'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जूनला भारतात परतणार

अभिजीत दीपके

फोटो स्रोत, instagram/cockroachjantaparty

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

'कॉक्रोच जनता पार्टी' या सोशल मीडिया मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी भारतात परत येऊन शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर इथे ते आंदोलन करणार आहेत.

अभिजीत दीपके सध्या अमेरिकेत असून, त्यांनी बोस्टन विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तरुण आणि झुरळांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर 'कॉक्रोच जनता पार्टी' ही सोशल मीडिया मोहीम सुरू करण्यात आली होती.

या मोहिमेचे संस्थापक महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील अभिजीत दीपके आहेत. त्यांनी अनेक वर्षे आम आदमी पार्टीच्या कम्युनिकेशन टीममध्ये काम केलं आहे.

अभिजीत दीपके यांनी काय घोषणा केली?

अभिजीत दीपके म्हणाले, "शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मी आपल्या मायदेशी आणि आपल्या घरी भारतात परत येतो आहे.

इतक्या दिवसांपासून आपण सोशल मीडियावर आवाज उठवत आहोत की पेपरफुटीमुळे नीटच्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि लाखो विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया गेले, त्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे."

"आठ लाख विद्यार्थ्यांनी आमच्या पिटीशनवर सही केली आहे. कोट्यवधी लोकांनी सोशल मीडियावर या मागणीला पाठिंबा दिला आहे. देशात दिल्ली, लखनौ आणि जयपूरसह अनेक ठिकाणी यासंदर्भात आंदोलनं देखील होत आहेत. मात्र तरीदेखील यांना काहीही फरक पडत नाहिये."

अभिजीत दीपके

"नीटचे 22 लाख विद्यार्थी, सीबीएसईचे 17 लाख विद्यार्थी, सीयूईटीचे 16 लाख विद्यार्थी आणि एसएससी जीडीचे 40 लाख विद्यार्थी, असे एक कोटींहून अधिक विद्यार्थी आहेत ज्यांच्या आयुष्याची व्यवस्थेनं चेष्टा केली आहे.

याच कारणामुळे विद्यार्थी त्यांच्या भवितव्याबद्दल चिंताग्रस्त आहेत आणि कोणाला तरी याची जबाबदारी घ्यावीच लागेल."

अभिजीत दीपके म्हणाले की इतकी मोठी चूक होऊनदेखील शिक्षण मंत्री राजीनामा देत नसतील तर त्याचा अर्थ आहे की देशात जबाबदारी नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. व्यवस्था हव्या तितक्या चुका करू शकते आणि त्यावर काहीच होणार नाही, असं दिसतं आहे.

असं किती दिवस चालणार. त्यामुळे वेळ आली आहे की आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल आणि भारताच्या राज्यघटनेच्या मार्गावर चालत शांततामय मार्गानं आपला आवाज उठवत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल.

अभिजीत दीपके

फोटो स्रोत, X/Cockroachisback

अभिजीत दीपके म्हणाले, "जर आपण एकत्र येऊन आवाज उठवला तर त्यांना आपलं म्हणणं मान्य करावं लागेल. मी निर्णय घेतला आहे की मी शनिवारी 6 जूनला सकाळी दिल्लीत येईन.

तुम्ही सर्वजण मला विमानतळावर भेटा. आपण सर्व मिळून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊ. तिथे आपण जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी त्यांची परवानगी घेऊया."

ते पुढे म्हणाले, "भारताची राज्यघटना आपल्याला चुकीच्या गोष्टींच्या विरोधात शांततापूर्ण मार्गानं आवाज उठवण्याचा अधिकार देते. त्या राज्यघटनेनुसार आपण आपला आवाज उठवू. मला आशा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचे जितके समर्थक आहेत आणि या व्यवस्थेमुळे त्रस्त झालेले जितके तरुण आणि विद्यार्थी आहेत, ते सर्व या आंदोलनात सहभागी होतील.

ज्यांना ज्यांना वाटतं की आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, त्या सर्वजणांनी या आंदोलनात सहभागी व्हावं."

कुटुंब, मित्रांना अटकेची भीती

याव्यतिरिक्त, अभिजीत दिपके म्हणाले की, "मला विमानतळावरच अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, अशी भीती माझे कुटुंब आणि मित्रांना वाटत आहे. मला अजूनही आशा आहे की, आजही आपला देश एक लोकशाही देश आहे आणि आम्हाला शांततेनं आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल."

अभिजीत दीपके म्हणतात की, भारत आजही एक लोकशाही देश आहे, अशी आशा त्यांना अजूनही आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिजीत दिपके म्हणतात की, भारत आजही एक लोकशाही देश आहे, अशी आशा त्यांना अजूनही आहे.

"माझी इच्छा असती तर, मी इथे अमेरिकेत नोकरी करून आरामात राहू शकलो असतो. गेल्या काही दिवसांत मला नोकरीच्या अनेक संधी मिळाल्या आहेत.

पण मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माझं माझ्या देशावर प्रेम आहे. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. आपण जे काही आहोत ते या देशामुळेच आहोत आणि आता आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची आपली वेळ आहे," असंही त्यांनी म्हटलं.

उपराष्ट्रपतींनीही केला 'कॉक्रोच'चा उल्लेख

राजकीय वर्तुळात 'कॉक्रोच जनता पार्टी'ची चर्चा आहेच. पण, रविवारी केरळमधील कोट्टायममधील मल्याळम दैनिक 'दीपिका'च्या 140 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही 'कॉक्रोच'बद्दल वक्तव्य केलं.

उपराष्ट्रपती म्हणाले की,"सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवल्या पाहिजे. तसं झालं तरच तरुणांना योग्य माहिती मिळेल. पण तसं झालं नाही तर ते 'कॉक्रोच'च्या मागे लागतील."

"लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा आणि मते धक्कादायक मानली जाऊ नयेत. ती एका सामान्य प्रक्रियेचा भाग मानली पाहिजेत. माध्यमं या गोष्टी हाताळण्यासाठी पुरेशी स्वतंत्र आहेत, असं मला वाटतं. राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत आणि ते सक्षमही आहेत. आपली कोणतीही संस्था कमकुवत नाही," असंही ते म्हणाले.

उपराष्ट्रपती

तर सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी'वर टीका केली आहे.

भाजपचे लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबतचा अभिजीतचा एक फोटो शेअर केला.

त्यांनी लिहिलं की, "अभिजीत दीपके हा आम आदमी पार्टीचा, म्हणजेच अरविंद केजरीवाल यांचा कार्यकर्ता आहे. त्याला बोस्टनला जाण्यासाठी कोणी पैसे दिले? सोरोस फाऊंडेशन त्याच्या खाण्यापिण्याचा खर्च करत आहे का? हा विरोधी पक्षांसाठी एक इशारा आहे. देश तोडण्यासाठी तुम्ही परकीय शक्तींची मदत घेणार का?"

दरम्यान, भारतीय जनता पक्षाची संघटना असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अभिजीतच्या काही ट्विट्सचा हवाला देत त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं आहे.

तजिंदर बग्गा यांनी अभिजीत दीपके यांचे एक जुने ट्विट रिट्विट करत लिहिलं की, "कॉक्रोच अभिजीत दीपकेला भारतात मुस्लिम पंतप्रधान का हवा आहे?"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)