्हिसा यामुळे युरोपियन आणि रशियन पर्यटक आता आशियातील इतर ठिकाणांना भेट देत आहेत.
यात प्रामुख्याने व्हिएतनाम आणि श्रीलंकेकडे त्यांचा अधिक कल दिसत आहे.
ते म्हणतात, "आज लोक लवकर निर्णय घेऊन शेवटच्या क्षणी प्रवास ठरवू इच्छितात. त्यामुळे व्हिसा मिळायला उशीर होणं ही पर्यटकांची संख्या कमी होण्यामागचं निश्चितच एक महत्त्वाचं कारण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ऑन-अरायव्हल व्हिसासोबतच हे देश गोव्याच्या तुलनेत स्वस्त असणं हे देखील एक कारण आहे.
डायस यांच्या मते, "देशांतर्गत प्रवास करणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि मीटिंग, कॉन्फरन्स, प्रदर्शन यांसारख्या कार्यक्रमांमुळे चांगल्या तारांकित दर्जाच्या हॉटेलचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे अनेक विदेशी पर्यटकांसाठी गोव्यात राहणे महाग झालं आहे."
गोव्यात समुद्रकिनारी असलेल्या स्वस्त रिसॉर्ट्सची संख्या व्हिएतनाम, श्रीलंका आणि थायलंडच्या तुलनेत कमी आहे. तिथे लोक अर्ध्या किमतीत किंवा त्याहूनही कमी खर्चात संपूर्ण ट्रॅव्हल पॅकेज घेऊन प्रवास करू शकतात.

फोटो स्रोत, Nikhil Inamdar
लंडनच्या गॅटविक विमानतळावरून गोव्याला जाणारी एअर इंडियाची थेट विमानसेवाही बंद झाल्याचा परिणाम झाला आहे.
गोव्यात मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या निकोला यांनी बीबीसीला सांगितलं की, थेट विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांना मुंबईत थांबावं लागलं. त्यामुळे त्यांची खूप गैरसोय झाली.
निकोला यांनी सांगितलं की, त्यांच्या भावाने या वर्षी गोव्याऐवजी श्रीलंकेत जाणं पसंत केलं.
"श्रीलंका आता लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. त्याला तिथे फिरणे अधिक स्वस्त वाटलं आणि गोव्याच्या तुलनेत ते ठिकाण खूपच स्वच्छ आहे," असं त्या म्हणाल्या.
स्वच्छताही एक कारण आहे का?
अर्नेस्ट डायस म्हणतात की, सरकारने समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले आहेत. पण, समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर कचरा असल्यामुळे ती ठिकाणं आता सुंदर राहिलेली नाहीत.
ॲप-आधारित टॅक्सी सेवांना स्थानिक संघटनांकडून तीव्र विरोध केला जातो. त्यामुळे टॅक्सीचे भाडं जास्त आहे आणि ही पण एक 'मोठी समस्या' आहे, असं त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "गोव्यातील लोक अजूनही जुन्या काळातच जगत आहेत, परिस्थिती अशी आहे. तिथे ॲपद्वारे टॅक्सी बुक करता येत नाही, कारण स्थानिक टॅक्सी संघटनेतील लोक त्याला विरोध करतात."
या सर्व गोष्टी गोव्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या मानल्या जात नाहीत, कारण ती मोठ्या प्रमाणावर पर्यटकांवर अवलंबून आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचजवळ 100 खोल्यांचे हॉटेल चालवणारे शर्विन लोबो म्हणतात, "त्यांच्या हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या किमान 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु, स्थानिक पर्यटकांच्या वाढलेल्या बुकिंगमुळे त्याचा परिणाम काहीसा भरून निघाला आहे."
"त्यांच्यासारख्या हॉटेल्समध्ये परदेशी पर्यटकांना जास्त पसंती दिली जाते, कारण ते जास्त दिवस थांबतात," असंही ते नमूद करतात.
डायस म्हणतात, "परदेशी पर्यटक स्थानिक पर्यटकांच्या तुलनेत जास्त फिरायला जातात, बाईक भाड्याने घेतात आणि बीचवरील शॅक्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवतात."
"तर भारतीय पर्यटक बहुतेक वेळा अशा पॅकेज टूर घेतात. त्यात राहणं, जेवणं हे सर्व आधीच समाविष्ट असतं. त्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा परिणाम पर्यटनाशी संबंधित संपूर्ण व्यवस्थेवर होत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
कदाचित गोव्याने या बाबतीत बराच काळ दुर्लक्ष केले होते. आता सरकार या समस्येबाबत सतर्क झाली आहे, असं डायस मानतात.
ते म्हणाले, "आता परदेशी पर्यटकांना पुन्हा गोव्यात आणण्यासाठी आम्ही रोड शोच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करत आहोत. अलीकडेच आम्ही पोलंडला गेलो होतो आणि आता आमचं पुढचं लक्ष्य स्कॅन्डिनेव्हिया आहे."
गोव्याला पुढील काही वर्षांत आशिया आणि आफ्रिकेतील पर्यटकांनाही आकर्षित करण्याची इच्छा आहे, असं डायस यांनी सांगितलं.
पण संपूर्ण आशियात स्वस्त, अधिक स्वच्छ आणि नवीन अनेक पर्यटनाचे पर्याय उपलब्ध होत आहेत. पांढरे शुभ्र चर्च, रंगीबेरंगी पोर्तुगीज घरं आणि 'सुशेगात' (सुसेगादो) म्हणजे शांत आणि आरामदायी जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याला आता पर्यटकांना परत आकर्षित करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





















