कुत्रे वास घेऊन करणार कॅन्सरचं निदान; भारतात विकसित होणारी नवीन पद्धत काय आहे?

डॉगनोसिसच्या प्रयोगशाळेत मास्कचा वास घेताना इंडी-लॅब्राडोर मिक्स जातीचा कुत्रा

फोटो स्रोत, Dognosis

फोटो कॅप्शन, डॉगनोसिसच्या प्रयोगशाळेत मास्कचा वास घेताना इंडी-लॅब्राडोर मिक्स जातीचा कुत्रा
    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

पुढील वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या आरोग्य तपासणी शिबिरात किंवा हॉस्पिटलमध्ये जाल आणि तुम्हाला 10 मिनिटं एका मास्कमध्ये श्वास घेण्यास सांगण्यात येईल, तेव्हा संकोच न करता आणि न घाबरता तसं करा.

वैद्यकीय टीम तुम्हाला मास्कमध्ये श्वास घेण्यास सांगेल. तसं करण्यामागे विशेष कारण असेल. तुम्हाला कर्करोगासारखा एखादा आजार तर झालेला नाही ना, हे ओळखता यावं किंवा त्याचं निदान करता यावं म्हणून असं केलं जाईल.

कोलोरेक्टल कॅन्सरसारख्या काही आजारांचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात निदान होतं, हे आपल्याला माहित आहे. या टप्प्यावर रुग्णाचा जीव वाचवणं डॉक्टरसाठी खूपच कठीण होऊन बसतं.

वैद्यकीय टीम जेव्हा तुम्हाला मास्कमध्ये श्वास घ्यायला सांगेल, तेव्हा ते तुमचं सॅम्पल घेत असतील. त्यानंतर विशिष्ट पद्धतीनं प्रशिक्षित केलेल्या कुत्र्याला त्या सॅम्पलचा वास घ्यायला सांगितला जाईल. त्यातून हे स्पष्ट होईल की शरीराच्या एखाद्या भागात किंवा अवयवात कर्करोग तर झालेला नाही ना.

कर्करोगाचं निदान जितक्या लवकर होतं, तितकाच त्यावर उपचार करून रुग्णाचा जीव वाचवणं सोपं जातं.

इस्रायल, ब्रिटन, फ्रान्स, जपान, अमेरिका, जर्मनी आणि तैवानसह अनेक देशांमध्ये बऱ्याच काळापासून कुत्र्याच्या मदतीनं कर्करोगाचं निदान करण्यासाठी प्रयोग केले जात आहेत. ही एक चांगली आणि आजमावलेली म्हणजे अनुभव घेण्यात आलेली पद्धत आहे.

मात्र भारतात पहिल्यांदाच कर्नाटकातील 6 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित कुत्र्यांच्या मदतीनं एक अभ्यास करण्यात आला आहे.

या अभ्यासात कुत्र्यांनी 1502 रुग्णांच्या सॅम्पलचा वास घेतला. यात कुत्र्यांनी 91 टक्के अचूकता दाखवली आणि त्यातून कोणत्या रुग्णांना 7 मोठे, गंभीर स्वरुपाचे कर्करोग आहेत आणि कोणत्या रुग्णांना नाहीत, हे समोर आलं.

या 1502 लोकांपैकी 283 लोक असे होते, ज्यांना बायोप्सीतून कर्करोग झाल्याची पुष्टी झाली होती. तर 1219 जणांना कर्करोग नव्हता.

कुत्र्यांची वास घेण्याची अद्भूत शक्ती

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉगनोसिस या बंगळुरूमधील एका स्टार्टअप कंपनीनं हा अभ्यास केला आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये शुक्रवारी (1 मे) या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.

डॉ. संजीव कुलकोड यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. संजीव, कर्नाटकातील हुबळीमधील रेड ऑन कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि संचालक आहेत.

आकाश कुलकोड, डॉगनोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत.

आकाश यांनी बीबीसीला सांगितलं, "आतापर्यंत आम्ही कर्नाटकातील हॉस्पिटलबरोबर मिळून 10 हजार सॅम्पल गोळा केले आहेत. पुढील टप्प्यात आम्ही महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधून सॅम्पल गोळा करण्याची योजना आखत आहोत. पुढील 6-9 महिन्यांमध्ये जवळपास 15 हजार लोकांची तपासणी केली जाईल."

या 10 हजार सॅम्पलचा वापर कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सिस्टम बनवण्यासाठी देखील केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला व्यापक स्तरावर नेणं हा यामागचा उद्देश आहे, असं आकाश कुलकोड म्हणाले.

"यात 30 कुत्र्यांच्या मदतीनं दरवर्षी 10 लाख सॅम्पल तपासण्याची क्षमता तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे," असं ते म्हणाले.

बंगळुरूमधील डॉगनोसिस केंद्रात आकाश कुलकोड (डावीकडे) आणि इतामार बिटान त्यांच्या कुत्र्यांसह

फोटो स्रोत, Dognosis

फोटो कॅप्शन, बंगळुरूमधील डॉगनोसिस केंद्रात आकाश कुलकोड (डावीकडे) आणि इतामार बिटान त्यांच्या कुत्र्यांसह

त्यांच्या बोलण्यातून एकप्रकारची घाई दिसून येते. त्यामागे देखील एक कारण आहे. सध्याच्या अंदाजांनुसार या वर्षी भारतातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 15 लाखांहून अधिक होईल. गेल्या तीन दशकांमध्ये यात 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या संशोधनाचे प्रमुख डॉ. संजीव कुलकोड यांनी बीबीसीला सांगितलं, "कर्करोगाचं प्रमाण वाढण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर लोकसंख्या वाढत आहे. दुसरं म्हणजे कर्करोग हा वयाशी संबंधित आजार आहे. जसजसं लोकांचं वय वाढतं, तसतसं कर्करोगाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत जाते."

यासंदर्भात, सर्वात आधी 1989 मध्ये कुत्र्यांकडे लक्ष वेधलं गेलं होतं.

एमिली मोजर आणि मायकल मॅककुलॉक या संशोधकांनी 2010 मध्ये जर्नल ऑफ व्हेटर्नरी बिहेवियरमध्ये लिहिलं होतं, "एका महिलेला तिच्या त्वचेवरील एका डागाची तपासणी कुत्र्याकडून करवून घेण्यास सांगण्यात आलं. तो कुत्रा डाग असणाऱ्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक रस दाखवत होता."

"क्लिनिकल तपासणीनंतर समोर आलं की तो डाग, मॅलिग्नंट मेलेनोमा या एका धोकादायक प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगाचा होता," असं ते म्हणाले.

त्यांच्या शोधनिबंधाचं शीर्षक होतं ... "कुत्र्यांद्वारे मानवी कर्करोग ओळखण्याची क्षमता, पद्धती आणि अचूकतेचा आढावा."

केरळमधील मृतदेह शोधणारे कुत्रे

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता सर्वात तीक्ष्ण असल्याचं मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर, त्यांच्यामध्ये 30 कोटी ओल्फेक्ट्री रिसेप्टर म्हणजे वास ओळखणाऱ्या पेशी असतात. तर मानवामध्ये याचं प्रमाण फक्त 50 लाख असतं.

हाँगकाँगमधील टिमोथी क्वान लो आणि त्यांच्या टीमनं 'फ्रंटियर्स इन मेडिसीन'मध्ये लिहिलं, "मानवी शरीरातून अतिशय कमी प्रमाणात स्त्रवणाऱ्या वोलेटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड म्हणजे व्हीओसीला देखील कुत्रे ओळखू शकतात. हा गंध शरीरात होत असलेले बदल, एखादा संसर्ग किंवा कर्करोगाशी संबंधित असू शकतो."

वैद्यकीय टीम रुग्णांना मास्क घालायला देते आणि त्यानंतर 10 मिनिटं श्वास घेण्यास सांगते. या मास्कचा प्रभावीपणा तीन महिने किंवा त्याहूनही अधिक काळापर्यंत राहतो. त्यानंतर, एका नियंत्रित लॅब सेटिंगमध्ये हा मास्क कुत्र्यांसमोर ठेवला जातो.

शरीरातील व्हीओसीमध्ये झालेले बदल कुत्रे ओळखतात आणि 7 प्रकारच्या कर्करोगांची ओळख पटवतात. इतकंच काय, कुत्रे सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाचीदेखील ओळख पटवू शकतात.

वायनाडमधील बचाव कार्यात मदत करताना- एंजल

फोटो स्रोत, Kerala Police Academy

फोटो कॅप्शन, वायनाडमधील बचाव कार्यात मदत करताना- एंजल

डॉक्टर विशाल यूएस राव, बंगळुरूच्या एचसीजी कॅन्सर सेंटरच्या सेंटर ऑफ अकॅडेमिक्स अँड रिसर्चचे डीन म्हणजे अधिष्ठाता आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "कुत्र्याच्या नाकाच्या आत खालच्या बाजूला एक विशेष रचना असते. त्याला वोमेरोनॅसल ऑर्गन किंवा जेकबसन ऑर्गनदेखील म्हटलं जातं. ही रचना दमटपणामुळे येणारे वास आणि गुंतागुंतीच्या रासायनिक संकेतांची ओळख पटवण्यासाठी कुत्र्यांना मदत करते."

कुत्र्यांची ही क्षमता लक्षात घेऊन केरळ पोलीस अकॅडमीनं अशा कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं, ज्यांनी जुलै 2024 मध्ये वायनाड भूस्खलनाच्या वेळेस मृतदेह शोधून काढले होते.

माया, मर्फी आणि एंजल या कुत्र्यांनी, फक्त 3 दिवसांमध्ये (31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान) त्या परिसरातील 23 मृतदेह शोधून काढले होते. या भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं हाहाकार केला होता. असं संकट केरळ त्यापूर्वी पाहिलं नव्हतं.

ढिगारे किंवा गाळाखाली 25 फूट गाडले गेलेले मृतदेहदेखील हे कुत्रे वासानं शोधून काढू शकत होते. मेरठच्या रिमाउंट व्हेटर्नरी कोअर सेंटरच्या आणखी 3 कुत्र्यांनादेखील मृतदेह शोधण्याच्या कामाला लावण्यात आलं होतं.

अकॅडमीचे आयजीपी आणि डायरेक्टर के. सेथुरमन यांनी बीबीसीला सांगितलं, "नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) देखील मृतदेह शोधण्यासाठी आमच्या कुत्र्यांना घेऊन जातात. सध्या आम्ही एनडीआरएफच्या लोकांना कुत्र्यांना प्रशिक्षित करण्याचं प्रशिक्षण देत आहोत."

हे कुत्रे आणि त्यांच्या ट्रेनर्सना कालिकत विद्यापीठाच्या फॉरेन्सिक विभागानं प्रशिक्षण दिलं होतं.

कालिकत विद्यापीठाच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाचे कोर्स कोऑर्डिनेटर शिवा प्रसाद बीबीसीला म्हणाले, "आम्ही गॉज (एक प्रकारचं पातळ, मुलायम वैद्यकीय कापड) वर रक्त लावून काही काळासाठी छुप्या जागी कुजण्यासाठी ठेवलं. कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी याच प्रकारच्या खोट्या किंवा बनावट वासाचा वापर केला जातो."

केरळ पोलीस अकॅडमी आणि फॉरेन्सिक विभागामध्ये झालेल्या एमओयू म्हणजे सामंजस्य करारामुळे आता पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य लोकांसाठी एक सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात कुत्र्यांना माणसांमधील कर्करोग ओळखण्यासाठी प्रशिक्षण कसं द्यायचं हे शिकवलं जाईल.

"ज्या हॉस्पिटलशी आम्ही बोललो, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या हॉस्पिटलमधील जवळपास एक डझन डॉक्टर, आमचं प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी त्रिशूरला देखील येऊन गेले आहेत. हे केरळ पोलीस अकॅडमीचं मुख्यालय आहे. वैद्यकीय संस्थांमधून सॅम्पल घेऊन आधी कुत्र्यांना आणि नंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं आमचं उद्दिष्टं आहे," असं शिवा प्रसाद म्हणाले.

कुत्र्यांचा वापर करण्यामागचं आणखी एक मोठं कारण

कर्करोगाची तपासणी किंवा निदान करण्यात कुत्रे एक महत्त्वाचं साधन ठरू शकतात. सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतींमध्ये रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, हेदेखील त्यामागचं एक मोठं कारण आहे. मॅमोग्रामसारख्या चाचण्यांमध्ये रुग्णांना आयोनायझिंग रेडिएशनला तोंड द्यावं लागतं. हे रेडिएशन त्या व्यक्तीच्या शरीरासाठी अपायकारक असतं. तर कोलोरेक्टल कॅन्सरची तपासणी करण्यासाठी इनव्हेसिव प्रोसिजर करावी लागते.

भारतासारख्या देशात, रुग्णांना अशा प्रकारच्या कर्करोगाची तपासणी किंवा निदान करण्यासाठी विश्वसनीय आणि सहजतेनं उपलब्ध होणारी ठिकाणं मिळतात की नाही, हादेखील एक मोठा प्रश्न आहे.

कर्करोगाच्या तपासणीतील याच उणिवा लक्षात घेऊन इस्रायलच्या एलिझाबेथ हाफ आणि त्यांच्या टीमनं 2024 मध्ये 'नेचर: सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये एक संशोधन प्रकाशित केलं होतं.

डॉगनोसिसच्या प्रयोगशाळेत मास्कचा वास घेताना कुत्रा

फोटो स्रोत, Dognosis

फोटो कॅप्शन, डॉगनोसिसच्या प्रयोगशाळेत मास्कचा वास घेताना कुत्रा

या अभ्यासात मांडण्यात आलं होतं की स्पॉटइट अर्ली लिमिटेड या इस्रायलच्या कंपनीनं कर्करोगाच्या तपासणीसाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे.

या पद्धतीत शरीराच्या आत काहीही टाकण्याची आवश्यकता नसते. तसंच यासाठी कोणत्याही विशेष मदतीची देखील आवश्यकता नसते. यात फक्त श्वासाचं सॅम्पल घेतलं जातं.

त्याच्या आधारे कर्करोगाचं निदान केलं जातं. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा मेळ घालून हे तंत्रज्ञान किंवा पद्धत काम करते.

त्यांच्या अभ्यासात असंही म्हटलं होतं की कर्करोगाचं निदान करण्यासाठी अनेकदा लघवीच्या सॅम्पलच्या तुलनेत श्वासाचे सॅम्पल अधिक प्रभावी ठरतात.

डॉ. संजीव कुलकोड म्हणाले की, "कुत्र्यांना माणसांच्या श्वासाच्या सॅम्पलमध्ये असलेला 'विशिष्ट गंध' ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं. ज्याप्रमाणे बॉम्ब, अंमली पदार्थ आणि भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या लोकांना शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षित केलं जातं, अगदी तसंच हे आहे."

निदान करण्यासाठी कुत्र्यांच्या कोणत्या जाती चांगल्या असतात?

केरळ पोलीस अकॅडमी आणि डॉगनोसिस यांनी वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचा वापर केला आहे. यामध्ये देशी किंवा गावठी कुत्र्यांचा (इंडी)देखील समावेश आहे.

अकॅडमीचं म्हणणं आहे की त्यांनी देशी कुत्रे, लॅब्राडोर आणि एका बीगलचा वापर केला आहे. तर फॉरेन्सिक विभागानं 8 बेल्जियन मेलिनोईस विकत घेतले आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट कोर्सच्या विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण दिलं जाईल.

डॉगनोसिसनं 4 बीगल, 1 लॅब्राडोर-इंडी मिक्स आणि 1 डच शेफर्ड-बेल्जियन मेलिनोईस मिक्स जातीच्या कुत्र्याचा वापर केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे, लॅब्राडोर-इंडी मिक्स कुत्र्याला डॉगनोसिसनं एका शेल्टरमधून दत्तक घेतलं होतं.

केरळ पोलीस अकॅडमी आणि डॉगनोसिसनं या कुत्र्यांना 10 आठवड्यांहून अधिक काळ रिवॉर्ड-बेस्ड पद्धतीनं प्रशिक्षण दिलं. या पद्धतीत योग्य गंध ओळखल्यास कुत्र्यांना बक्षीस दिलं जातं.

शिवा प्रसाद यांच्या मते, "या प्रक्रियेत ज्या व्यक्तीची तपासणी करायची असते, त्याला मास्क घालून जवळपास 10 मिनिटं सामान्य पद्धतीनं श्वास घेण्यास सांगितलं जातं. त्यानंतर आवश्यक त्या क्लिनिकल चाचण्या केल्या जातात. त्यानंतर, कुत्र्यांचं मूल्यांकन किंवा आकलन बरोबर होतं की नाही, याची पुष्टी केली जाते."

कालिकत विद्यापीठाच्या फॉरेन्सिक सायन्स विभागानं 'लैला'ला मृतदेह शोधण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे

फोटो स्रोत, Kerala Police Academy

फोटो कॅप्शन, कालिकत विद्यापीठाच्या फॉरेन्सिक सायन्स विभागानं 'लैला'ला मृतदेह शोधण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे

"ज्या लोकांना कर्करोग झाल्याची शंका कुत्रे व्यक्त करतात, त्यांची पुढे फुल बॉडी पीईटी-सीटी स्कॅन सारखी सखोल तपासणी केली जाऊ शकते,"आकाश कुलकोड म्हणाले.

"ही तपासणी सुरुवातीच्या टप्प्यातदेखील ट्युमर शोधून काढते. यामुळे मोठ्या संख्येनं लोकांची तपासणी करणंदेखील सोपं होतं. तसंच खर्चदेखील कमी येतो," असं ते म्हणाले.

सोप्या भाषेत सांगायचं तर, श्वासाद्वारे केली जाणारी ही चाचणी, कर्करोगाचं मोठ्या प्रमाणात प्री-स्क्रीनिंग म्हणजे पूर्व-तपासणी करण्यासाठीचं एक प्रभावी साधन म्हणून उदयास येते आहे.

मात्र डॉ. विशाल राव यांनी एक सूचना केली आहे. यात त्यांनी "समुदायाच्या स्तरावर ही तपासणी करण्यासाठी अधिक स्टँडर्ड पद्धत विकसित करण्यासाठी" पशूवैद्यकशास्त्र आणि वैद्यकीय क्लिनिकल व्यावसायिकांच्या (डॉक्टर, नर्स इत्यादी) सक्रिय सहकार्याचा मुद्दा मांडला आहे.

याप्रकारच्या इनोव्हेशन्स किंवा नवीन पद्धतींविषयी ते म्हणतात, "कुत्र्यांच्या घ्राणेंद्रियांची नक्कल करून या व्हीओसी (वोलेटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड्स)ची ओळख पटवू शकेल, असे कृत्रिम नाक भारतानं विकसित करण्याची वेळ आता आली आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)