You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅस्परीनमुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो का? काय सांगते नवीन संशोधन?
- Author, मिरियम फ्रँकेल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
सुमारे 4,000 वर्षांपासून वेदनाशामक म्हणून वापरले जाणारे हे औषध आता कॅन्सरला रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, अॅस्परीनमुळे शरीरात काही विशिष्ट प्रकारचे ट्यूमर तयार होण्यास प्रतिबंध होतो. या संशोधनामुळे आरोग्य धोरणावर देखील परिणाम होत आहे.
ब्रिटीश नागरिक निक जेम्स 40-45 वर्षांचे असून ते फर्निचर बनवण्याचे काम करतात. त्यांच्या आईचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला तेव्हा त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या आरोग्याची चिंता वाटू लागली.
यानंतर त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील इतर अनेक सदस्यांनाही आतड्यांचा कॅन्सर झाला.
त्यामुळे त्यांनी जेनेटिक टेस्ट (अनुवंशिक चाचणी) करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीतून असे समोर आले की, त्यांच्यामध्ये एक दोषपूर्ण जीन आहे जो 'लिंच सिंड्रोम' नावाच्या आजाराला कारणीभूत ठरतो. हा आजार कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतो.
निक जेम्स यांना मदतीचा असा एक मार्ग सापडला ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता.
'अॅस्परीन' हे वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे 'ऑफ द काउंटर' (डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारे) औषध दररोज घेतल्यास ते कॅन्सरपासून रुग्णांचा बचाव केला जाऊ शकतो का?
हे तपासण्यासाठी एक वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या प्रयोगात सामील होणारे निक जेम्स हे पहिले व्यक्ती होते.
लिंच सिंड्रोम असलेल्या 10 ते 80 टक्के पीडितांना आपल्या आयुष्यात जीन म्युटेशनद्वारे कधी ना कधी आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
निक जेम्स यांच्या बाबतीत मात्र आत्तापर्यंत सर्व काही ठीक आहे. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन बर्न यांनी या संशोधनाचे काम पाहिले होते. ते सांगतात, "जेम्स गेल्या 10 वर्षांपासून आमच्या सांगण्यानुसार अॅस्परीन घेत आहेत आणि त्यांना आतापर्यंत कॅन्सर झालेला नाही."
हे ऐकलं तर नवल वाटेल पण ही साधी गोळी आतड्यांचा कॅन्सर (कोलोरेक्टल कॅन्सर) पसरण्यापासून रोखू शकते किंवा तो होण्यापासूनच वाचवू शकते. असे संकेत बऱ्याच काळापासून मिळत होते. गेल्या एका वर्षात झालेल्या अनेक चाचण्या आणि अभ्यासांमुळे आता या गोष्टीला अधिक भक्कम पुरावा मिळाला आहे.
काही देशांनी तर आपल्या आरोग्य नियमावलीत बदल केले आहेत. ज्या लोकांना कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे त्यांच्यासाठी हे औषध संरक्षणाची पहिली पायरी म्हणून वापरले जात आहे. (अर्थात, तज्ज्ञांच्या मते हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केले पाहिजे).
आपल्या सर्वात जुन्या आणि गुणकारी औषधांच्या इतिहासात एका ताज्या शोधामुळे एक आश्चर्यकारक बदल झाला आहे. 19 व्या शतकाच्या अखेरीस सध्याच्या इराक प्रांतातील निप्पुर शहरात उत्खनन करताना वैज्ञानिकांना 4,400 वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक साधने मिळाली होती (क्युइनोफॉर्म टॅबलेट - कीलाकार लेख). या लेखांमध्ये झाडपाला, प्राणी आणि खनिजांपासून तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या औषधांची यादी कोरलेली होती.
या कीलाकार लेखांमध्ये 'विलो'च्या झाडापासून तयार केलेल्या औषधाची माहिती दिली होती. विलोमध्ये 'सैलिसिन' नावाचा घटक असतो. ज्याचे रूपांतर आपले शरीर 'सॅलिसिलिक ॲसिड' मध्ये करू शकते.
जो शरीरात गेल्यावर वेदनाशामक म्हणून काम करतं. आज आपण जे अॅस्परीन वापरतो त्याची रचना या जुन्या औषधासारखीच आहे. फरक इतकाच की जुने औषध पोटासाठी थोडे त्रासदायक होते. केवळ मेसोपोटामियाच नाही तर प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि रोममधील लोकही वेदना कमी करण्यासाठी या नैसर्गिक औषधाचा वापर करायचे.
अॅस्परीनमधील या घटकावर खऱ्या अर्थाने संशोधन 1763 मध्ये सुरू झाले. तेव्हा एडवर्ड स्टोन नावाच्या एका इंग्रज धर्मगुरूंनी 'रॉयल सोसायटी'ला एका पत्राद्वारे सांगितले की, विलो झाडाच्या सालीची पावडर ताप उतरवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. पुढे जवळजवळ शंभर वर्षांच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी मूळ अॅसिटाइल सॅलिसिलिक ॲसिडमध्ये सुधारणा करून ते अधिक सुरक्षित बनवले. हेच औषध पुढे 'बायर' (Bayer) या ब्रँडच्या नावाने बाजारात आणले.
पुढच्या एका शतकानंतर, वैज्ञानिकांच्या लक्षात आले की अॅस्परीन केवळ वेदनाशामक नाही तर हृदयविकारांपासून वाचवण्यासाठीही त्याचे काही अनपेक्षित फायदे आहेत. अॅस्परीन रक्तातील पेशींचा चिकटपणा कमी करून रक्त पातळ करते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका टळतो.
याच कारणामुळे यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) सारख्या संस्था हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका असलेल्या लोकांना दररोज कमी प्रमाणात अॅस्परीन घेण्याचा सल्ला देतात.
1972 सालापर्यंत शास्त्रज्ञांना असं वाटू लागलं की अॅस्परीन कॅन्सरवरही गुणकारी ठरू शकतं. उंदरांवर केलेल्या एका प्रयोगादरम्यान ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली ज्यामध्ये उंदरांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी सोडण्यात आल्या होत्या.
अमेरिकन शास्त्रज्ञांना असे आढळले की ज्या उंदरांच्या पिण्याच्या पाण्यात अॅस्परीन मिसळले होते त्यांच्या शरीरात कॅन्सर पसरण्याचा (मेटास्टेसिस) धोका अॅस्परीन न दिलेल्या उंदरांच्या तुलनेत खूपच कमी झाला होता. विज्ञानाच्या भाषेत कॅन्सर पसरण्याच्या या प्रक्रियेलाच 'मेटा' (Metastasis) म्हणतात.
या शोधामुळे शास्त्रज्ञांच्या आशा नक्कीच उंचावल्या होत्या. पण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या प्राध्यापिका रुथ लँगली म्हणतात, "याचा सामान्य रुग्णांच्या उपचारांवर नेमका काय परिणाम होईल हे तेव्हा लगेच सांगणे कठीण होते."
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अॅस्परीनचा जो परिणाम उंदरांवर दिसला तो माणसांमध्येही दिसेलच याची काही खात्री नव्हती. त्यामुळेच कॅन्सरवरचा एखादा मोठा चमत्कार ठरण्याऐवजी ही गोष्ट फक्त एक कुतूहल निर्माण करणारी माहिती म्हणून उरली.
2010 मध्ये या संशोधनाला एक महत्त्वाचे वळण मिळाले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक पीटर रॉथवेल यांनी हृदयाच्या आजारांशी संबंधित अॅस्परीनच्या जुन्या माहितीचा पुन्हा सखोल अभ्यास केला. त्यांच्या विश्लेषणातून असे समोर आले की, हे औषध केवळ कॅन्सर होण्यापासून रोखत नाही, तर ते शरीरात पसरण्यापासूनही वाचवते. यामुळे अॅस्परीनची कॅन्सरशी लढण्याची ताकद समजून घेण्यात शास्त्रज्ञांना पुन्हा रस निर्माण झाला.
अॅस्परीन कॅन्सर रोखू शकते हे सामान्य लोकांच्या बाबतीत सिद्ध करणे शास्त्रज्ञांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.
यासाठी शास्त्रज्ञांना एका मोठ्या प्रयोगाची गरज होती. अर्ध्या लोकांना खरी अॅस्परीन द्यायची आणि उरलेल्यांना औषध नसलेली गोळी (प्लेसिबो). मग काही काळाने कोणत्या गटात कॅन्सरचा धोका कमी झाला हे तपासावे लागले असते.
पण कॅन्सर शरीरात वाढायलाच कित्येक वर्षं किंवा दशकं लागतात. त्यामुळे असा प्रयोग पूर्ण व्हायला खूप मोठा काळ आणि प्रचंड पैसा खर्च झाला असता. स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापिका अॅना मार्टलिंग स्पष्टपणे सांगतात की, "खरे सांगायचे तर असा प्रयोग करणे जवळपास अशक्यच आहे."
याच अडचणीमुळे वैज्ञानिकांनी आपले पूर्ण लक्ष ठराविक लोकांवर केंद्रित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने अशा लोकांचा समावेश आहे ज्यांना आधीच कॅन्सर झाला आहे किंवा ज्यांच्यामध्ये अनुवांशिक कारणांमुळे कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे.
येथेच जॉन बर्न यांनी 'लिंच सिंड्रोम' असलेल्या रुग्णांवर केलेला अभ्यास महत्त्वाचा ठरतो. हा सिंड्रोम आतड्यांच्या आणि मलाशयच्या (कोलोरेक्टल) कॅन्सरचा तसेच इतर काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका खूप जास्त वाढवतो.
2020 मध्ये प्राध्यापक बर्न यांनी या आजाराने ग्रस्त 861 रुग्णांवर केलेल्या एका ऐतिहासिक प्रयोगाचे निकाल जाहीर केले. 10 वर्षांच्या निरीक्षणांनंतर त्यांच्या टीमला असे आढळले की, ज्या लोकांनी किमान दोन वर्षे दररोज 600 मिग्रॅ अॅस्परीन घेतली त्यांच्यामध्ये आतड्यांच्या कॅन्सरचा धोका जवळपास निम्म्याने कमी झाला. त्यानंतर त्यांनी दुसरी चाचणीही केली. जिचे निकाल लवकरच अधिकृतपणे प्रसिद्ध होतील. प्राथमिक अंदाजानुसार, अॅस्परीनची अगदी कमी मात्रा (75–100 मिग्रॅ) देखील तितकीच प्रभावी ठरते.
बर्न म्हणतात, "ज्या लोकांनी दोन वर्षे अॅस्परीन घेतली त्यांच्यामध्ये मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचे प्रमाण 50% नी कमी झाले. आम्हाला हा अभ्यास अजून काही वर्षे सुरू ठेवायचा आहे. कारण जसजसा वेळ जाईल तशी याबद्दलची माहिती अधिक स्पष्ट होत जाईल." (निक जेम्स, जे या चाचणीत सहभागी होणारे पहिले रुग्ण होते त्यांना याचा नक्कीच फायदा झाला आहे.)
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी लोक सहसा जेवढी कमी मात्रा (75–100 मिग्रॅ) घेतात तेवढीच या प्रयोगातही वापरली गेली. हे खूप महत्त्वाचे आहे कारण अॅस्परीनचे काही त्रासदायक दुष्परिणाम देखील असू शकतात. जसे की अपचन, शरीरांतर्गत रक्तस्राव , पोटातील अल्सर आणि क्वचित प्रसंगी मेंदूतील रक्तस्राव. कमी प्रमाणात घेतलेले औषध शरीर सहसा जास्त सहजपणे सहन करू शकते. या निकालांचा परिणाम आता धोरणांवरही झाला आहे. बर्न सांगतात, "आमच्या निष्कर्षांनंतर यूकेमध्ये आरोग्य नियमावली बदलण्यात आली आहे."
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आता 2020 पासून लिंच सिंड्रोमच्या रुग्णांना वयाच्या 20 व्या वर्षापासून अॅस्परीन सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. जर धोका कमी असेल तर हे औषध वयाच्या 35 व्या वर्षापासून सुरू करता येते.
हे सकारात्मक निकाल पाहता अॅस्परीन इतर रुग्णांसाठीही फायदेशीर ठरू शकते का असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. संशोधक एना मार्टलिंग सध्या याच विषयावर काम करत आहेत. ज्यांना यापूर्वी कोलोरेक्टल कॅन्सर झाला आहे. त्यांच्या शरीरात कॅन्सरचा प्रसार रोखण्यासाठी अॅस्परीन मदत करू शकते का, याचा त्या अभ्यास करत आहेत. विशेषतः ज्यांच्या ट्यूमरमध्ये ठराविक प्रकारचे बदल दिसतात. अशा रुग्णांवर हे संशोधन आधारित आहे.
त्या सांगतात, "मोठ्या आतड्याचा कॅन्सर (कोलोरेक्टल) असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये नेमके तेच बदल आढळतात ज्यांचा आम्ही अभ्यास केला आहे." यापूर्वीच्या संशोधनातून असे संकेत मिळाले होते की, अशा रुग्णांवर अॅस्परीनचा खूप चांगला परिणाम होतो.
3 वर्षे चाललेल्या या चाचणीत 2,980 रुग्ण सहभागी झाले होते. यातील एका गटाला शस्त्रक्रिया झाल्यावर 3 महिन्यांच्या आत दररोज 160 मिग्रॅ अॅस्परीन देण्यात आली तर दुसऱ्या गटाला फक्त प्लेसिबो दिली गेली. ज्या रुग्णांना अॅस्परीन मिळाली त्यांच्यामध्ये कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका निम्म्याहून कमी झाला होता. हा फरक परिणामांच्या दृष्टीने खूपच मोठा आहे.
मार्टलिंग म्हणतात, "रुग्णांची ही संख्या खूप मोठी आहे." विशेष म्हणजे, मार्टलिंग आणि बर्न या दोघांच्याही प्रयोगांमध्ये अॅस्परीन घेणाऱ्या लोकांमध्ये दुष्परिणाम अत्यंत कमी प्रमाणात दिसून आले. मार्टलिंग यांचा हा अभ्यास सप्टेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर स्वीडनमध्ये या आजारावर उपचार करण्याच्या पद्धती वेगाने बदलल्या.
जानेवारी 2026 पासून देशात आतड्यांच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये त्या विशिष्ट जनुकीय बदलांची तपासणी केली जात आहे. जर कोणामध्ये हे बदल आढळले तर त्यांना कमी प्रमाणात अॅस्परीन घेण्याचा पर्याय दिला जातो. अॅस्परीन इतर प्रकारच्या कॅन्सरपासूनही रुग्णांचे संरक्षण करू शकते का हे सध्या स्पष्ट नाही. पण लवकरच आपल्याला याची उत्तरे मिळू शकतील.
सध्या रुथ लँगली यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठे संशोधन सुरू आहे. ज्यामध्ये युके, आयर्लंड आणि भारत या देशांतील 11,000 लोकांचा समावेश आहे. या सर्वांनी यापूर्वी कोलन, ब्रेस्ट, गॅस्ट्रोइसोफेगल किंवा प्रोस्टेट सारख्या कॅन्सरचा सामना केला होता. त्यांची टीम दररोज 100 मिग्रॅ किंवा 300 मिग्रॅ अॅस्परीनच्या प्रतिबंधात्मक डोसचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करत असून पुढील वर्षापर्यंत याचे निकाल मिळण्याची त्यांना आशा आहे.
त्या म्हणतात, "वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूमरवर अॅस्परीनचा काय परिणाम होतो याचा इतक्या बारकाईने अभ्यास करणारे आम्ही जगातील पहिलेच संशोधक आहोत."
त्यांचे उद्दिष्ट कोलोरेक्टल कॅन्सरबाबत मार्टलिंग यांनी मिळवलेले निष्कर्ष पुन्हा तपासून पाहणे. तसेच इतर कॅन्सरमधील विशिष्ट जनुकीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी निधी उभारणे हे आहे. त्या स्पष्ट करतात की, कोणत्याही निष्कर्षांची पुनरावृत्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणत्याही नवीन शिफारसीपूर्वी अधिकारी सहसा किमान दोन वेगवेगळ्या चाचण्यांचे निकाल पाहणे पसंत करतात.
हे औषध कसे काम करते?
मार्टलिंग यांच्या मते, "अॅस्परीन हे एक विलक्षण औषध आहे. जे पेशींच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही स्तरांवर कार्य करते." त्यांच्या अभ्यासानुसार, पेशींमध्ये 'Cox 2' नावाचा एक घटक (Enzyme) असतो जो कॅन्सर वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. अॅस्परीन याच घटकावर नियंत्रण मिळवते आणि त्याला रोखण्याचे काम करते.
त्या सांगतात की, हे एन्झाईम 'प्रोस्टाग्लँडिन' नावाचे हार्मोन्ससारखे घटक तयार करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील अशा प्रक्रिया सुरू होतात ज्या पेशींना मर्यादेबाहेर वाढण्यास प्रवृत्त करतात.
युकेच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीमधील कॅन्सर इम्युनोलॉजीचे प्राध्यापक राहुल रॉयचौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक वेगळीच माहिती समोर आली आहे. आपल्या शरीरात एक जीन असतो. हा जीन आपल्या शरीरातील 'T cells' (जे रोगांशी लढतात) समोर अडथळा निर्माण करतो ज्यामुळे या पेशी शरीरात पसरणाऱ्या कॅन्सरला ओळखू शकत नाहीत किंवा त्यांना मारू शकत नाहीत.
त्यांना असं आढळलं की, हा जीन 'थ्रोमबॉक्सेन A2' मुळे सक्रिय होतो जो शरीराला जखम झाल्यावर रक्त गोठण्यास मदत करतो. अॅस्परीन या घटकाला रोखून धरते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या पेशी ओळखणं अधिक सोपं होतं. संशोधकांच्या टीमसाठी देखील ही एक आश्चर्यकारक बाब होती.
रॉयचौधरी यांचे हे संशोधन उंदरांवर करण्यात आले होते. त्यामुळे त्याचे निकाल माणसांच्या बाबतीतही सारखेच असतील असे खात्रीने सांगता येणार नाही. मात्र, लँगली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे.
ज्यांना कोलन किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आहे त्यांच्या शरीरात निरोगी व्यक्तींच्या तुलनेत 'थ्रोमबॉक्सेन'चे प्रमाण खूप जास्त असते. अगदी उपचार यशस्वी झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत सुद्धा. यावरून असे संकेत मिळतात की, माणसांच्या शरीरातही कॅन्सरचा प्रसार होण्यामागे या घटकाचा हात असू शकतो.
प्रत्येक आजारावरचे औषध?
नेमक्या कोणत्या लोकांनी आणि कधी अॅस्परीन नियमितपणे घ्यायला हवी यावर अजूनही तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. काही संशोधकांच्या मते, हृदयविकार आणि कॅन्सर या दोन्हीमधील अॅस्परीनचे फायदे पाहता हे औषध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवे.
जॉन बर्न, ज्यांनी स्वतः देखील खबरदारी म्हणून अॅस्परीन घेतली आहे. या औषधाचा जनसामान्यांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या वापराबाबत खूप आशावादी आहेत. ते म्हणतात, "आम्ही एका मोठ्या अभ्यासात हे दाखवून दिले आहे की, जर 50 व्या वर्षाच्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीने 10 वर्षे दररोज अॅस्परीनचा छोटा डोस घेतला तर देशातील एकूण मृत्यूदर 4% पर्यंत कमी होऊ शकतो."
मात्र, बहुतांश संशोधकांचे असे मत आहे की, अॅस्परीनचा वापर फक्त ठराविक प्रकारच्या रुग्णांपुरताच मर्यादित असायला हवा. मार्टलिंग म्हणतात, "कॅन्सरचा सामना करणाऱ्या रुग्णांना अॅस्परीन देणे ही एक गोष्ट झाली पण पूर्णपणे निरोगी असलेल्या लोकांना असे औषध देणे ज्यामुळे त्यांचे नुकसानही होऊ शकते ही पूर्णपणे वेगळी बाब आहे."
याचे कारण असे की, अॅस्परीनचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते प्रत्येक व्यक्तीवर किंवा प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरवर गुणकारी ठरेलच असे नाही.
मात्र, जर तुम्हाला 'लिंच सिंड्रोम' असेल किंवा तुमच्यावर आंतड्यांच्या कॅन्सरचे उपचार झाले असतील तर दररोज कमी प्रमाणात अॅस्परीन घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का हे एकदा विचारून घेणे चांगले आहे. लँगली म्हणतात, "अॅस्परीन सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या."
अॅस्परीनवरील संशोधन जसजसे पुढे जाईल तसतशी अजूनही काही आश्चर्यकारक माहिती समोर येऊ शकते. पण अॅस्परीनचा हा 4,000 वर्षांचा जुना इतिहास पुढील 4,000 वर्षांपर्यंत असाच सुरू राहील का? हे शक्य आहे की, आपल्या येणाऱ्या पिढ्या या औषधाचा असा काही वापर करतील ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही.
(या लेखात दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. याला डॉक्टरांच्या सल्ल्यासारखं समजू नका. इथली माहिती वाचून स्वतःच स्वतःवर उपचार किंवा निदान करू नका. कारण त्यासाठी बीबीसी जबाबदार नसेल. तसंच लेखात दिलेल्या दुसऱ्या वेबसाईटच्या लिंक किंवा तिथे सांगितलेल्या गोष्टींशी बीबीसीचा संबंध नसेल. तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दल काहीही शंका वाटली तर सर्वात आधी आपल्या डॉक्टरांशी नक्की बोलून घ्या.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)