धीरेंद्र शास्त्रींच्या राम आणि कृष्णाची तुलना करणाऱ्या विधानानंतर विरोधकांची टीका, नेमकं काय म्हटलं?

धीरेंद्र शास्त्री
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आपल्या अनुयायांमध्ये 'बागेश्वर बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू धर्मगुरू धीरेंद्र शास्त्री यांच्या एका विधानावरून आता वाद निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी श्रीराम आणि श्रीकृष्णांची तुलना केली होती.

धीरेंद्र कृष्ण गर्ग (जे धीरेंद्र शास्त्री या नावानेही ओळखले जातात) यांच्या या विधानांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अनेकजण त्यांच्या वक्तव्यावर टीका करत आहेत. या वादावर अनेक राजकीय नेत्यांनीही भूमिका घेतली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, अपक्ष खासदार पप्पू यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि एनडीएतील घटक पक्षांच्या काही नेत्यांनी शास्त्री यांची पाठराखण केली आहे.

या विषयावरून वाद वाढत असल्याचं पाहून धीरेंद्र शास्त्री यांनीही आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अखिलेश यादव, पप्पू यादव यांनी काय म्हटलं?

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "सनातनी आता गप्प का आहेत? एक बाबा अपमानास्पद विधानं करत आहेत. आधी भगवान कृष्णांचा अपमान केला. आता प्रभू श्रीराम यांच्या वडिलांबद्दल काहीतरी बोलत असल्याचं ऐकायला मिळतंय. सनातनी लोकांचे बुलडोझर कुठे गेले? त्यांच्याकडे बुलडोझर असतील, तर शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते पाठवायला हवेत. सरकार काय करत आहे?"

अखिलेश यादव

अखिलेश यादव यांनी 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवर अजून एक पोस्ट करताना म्हटलं, "सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत. आता खरे सनातनी त्यांची पावती फाडतील."

धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर रायबरेलीमध्ये वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजीही केली.

"हे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही. ते भाजपचे एजंट म्हणून काम करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे," असं वकिलांनी म्हटलं.

पप्पू यादव
फोटो कॅप्शन, पप्पू यादव
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव हे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यासाठी दिल्लीतल्या संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले.

पप्पू यादव यांनी म्हटलं की, "धीरेंद्र शास्त्री यांचं वागणं पहिल्यापासूनच संदिग्ध होतं. अशा लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपचे लोक नेहमीच पाठिशी घालताना दिसतात. बाबा अधिकारवाणीने ज्या कथा सांगतात, त्याविषयी एक कठोर कायदा असावा, असं मी यापूर्वीही म्हटलं आहे. धर्माबद्दल बोलण्यासाठी कायद्याच्या चौकटीत एक आदर्श आचारसंहिता असायला हवी."

"आधी हे लोक धर्मांमध्ये फूट पाडत होते. आता धर्मातही वेगळा धर्म निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेते आणि एका राजकीय पक्षाकडून त्यांना प्रोत्साहन दिलं जातंय. त्यांनी 29 ऑक्टोबरला प्रवचन दिलं होतं आणि सोमवारी (2 नोव्हेंबर) स्वतःच त्यातला तीन मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला."

धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी 'एक्स'वर लिहिले, "हे योग्य कसं आहे? हे धर्मशास्त्री आता भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्यात तुलना करत आहेत? ज्या पक्षाने त्यांना प्रोत्साहन दिले, त्या पक्षाकडून याबाबत मौन का बाळगले जात आहे?"

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी म्हटलं, "भाजपने समर्थन केलेल्या बाबा आणि धर्मगुरूंचं खरं स्वरूप एक ना एक दिवस समोर येतंच. जे राम आणि कृष्ण यांच्यात फूट पाडण्याची भाषा करतात, ते धर्माचरण करणारे असू शकत नाहीत. समाजातील प्रत्येक घटकाने याचा निषेध करायला हवा."

धीरेंद्र शास्त्रींचे स्पष्टीकरण

मात्र, आपल्या वक्तव्यावरून वाद वाढत असताना धीरेंद्र शास्त्री यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं,"मी भावनेच्या भरात श्री ठाकूरजी (कृष्ण) यांच्याबद्दल बोललो. ती प्रेमाने केलेली तक्रार होती. मात्र, अनेकांनी त्यातून चुकीचा अर्थ काढला. या लटक्या तक्रारीतून भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्यात तुलना करण्याचा माझा हेतू नव्हता. मी स्वतः कृष्णभक्त आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी देवतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला नाही."

अखिलेश यादव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी म्हटलं, "अखिलेश यांना कृष्णाशी काही देणंघेणं नाहीये. त्यांनी मथुरेला जाऊन भगवान कृष्णाचं दर्शन घ्यायला हवे. पण ते तिथे जात नाहीत. केवळ ट्विटर आणि पत्रकार परिषदांमध्ये बोलतात."

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर
फोटो कॅप्शन, विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर

धीरेंद्र शास्त्री यांचं वादग्रस्त विधान आणि अखिलेश यादव यांनी केलेली टीका यावर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनीही प्रतिक्रिया दिली.

त्यांनी म्हटलं, "विश्व हिंदू परिषदेची भूमिका स्पष्ट आहे. प्रत्येक हिंदू हा 'हिंदू' आहे. मग तो कोणत्याही मताचा, पंथाचा, संप्रदायाचा किंवा पूजापद्धतीचा अनुयायी असो अथवा कोणत्याही भौगोलिक प्रदेशात राहत असो. अखिलेश यादव हे निवडणुकीपुरते हिंदू आहेत. ते केवळ निवडणुकीच्या काळातच हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करतात."

यापूर्वीही अडकले होते वादात

सप्टेंबर महिन्यात बागेश्वर बाबा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत कोलकात्यातील भवानीपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

दक्षिण कोलकाता जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप प्रसाद यांनी या तक्रारीत म्हटलं होतं, "दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करणाऱ्या बंगाली लोकांना त्यांनी (धीरेंद्र शास्त्री) 'ढोंगी' म्हटलं आहे. बागेश्वर बाबांनी कोणतीही माहिती नसताना केलेल्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी पश्चिम बंगालमधील जनतेची माफी मागायला हवी."

त्यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी हावडा जिल्ह्यातील लिलुआ इथं बोलताना दुर्गापूजेच्या काळात हिंदूंना शाकाहारी भोजन करण्याचे आवाहन केले होते.

धीरेंद्र शास्त्री
फोटो कॅप्शन, धीरेंद्र शास्त्री आपल्या वक्तव्यांमुळे यापूर्वीही वादात अडकले होते. (फाइल फोटो)

राज्यातील भाजप सरकार बंगालच्या संस्कृतीचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आरोप केला होता

या वादानंतर पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी धीरेंद्र शास्त्री यांचे नाव न घेता त्यांच्या या आवाहनाला विरोध केला होता.

धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धामचे पुजारी आहेत. 2022 मध्ये नागपूर इथं एका कार्यक्रमादरम्यान अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपांमुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)