मच्छर, हाथी, वाघ, घोडा, पोपट, मांकड... गुजरातमध्ये अशी आडनावे कुठून आली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आर्जव पारेख
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
काही दिवसांपूर्वी फ्लाय दुबई एअरलाइनच्या विमानात घडलेल्या एका घटनेनंतर मुळचे गुजराती असलेले कॅप्टन स्मित मच्छर यांची बरीच चर्चा झाली.
त्यांच्या मोठ्या कामगिरीसोबतच सोशल मीडियावर त्यांच्या 'मच्छर' या आडनावाचीही चर्चा झाली.
गुजरातमध्ये अशी अनेक आडनावे आढळतात, जी प्राणी किंवा कीटकांच्या नावांवरून पडली आहेत.
गुजरातमध्ये घोडा, मच्छर, हाथी, वाघ, मांकड, पोपट, बिच्छू आणि शियाल यांसारखी आडनावे बऱ्यापैकी प्रचलित आहेत.
याशिवाय कीडी, चकली, तितोडी, बकरी, मकोडी आणि तीतर अशी आडनावेही आढळतात.
मात्र, प्राणी आणि कीटकांच्या नावांवरून ही आडनावे कशी पडली आणि समाजात प्रचलित कशी झाली? जाणून घेऊयात.
या गुजराती आडनावांची मुळे कुठे आहेत?
समाजशास्त्रात 'टोटेमिझम' नावाची एक संकल्पना आहे. जुन्या काळात लोक वेगवेगळ्या समूहांमध्ये आणि जमातींमध्ये राहत होते. त्या वेळी प्रत्येक समूह आपली ओळख दर्शवण्यासाठी एखाद्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचे चिन्ह वापरत असे. इंग्रजीत याला 'टोटेम' म्हणतात.
अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील अनेक समुदायांमध्ये ही परंपरा होती.
याच आधारावर असा अंदाज व्यक्त केला जातो की प्राणी, कीटक किंवा पक्ष्यांच्या नावांवरून पडलेली ही आडनावे फार पूर्वीपासून प्रचलित असावीत.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक विनोदिनी नीलकंठ यांनी 'गुजराती अटकों का इतिहास' नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात त्या लिहितात, " घोडा, हाथी किंवा वाघ यांसारखी आडनावे टोटेममधून आली असू शकतात. मात्र, कीडी, मकोडी, मांकड किंवा मच्छर यांसारख्या आडनावांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. कारण माती, दगड किंवा लाकडावर ही चिन्हे सहज तयार करता येत नाहीत."
त्या पुढे सांगतात, "गुजराती आडनावे याच परंपरेतून आली आहेत, असे म्हणणे योग्य वाटत नाही. गुजराती आडनावांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर ती पाच, सात किंवा दहा पिढ्यांपेक्षा जुनी नसल्याचे लक्षात येते."
मच्छर, हाथी आणि घोडा यांसारखी आडनावे कशी पडली?
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ विद्युत जोशी सांगतात, "अशा प्रकारची आडनावे प्रामुख्याने गुजरातमधील वडनगर नागर समुदायात आढळतात. हे लोक वडनगर आणि जुनागढमध्ये राहतात. मात्र, अशी आडनावे प्रामुख्याने जुनागढच्या नागर समुदायात दिसतात."
ते म्हणतात, "एकमेकांची थट्टा करण्यामधून ही आडनावे पडल्याचे मानले जाते. वडनगरचे नागर लोक जुनागढच्या नवाबांच्या राजवटीत वेगवेगळी कामे करत असत. त्यांच्यात बरीच ओढाताण आणि थट्टामस्करी होत असे. त्यातूनच ही आडनावे पडल्याचे मानले जाते."
विद्युत जोशी पुढे सांगतात, "हे लोक राजकारभाराशी संबंधित होते. त्यामुळे काम करताना त्यांना बुद्धीचा अधिक वापर करावा लागत असे. जुन्या काळात नागर समुदायातील लोक विनोद आणि थट्टामस्करी करणारे म्हणून ओळखले जात. उदाहरणार्थ, कुणी त्यांना विचारले की आज जेवणात काय बनवले आहे, तर ते कृष्णवली आणि चंद्रकला असे सांगत. प्रत्यक्षात मात्र खिचडी आणि कांदा खायचे."
"आयुष्य हलक्याफुलक्या पद्धतीने जगण्यासाठी ते ओळखले जात. त्यामुळे अशी आडनावे एकमेकांची थट्टा करण्यामधून पडली असावीत."
प्राध्यापक नीलकंठ लिहितात, "नातेवाईकांनी आणि व्याह्यांनीही गंमत म्हणून ही वेगळी आडनावे ठेवली असण्याची शक्यता आहे. अशी आडनावे असलेल्या लोकांशी आम्ही स्वतः बोललो आहोत. मात्र, बहुतेक कुटुंबांनाही आपल्या आडनावाबद्दल फारशी माहिती नाही. त्यांच्याकडे जी माहिती आहे, तीही केवळ अंदाजावर आधारित आहे. त्याला कोणताही पुरावा नाही."

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक विनोदिनी नीलकंठ आपल्या संशोधनाच्या आधारे सांगतात, "ही सर्व आडनावे पडण्यामागची कारणेही वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ, गुजराती हिंदूंमध्ये हाथी आणि वाघ ही आडनावे आढळतात. मात्र, ही दोन्ही आडनावे पडण्यामागची कारणे पूर्णपणे वेगळी आहेत."
समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी सांगतात, "साहित्यिक रणजीतराम वावाभाई यांनी एकदा म्हटले होते की गुजरातमध्ये जितक्या जाती आणि समुदाय आहेत, तितके कदाचित इतर कुठेही नसतील. आपल्याकडे समुदाय आणि आडनावांमध्ये मोठी विविधता आहे."
ते म्हणतात, "व्यापारी संस्कृतीमुळे आपल्याकडे अनेक आडनावे व्यवसायाशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, दलाल, ब्रोकर आणि लाडवावाला. त्या काळात संवाद आणि संपर्काची साधने फार कमी होती. त्यामुळे समुदाय आणि व्यवसायाची ओळख सांगण्यासाठी अशी आडनावे ठेवली जात. गुजरातमध्ये गावांच्या नावांवरूनही आडनावे पडली आहेत. उदाहरणार्थ, सोजित्रा. मात्र, अशा प्रकारची आडनावे प्रामुख्याने सौराष्ट्रातच आढळतात."
गुजराती आडनावांबाबत कोणते अंदाज आहेत?
प्राध्यापक नीलकंठ यांच्यामते, "घोडा हे आडनाव काठियावाडमधील नागर समुदायात आढळते. मात्र, त्याची सुरुवात कशी झाली याबाबत अनेक अंदाज आहेत. काठियावाडमध्ये घोडाद्रा नावाचे एक गाव आहे आणि घोडासर नावाचे अनेक तलाव आहेत. कदाचित याच कारणामुळे हे आडनाव पडले असावे.
"असेही सांगितले जाते की त्या काळात नागर समुदायातील लोकांचे शरीर इतके मजबूत होते की ते घोडासर तलावाच्या खोल पाण्यातही घोड्याप्रमाणे एका काठावरून दुसऱ्या काठावर पोहोचत असत. त्यामुळे त्या नागरांना घोडा म्हटले जाऊ लागले.
त्याचप्रमाणे पोपट हे आडनाव पारशी आणि हिंदू या दोन्ही समुदायांमध्ये आढळते.
प्राध्यापक नीलकंठ यामागे पोपटासारखे नाक किंवा पोपटाप्रमाणे पाठांतर करून ज्ञान मिळवणे, अशी कारणे सांगतात.
मच्छर या आडनावाबद्दल त्या लिहितात, "हे आडनाव काठियावाडमधील असल्याचे मानले जाते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती खूप मत्सरी असावी आणि वरकरणी रागाने भरलेली असावी. त्यामुळे लोकांनी तिला 'मत्सर' असे नाव दिले असावे. हेही शक्य आहे की कुटुंब ज्या गल्लीत राहत होते, तिथे खूप मच्छर असावेत. त्यामुळे त्यांना मच्छरवाला म्हटले जाऊ लागले असावे."
मांकड हेही बऱ्यापैकी प्रचलित आडनाव आहे. हे आडनाव काठियावाडमधील नागर समुदायात आणि मुस्लिमांमध्येही आढळते.
गुजराती भाषेत मांकड या शब्दाचा अर्थ ढेकूण असा होतो.
याबद्दल त्या लिहितात, "या आडनावाच्या लोकांनी त्याचा संबंध ऋषी मार्कंडेय यांच्याशी जोडला आहे. मच्छरांप्रमाणे मांकड नावाच्या भागात राहणाऱ्या लोकांना मांकड म्हटले जाऊ लागले असण्याचीही शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मांकडासारखा (ढेकणासारखा) त्रास देणारा असेल आणि ती इतरांना शांत बसू देत नसेल, तर तिलाही मांकड हे नाव दिले गेले असावे."
त्याचप्रमाणे वाघ या आडनावामागे त्या वाघेश्वर मेहता नावाच्या एका प्रमुख व्यक्तीला कारण मानतात. त्यांच्या प्रभावामुळे संपूर्ण कुटुंब वाघ या नावाने ओळखले जाऊ लागले.

फोटो स्रोत, Getty Images
समाजशास्त्रज्ञ गौरांग जानी सांगतात, "मच्छर, हाथी आणि घोडा यांसारखी आडनावे प्रामुख्याने तीन समुदायांमध्ये आढळतात. हे समुदाय म्हणजे नागर, लोहाणा आणि ब्रह्मक्षत्रिय. आता अशा प्रकारची आडनावे फार कमी दिसतात. ही सर्व आडनावे सौराष्ट्रातील भागांमध्येच आढळतात. इतर समुदायांच्या तुलनेत नागर समुदायातील लोकांनी आपली ही आडनावे बदललेलीही नाहीत."
ते म्हणतात, "सौराष्ट्रात 200 पेक्षा जास्त संस्थाने होती. प्रत्येक संस्थानाची स्वतःची ओळख होती. या संस्थानांमध्ये काम करणाऱ्या लोकांची आडनावेही त्यांची वेगळी ओळख दर्शवत असत. मुघलांच्या राजवटीत नागर समुदायातील लोक राजकारभारात मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. त्यांनी दिवाण म्हणूनही काम केले. कदाचित याच कारणामुळे त्यांनी अशी आडनावे ठेवली असावीत."
अशा आडनावांचे प्रसिद्ध लोक
मांकड हे आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींचा विचार केला, तर सर्वप्रथम वीनू मांकड यांचे नाव येते.
वीनू मांकड यांची गणना भारतीय क्रिकेटमधील सुरुवातीच्या प्रस्थापित अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.
1947-48 मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वीनू मांकड यांनी सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे सलामीचे फलंदाज बिल ब्राउन यांना नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला धावचीत केले होते. त्यांच्या आडनावावरूनच क्रिकेटमध्ये अशा प्रकारे बाद करण्याच्या पद्धतीला 'मांकडिंग' असे नाव पडले.
भारताच्या माजी टेनिसपटू निरुपमा मांकड यांचेही हेच आडनाव आहे. 1965 ते 1978 या काळात त्या भारतातील आघाडीच्या टेनिसपटू होत्या.
मांकड आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये गुजराती साहित्यिक आणि कादंबरीकार मोहम्मद मांकड यांचाही समावेश आहे.
त्यांना साहित्य गौरव पुरस्कार आणि रणजीतराम सुवर्ण चंद्रक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हाथी आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये काँग्रेसचे सौराष्ट्रातील नेते जयसुखलाल हाथी यांचा समावेश आहे. ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते. याशिवाय त्यांनी पंजाब आणि हरियाणाचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.
घोडा हेही परिचित आडनाव आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार अमित घोडा, कृष्णा घोडा आणि गुजरातचे चित्रपट निर्माते अभिलाष घोडा यांचेही हेच आडनाव आहे.
पोपट आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये बॅडमिंटनपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या अपर्णा पोपट तसेच गुजराती मूळचे ब्रिटिश राजकारणी डोलर पोपट यांचा समावेश आहे.
गुजरातमधील भावनगर लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार भारतीबेन शियाल यांचेही अशाच प्रकारचे आडनाव आहे.
गुजरातमधील आडनावांची विविधता
पारशी आडनावे: दारूवाला, पीठावाला, बूमला, गोटला, पापड़खाऊं, भाजीखाऊं, मसालावाला, पाववाला, नारियलवाला, बेकरीवाला आणि अंडावाला.
व्यवसायाशी संबंधित आडनावे: इंजिनियर, घडियाळी, जव्हेरी, कपडिया, गांधी, मर्चंट, दलाल, वकील, सुतरिया, सुथार आणि लुहार.
ठिकाण किंवा गावांच्या नावांवरून पडलेली आडनावे: खंभाता, सोजित्रा, घोघावाला, पारडीवाला, भरूचा, संजाणा, सूरती आणि अहमदाबादी.
गुजराती हिंदूंमध्ये वापरली जाणारी मुस्लिमांशी संबंधित आडनावे: बक्षी, मुन्शी, बादशाह, नवाब, इनामदार, काझी आणि सूबेदार.
समुदायांच्या नावांवरून पडलेली आडनावे: कडिया, कंसारा, काछिया, खमार, घांची, दर्जी, प्रजापती, भरवाड, रबारी, मोची आणि सोनी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























