नरेंद्र मोदींचा चहाचा कप देव्हाऱ्यात ठेवणाऱ्या मीरा मांझींच्या घरी आता वसुली एजंट्स का फेऱ्या मारत आहेत?

फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
- Author, गौरव गुलमोहर
- Role, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
- Reporting from, अयोध्या
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
उत्तर प्रदेशातील अयोध्येत मीरा मांझी यांच्या घरात पाऊल ठेवताच समोर एक छोटासा देव्हारा दिसतो. तिथल्या देवी-देवतांच्या मूर्तींच्या मधोमध, एका स्टीलच्या ताटात ठेवलेला चिनी मातीचा कप लक्ष वेधून घेतो.
"हा तोच कप आहे, ज्यातून प्रत्यक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या घरी येऊन चहा घेतला होता", असं मीरा मांझी यांनी सांगितलं.
रोज सकाळी देवांची पूजा करताना या कपाचीही तितक्याच भक्तीभावाने पूजा करत असल्याचं त्या सांगतात.
वर्ष 2023 च्या अखेरीस 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक मीरा मांझी यांच्या घरासमोर येऊन उभे ठाकले. त्यांनी मीरा यांच्या हातचा चहा घेतला आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत काही निवांत क्षणही घालवले.
निमित्त होतं केंद्र सरकारच्या 'उज्ज्वला योजने'चं. या योजनेच्या 10 कोटी लाभार्थ्यांमध्ये मीरा मांझी यांचे नाव त्या विक्रमी क्रमांकावर नोंदवले गेले होते. त्यामुळंच या विशेष क्षणी पंतप्रधान स्वतः त्यांच्या झोपडीत पोहोचले होते.
'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यात गरजू आणि गरीब कुटुंबांतील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिलं जातं.
पंतप्रधान मोदींनी मीरा मांझी यांच्या कुटुंबीयांसोबत जवळपास वीस मिनिटांचा वेळ घालवला होता.
मात्र त्या ऐतिहासिक भेटीला आता जवळपास तीन वर्षे उलटून गेली असून सध्या मीरा मांझी यांचं कुटुंब हलाखीच्या आर्थिक संकटांशी दोन हात करत आहे

फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
मीरा मांझी म्हणतात की, पंतप्रधान मोदी घरी आल्यानंतर आपल्या अडचणी संपतील आणि दिवस बदलतील अशी एक मोठी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
"2023 मध्ये पंतप्रधान मोदीजी जेव्हा आमच्या घरी आले, तेव्हा मनात किती आनंद झाला होता हे शब्दांत सांगू शकत नाही. ते आमच्यासाठी देवासारखे, साक्षात प्रभू श्रीरामाच्या रूपात आले होते. आम्ही त्यांना रामच मानले; कारण त्यांनी आम्हाला पक्के घर मिळवून दिले. एका घरासाठी आम्ही आधी काय काय सोसले होते, किती उंबरे झिजवले होते! उज्ज्वला योजनेचा गॅस सिलिंडरही मिळाला, त्यामुळे आम्ही खूप समाधानी होतो," असं त्या सांगतात.
मात्र आज तीन वर्षांनंतर मीरा मांझींचे कुटुंब कर्जाच्या अशा गर्तेत सापडले आहे की त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नाही.
तीन लाख रुपयांचं कर्ज कसं मिळालं?
मीरा मांझी सरयू नदीकाठच्या नया घाटावर फुलं विकायच्या. तर त्यांचे पती सूरज कुमार मांझी मजुरी करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. पण पंतप्रधानांच्या भेटीनंतर जिल्हा प्रशासनानं या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कर्जाच्या रूपाने मदतीचा हात पुढे केला.
प्रशासनाने एकाच दिवसात त्यांना 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा'अंतर्गत (PMEGP) दोन कर्जे मंजूर केली. तो दिवस होता 5 सप्टेंबर 2024.
'पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना' ही केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयामार्फत चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.
खेड्यापाड्यांत आणि शहरांमध्ये छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या वाटा शोधणे, तसेच बेरोजगार तरुणांना आणि पिढीजात कारागिरांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणे, हा या योजनेमागचा हेतू आहे.
मीरा मांझी यांचे पती सूरज कुमार मांझी यांना याच योजनेतून कर्ज मिळाले होते. यात त्यांना पहिल्यांदा 2,61,250 रुपयांचे आणि नंतर 23,750 रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते.
या पैशांतून सूरज यांनी स्वतःची नाव तयार केली आणि त्या नावेतून होणाऱ्या रोजच्या कमाईतून ते कर्जाचे हप्ते फेडत होते.
मात्र उर्वरित 2,04,616 रुपयांची परतफेड न होऊ शकल्यामुळे त्यांचं हे कर्ज अखेर एनपीए म्हणजे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट घोषित करण्यात आलं. यानंतर बँकेने 5 जुलै 2026 रोजी सूरज मांझी यांच्या नावे रीतसर नोटीस बजावली.
मीरा मांझी यांनी 'बीबीसी न्यूज हिंदी'शी बोलताना आपली व्यथा मांडली. "आम्ही काही कर्जाची मागणी केली नव्हती. आम्हाला वाटलं की प्रत्यक्ष देशाचे पंतप्रधान आमच्या घरी आलेत, कलेक्टर साहेब स्वतःहून मदत देतायत. त्यांनी म्हटलं होतं, 'टेंटचं दुकान सुरू करून देऊ.' मग विचार केला जे टेंटचं दुकान टाकून देतायत त्यांच्यासाठी नाव ती काय मोठी गोष्ट आहे? नाव तर ते स्वतःहूनच देतील. पण 3 महिन्यांनंतर जेव्हा पैशांसाठी फोनवर एकामागोमाग एक मेसेज यायला लागले, तेव्हा हे सगळं कर्जावर आहे हे आम्हाला समजलं."
'बीबीसी न्यूज हिंदी'ने या प्रकरणी अयोध्येतील कॅनरा बँकेच्या ब्रँच मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
कुटुंब कर्ज का फेडू शकत नाहीत ?
मीरा मांझी यांच्या घरात एकूण सात सदस्य आहेत आणि हे संपूर्ण कुटुंब अवघ्या दोन खोल्यांच्या घरात राहतं. सध्या त्या ज्या घरात राहतात ते त्यांना 'पंतप्रधान आवास योजने'तून मिळालं आहे. घरात 3 मुलं असून ती तिघंही सरकारी शाळेत शिकतात.
मीरा मांझींचे पती सूरज मांझी नदीत नाव चालवून कर्जाची परतफेड करत होते. पण रोजच्या जगण्याच्या संघर्षात कर्जाचा पूर्ण हप्ता भरणं त्यांना काही केल्या जमत नव्हतं.

फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
सूरज मांझी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "नाव तयार करून घेऊन आम्ही ती चालवत होतो. नाव चालवता चालवता जमेल तसे कर्जाचे हप्तेही भरत होतो. पण बँकेतून सतत फोन यायचे की, 'इतके कमी पैसे का भरताय? अजून पैसे भरा, हप्ता वाढवा.' पण आमची तेवढी कमाईच होत नव्हती. तरीही ओढाताण करून आम्ही कसेबसे एक-दीड लाख रुपये भरले. पण नंतर अचानक राम मंदिरात चोरीची घटना घडली आणि सगळा धंदाच ठप्प झाला. भाविकांची, पर्यटकांची गर्दी एकदम कमी झाली आणि आमची रोजची कमाई पुरती थांबली."
सूरज सांगतात की, या पडत्या काळातच त्यांच्या पत्नी मीरा यांचा घाटावर फुले विकण्याचा छोटासा व्यवसायही हातून गेला.
"माझी पत्नी घाटावर जाऊन हार-फुलं विकायची. पण तिथल्या पुजाऱ्यांनी तिचा तो पोटापाण्याचा आधारही हिरावून घेतला. तिला तिथून हुसकावून लावलं. त्यामुळे तीही घरात बसली आणि माझाही धंदा बसला. त्यात भर म्हणून नदीला आलेल्या पुराने अडीच महिने सगळ्यांच्याच नावा जागेवर ठप्प झाल्या," असं ते म्हणाले.
नावेतून होणारी कमाई घटण्यामागची कारणे काय?
या प्रश्नाचे उत्तर देताना सूरज मांझी यांनी 'बीबीसी न्यूज हिंदी'शी बोलताना सांगितलं की, "अयोध्येत बोटींची (नाव) संख्या प्रचंड वाढली आहे.
इथे कमीत कमी 300 बोटी तरी असतील ज्यातल्या 150 राजघाट-कंधरपूरच्या आहेत, तर 100 हून जास्त बाहेरून आल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच काम मिळणं कठीण झालं आहे. त्यात सरयूच्या घाटांवर आलेल्या क्रूझ बोटींमुळे आमच्या धंद्याला मोठा फटका बसला आहे.
पूर्वी जे पर्यटक यायचे आणि आमच्या छोट्या बोटींमधून नदीची सफर करायचे ते आता थेट क्रूझ बोटींकडे वळतात. यामुळे आमचंच नुकसान होत आहे. आमच्या पदरात फायद्याऐवजी फक्त तोटाच पडतोय."
'त्यांच्या येण्याने आमच्या घराची आर्थिक घडीच विस्कटली'
पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी येण्यापूर्वीची आमची परिस्थिती जास्त बरी होती, असं मीरा मांझी मानतात.
त्या सांगतात की, घाटाघाटांवर फिरून फुलं विकत असताना घराचा गाडा तुलनेने जास्त चांगल्या रीतीने चालत होता. पण बँकेकडून मिळालेल्या सुमारे 3 लाख रुपयांच्या कर्जानंतर मात्र, फुलं आणि नावेतून सुटणाऱ्या पैशांतून त्या कर्जाचे हप्ते फेडणं पुरतं अशक्य होऊन बसलं.
मीरा मांझी म्हणाल्या, "एका गरिबाच्या झोपडीत देशाचे पंतप्रधान पाऊल ठेवतात, आम्हाला वाटलं, साक्षात पंतप्रधान आलेत म्हणजे आता आमची सगळी दुःखे, सगळ्या अडचणी दूर होतील, असा मला ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांना देवासमान मानून तो चहाचा कप-बशी आम्ही देवघरात देवांच्या शेजारी जपून ठेवला. पण पंतप्रधानजींनी निदान आमच्या या तीन लहान मुलांच्या भवितव्याचा तरी विचार करायला हवा होता. तसं झालं असतं तर आयुष्यभर आम्ही त्यांचे उपकार मानले असते."

मीरा पुढे हतबलतेने सांगतात, "मी फिरून हार-फुलंच विकायचे, पण त्यात आमचा संसार छान सुरू होता. ते घरी आले आणि आमचे दिवस सुधारण्याऐवजी परिस्थिती खालावली. कारण माझ्या नवऱ्याच्या माथी नवं कर्ज मारलं गेलं. आम्ही आधीच एका बचत गटाचे हप्ते कसेबसे भरत होतो. त्यात हे दुसरं कर्ज डोक्यावर बसलं. दोन-दोन कर्जांचे हफ्ते भरायचे की तीन-तीन लेकरांचं पोट भरायचं? सगळा संसारच ओढाताणीत सापडला."
आमची त्यांच्याकडे हात जोडून एवढीच विनंती आहे, कोणाच्याही घरी जा, पण बिचाऱ्याचं आयुष्य असं रस्त्यावर येईल इतकं उद्ध्वस्त करू नका. आमचं एवढंच म्हणणं आहे की, तुम्ही आमची गरिबी स्वतः बघून गेला होता, मग एका निषादाच्या झोपडीत पाय ठेवला होता तर त्याच्यासाठी काहीतरी करावं, असा साधा विचार तरी मनात यायला नको होता का?
आमच्या जागी एखादा श्रीमंत असता आणि त्याच्या दारात पंतप्रधान गेले असते, तर कायच्या काय झालं असतं! पण आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्या वाट्याला काहीच नाही का?" असा सवाल मीरा मांझी यांनी विचारला.

फोटो स्रोत, ANI
मीरा मांझी यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळातून मदतीचे हात पुढे आले. 29 ऑक्टोबर रोजी सपा सरकारमधील माजी मंत्री पवन पांडे यांनी 50 हजार रुपये, तर अयोध्येचे भाजप महापौर गिरीश पती त्रिपाठी यांनी 60 हजार रुपयांची रोख मदत केली.
पण मीरा मांझींचे कुटुंब गेल्या कित्येक दिवसांपासून मदतीसाठी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दारात पत्रांद्वारे साकडे घालत आहे.
30 डिसेंबर 2024 रोजी मीरा यांचे पती सूरज मांझी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नदीत नाव चालवू देण्याची विनंती केली होती.
तर 17 ऑगस्ट 2024 ला मीरा मांझी यांनी स्वतः पंतप्रधानांना पत्र धाडून नया घाटावर हार-फुलं विकण्यासाठी एक पक्की जागा मागितली होती. पण दुर्दैवाने यापैकी एकाही अर्जाची साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही.

फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
17 ऑगस्टलाच मीरा मांझी यांनी उत्तर प्रदेश सरकारकडेही पत्राद्वारे दाद मागितली होती.
मीरा म्हणतात, "आम्ही मदतीची आस धरून कितीतरी लोकांचे हात जोडले. पण कुणीही पाठीशी उभं राहिलं नाही. 'दोन-चार हजारांची गोष्ट असती तर आम्ही हात सैल सोडला असता पण इतकी मोठी रक्कम आम्ही कुठून देणार?' असं लोक म्हणायचे."
कर्ज फेडता न आल्यामुळे कुटुंबाच्या झालेल्या मानसिक अवस्थेविषयी सांगताना मीरा यांना अश्रू अनावर झाले, "माझ्या पतीने तर एके दिवशी विष खाऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णयही घेतला होता. आमच्यावर अक्षरशः ही वेळ येऊन ठेपली होती. पण आम्ही कशीबशी हिंमत एकवटली आणि ठरवलं की, आपण गप्प बसायचं नाही, कुठेतरी आवाज उठवायचा. आपण यातून पुढे जायचा मार्ग शोधायचा."
सध्या काही संवेदनशील लोकांकडून मीरा मांझींपर्यंत मदतीचा ओघ सुरू झाला असला, तरी डोक्यावरचे सगळे कर्ज उतरवण्यासाठी ही मदत अजूनही खूप तोकडी असल्याचे त्या हतबलतेने सांगतात.
सत्ताधारी आणि विरोधकांचे वेगवेगळे दावे
अयोध्येतील युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद शुक्ला यांनी मीरा मांझी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या सर्व परिस्थितीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले, त्यावेळी मीरा मांझी यांच्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीची चर्चा ऐरणीवर आली.
शरद शुक्ला यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "मीरा मांझी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आधीच अतिशय नाजूक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी चहा घेतला आणि असं सांगितलं गेलं की, या कुटुंबाला सर्व योजनांचे लाभ दिले गेले आहेत. पण यात वेगळं काय आहे? एका सामान्य गरीब कुटुंबाला योजनांचे जे लाभ मिळतात तेच या कुटुंबालाही मिळत आहेत."
"नरेंद्र मोदीजींना जर खरोखरच त्या कुटुंबाला मदत करायची होती तर व्यवसायासाठी मदतनिधी देता आली असती. पण ज्या कुटुंबाकडे उत्पन्नाचा कोणताही खात्रीशीर मार्ग नव्हता प्रशासनाने त्यांना थेट कर्जाच्या गर्तेत ढकललं."
ते पुढे म्हणतात, "ज्या मीरा मांझी यांच्या घरी जाऊन स्वतः पंतप्रधानांनी चहा घेतला होता. अवघ्या तीन वर्षांनंतर त्यांच्या उंबरठ्यावर थेट रिकव्हरी एजंट उभे राहत आहेत. यावरून एकच सिद्ध होतं की, 'विश्वगुरू' म्हणून जी प्रतिमा उभी केली जातेय ती प्रत्यक्षात केवळ एका 'पॉन्झी गुरू'सारखी आहे."
'मीरा मांझी यांच्या कुटुंबाला योजनांचा लाभ मिळतोय'
भारतीय जनता पक्षाचे अयोध्येचे महापौर गिरीश पती त्रिपाठी यांनी मात्र हा विरोधकांनी उभा केलेला निव्वळ राजकीय मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. मीरा मांझी यांच्या कुटुंबाला केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ दिला जात असल्याचा दावा ते करतात.
गिरीश पती त्रिपाठी यांनी बीबीसीला स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "पंतप्रधानांच्या भेटीनंतर या कुटुंबाला 'पंतप्रधान आवास योजने'तून हक्काचं पक्कं घर मिळालं. 'उज्ज्वला योजने'तून घरात गॅस सिलिंडर आला आणि आजारपणाच्या खर्चाची चिंता मिटावी म्हणून 'आयुष्मान योजने'चे हेल्थ कार्डही त्यांना देण्यात आले."
"बोटीच्या डागडुजीसाठी 'पीएम स्वनिधी योजने'तून 25 हजारांचे कर्ज मिळाले. याव्यतिरिक्त तीन लाखांचे आणखी एक कर्ज मंजूर झाले होते ज्यावर 75 हजारांची घसघशीत सबसिडी होती. प्रश्न फक्त उरलेल्या सव्वा दोन लाखांचे हप्ते फेडण्याचा होता पण ते पैसे वेळेवर भरता न आल्याने त्यांचे कुटुंब अडचणीत सापडले. आता बँकेच्या कर्जफेडीच्या बाबतीत शासन किंवा प्रशासन थेट हस्तक्षेप करू शकत नाही अशा प्रकरणात समाजानेच एकत्र येऊन हातभार लावायचा असतो."
"मीरा मांझी यांनी थेट येऊन आम्हाला भेटायला हवं होतं. आम्ही नक्कीच त्यांची मदत केली असती. पण हीच बाब विरोधी पक्षातील काही लोकांच्या हाती लागली आणि त्यांनी यावरून गोंधळ करायला सुरुवात केली, की पंतप्रधान स्वतः यांच्या घरी गेले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या शक्य तितक्या सर्व योजनांचे लाभ आम्ही या कुटुंबाला मिळवून दिले आहेत," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
'बीबीसी हिंदी'च्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांना विचारलं की, 'मीरा मांझी यांनी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला आहे की, त्यांच्या पतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता हे कर्ज त्यांच्या माथी मारण्यात आलं, यावर तुमचं काय म्हणणं आहे?'
शशांक त्रिपाठी यांनी सांगितलं की, "या प्रकरणात आमची कोणतीही भूमिका नाही. आम्ही यात काय करू शकतो, तुम्हीच सांगा? आम्ही यासंदर्भात रीतसर प्रेसनोट जारी केली आहे."
मीरा मांझी यांचं प्रकरण ऐरणीवर आल्यानंतर अयोध्या जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी प्रेसनोट प्रसिद्ध करत सांगितलं होतं की, मीरा मांझी यांना 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना', 'आवास योजना', 'आयुष्मान कार्ड' आणि 'अंत्योदय रेशन कार्ड' यांसारख्या सर्व आवश्यक शासकीय सुविधांचे लाभ मिळत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्यातून चहा दिला होता तो कप मीरा मांझी यांनी आजही देवघरात अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवला आहे. त्या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी त्यांच्यासाठी आजही तितक्याच अनमोल आहेत.
मात्र दुसरीकडे डोक्यावरचा कर्जाचा डोंगर आणि रोजच्या रोजीरोटीचं गंभीर संकट आजही त्यांच्या कुटुंबासमोर आ वासून उभं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























