'रात्री उकाड्यात झोप येत नाही, सकाळी पुन्हा गर्मीत कामावर जावं लागतं,' राज्यात रात्रीही असा होतोय उन्हाचा त्रास

सुनीता

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

फोटो कॅप्शन, सुनीता गंगोले रात्री घरात उकडू लागलं की बाहेर येऊन बसतात, पण त्रास कमी होत नाही.
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

"रात्री उन्हाळ्याचा खूपच त्रास होते. आमचे घर पण टीनचे आहे. स्वयंपाक करताना तर घाबरल्यासारखं वाटू लागते. गर्मी खूप होते, झोप नाही येत. घरात थांबाले मनच करत नाही. बाहेर झोपायची खूप भीती वाटते. झोप नाही झाली, तरीही सकाळी उठून कामाला जावं लागतं."

अमरावतीतील पूर्णानगर गावात राहणाऱ्या सुनीता गंगोले त्यांना होणाऱ्या त्रासाविषयी सांगतात.

सुनीता दिवसभर शेतात मजुरी करतात. तण काढणं, कापूस वेचणं अशी कामं करतात. घरी आल्यावर त्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो.

"खूप गरम होते, घरात थांबूशी नाही वाटत. मग आम्ही झाडाखाली बसतो. पण शेजारीच नाली वाहते, त्यामुळे मच्छर येतात. मग परत आत जातो. जीव घाबरा होतो," अलीकडे रात्रीची गर्मी जास्तच वाढत असल्याचं त्या सांगतात.

काहीसा असाच अनुभव मुंबईतल्या पूर्व उपनगरात एका वस्तीत राहणाऱ्या मनीषा (नाव बदलले आहे) यांना येतो आहे.

सुनीता यांच्यासारख्या अनेकजणी दिवसा उन्हात काम केल्यावर घरी येतात, तेव्हा त्यांना स्वयंपाकही करावा लागतो.

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

फोटो कॅप्शन, सुनीता यांच्यासारख्या अनेकजणी दिवसा उन्हात काम केल्यावर घरी येतात, तेव्हा स्वयंपाकघरातही त्यांना उष्णतेचा सामना करावा लागतो.

चिंचोळ्या गल्लीत दाटीवाटीनं वसलेल्या एका बैठ्या चाळीतल्या घरात त्यांचं पाच जणांचं कुटुंब राहतात. पुढे एक छोटी खोली, मागे आणखी छोटं स्वयंपाकघर.

त्या कोंदट वातावरणात रात्र काढणं शक्यच नसल्याचं त्या सांगतात. "रात्री इतकं उकडतं घरात की काही सुचतच नाही. कधी एकदा पाऊस येतोय नी उन्हाळा संपतोय कोण जाणे."

मनीषा चार-पाच घरी स्वयंपाक आणि घरकामात मदतनीस म्हणून काम करतात. त्या सांगतात, "सकाळी उन्हातच कामासाठी बाहेर पडावं लागतं. तिथे पंखे बंद करून झाडलोट करायची, किचनमध्ये पोळ्या लाटायच्या, काम संपल्यावर गर्दीतून घरी यायचं, नी गर्मीतच पुन्हा स्वयंपाक करायचा. पंखा असूनही उपयोग काहीच नाही, उकाड्यानं हैराण व्हायला होतं अगदी."

महाराष्ट्राच्या दोन टोकाला असलेल्या या दोन ठिकाणी राहणाऱ्या दोघींच्या त्रासाचं मूळ मात्र एकाच गोष्टीत आहे. रात्रीची वाढलेली उष्णता.

इथे रात्रही भट्टीसारखी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात दिवसा पारा चाळीस अंश सेल्सियसवर जाणं नवं नाही. अनेक ठिकाणी सकाळी आठ वाजताच उन्हाचे चटके जाणवू लागतात. सूर्यास्तानंतर तापमान हळूहळू कमी होऊ लागतं.

मात्र यंदाच्या उन्हाळ्यात भारतातील अनेक शहरं आणि गावांमध्ये रात्री उशीराही तापमान कमी होत नाहीये, असं हवामान विभागाच्या किमान तापमानाच्या नोंदींवरून दिसून येतं.

मे महिन्यात महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वर्धा, यवतमाळसारख्या ठिकाणी रात्रीही 30 अंश सेल्सियसपेक्षा जास्त किमान तापमानाची नोंद झाली. मुंबई, रत्नागिरीतही रात्री पारा 27 अंशांवर गेला.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या काही भागातही गेले काही दिवस किमान तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सियसनं अधिक होतं. राजस्थान, दिल्ली, गुजरातमध्येही मे महिन्यात काहीवेळा रात्रीचं तापमान 26-27 अंशांपेक्षा वर होतं.

मान्सूनपूर्व सरी आणि ढगाळ आकाशामुळे आता काही ठिकाणी दिवसाचं कमाल तापमान कमी झालंय, पण आर्द्रता आणि रात्रीचं न घटणारं किमान तापमान यांमुळे उष्णतेपासून दिलासा मिळत नाही.

23 मे 2026 रोजीचं किमान तापमान दर्शवणारा भारतीय हवामान विभागाचा नकाशा. अनेक ठिकाणी रात्रीही तापमान 26 ते 28 अंशांपेक्षा जास्त राहतंय.

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, 23 मे 2026 रोजीचं किमान तापमान दर्शवणारा भारतीय हवामान विभागाचा नकाशा. अनेक ठिकाणी रात्रीही तापमान 26 ते 28 अंशांपेक्षा जास्त राहतंय.

भारतासह दक्षिण आशियातील अनेक गजबजलेल्या शहरांमध्ये उन्हाळ्यात आपण दिवस-रात्र भट्टीत किंवा कुकरमध्ये शिजून निघतोय असंच वाटू लागलं आहे.

उष्णता ही फक्त दिवसाची समस्या राहिलेली नाही. रात्रीही तिचा त्रास जाणवू लागला आहे.

त्यात उष्णतेवर उपाय सर्वांनाच उपलब्ध नाहीत किंवा परवडत नाहीत. भारतात केवळ 8-10 टक्के घरांतच एअर कंडिशनर्स आहेत, तेही प्रामुख्यानं शहरांत. गावांत एसी, फॅन असला तरी अनेकदा वीजच नसते.

रात्रीची उष्णता का ठरते घातक?

मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सियस एवढे आहे. म्हणजे एवढ्या तापमानात शरीरातील पेशींपासून, हार्मोन्स, एन्झाईम्स तसंच हृदय आणि मेंदूसारख्या अवयवांपर्यंत सर्व रचना व्यवस्थित काम करू शकतात.

पण एखाद्या ठिकाणी हवेचं तापमान यापेक्षा वर जातं, तेव्हा शरीराला त्या तापमानाशी जुळवून घ्यावं लागतं. घाम येणे, रक्ताभिसरण वाढवणे अशा प्रक्रियांतून शरीर तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतं.

सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास असणारे प्रा. दिलीप मावळणकर त्याविषयी माहिती देतात. ते गुजरातच्या गांधीनगरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे माजी संचालक आहेत.

प्रा. मावळणकर सांगतात, "बाहेरची उष्णता खूप वाढते, तेव्हा एखाद्या खोलीचं तापमान नियंत्रित करण्यासाठी तिथल्या एसी युनिटला जास्त काम करावं लागतं. आपल्या हृदयाचंही तसंच होतं. तापमान वाढतं, तेव्हा हृदय अधिक रक्त पंप करण्यासाठी अधिक वेगानं काम करू लागतं."

"त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. उष्णतेनं शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन झाल्यास किडनीच्या कामगिरीवर परिणाम होतो."

मानवी शरीर स्वतःचं तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मानवी शरीर स्वतःचं तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असतं.

तापमान 40 अंशांवर गेल्यास मेंदूतील तापमान नियंत्रित करणाऱ्या केंद्रांवरही परिणाम होतो. यापलीकडे पेशीच्या पातळीवरील रासायनिक प्रक्रियांवरही उष्णतेमुळे परिणाम होत असतो, असं मावळणकर नमूद करतात.

मानवी शरीर अशी उष्णता काही तास सहन करू शकतं आणि रात्री तापमान कमी होतं, तेव्हा शरीराला सावरण्यासाठी वेळ मिळतो.

पण रात्रीही वातावरण तापलेलेच राहिले, तर शरीराचे तापमान कमी होण्यासाठी वेळच मिळत नाही . मग आधीच तणावात असलेल्या शरीराला दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी उष्णतेचा सामना करावा लागतो.

यालाच 'क्रॉनिक हीट स्ट्रेस' म्हणजे दीर्घकालीन उष्णताजन्य ताण म्हणतात. सतत अशी परिस्थिती राहिली, तर मृत्यूही ओढवू शकतो.

रात्रीच्या उष्णतेमुळे झोप पूर्ण झाली नाही, तर त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव, अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, लक्ष न लागणे अशा गोष्टी जाणवू शकतात.

मुंबईतल्या अशा वस्त्यांमध्ये रात्री उष्णतेचा त्रास आणखी जास्त जाणवतो. प्रातिनिधिक फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या अशा वस्त्यांमध्ये रात्री उष्णतेचा त्रास आणखी जास्त जाणवतो. प्रातिनिधिक फोटो.

आधीच हृदयविकार किंवा इतर आजार असलेल्या व्यक्ती, लहान मुलं, वयस्कर माणसं, गरोदर महिलांना याचा जास्त त्रास होऊ शकतो.

तसंच शेतकरी, मजूर, ट्रॅफिक पोलीस अशा दीर्घकाळ बाहेर उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंपाकघर किंवा इतर उष्णता जास्त असलेल्या ठिकाणी कामं करणाऱ्या व्यक्ती, समुद्रकिनारी दमट हवेत काम करणाऱ्यांना ही जास्त धोका असतो.

पुण्यातील प्रयास या संस्थेशी निगडित संशोधक रितू परचुरे यांनी हवामानाचा सार्वजनिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास केला आहे. या संस्थेनं शहरातील रस्त्यांवर काम करणाऱ्या व्यक्तींवर उष्णतेचा परिणाम कसा होतोय, याची पाहणी केली.

संध्याकाळी सूर्यास्तानंतरही जाणवणाऱ्या अशा उष्णतेत जीवाची घालमेल होणं, घाबरल्यासारखं वाटणं, छातीत धडधड, हात पाय लटपटणं असे परिणाम जाणवल्याचं लोकांनी या अभ्यासादरम्यान नोंदवलं आहे.

उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होतातच, पण काही अदृश्य परिणामही असतात, असं रितू नमूद करतात. "रात्री उष्णतेमुळे पुरेशी विश्रांती मिळाली नाही, तर थकवा येतो आणि त्याचा परिणाम कामावर म्हणजे रोजीरोटीवरही होऊ शकतो."

भारतात रात्रीची उष्णता का वाढली?

पुण्यातल्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीचे संशोधक रॉक्सी कोल सांगतात, "सूर्यकिरणांतून प्रकाशाच्या रूपानं येणारी ऊर्जा 'शॉर्टवेव्ह रेडिएशन' (लघुतरंग किरणोत्सार) मार्फत पृथ्वीवर पोहोचते आणि परावर्तित झालेली ऊर्जा 'लाँगवेव्ह रेडिएशन'च्या रूपात बाहेर फेकली जाते. काँक्रिटच्या इमारती शॉर्टवेव्ह रेडिएशन सहज शोषून घेतात, पण लाँगवेव्ह रेडिएशन अडकवून ठेवतात."

थोडक्यात, सिमेंट काँक्रिटची घरं, रस्ते दिवसाच्या उन्हात तापतात आणि मग रात्रीही ती उष्णता परावर्तित करत राहतात.

इमारतींच्या आसपास मोकळ्या जागा, वनस्पती, पाणवठे, पाणथळ जागा नसतील, आणि मोठ्या प्रमाणात काँक्रिटची बांधकामं असतील, तर उष्णता रात्रीही तिथेच अडकून राहते, असं रॉक्सी नमूद करतात.

यातून जी परिस्थिती निर्माण होते, त्याला अर्बन हीट आयलंड म्हणजे शहरातील 'उष्णतेची बेटं' म्हटलं जातं. पण म्हणजे फक्त शहरांतच अशी स्थिती निर्माण होतेय, असं नाही. गावातही याचा त्रास जाणवू लागला आहे.

ECOSTRESS LAND SURFACE TEMPERATURE, Delhi India, 5 May 2022

फोटो स्रोत, NASA-JPL

फोटो कॅप्शन, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातली उष्णतेची बेटं दर्शवणारा हा नकाशा, नासाच्या ECOSTRESS उपकरणानं आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकातून नोंदवलेल्या तापमानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. (मे 2022)

रितू परचुरे माहिती देतात, "आम्ही केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं होतं की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या सरासरी तापमानात मागच्या एक दोन दशकात मोठी वाढ झाली आहे आणि मागच्या चार-पाच वर्षांत या वाढीचा वेग जास्त आहे."

वाढलेलं तापमान, आर्द्रता, शहरीकरण, काँक्रिटीकरण, वृक्षतोड, हवेशीर जागांचा अभाव, घरांच्या रचना, शहरातील लहान घरात अनेकजण एकत्र राहणं अशा विविध गोष्टींचा एकत्रित परिणाम रात्रीच्या झोपेवर आणि पर्यायानं शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर होतो. हवामान बदलामुळे याची तीव्रता आणखी वाढली आहे.

पण रात्रीच्या उष्णतेविषयी फारशी चर्चा मात्र होताना दिसत नाही. तसंच नेमक्या परिणामांविषयी अचूक माहितीचीही कमतरता जाणवते.

दाटीवाटीनं वसलेल्या मुंबईसारख्या शहरांत रात्रीची उष्णता ही आणखी गंभीर समस्या बनते आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दाटीवाटीनं वसलेल्या मुंबईसारख्या शहरांत रात्रीची उष्णता ही आणखी गंभीर समस्या बनते आहे.

त्यासाठी आपल्याला प्रत्येक शहराचा किंवा प्रदेशाचा मृत्यूदरही पाहायला हवा, असं दिलीप मावळणकर सांगतात. "अहमदाबादचा क्लायमेट अक्शन प्लॅन तयार करताना आम्ही पंधरा वर्षांची आकडेवारी पाहिली. त्यानुसार अहमदाबादमध्ये दरदिवशी सुमारे शंभर मृत्यू होत असतील, तर उष्ण दिवशी किती मृत्यू आहेत हे पाहिलं- अपवाद साथीच्या काळाचा.

"जेव्हा अहमदाबादमध्ये दिवसाचं तापमान 45 अंशांवर जातं, पण रात्रीचं तापमान 28 अंशांच्या खाली असतं, तेव्हा मृत्यूदर 108 म्हणजे फार वाढत नाही. पण दिवसा 45 अंश आणि रात्रीचं तापमान 28-30 अंश असतं तेव्हा मृत्यूदर जवळपास 165 इतका तसंच रात्रीचं तापमान 30 अंशांवर जातं तेव्हा मृत्यूदर 265 इतका वाढलेला दिसला."

अशा उष्ण रात्रींच्या आसपास रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं ते सांगतात. प्रत्येक शहरात, गावातली अशी आकडेवारी जमा केली आणि तिचं विश्लेषण केलं, तर रात्रीच्या उष्णतेविषयी नेमके स्थानिक इशारे देण्यासाठी मदत होईल असंही मावळणकर सांगतात.

शहरात किंवा गावात उष्णतेचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या जागांचा शोध घ्यायला हवा, मोकळ्या जागा ठेवणं आणि झाडं लावणं, असे उपाय करायला हवेत, असं रॉक्सी कोल नमूद करतात. त्यांच्यामते आजची घरं, इमारती बांधताना 20-30 वर्ष पुढचा विचार व्हायला हवा.

"उष्णता आज किंवा उद्या थांबणारं संकट नाही. उलट भविष्यात ती आणखी तीव्र होणार आहे. उष्णतेची वारंवारता, तीव्रता, व्याप्ती आणि कालावधी, विशेषतः रात्रीचे तापमान, भविष्यात अधिक वाढतील. उष्णतेचा विचार केवळ तापमान म्हणून न करता परिणामांसह करायला हवा. आपण भविष्यातल्या उष्ण दिवसांसाठी आणि रात्रींसाठी, व्यक्ती म्हणून, समुदाय म्हणून, राज्य म्हणून आणि राष्ट्र म्हणून तयार राहणे आवश्यक आहे."

अतिरिक्त रिपोर्टिंग नितेश राऊत, प्राची कुलकर्णी आणि गणेश पोळ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)