You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या चेहऱ्यावर खूप केस होते याची आठवण सोशल मीडिया करून देतो'; 12वी निकालानंतर प्राची निगमने काय अनुभवलं?
- Author, नीतू सिंह
- Role, बीबीसीसाठी
- Reporting from, सीतापूर
- वाचन वेळ: 6 मिनिटे
उत्तर प्रदेश मधील सीतापूरची प्राची निगम तुम्हाला आठवते का? 2 वर्षांपूर्वी ती यूपी बोर्डाच्या 10वी परीक्षेत टॉपर होती. पण त्यावेळी तिच्या मार्क्सपेक्षा तिच्या दिसण्याचीच खूप चर्चा झाली होती.
त्या वेळी बीबीसी न्यूज हिंदीने प्राचीशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना तिने टॉपर असूनही सोशल मीडियावर तिला कसं ट्रोल करण्यात आलं, हे सांगितलं होतं.
यावर्षी यूपी बोर्डाचा 12वीचा निकाल लागला, तेव्हा प्राचीचा निकाल कसा लागला हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.
सोशल मीडियावर तिला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, ते पाहता तिने त्या सर्वांचा कसा सामना केला आणि पुढे शिक्षण कसं सुरू ठेवलं, हा प्रश्नही माझ्या मनात होता.
हेच जाणून घेण्यासाठी 26 एप्रिलला मी पुन्हा एकदा प्राचीच्या घरी गेले.
दुपारचे साधारण 12 वाजले होते, परंतु सीतापूरमधील प्राचीच्या घरात शांतता होती. 2 वर्षांपूर्वी निकालाच्या वेळी जशी गडबड आणि उत्साह होता, तसं यावेळी दिसत नव्हतं.
कारण यंदा प्राची बोर्डात अव्वल आली नव्हती. पण, तिने 12वीत 91.20 टक्के गुण मिळवले आहेत.
10वीत अव्वल आल्यानंतर 12वीतही टॉप करण्याचा दबाव होता का? असा प्रश्न विचारल्यावर 19 वर्षांच्या प्राची निगमने अतिशय सहजपणे उत्तर दिले, "पाहा, यावेळी तर मला भेटायला कोणीच आलं नाही. 12वीत मला 91.20 टक्के मिळाले. सर्व विषयांत चांगले मार्क्स होते, पण इंग्रजीत 73 मार्क्स मिळाले. मार्क्स चांगले आहेत, पण निकाल थोडा कमी झाला. जवळपास 5 टक्क्यांचा फरक पडला."
मार्क्स चांगले आहेत, परंतु प्राचीच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. यूपी बोर्डाच्या अव्वल 10मध्येही स्थान मिळवता आलं नाही, याची तिला खंत आहे.
2 वर्षांपूर्वी प्राचीने 10वीच्या परीक्षेत सुमारे 29.47 लाख विद्यार्थ्यांमधून यूपी बोर्डात पहिला क्रमांक मिळवला होता. हा बोर्ड देशातील कठीण बोर्डांपैकी एक मानला जातो.
पण तिने टॉप केल्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावरच्या केसांचीच जास्त चर्चा झाली. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.
त्या वेळी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना तिने म्हटलं होतं, "हे ट्रोलिंग आणि गर्दी पाहून वाटतं की, मला 1-2 मार्क्स कमी मिळाले असते तरी चाललं असतं. मी टॉप केलं नसतं, तर लोकांचे लक्ष माझ्या चेहऱ्याकडे गेलं नसतं."
"माझ्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात केस आहेत, याची जाणीव मला पहिल्यांदाच हायस्कूल बोर्डात टॉप केल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांमुळे झाली."
उपचारातील अडचणी
प्राचीच्या चेहऱ्यावर नववीपासून केसांची वाढ जास्त झाली होती. डॉक्टरांनी याचं कारण हार्मोन्सचे असंतुलन असल्याचं म्हटलं होतं. ट्रोलिंग झाल्यानंतर 2 महिन्यांनी प्राचीने चेहऱ्यावर उपचारही केले.
आता तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे केस नाहीत. हा फक्त उपचार नव्हता, तर स्वतःला स्वीकारणं आणि बदल घडवणं असा मानसिक प्रवास देखील होता.
या अनुभवाबद्दल प्राची सांगते, "मी इतक्या लवकर उपचार करेन, असं आधी वाटलं नव्हतं. एप्रिलमध्ये निकाल लागला आणि जूनपासून मी उपचार सुरूही केले."
ती म्हणाली, "ट्रोलिंगच्या काळात लखनऊमधील एका डॉक्टरांनी माझे 6-7 वेळा मोफत उपचार केले. त्यावेळी मी दर महिन्याला जायचे. आता एकदा जाण्यासाठी सुमारे 10 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे 3 महिन्यांनी एकदा जाते. आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपये खर्च झाले आहेत. 10 दिवसांपूर्वीच हेअर रिमूव्हल करून आले आहे."
प्राचीसाठी हा केवळ उपचार नव्हता, तर त्या काळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही होता. तुझ्या बदललेल्या रूपामुळे (मेकओव्हर) लोकांच्या वागण्यात काही फरक पडला का, असं विचारल्यावर प्राची हसत म्हणाली, "पूर्वीही कुणाला काही फरक पडत नव्हता आणि आताही पडत नाही."
प्राची उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद ब्लॉकच्या भट्टा परिसरात राहते. यावर्षी 12वीत तिने 500 पैकी 456 मार्क्स मिळवले आहेत. गणितात 99, रसायनशास्त्रात 95, हिंदीत 96, भौतिकशास्त्रात 93 आणि इंग्रजीत 73 मार्क्स मिळाले आहेत.
प्राची इन्स्टाग्रामवर तिच्या जुन्या फोटोंच्या अनेक पोस्ट्स दाखवत म्हणाली, "माझ्या फीडवर माझे जुने फोटो दिसत आहेत. माझे फोटो, माझे कपडे एडिट करून लोक त्यांना जे समजतं ते लिहून किंवा बोलून फक्त शेअर करत आहेत."
लोकांच्या बोलण्याचा किती परिणाम?
"या वेळी लोक ट्रोल करत नाहीत, पण माझ्या मार्कांवर चर्चा करत आहेत. मात्र त्यावर येणाऱ्या कमेंट्स खूपच असभ्य, वाईट आहेत. लोक काय-काय लिहित आहेत हे मी तुम्हाला सांगूही शकत नाही."
आता तू उपचार करून घेतले आहेत, पण लोक अजूनही तुझे जुने फोटोच शेअर करत आहेत. याकडे तू कसं पाहते?
या प्रश्नाला उत्तर देताना प्राची म्हणाली, "लोकांकडे माझे नवीन फोटो नाहीत कारण मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही. लोक व्ह्यूज मिळवण्यासाठी माझे जुने फोटो वापरत आहेत, कारण नवीन फोटोला व्ह्यूज मिळणार नाहीत."
प्राची मीडिया आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर नाराजी व्यक्त करत म्हणते, "या वेळी मी टॉप केलं नाही, तरीही माझे फोटो खूप शेअर केले जात आहेत. लोक व्ह्यूजसाठी कुठल्याही थराला जातात."
"अनेक पत्रकारांकडे प्रश्न विचारण्याचेही सौजन्य नसते. तेच-तेच ट्रोलिंगबद्दलचे प्रश्न विचारले जातात. मी हे सगळं खूप आधी विसरून गेले आहे, परंतु सोशल मीडिया मला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की, माझ्या चेहऱ्यावर भरपूर केस होते. हे योग्य नाही. प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य आणि वैयक्तिक जीवन असतं."
तिला जुन्या अनुभवांमुळे राग येतो आणि त्रास होतो, कारण ते प्रश्न उपस्थित करतात आणि वास्तव दाखवतात. पण ती हेही म्हणते की, आता ती स्वतः या सर्वातून बाहेर पडायला शिकली आहे.
"या 2 वर्षांत ट्रोलिंगचा तुझ्यावर काय परिणाम झाला?" या प्रश्नावर प्राची हसत म्हणते, "मला तर काहीच फरक पडला नाही. ट्रोलिंगनंतर मला खूप प्रसिद्धी मिळाली. फिरायला खूप मिळालं आणि आदरही मिळाला. आता कुठेही बाहेर गेले तरी लोक मला लांबूनच ओळखतात."
इथे खास गोष्ट अशी आहे की, ज्या ट्रोलिंगमुळे तिला त्रास झाला, त्याचमुळे तिला नवीन अनुभवही मिळाले. प्रसिद्धी आणि अस्वस्थता हे दोन्ही या कथेचा भाग आहेत.
प्राची 3 भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. तिला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. तिचे वडील नगरपालिकेत काम करतात आणि आई गृहिणी आहे.
प्राची म्हणते, "कोणालाही ट्रोल करू नये. मी स्वतः याकडे फार लक्ष देत नाही, परंतु बरीच मुलं हे मनावर घेतात. ट्रोलिंगमुळे काही लोक आत्महत्याही करतात."
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीही तणावाखाली असाल, तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 1800 233 3330 वर मदत घेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी बोलायला हवं.)
या ट्रोलिंगचा आपल्यावर काहीही परिणाम झाला नाही, असं प्राची जरी वारंवार सांगत असली, तरी आता ती कोणत्याही मीडिया हाऊसशी बोलण्यासाठी फारशी उत्सुक नाही. सोशल मीडिया आणि मीडियाच्या वर्तणुकीबाबत तिच्या मनात स्पष्ट नाराजी आहे.
मीडियाच्या वर्तणुकीवर प्राचीचा प्रश्न
ती पुढे म्हणते, "सोशल मीडियावर येण्याची माझी अजिबात इच्छा नाही. लोक फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी सोशल मीडिया वापरतात. मीडियाने चांगल्या विषयांवर भाष्य करायला हवं, जसं शिक्षण आणि आरोग्य. पण त्यातून व्ह्यूज मिळत नाहीत, म्हणून ते अशा गोष्टी दाखवतात ज्यातून व्ह्यूज मिळतात."
प्राचीची आई ममता निगम यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितलं, "चांगली गोष्ट अशी आहे की, माझी मुलगी जास्त विचार करत नाही, पण तरीही एकच गोष्ट खूप लोक वारंवार बोलले तर त्याचा परिणाम होतोच."
"जर मीडियाने इतकं ट्रोल केलं नसतं, तर कदाचित आज आम्ही मीडियापासून लांब राहिलो नसतो. हायस्कूलमध्ये ती यूपी टॉपर झाली, तेव्हा आम्ही खूप आनंदी होतो, त्यामुळे आम्ही खूप माध्यमांशी बोललो. पण नंतर लोक फक्त तिच्या चेहऱ्यावरच्या केसांबद्दलच बोलू लागले."
या सगळ्या गोष्टींनंतरही प्राचीचा मनमिळाऊ स्वभाव बदललेला नाही. ती म्हणते, "मी ज्याच्याशीही बोलते, मैत्रीपूर्णपणेच बोलते. मला कोणालाही दुखवायला आवडत नाही."
प्राची आपल्या भविष्यातील योजना सांगणं टाळत म्हणते, "यापूर्वी मी म्हणाले होते की, मला आयआयटी-जेईई परीक्षा पास करून इंजिनिअर व्हायचं आहे. या वेळी टॉप करू शकले नाही, म्हणून अनेकांनी लिहिलं की इंजिनिअर होण्याची तयारी करत होती म्हणून टॉप नाही करू शकली, पण हे खरं नाही."
ती म्हणते, "स्वप्न बदलू शकतात. आता मला कोणालाही माझं स्वप्न काय आहे हे सांगायचं नाही. फक्त मला एक चांगली नोकरी मिळावी आणि माझं आयुष्य मला आनंदाने जगायला मिळावं."
"भविष्यात मार्क्स महत्त्वाचे आहेत, असं तुला वाटतं का?" या प्रश्नावर प्राची म्हणते, "जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात जायचं असेल तर मार्क्स खूप महत्त्वाचे असतात. लोक फक्त मार्क्सकडेच पाहतात."
मात्र, तिच्या 12वीच्या मार्क्सबाबत घरातील लोक समाधानी आहेत.
ममता निगम म्हणतात, "मी या वेळीही तिच्या मार्क्सवर खूप खूश आहे. तिने टॉप का केलं नाही, याने आम्हाला काही फरक पडलेला नाही. प्रत्येक वेळी तीच टॉप करावी असे काही गरजेचं नाही."
"सर्वांना संधी मिळायला हवी. या वेळी आमच्या जवळच्या 2 मुलींनी 10वी आणि 12वीत टॉप केलं, पण त्यांच्याकडे मीडियाची इतकी गर्दी नव्हती जितकी 2 वर्षांपूर्वी आमच्याकडे होती. त्या वेळी गर्दीचे कारण प्राचीच्या चेहऱ्यावरचे केस होते."
प्राचीचे वडील चंद्र प्रकाश निगम म्हणतात, "मला 2 वर्षांपूर्वीही ट्रोलिंगमुळे काही फरक पडला नाही आणि माझ्या मुलीलाही नाही. जर आम्हाला त्याचा त्रास झाला असता, तर आज ती जेवढे मार्क्स मिळवू शकली तेवढे तिला मिळाले नसते. फक्त एवढंच की, यावेळी घरात गर्दी नाही. तिला अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून आम्हा सर्वांना आता मीडियापासून दूर राहायचं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)