संजय कपूर यांच्या संपत्तीच्या वादात करिश्मा कपूरच्या मुलांना दिलासा, दिल्ली हायकोर्टाने काय म्हटलं?

वाचन वेळ: 6 मिनिटे

दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांना अंतरिम दिलासा दिला आहे. संजय कपूर यांच्या संपत्तीची विक्री तात्पुरती थांबवण्याची याचिका न्यायालयाने मंजूर केली आहे.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाह 2003 मध्ये झाला होता. परंतु, लग्नानंतर 13 वर्षांनी, म्हणजे 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संजय कपूर यांचं 2025 मध्ये निधन झालं होतं.

लाइव्ह लॉने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना त्यांची संपत्ती विकणे किंवा खर्च करण्यास मनाई केली आहे.

प्रिया सचदेव कपूर या संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.

न्यायालयाने आदेश दिला आहे की, संजय कपूर यांच्या मुलांनी दाखल केलेला खटला सुरू असेपर्यंत त्यांची संपत्ती सुरक्षित ठेवली जावी.

प्रिया सचदेव कपूर कोणतीही संपत्ती विकू किंवा दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करू शकत नाहीत, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

न्यायालयाने काय म्हटलं?

संपत्ती वाया घालवली जाऊ नये आणि ती सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे, असं न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी म्हटल्याची माहिती बार अँड बेंचने दिली आहे.

तसेच, मुलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रिया कपूर यांनी द्यावीत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

या खटल्याच्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलल्या सर्व चिंता आणि प्रश्नांना प्रतिवादी क्रमांक एकने (प्रिया कपूर) उत्तर द्यावं, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

दिवंगत संजय कपूर यांच्या बहीण मंधिरा कपूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "पुढचं पाऊल म्हणजे मृत्युपत्राची फॉरेन्सिक तपासणी करणं. न्याय मिळाला आहे. या संपूर्ण लढाईत उचलल्या गेलेल्या पहिल्या पावलामुळं आम्ही खूप आनंदी आहोत."

त्या म्हणाल्या, "तांत्रिकदृष्ट्या या मालमत्ता माझ्या आईच्या आहेत. या मालमत्ता वाया जाऊ नयेत, याची आम्हाला जास्त चिंता आहे. त्या पुन्हा कुटुंबात यायला हव्यात. मुलांची योग्य काळजी घेतली जावी. हा आदेश कुटुंब, माझी आई आणि मुलांसाठी खूप चांगला आहे."

बार अँड बेंचनुसार, न्यायालयाने मुलांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांना दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या संपत्तीवर किंवा मालमत्तेवर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला हक्क सांगू देण्यास मनाई केली आहे.

न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी गुरुवारी (30 एप्रिल) म्हटलं की, करिश्मा कपूर आणि राणी कपूर (संजय कपूर यांच्या आई) यांनी संजय कपूर यांच्या कथित इच्छापत्राच्या वैधतेवर आणि सत्यतेवर शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे हा संशय दूर करण्याची जबाबदारी आता प्रिया सचदेव कपूर यांची आहे.

न्यायालयाने प्रिया सचदेव कपूर यांना संजय कपूर यांच्या भारतीय कंपन्यांमधील शेअर्स किंवा हिस्सेदारी विकणे, दुसऱ्याच्या नावावर करणे, गहाण ठेवणे किंवा त्यात बदल करणे यापासून रोखले आहे.

न्या.ज्योती सिंह म्हणाल्या, "मी त्यांना भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढण्यापासून रोखलं आहे, यासाठी त्यांनी संमती दिली होती. तसेच, वैयक्तिक वस्तू, कलाकृती व इतर साहित्य विकण्यापासूनही त्यांना रोखलं आहे, यालाही त्यांनी मान्यता दिली होती."

हा आदेश संजय कपूर यांच्या परदेशातील स्थावर मालमत्तेला लागू होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

प्रकरण काय आहे?

बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूर यांच्या मुलांनी प्रिया सचदेव कपूर (संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी) यांच्यावर संजय कपूर यांच्या मृत्युपत्रात फेरफार करून संपूर्ण संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

मुलांनी त्यांच्या आईमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. जून 2025 मध्ये ब्रिटनमध्ये संजय कपूर यांचं अचानक निधन झाल्यानंतर प्रिया कपूर यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने संपत्तीतून बेदखल केलं, असा युक्तिवाद त्यांनी केला.

या खटल्यात प्रिया कपूर, त्यांचा अल्पवयीन मुलगा, संजय कपूर यांच्या आई राणी कपूर आणि मृत्युपत्राची जबाबदारी पाहणाऱ्या (एक्झिक्युटर) श्रद्धा सूरी मारवाह यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

या वादाच्या मुळाशी 21 मार्च 2025 रोजीचं एक मृत्युपत्र आहे. या मृत्युपत्रात संजय कपूर यांची संपूर्ण खासगी मालमत्ता प्रिया कपूर यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे.

मुलांनी न्यायालयात दावा केला आहे की, त्यांच्या सावत्र आईने दोन सहकारी दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा यांच्या मदतीने हे मृत्युपत्र सात आठवड्यांपेक्षा जास्त काळ लपवून ठेवलं आणि नंतर 30 जुलै 2025 रोजी कौटुंबिक बैठकीत याबाबत सांगितलं.

न्यायालयात हे मृत्युपत्र बनावट आणि तथ्यहीन आहे,असा युक्तिवाद करण्यात आला.

अर्जानुसार, प्रिया कपूर यांच्या वर्तनावरून त्या संजय कपूर यांच्या 'संपत्तीवर पूर्ण ताबा' मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतर कायदेशीर वारसांना त्यापासून दूर ठेवू इच्छितात, असं दिसून येतं.

हे मृत्युपत्र खरं आहे आणि त्यात फेरफार केल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असं प्रिया सचदेव कपूर यांनी हे दावे फेटाळत म्हटलं.

त्यांनी म्हटलं की, मृत्युपत्रामध्ये काही चुका असल्या तरी ते अमान्य ठरत नाही. तसेच, त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, करिश्मा कपूर यांच्या मुलांना कपूर कुटुंबाच्या ट्रस्टमधील त्यांचा हिस्सा या आधीच मिळाला आहे.

वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी प्रिया सचदेव कपूर यांच्या वतीने सांगितलं की, करिश्मा कपूर यांनी संजय कपूर यांच्यासोबतचे संबंध चांगले होते, अशी कथा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

त्यांनी युक्तिवाद केला की, "करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या विवाहाचा शेवट कटू घटस्फोटाने झाला आणि त्यानंतर त्या कुठेच दिसल्या नाहीत, असं सांगण्यात आलं."

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी करिश्मा कपूर यांच्या मुलांना दिलासा दिला.

करिश्मा कपूरच्या वकिलांनी काय म्हटलं?

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांचे वकील वैभव गग्गर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, "न्यायालयात जे मांडलं गेलं, त्यावरून हा खूप मजबूत आदेश वाटतो. यात सर्व पक्षांच्या युक्तिवादांचा सविस्तर विचार करण्यात आल्याचे दिसून येतं."

"प्रथम असं दिसून येतं की, करिश्मा कपूर यांच्या मुलांनी आणि राणी कपूर यांनी मृत्युपत्राबाबत मांडलेल्या संशयास्पद मुद्द्यांमध्ये बरंच तथ्य आहे. आता हे सर्व संशय चुकीचे आहेत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी प्रिया सचदेव यांच्यावर आहे. संपत्तीच्या बाबतीत सध्याची स्थिती जशी आहे तशीच कायम राहील."

तर करिश्मा कपूरचे वकील रवी शर्मा म्हणाले की, "हा अर्ज करिश्मा आणि संजय कपूर यांचा मुलगा आणि मुलीच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने करिश्मा कपूर यांच्या मुलांच्या बाजूने एक आदेश जारी केला आहे.

त्यानुसार, यापुढे प्रिया कपूर यांना स्थावर मालमत्ता, कंपनी, शेअर्स, इक्विटी, बँक खाते आणि क्रिप्टो वॉलेटसह कोणताही व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे."

संजय कपूर कोण होते?

12 जून रोजी 2025, 53 वर्षीय संजय कपूर यांना ब्रिटनच्या सरे येथे पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं होतं.

ते सोना कॉमस्टार कंपनीचे वारसदार होते. या कंपनीचा व्यापार 3.6 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि हा उद्योग त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसाहक्कानं मिळाला होता.

सोना कॉमस्टार ही ऑटो पार्ट्स बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्या भारत, चीन, मेक्सिको आणि अमेरिकेत एकूण 10 फॅक्टरी आहेत.

संजय कपूर यांनी तीन लग्न केली होती. त्यांचा पहिला विवाह डिझायनर नंदिता महतानी यांच्यासोबत झाला होता. तर दुसरा विवाह 1990 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी झाला होता.

त्यांनी 2017 मध्ये माजी मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेव यांच्यासोबत तिसरा विवाह केला होता.

परंतु, त्यांच्या निधनानंतर काही आठवड्यांतच वारसदार कोण होणार, या प्रश्नामुळे कपूर आणि त्यांचे कुटुंब माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

यामध्ये संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांच्याही नावाची मोठी चर्चा झाली. राणी कपूर यांनी यापूर्वी सोना कॉमस्टारच्या चेअरपर्सन म्हणून काम पाहिलेलं आहे.

गेल्या वर्षी 24 जुलै रोजी राणी कपूर यांनी सोना कॉमस्टारच्या बोर्डाला एक पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर कंपनीत झालेल्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित केले होते.

आपल्या पत्रात राणी कपूर यांनी असा दावा केला की, त्यांच्या दिवंगत पतींनी 2015 मध्ये केलेल्या मृत्युपत्रामध्ये त्या एकमेव लाभार्थी होत्या.

मुलाच्या मृत्यूमुळे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप अस्वस्थ असताना त्यांच्याकडून महत्त्वाच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करून घेण्यात आली, असा दावाही राणी कपूर यांनी केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)