'येत्या शुक्रवारी दिल्लीत पुन्हा एकत्र या', अभिजीत दिपकेंनी नेमकं काय आवाहन केलंय?

फोटो स्रोत, ANI
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी येत्या शुक्रवारी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
"सौरव दास आणि आशुतोष रांका यांना तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. मी सर्व देशभक्तांना आणि तिरंग्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी तिरंगा झेडा घेऊन दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये यावे. आपण आपला तिरंगा फडकवू आणि तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, हे लोकांना सांगू," असं दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीला येऊ न शकणाऱ्या लोकांनी आपापल्या शहरांमध्ये संध्याकाळी तिरंगा मार्च काढावा. या लोकांना (सरकारला) आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि तो फडकवणे हा गुन्हा नाही, हे सांगावे, असेही त्यांनी म्हटले.
"कदाचित मलाही तुरुंगात टाकले जाईल, पण त्याची मला चिंता नाही. माझा तिरंगा हा माझा अभिमान आहे आणि मी तो फडकवणारच," असं त्यांनी या व्हीडिओत म्हटलं आहे.
सौरव दास, आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कॉक्रोच जनता पार्टीचे आशुतोष रांका आणि सौरव दास यांना 5 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, असल्याची माहिती त्यांचे वकील अभिष्ट हेला यांनी माध्यमांना दिली.
अजिंक्य शिंदे यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते पण यांना वैयक्तिक हमीपत्रावर सोडण्यात आले आहे, अशी माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्या लिगल हेड रत्ना सिंह यांनी दिली.
दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सौरव आणि आशुतोष या दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती कायदेशीर घडामोडींवर वृत्तांकन करणाऱ्या 'लाइव्ह लॉ' या संकेतस्थळाने दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना आज (14 ऑक्टोबर) पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. आज सकाळी त्यावर सुनावणी पार पडली.
सीजेपी नेत्यांची न्यायालयात बाजू मांडणारे वकील अभिष्ट हेला यांनी न्यायालयात झालेल्या कामकाजाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याचे सांगितले.

फोटो स्रोत, @abhijeet_dipke
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
"आशु आणि सौरवला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांचा गुन्हा काय? तर जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन पुढे म्हटले आहे की, "हिम्मत दाखवा. जर तुमच्याविरोधातल्या नाराजीला चिरडण्यासाठी तुम्ही इतके इच्छुक असाल तर पडद्याआड लपून राहण्याऐवजी थेट आणीबाणी घोषित करा," असं दिपकेंनी म्हटलंय. दिपके हे सध्या नागपुरात आहेत.
जंतर-मंतर परिसरात मंगळवारी (13 ऑक्टोबर) तिरंगा फडकवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तिरंगा फडकवल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, "13 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि सीजेपीचे इतर 11 सदस्य जंतरमंतरवर पोहोचले. जंतरमंतर हे आता अधिकृत आंदोलनस्थळ नाही. या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी एका खासगी जागेतून अनधिकृतपणे प्रवेश केला होता."
तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.
या सर्व 14 जणांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात 13 ऑक्टोबर 2026 रोजी 2 गुन्हे दाखल करण्यात आले. पहिला गुन्हा कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात, तर दुसरा संसद मार्ग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
त्यानंतर, कायद्यानुसार या सर्व 14 जणांकडून संबंधित प्रकरणांमध्ये पुन्हा कायद्याचं उल्लंघन न करण्याबाबत हमी घेण्यात आली.

फोटो स्रोत, @abhijeet_dipke
वारंवार सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असल्यामुळे आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना प्रतिबंधात्मक कायदेशीर तरतुदींनुसार अटक करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांनाही अशाच बेकायदेशीर कृत्यांसाठी चिथावणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याच्या आरोपांचीही दखल पोलिसांनी घेतली आहे.
या तिघांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 126 आणि 170 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली.
पोलिसांनी सादर केलेली माहिती आणि कायद्याचं वारंवार उल्लंघन केल्याचे आरोप लक्षात घेऊन, जामिनावर सुटल्यानंतरही ते पुन्हा कायदा मोडू शकतात आणि इतरांनाही तसं करण्यासाठी चिथावणी देऊ शकतात, अशी भीती दंडाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अजिंक्य शिंदे यांच्याकडून वैयक्तिक बॉण्डवर आणि 5 हजार रुपयांच्या जामिनावर पुढील 6 महिने शांतता राखण्याचं आणि चांगलं वर्तन ठेवण्याचं बंधपत्र घेण्यात आलं आहे.
अजिंक्य शिंदे काय म्हणाले?
हमीपत्रावर सुटून बाहेर आल्यावर सीजेपीचे राष्ट्रीय प्रभारी अजिंक्य शिंदे म्हणाले, "तुम्हाला माहीत असेलच की, मी, आशुतोष, सौरव दास आणि सीजेपीचे काही कार्यकर्ते जंतर-मंतरवर गेलो होतो. आम्ही केवळ भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.
"यासाठी हुकूमशाही मोदी-शाह सरकारने सौरव आणि आशुतोष यांना पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं आहे. आज आशुतोषचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्यामुळे आणि तिरंगा फडकवल्यामुळे त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं.
"देशातील सर्व लोकांना मला सांगायचं आहे की, या सरकारने देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यासाठी आपल्या संपूर्ण यंत्रणेचा वापर आणि सत्तेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. या हुकूमशाही सरकारला पायउतार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे, असं आवाहन मी सर्वांना करतो.
मला हेही सांगायचे आहे की, जर सरकारला असे वाटत असेल की आमचे दोन नेते, आशुतोष आणि सौरव यांना पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवल्याने ते घाबरतील, तर त्यांचा हा मोठा गैरसमज आहे. ते ताठ मानेने तुरुंगात जात आहेत. आपण घाबरणार नाही, हे त्यांनी देशातील जनतेला दाखवून दिलं आहे."
मंगळवारी रत्ना सिंह यांनी काय म्हटलं होतं?
त्यांना ताब्यात घेतल्यावर रत्ना सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, "सध्या दिल्ली पोलीस एका विशिष्ट 'नियमावली'नुसार काम करत असल्याचं दिसून येत आहे. ही नियमावली वरिष्ठांकडून प्राप्त आदेशांच्या आधारे ठरवली जाते. पोलीस कायद्याला डावलून या नियमावलीचं पालन करत आहेत."
त्या पुढे म्हणाल्या, "जंतर-मंतरवर केवळ तिरंगा फडकवण्यासाठी गेलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचं आम्ही पाहिलं. जवळपास 24 तास उलटले आहेत, तरीही त्यांना अद्याप कोणत्याही वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सुरुवातीला त्यांना ताब्यात घेण्याची किंवा अटक करण्याची कारणंही सांगण्यात आली नव्हती. नंतर अटकेची कारणं सांगण्यात आली. मात्र, सध्याच्या परिस्थितीत दिल्ली पोलीस मनमानी पद्धतीने काम करत आहेत, हाच खरा प्रश्न आहे."
आंदोलनासाठी निर्धारित स्थळांच्या यादीतून जंतर-मंतरला वगळलं
कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांना मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोघांनी जंतर-मंतरच्या बंद प्रवेशद्वार ओलांडून आत प्रवेश केला होता.
या घटनेच्या एक दिवस आधीच दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकलं होतं.
13 ऑक्टोबर रोजी आशुतोष रांका यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर एक व्हीडिओ शेअर केला होता. या व्हीडिओमध्ये आशुतोष आणि सौरव दास, संघटनेचे राष्ट्रीय प्रभारी अजिंक्य शिंदे यांच्यासोबत जंतर-मंतरच्या बंद प्रवेशद्वारावर चढून परिसरात प्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतलं.
लुटियन्स दिल्लीतील जंतर-मंतरमध्ये प्रवेश करण्याचा हा प्रयत्न, आंदोलनासाठी निर्धारित स्थळांच्या यादीतून त्याला वगळण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी झाला.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्ली पोलिसांनी सोमवारी (12 ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनानुसार, शहराच्या विविध भागांमध्ये आंदोलने करण्यासाठी तीन नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, तसेच जंतर-मंतर येथे आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. याच ठिकाणी सीजेपीने जून आणि जुलैमध्ये मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर तत्कालिन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.
परिपत्रकानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकांचा आंदोलन आणि धरणे करण्याचा अधिकार लक्षात घेऊन, सध्याच्या निर्धारित स्थळांना पर्याय म्हणून योग्य ठिकाणं निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली होती.
समितीच्या शिफारशींच्या आधारे जंतर-मंतरला आंदोलन स्थळाच्या दर्जातून वगळण्यात आलं असल्याचं परिपत्रकात म्हटलं आहे. यापुढे आंदोलनासाठी पर्यायी ठिकाणे म्हणून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान निश्चित करण्यात आले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.




























