लातूरमध्ये नऊ महिन्याच्या बाळासह चार जणांचा मृत्यू, उष्माघाताचा दावा करताना नातेवाईक काय म्हणाले?

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारी पारा 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू लागला आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

उन्हाच्या या फटक्यानं शेतकरी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हे सर्वाधिक धोक्यात आहेत.

त्यातच गेल्या सात दिवसांत चार जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे.

आरोग्य विभागाकडून या मृत्यूंबाबत उष्माघाताच्या कारणाची कोणतीही अधिकृत नोंद नाही. तरीही कुटुंबीयांनी तसा दावा केला असून, त्यांचे तपशीलही वेगळंच चित्र मांडणारे आहेत.

पानचिंचोली : 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील 75 वर्षीय त्र्यंबक नारायण बेळंबे हे दुपारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात चारा कापत होते.

दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि ते कोसळले.

कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तत्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

''कडक उन्हामुळेच त्यांचा मृत्यू झाला,'' असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

औसा : 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

औसा तालुक्यातील एरंडी गावातील महेश लिंबाजी इंगोले (25 वर्षं) हा तरुण शेतातील कामावरून घरी आल्यानंतर अचानक चक्कर येऊन कोसळला.

त्याच्या मृत्यूमागे उष्माघाताचाच संशय व्यक्त करण्यात आला आहे. एका तरूणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नऊ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

औसा तालुक्यातील गोंद्री इथे नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. बाळाची प्रकृती अचानक खालावली असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं त्यांचं म्हणणं आहे.

तर लातूर, कर्नाटक सीमेजवळील औराद शहाजनी येथील 60 वर्षीय लक्ष्मण भंडारे सोमवारी शेतात काम करत असताना अचानक खाली कोसळले.

गावकऱ्यांच्या मते, त्या दिवशी परिसरात तापमान 42 अंशांपेक्षा वर पोहोचलं होतं.

मुलगा बालाजी भंडारे सांगतात, "वडील दुपारी शेतात कडबा गोळा करत होते. शेजाऱ्यांनी फोन करून सांगितलं की चक्कर येऊन ते खाली पडले. आम्ही लगेच दवाखान्यात नेलं. पण डॉक्टर म्हणाले की, उष्माघातामुळे मृत्यू झाला."

डॉक्टर मल्लिकार्जुन शंकर यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना म्हटलं की, "सोमवारी तापमान 42.8 अंश होतं. दिवसभर उन्हात काम केल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आणि उष्माघाताचा झटका आला."

पत्नी झुंबरबाई भंडारे यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या.

"घर मोठं, खर्च जास्त. पोटासाठी रोज मजुरीला जावंच लागत होतं. मुलींचे लग्न, जेवणं, सगळं त्यांनी कष्टातून केलं," असं त्या म्हणाल्या.

लक्ष्मण भंडारे यांच्या वाट्याला मिळालेली दीड एकर शेती पुरेशी नव्हती. त्यामुळे ते इतरांच्या शेतात मजुरी करून 300-400 रुपये मिळवत कुटुंब चालवत होते.

आरोग्य विभागाकडून मृत्यूची नोंद नाही

लातूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. उदय मोहिते यांनी म्हटलं की, "आमच्याकडे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची एकही अधिकृत नोंद नाही."

म्हणजेच कुटुंबीयांच्या संशयाला शासकीय पुष्टी नाही. या विरोधाभासामुळे या मृत्यूंमागील खरं कारण काय, हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनतो.

दरम्यान लातूर शहरात पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दिवसभर कडक उन्हामुळं रस्ते ओस पडत आहेत. उष्णतेचा सर्वाधिक फटका शेतकरी, मजूर, लहान मुलं आणि ज्येष्ठांना बसत आहे.

प्रशासनाचे आवाहन

प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना कडक उन्हाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांसाठी काही सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत.

  • दुपारी अत्यावश्यक नसल्यास बाहेर पडू नका
  • पुरेसे पाणी प्या
  • हलके व सैल कपडे वापरा
  • लहान मुलांची विशेष काळजी घ्या
  • शेतात काम करणाऱ्यांनी सावलीत विश्रांती घ्यावी

मृत्यूंच्या चौकशीची गरज

कुटुंबीयांच्या दाव्यानुसार मृत्यूसाठी उष्माघात कारणीभूत घटक असला तरी शासकीय नोंद तशी नाही. लातूर जिल्ह्यात तापमानाचा कहर पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उष्माघातामुळे मृत्यूंच्या शंकास्पद घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्यांचा वैद्यकीय तपास करण्याची गरज असल्याचं या घटनांनंतर म्हटलं जात आहे.

हवामान बदल आणि वाढता उन्हाळा हे आता केवळ पर्यावरणाचे नव्हे, तर थेट जनजीवनाचे आणि लोकांच्या आरोग्याचे संकट बनत चालले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 28 एप्रिल 2026 पर्यंत राज्यात एकूण 90 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तर उष्माघातामुळे तीन संशयित मृत्यू झाले आहेत. यात अहिल्यानगरमध्ये दोन, तर सोलापूरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

पण आतापर्यंत उष्माघातानेच संबंधित व्यक्तींचा मृत्यू झालाय, असा उल्लेख सरकारने कुठेही केलेला नाही.

दुसरीकडे आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार, 1 मार्च 2026 to 26 एप्रिल 2026 या दरम्यान, महाराष्ट्रातील उष्माघाताच्या रूग्णांची एकूण संख्या 55 इतकी आहे. तर, उष्माघातामुळे दोन रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचा संशय आहे.

मात्र, आतापर्यंत उष्माघाताने झालेल्या मृत्यूची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नोंद नाही.

दरम्यान, मे महिन्यात महाराष्ट्राला उष्णतेचा तीव्र फटका बसण्याची शक्यता असून, मान्सूनबाबतही काही महत्त्वाचे संकेत भारतीय हवामान खात्याने (IMD) दिले आहेत.

1 मे 2026 रोजी भारतीय हवामान खात्याने पत्रकार परिषद घेत मे महिन्यासाठी हवामानाचा मासिक अंदाज जाहीर केला आहे.

त्यानुसार, महाराष्ट्रातील काही भागांना आणखी हीटवेव्हचा सामना करावा लागू शकतो. तर देशाच्या अनेक भागांत कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)