You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'1 जीबी डेटासाठी 10 लाख रियाल मोजावे लागले'; युद्धामुळे इराणमधील लोक कसं आयुष्य जगत आहेत?
- Author, बीबीसी पर्शियन सर्व्हिस
- वाचन वेळ: 6 मिनिटे
(बीबीसी पर्शियन ही बीबीसी न्यूजची फारसी भाषा सेवा आहे. जगभरात या सेवेचे साधारण 2.4 कोटी वाचक आणि प्रेक्षक आहेत. ज्यातील बहुतांश लोक इराणमधील आहेत. इराण सरकारने या सेवेवर बंदी घातली आहे आणि तिच्या प्रसारणात वारंवार अडथळे आणले जात आहेत.)
इराणची राजधानी तेहरानसारख्या मोठ्या शहरांमधील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं दिसतंय. पण सोशल मीडियावर इराणी नागरिक वेगवेगळे अनुभव शेअर करत आहेत.
ही एक अशी कथा आहे जिथे एकीकडे आयुष्य सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे मानसिक थकवा, आर्थिक ताण आणि इंटरनेटवरील निर्बंधांबाबतची चर्चाही रंगत आहे.
मात्र, हे अनुभव म्हणजे केवळ काही लोकांच्या वैयक्तिक प्रतिक्रिया आहेत. त्यावरून संपूर्ण समाजाचं चित्र स्पष्ट होत नाही. तरीही गेल्या काही आठवड्यांपासून इंटरनेट बंदी, कोसळलेली अर्थव्यवस्था आणि युद्धाच्या छायेत जगताना निर्माण झालेली चिंता हे प्रश्न आजही इराणी जनतेला भेडसावत असल्याचं यावरून दिसतंय.
शिवाय या सर्व परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यावरून लोकांमध्ये मतभेद असल्याचंही या प्रतिक्रियांवरून स्पष्टपणे जाणवतं.
काही युजर्सनी अशा लोकांवर कडाडून टीका केली आहे. देशात युद्धाचे सावट असताना काही लोक मात्र खरेदी आणि फिरण्यासारख्या सामान्य गोष्टींमध्ये व्यग्र आहेत. यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. हे वागणं म्हणजे सध्याच्या भीषण परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे, असं मत अनेक युजर्सनी व्यक्त केलं आहे.
युद्धाच्या सावटात जगण्यासाठी चाललेली धडपड
याच्या अगदी उलट काही लोक आपलं दैनंदिन आयुष्य सुरू ठेवण्याच्या अधिकाराचे समर्थन करताना दिसत आहेत.
एका युजरने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिलं, "काल रात्रीपासून मी अनेकदा रडलो असेन. पण तरीही मी माझे छान कपडे घालून मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकतो आणि याबद्दल माझ्यावर टीका करू नये."
दुसऱ्या एका युजरने फुटबॉल सामन्याचा उल्लेख करत म्हटलं, "आपल्या मेंदूलाही कधीतरी इतर गोष्टींमध्ये गुंतवण्याची गरज असते. त्यामुळे 'व्हाईट सिम-कार्ड' धारकांना (ज्यांच्यावर इंटरनेटचे निर्बंध कमी आहेत) उगाच दोष देऊ नका."
इराणमध्ये ज्यांच्याकडे 'व्हाईट सिम' आहे ते इतर युजर्सच्या तुलनेत इंटरनेटचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकतात. इतकंच नाही तर सामान्य लोकांसाठी बंदी असलेल्या अनेक वेबसाईटही ते सहज पाहू शकतात.
दुसऱ्या एका युजरने आपल्या भावना मांडताना लिहिलं, "यात काहीच वावगं नाही. आपण पूर्णपणे खचून जाऊ नये म्हणून आपल्या मनाला काही क्षणांसाठी इतर गोष्टींमध्ये गुंतवण्याची गरज असते. कदाचित आपलं आयुष्य आता दीर्घकाळ असंच राहणार आहे."
या संकटाच्या काळात येणाऱ्या चिंतेला लोक कशा प्रकारे हाताळत आहेत याचीही झलक काही पोस्टमधून दिसते. जसे की एका युजरने म्हटलं, "माझी अस्वस्थता इतकी वाढली की मी सकाळी 6 वाजल्यापासूनच घर आवरण्याला सुरुवात करतो."
इराणमध्ये 'इंटरनेट प्रो' ही एक प्रकारची विशेष आणि मर्यादित इंटरनेट सुविधा आहे जी काही ठराविक युजर्सना कमी निर्बंधांसह उपलब्ध करून दिली जाते.
दरम्यान, इंटरनेटचा प्रश्न अजूनही तापलेलाच आहे. इंटरनेटवरील निर्बंध, वाढत्या किमती आणि याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबद्दल युजर्स सातत्याने सोशल मीडियाद्वारे आपली मतं मांडत आहेत.
अनेक युजर्सनी इंटरनेट वापरामध्ये येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे.
एका युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, "अतिशय मेहनतीने मी 1 जीबी डेटा खरेदी करू शकलो, पण त्यासाठी मला 10 लाख रियाल मोजावे लागले."
तर आपला डेटा लवकर संपेल या भीतीने दुसरा एक युजर काळजीत आहे.
तो म्हणतो, "हा महागडा 2 जीबी डेटा संपला की, मी पुन्हा जगापासून तुटलो जाईन याची मला सतत धास्ती वाटतेय."
यासोबतच इंटरनेट हा मूलभूत सार्वजनिक अधिकार आहे, असा सूर अनेक इराणी युजर्सनी लावून धरला आहे.
एकानं म्हटलं, "खुले इंटरनेट (ज्यावर सरकारचे कोणतेही निर्बंध, सेन्सॉरशिप किंवा तांत्रिक बंदी नाही) हा प्रत्येकाचा अधिकार आहे."
तर दुसऱ्या एका युजरने आपली स्पष्ट भूमिका मांडताना लिहिलं, "हक्क कधीही भीक मागून मिळत नसतात. इंटरनेट म्हणजे फक्त इंटरनेट असतं. त्यात कोणत्याही अटी किंवा शर्ती नसाव्यात."
इराणी नागरिकांच्या या चर्चेत वारंवार 'इंटरनेट प्रो' नावाच्या एका सुविधेचा उल्लेख येत आहे.
या सुविधेचा अर्थ असा आहे की, इंटरनेटचा वापर केवळ एका विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित ठेवला आहे. जसे की मोठे व्यावसायिक किंवा विद्यापीठांशी संबंधित लोक.
हे लोक अतिरिक्त शुल्क भरून किंवा ठराविक कोट्याद्वारे कमी निर्बंधांसह अधिक व्यापक इंटरनेट वापरू शकतात. याउलट, सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र इंटरनेटची उपलब्धता पूर्वीप्रमाणेच अत्यंत मर्यादित आहे.
इराणमधील नागरिक सध्याच्या या व्यवस्थेला 'इंटरनेटमधील भेदभाव' म्हणून संबोधत आहेत. इंटरनेट वापरामध्ये केली जाणारी ही विभागणी म्हणजे सामाजिक विषमतेचे उदाहरण असल्याचे मत अनेक युजर्सनी व्यक्त केले आहे.
एका पोस्टमध्ये तर स्पष्टपणे म्हटले, "'इंटरनेट प्रो'च्या नावाखाली लोकांच्या मूलभूत अधिकारांची विभागणी केली जात आहे."
दुसरीकडे, एका युजरने अशी भीती व्यक्त केली आहे की, वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या प्रकारची इंटरनेट सुविधा दिल्यास "समाजातील दरी आणि वर्गकलह अधिक वाढेल."
इतर संदेशांमध्येही इंटरनेटचा वापर करू शकणारे लोक आणि ज्यांच्यावर निर्बंध आहेत अशांमधील विषमतेवर भाष्य करण्यात आले आहे.
काही युजर्सनी तर कळकळीचे आवाहन केले, "ज्यांना हजारो तासांपासून इंटरनेट मिळालेले नाही त्यांचा आवाज बना."
गेल्या काही दिवसांप्रमाणेच अनेक युजर्सनी हे स्पष्ट केलं की, या परिस्थितीचा त्यांच्या कामावर आणि उदरनिर्वाहावर थेट परिणाम झाला आहे.
काही पोस्टमध्ये आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याचं म्हटलं असून विशेषतः छोटे व्यवसाय आणि इंटरनेटवर अवलंबून असलेल्या नोकऱ्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
एका युजरने एका कॅफे मालकाची हतबलता व्यक्त करताना सांगितले की, तो मालक म्हणतो, "ही जागा आता मेणबत्तीसारखी वितळत चालली आहे. केवळ एका धाग्यावर ती तग धरून आहे."
दुसऱ्या एका पोस्टमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांच्या उत्पादनांची विक्री थांबल्याचं म्हटलं गेलं. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर त्यांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
काही युजर्सनी स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या नोकऱ्या गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
एका व्यक्तीने आपली व्यथा मांडताना लिहिलं, "स्टील आणि पेट्रोकेमिकल कारखान्यांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मी आणि माझं पूर्ण कुटुंब बेरोजगार झालो आहोत आणि सध्या घरी बसून आहोत."
यासोबतच वाढत्या महागाईचा मुद्दाही लोकांच्या चर्चेत वारंवार समोर येत आहे.
वाढत्या महागाईच्या झळा बसत असल्याचं अनेक युजर्सच्या पोस्टमधून जाणवत आहे.
एका युजरने दूध, पनीर आणि अगदी औषधांच्या किमती कशा वाढल्या आहेत याची यादीच मांडली आहे.
गेल्या काही महिन्यांत अंड्यांचे दरही कडाडले असून सर्वसामान्यांवर आर्थिक ओझं वाढत असल्याचं यातून स्पष्टपणे दिसून येतंय.
इराणी जनतेमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आणि भीती पाहायला मिळतेय.
"तणावामुळे माझं शरीर थरथरायला लागलंय," असं एका नागरिकाने सोशल मीडियावर लिहिलं आहे.
अनेक युजर्सनी त्यांना सतत रडू येत असल्याचं आणि प्रचंड दडपण जाणवत असल्याचं म्हटलं आहे. युद्धाचा फटका केवळ शहरांनाच बसला नाही तर लोकांच्या मनावरही त्याचे खोल परिणाम झाले आहेत. एखादा मोठा आवाज झाला तरी लोक दचकतात कारण पुन्हा युद्ध सुरू होण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे.
एका युजरने आपला अनुभव सांगताना म्हटलं की, आकाशात विजांचा कडकडाट झाला तरी मला वाटतं "कुठे बॉम्ब तर पडला नाही ना?"
दुसऱ्या एका युजरने "युद्धाने दिलेल्या मानसिक धक्क्याचा (ट्रॉमा)" उल्लेख करत लिहिलं की, अनेक लोक आता साध्या आवाजांनाही लढाऊ विमानं किंवा स्फोटांचा आवाज समजतात.
याशिवाय, अनेक पोस्टमधून युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीतीही व्यक्त होताना दिसते. एका महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, "कदाचित उद्या पुन्हा युद्ध सुरू होईल."
दुसरीकडे, एका युजरने एका नव्या जीवघेण्या भीतीबद्दल लिहिलं आहे ज्यातून तो अजूनही बाहेर पडू शकलेला नाही.
केवळ भीतीच नाही तर लोकांच्या बोलण्यातून सामाजिक विषमताही समोर येतेय. इंटरनेट कोणाला मिळतंय आणि कोणाला नाही इथून सुरू झालेली ही दरी आता रोजच्या जगण्यातही जाणवू लागली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर लोकांचा राग आणि असंतोष आणखी वाढेल, असा इशाराही काही जणांनी दिला आहे.
एका मेसेजमध्ये प्रश्न विचारण्यात आला, "या सगळ्यातून आर्थिक नुकसान, जनतेमधील असंतोष आणि समाजात पडणारी फूट याशिवाय दुसरं काय साध्य होत आहे?"
हे सर्व संदेश जरी वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले असले तरी ते हेच दाखवतात की गेल्या काही आठवड्यांपासूनचे प्रश्न अजूनही कायम आहेत.
यामध्ये इंटरनेटवरील निर्बंध, वाढती महागाई, युद्धाची भीती आणि भविष्याबद्दल वाटणारी असुरक्षितता यांचा समावेश आहे.
या सगळ्यातून लोक असा अनुभव व्यक्त करत आहेत, जिथे आयुष्य पुढे रेटण्याची धडपड, थकवा, चिंता आणि विषमतेची भावना हे सर्व एकाच वेळी पाहायला मिळत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)