उष्णतेच्या लाटेचे शरीरावर होतात 'हे' परिणाम; त्यापासून बचाव करण्याचे उपाय जाणून घ्या

उष्णतेची लाट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, शिवांगी जायसवाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

महाराष्ट्रासह मध्य, आणि वायव्य भारतातील मोठ्या प्रदेशात उष्णतेची लाट आल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं असून विदर्भातील काही जिल्ह्यांत तर तीव्र तापमानासाठी रेड अलर्ट दिला आहे.

पुढच्या चार पाच दिवसांत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तीव्र ते अति तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.

20 मे रोजी वर्धा इथे सर्वाधिक 47.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातलं हे आज नोंदवलं गेलेलं सर्वाधिक तापमान आहे.

भारताच्या हवामान विभागानुसार, या संपूर्ण आठवडाभर दिल्लीसह उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसेल.

हवामान विभागानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रा (एनसीआर) मध्ये मंगळवारपासून (19 मे) तीन दिवसांचा हीट वेव्हशी संबंधित यलो अलर्ट जारी केला आहे.

दिल्ली आणि भारतातील इतर प्रदूषित शहरांमध्ये हीट वेव्ह किंवा उष्णतेच्या लाटेचा आरोग्यावर दुप्पट परिणाम होतो, असं तज्ज्ञांना वाटतं.

हवामान विभागानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रा (एनसीआर) मध्ये मंगळवारपासून (19 मे) तीन दिवसांचा हीट वेव्हशी संबंधित यलो अलर्ट जारी केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हवामान विभागानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रा (एनसीआर) मध्ये मंगळवारपासून (19 मे) तीन दिवसांचा हीट वेव्हशी संबंधित यलो अलर्ट जारी केला आहे.

नवी दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमधील सीनियर कन्सल्टंट डॉक्टर एम वली म्हणतात की, यलो अलर्टचं रुपांतर लवकरच रेड अलर्टमध्ये होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

"जर तीव्र उष्णतेमुळे एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यातून प्रदूषित हवेतील उष्णतेच्या लाटेचा परिणाम दिसून येतो. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. हे धोकदायक ठरू शकतं," असं ते म्हणाले.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"विशेषकरून दमा, रक्तदाब, ह्रदयविकाराच्या रुग्णांसाठी हे हवामान धोकादायक आहे. कारण उष्णतेची लाट असल्यावर हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे हवेतील प्रदूषित कण वाढतात. त्यामुळे शक्य असेल तर दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर पडू नये," असं ते पुढे म्हणाले.

फील्डवर काम करणारे लोक, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी इत्यादींना नाईलाजानं दिवसा घराबाहेर पडावं लागतं.

अशा परिस्थितीत डॉक्टर वली सल्ला देतात की, "स्लीव्हलेस कपडे घालू नये आणि संपूर्ण शरीर झाकलेलं असावं. लोक काळी रंगाची छत्री घेऊन बाहेर पडतात. हीदेखील खूप उष्णता शोषून घेते. त्यामुळे पांढऱ्या रंगाची छत्री वापरणं योग्य ठरतं. डोक्याला पांढऱ्या रंगाच्या कपड्यानं झाकून घेणंदेखील फायदेशीर ठरतं."

"ज्या लोकांना सनस्क्रीन वापरणं शक्य आहे, त्यांनी एसपीएफ-50 क्षमता असणारी सनस्क्रीन वापरावी. यापेक्षा कमी क्षमतेची सनस्क्रीन वापरू नये. त्याचबरोबर दर 3 तासांनी ती पुन्हा लावावी. कारण इतक्या कालावधीनंतर यूव्ही किरणांपासून संरक्षण करणारं त्याचं सुरक्षा कवच संपुष्टात येतं," असं ते पुढे म्हणाले.

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करत घर थंड कसं ठेवावं?

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बहुतांश लोक घरातच राहतात. अशावेळी घराचं तापमान नियंत्रित ठेवणंदेखील आवश्यक असतं.

डब्ल्यूएचओनुसार, रात्रीच्या हवेचा वापर घर थंड ठेवण्यासाठी करा. यासाठी अंधार पडताच खिडक्या उघडा. मात्र दिवसा सूर्याची उष्णता घरात येण्यापासून रोखणं आवश्यक आहे.

त्यासाठी घराच्या खिडक्या बंद ठेवा आणि पडदा लावून तीव्र उष्णता असणारा प्रकाश येण्यापासून अडवा. यामुळे घराचं तापमान स्थिर राहू शकतं.

त्याचबरोबर या गोष्टीची काळजी घ्या की जर वातावरणाचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तर घरात असलेले पंखे शरीर थंड ठेवू शकतात. मात्र जर तापमान यापेक्षा अधिक असेल तर पंखे शरीराला थंड ठेवण्याऐवजी गरम करू लागतात. अशावेळी कूलर इत्यादींचा वापर करावा.

एसी खूप कमी तापमानावर सेट न करतादेखील तुम्ही घर थंड ठेवू शकता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एसी खूप कमी तापमानावर सेट न करतादेखील तुम्ही घर थंड ठेवू शकता

जर तुमच्याकडे एअर कंडिशनर (एसी) असेल तर त्याला खूप कमी तापमानावर सेट न करतादेखील तुम्ही घर थंड ठेवू शकता.

डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की एसीचं तापमान 27 अंश सेल्सिअसवर सेट करा. सोबत एक पंखादेखील चालू ठेवा. असं केल्यानं तुम्हाला 4 अंश सेल्सिअस कमी म्हणजे 23 अंश सेल्सिअस तापमानातील थंडावा अनुभवता येईल. यामुळे तुमचं विजेची बचतदेखील करू शकाल.

कोल्ड ड्रिंक शरीराला थंड ठेवत नाहीत

डॉक्टर अली सांगतात की उष्णतेमध्ये काय खावं यापेक्षा आपलं लक्ष, काय न खाणं आरोग्यासाठी चांगलं ठरेल यावर असला पाहिजे. जड आणि चरबीयुक्त पदार्थ सर्वसाधारणपणे खाऊ नये. कारण यामध्ये चरबी आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे ते पचायला जड असतात. यामुळे शरीराचं तापमान वाढू शकतं. त्यातून तुम्हाला जास्त गरम आणि सुस्त वाटू शकतं.

ते म्हणाले की सैंधव मिठाचा वापरदेखील टाळावा. त्यासोबतच, जेवणातील अन्नाचं प्रमाणदेखील कमी ठेवावं. अशा वातावरणात उपाशी पोटी किंवा जेवण झाल्यावर लगेच बाहेर जाऊ नये. जेणेकरून शरीर थंड आणि ऊर्जामय राहील.

कोल्ड ड्रिंकमध्ये साखर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातून पाणी बाहेर पडतं, त्यातून डी-हायड्रेशन होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोल्ड ड्रिंकमध्ये साखर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातून पाणी बाहेर पडतं, त्यातून डी-हायड्रेशन होतं

डब्ल्यूएचओ सल्ला देतं की तीव्र उष्णता असताना कॅफीन आणि अल्कोहोलचं अतिसेवन करू नये.

दर तासाला किमान एक कप पाणी प्या. मग भलेही तुम्हाला तहान लागलेली नसो. द्रवपदार्थांचं भरपूर सेवन करा. त्यासोबतच, संपूर्ण दिवसभरात 2-3 लीटर पाणी पिणं आवश्यक आहे.

डॉक्टर अली म्हणतात, "तरुणांना वाटतं की कोल्ड्र ड्रिंक किंवा चिल्ड बिअर प्यायल्यानं त्यांच्या शरीरात थंडावा राहील. मात्र या दोन्हीमध्ये साखर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातून पाणी बाहेर पडतं. यामुळे डी-हायड्रेशन होतं."

त्याऐवजी ते सत्तू, दुधी भोपळ्याचा रस, मठ्ठा इत्यादी पिण्याचा सल्ला देतात.

तीव्र उष्णता असूनही घाम येत नसल्यास सावध व्हा

बीबीसीच्या आणखी एका लेखानुसार, जर तुमच्या शरीराचं तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, तर हीट स्ट्रोक होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही लगेच वैद्यकीय मदत घेतली पाहिजे.

जर पुढील लक्षणं आढळली, तर डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या -

- घाम येणं बंद झालं - या स्थितीत उष्णता जाणवते, मात्र शरीर कोरडं पडतं.

- श्वास घेण्यास त्रास होणं.

तुम्हाला तहान लागलेली नसली तरी दर तासाला किमान एक कप पाणी नक्की प्या, असं डॉक्टर सांगतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुम्हाला तहान लागलेली नसली तरी दर तासाला किमान एक कप पाणी नक्की प्या, असं डॉक्टर सांगतात

हीट स्ट्रोकमुळे व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. गंभीर स्थितीमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो.

अशावेळी शरीर लगेचच थंड करा. ज्या तापमानाची तुम्हाला सवय नाही, तितकं जर तुमचं शरीर गरम होत असेल, तर तुम्हाला पुढील लक्षणं जाणवू शकतात. डोकेदुखी, चक्कर येणं, कमी भूक लागणं, मळमळ होणं, खूप जास्त घाम येणं, क्रॅम्प्स येणं, श्वासोच्छवास वेगानं होणं आणि खूप जास्त तहान लागणं.

अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या हालचाली लगेच मर्यादित करून शरीराचं तापमान सामान्य करण्यावर लक्ष केंद्रित करा. यासाठी जिथे थंडावा असेल अशा ठिकाणी जा किंवा शरीरावर ओलं कापड ठेवा.

आपलं शरीर 40 अंश सेल्सिअसवर कसं काम करतं?

हीट वेव्ह किंवा उष्णतेच्या लाटेचा परिणाम समजून घेण्यासाठी बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांनी 2023 साउथ वेल्स विद्यापीठातील एन्व्हायर्नमेंट चेंबरमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान अनुभवून याचा परिणाम समजून घेतला.

हीट स्ट्रोकमुळे व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो, हे लक्षात ठेवा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हीट स्ट्रोकमुळे व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो, हे लक्षात ठेवा

लेखानुसार, वैज्ञानिक उपकरणांच्या देखरेखीखाली त्या चेंबरचं तापमान हळूहळू 21 अंश सेल्सिअसवरून 40.3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यात आलं. त्यातून पुढील गोष्टी लक्षात आल्या -

  • मेंदूतील रक्तस्त्राव 8.5 टक्क्यांपर्यत कमी झाला.
  • श्वास घेण्याचा वेग प्रति मिनिट 10 ते15 पर्यंत वाढला.
  • ह्रदयाची गती प्रति मिनिट 54 ते 87 पर्यंत वाढली.
  • शरीराचं तापमान 36.2 ते 37.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं.
  • एका तासाच्या प्रयोगत 400 मिलीलीटर घाम निघाला.
  • त्वचेचं तापमान 31.3 ते 35.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं.

या प्रयोगाच्या वेळेस कमाल तापमानावर मेमरी पजल स्कोअर तपासण्यात आला. तो 23/30 ते 17/30 होता. यातून मेंदूच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवरील तापमानाचा परिणाम दिसून येतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.