प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं? 'तो' मेसेज हत्येचा संकेत होता का?

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन
वाचन वेळ: 7 मिनिटे

प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रकाश महाजन यांनी केलेल्या काही विधानांमुळे तसेच त्यांच्यात आणि सारंगी महाजन यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल पुन्हा चर्चा होतेय.

याआधीही प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी खासदार त्यांच्या मुलाखतींमुळे चर्चेत आल्या होत्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या प्रकरणावर भाष्य केले होते.

एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या होत्या की, या हत्या प्रकरणाची नीट चौकशी होण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहीन.

प्रवीण महाजन यांनी बंदुकीचं ट्रिगर दाबलं असलं, तरी त्यामागे अनेकांची डोकी होती, असाही खळबळजनक दावाही पूनम महाजनांनी केला होता.

या दाव्यांमुळे प्रमोद महाजन हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं..

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी यापूर्वी प्रमोद महाजन हत्या प्रकरणावर सविस्तर वृत्तलेख लिहिला होता. नव्याने होत असलेल्या चर्चेमुळे पुन्हा इथे देत आहोत.

प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन

22 एप्रिल 2006 चा दिवस उजाडला एका गोळीबाराच्या सुन्न करणाऱ्या घटनेनं. संपूर्ण भारताला हादरवणारा हा गोळीबार झाला दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत. कारण या गोळीबारात जखमी झाले होते भाजपचे नेते प्रमोद महाजन.

गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी 3 मे 2006 रोजी अखेरचा श्वास घेतला.

प्रमोद महाजनांच्या हत्येनं हादरा बसण्याचं आणखी एक कारण म्हणजे मारेकरी. कारण ही हत्या कुणी दुसऱ्यानं नाही, तर त्यांच्याच सख्ख्या भावानं म्हणजे प्रवीण महाजन यांनीच केली होती.

  • हत्येच्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
  • या हत्येमागचं कारण काय होतं?
  • कोर्टात काय घडलं?
  • प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना केलेला 'तो' मेसेज हत्येचा संकेत होता?

अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या हत्येच्या गोष्टीतून जाणून घेणार आहोत.

हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?

दिवस होता 22 एप्रिल 2006.

वार : शनिवार

वेळ : सकाळचे 7.30 वाजले होते.

भाजप नेते प्रमोद महाजन मंबईतील वरळी परिसरातल्या 'पूर्णा' निवासस्थानी होते. हातात पेपर आणि समोर चहाचा कप. समोरच्या टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. महाजन कुटुंबीयांसाठी ही सकाळ सामान्य दिवसाप्रमाणेच होती.

महाजनांना त्यादिवशी कोणी मोठा नेता किंवा कार्यकर्ते भेटायला येणार नव्हते. त्यामुळे पांढरा कुर्ता घातलेले महाजन दिवसाची नेहमीप्रमाणे सुरुवात करण्याच्या तयारीत होते.

तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली. त्यांचे छोटे बंधू प्रवीण महाजन समोर उभे होते.

जिन्स आणि टी-शर्ट घातलेले प्रवीण महाजन आत आले. बहुधा प्रमोद महाजन यांना याची कल्पना नसावी. कारण प्रवीण महाजन फारसे प्रमोद महाजन यांच्या घरी येत नसत.

प्रमोद महाजनांनी विचारलं, "तू इथे कसा?"

प्रवीण महाजन सोफ्यावर बसले आणि त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरुवात केला. प्रमोद महाजन त्यांना वेळ देत नाहीत. व्यापारात मदत करत नाहीत, अशी त्यांची प्रामुख्याने तक्रार होती.

त्यानंतर दोन्ही भावात काहीकाळ चर्चा झाली. त्यानंतर अचानक 7.40 च्या सुमारास प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं 32 बोअरचं पिस्तूल बाहेर काढली आणि प्रमोद महाजनांवर पॉईंट ब्लँक रेंजवरून गोळ्या झाडल्या. प्रमोद महाजन यांच्या छातीच्या खाली तीन गोळ्या लागल्या.

गोळ्या झाडून प्रवीण महाजन थेट पोलीस ठाण्यात

मुंबई पोलिसांनी त्यावेळी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, "प्रवीण महाजन चौथी गोळी फायर करण्यासाठी सरसावले. पण पिस्तूल जॅम झालं. त्यामुळे त्यांना पुढे फायरिंग करता आलं नाही. त्यांच्या पिस्तूलात नऊ बूलेट्स होत्या."

'पूर्णा' इमारतीत एकच हाहाःकार उडाला आणि धावपळ सुरू झाली. रेखा महाजन यांनी मदतीसाठी गोपीनाथ मुंडेंच्या घरी धाव घेतली. मुंडे याच इमारतीत 12 व्या मजल्यावर रहात होते. मुंडे धावत महाजन यांच्या घरी पोहोचले.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर

त्या दिवशी काय झालं होतं, याबाबत प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी कोर्टात साक्ष दिली होती.

त्या म्हणाल्या होत्या, "मी बेडरूममध्ये असताना गोळ्यांचा आवाज ऐकला. मी बाहेर आले. प्रवीण महाजनांना पिस्तूलातून प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडताना पाहिलं."

"मी ओरडले. प्रवीण तू हे काय केलंस. मी त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला ढकलून दिलं. तुम्ही माझं ऐकलं नाही. आता भोगा," असं प्रवीण महाजन म्हणाल्याचं रेखा महाजन यांनी कोर्टाला सांगितलं होतं.

लाल रेष
लाल रेष

प्रमोद महाजनांवर गोळ्या झाल्यानंतर प्रवीण महाजन घराबाहेर पडले. कोणाशी काहीच न बोलता, 15 मजले जिन्याने उतरत खाली आले. गाडी पार्किंगमध्येच सोडली. आणि टॅक्सीने पोलीस स्टेशनकडे निघाले.

सकाळचे 8.30 वाजले असतील. नाईट शिफ्टवर असलेले वरळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यातच हातात पिस्तूल घेऊन प्रवीण महाजन शांतपणे चालत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी पिस्तूलासह सरेंडर केलं.

"मी प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्यात," त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मराठीत सांगितलं.

ड्युटीवरील पोलिसांचा विश्वासच बसला नाही. कारण प्रवीण महाजन कोणालाच फारसे माहित नव्हते. प्रवीण महाजन यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रमोद महाजनांच्या घरी धाव घेतली.

प्रवीण महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रवीण महाजन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रमोद महाजन जबर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनी त्याच इमारतीत रहाणारे डॅा. विजय बंग यांना फोन केला.

इंडिया टू-डेशी बोलताना डॉ. बंग म्हणाले होते, "मी पोहोचलो तेव्हा प्रमोद महाजन खुर्चीवर बसवण्यात आलं होतं. त्यांचा रक्तदाब खूप कमी होता. शरीरात रक्तस्राव सुरू झाला असावा."

गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. प्रमोद महाजन भाजपचे मोठे नेते होते. त्यामुळे डॅाक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

कोर्टात साक्ष देताना रेखा महाजन पुढे म्हणाल्या होत्या, "रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन शुद्धीवर होते. ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले, मी असं काय केलं होतं, की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या?"

इथे वरळी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ IPS अधिकारी पोहोचण्यास सुरुवात झाली.

पोलिसांनी प्रवीण महाजन यांनी गुन्ह्याची कबूली दिल्याचा दावा केला होता, तर वरळी पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने रिपोर्टर आणि चॅनलच्या ओबी व्हॅन पोहोचल्या होत्या.

कोर्टात काय घडलं?

प्रवीण महाजनांना अटक करून मध्य मुंबईतील भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात सेशन्स कोर्टात आरोपपत्र दाखल केलं.

मुंबई सेशन्स कोर्टाने 2007 मध्ये प्रवीण महाजन यांना प्रमोद महाजन हत्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली.

वरिष्ठ वकील उज्वल निकम प्रमोद महाजन खटल्यात विशेष सरकारी वकील होते.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "प्रवीण महाजन यांच्या मनात नेमकं काय होतं, हे कधीच कळू शकलं नाही."

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजन

प्रमोद महाजन खटल्याच्या सुनावणीचा काही भाग इन-कॅमेरा करण्यात आला होता. प्रमोद महाजन यांच्या चारित्र्यावर आरोप केल्यामुळे हा खटला इन-कॅमेरा करण्यात आला होता.

14 दिवसांच्या फर्लोवर बाहेर आल्यानंतर प्रवीण महाजन यांनी काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. डीएनएच्या मुलाखतीत त्यांना तुम्ही प्रमोद महाजन यांची हत्या का केली? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या मुलाखतीत प्रवीण महाजन म्हणाले होते, "मी प्रमोदला मारलं नाही. हे घडलं. तुम्ही यावर विश्वास ठेऊ शकाल? मी याचा विचार करत नाही. तुम्हाला वाटेल की, ही घटना पुन्हा माझ्यासमोर येत राहील. पण मी याचा विचार करत नाही."

"काही गोष्टी न समजण्यापलिकडे असतात. हे सर्व फक्त 15 मिनिटात घडलं. माझ्या अनेक गोष्टी लक्षात आहेत. फक्त 22 एप्रिल 2006 चा दिवसच का? मला सर्व आठवतंय."

'तो' मेसेज हत्येचा संकेत होता?

प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यात नेमकं काय झालं? हे कधीच पुढे आलं नाही.

मात्र, प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडण्याच्या सहा दिवस आधी, म्हणजे 15 एप्रिल 2006 रोजी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता.

त्या मसेजमध्ये प्रवीण महाजन यांनी लिहिलं होतं - "अब याचना नहीं, रण होगा. जीवन विजय के साथ, या फिर मरण होगा."

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सेशन्स कोर्टात दिलेल्या साक्षीत, या मेसेजजबाबत माहिती दिली होती.

प्रवीण महाजन यांचा मृत्यू

प्रवीण महाजन यांना 18 डिसेंबर 2007 रोजी मुंबई सेशन्स कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना नाशिक सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं.

प्रवीण महाजन

फोटो स्रोत, Huw Evans Picture Agency

फोटो कॅप्शन, प्रवीण महाजन

27 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांना 14 दिवसांची फर्लोची रजा देण्यात आली.

ही रजा संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2009 रोजी त्यांना डोकेदुखी आणि रक्तदाबाच्या त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना त्याच रात्री ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी नेण्यात आले. तिथे त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि ते कोमात गेले.

दोन-अडीच महिने प्रवीण महाजन कोमातच होते. अखेर उपचारादरम्यानच त्यांचा 3 मार्च 2010 रोजी मृत्यू झाला.

हत्येचं कारण कधीच समोर का आलं नाही?

भावाच्या म्हणजे प्रमोद महाजनांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर नाशिक जेलमध्ये प्रवीण महाजन यांनी 'माझा अल्बम' नावाचं एक पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वादाचा विषय बनलं होतं.

प्रवीण महाजन यांच्या पुस्तकातील काही भाग वर्तमानपत्रातही छापण्यात आला होता. त्यात ते असं म्हणाले होते, 'हे सर्व कसं घडलं. आणि कोणी केलं. हे लोकांना कधीच कळणार नाही.'

झालंही तसंच. प्रमोद महाजनांच्या हत्येचं कारण कधीच समोर आलं नाही.

मात्र, आता भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन आणि प्रमोद महाजन यांच्या कन्या पून महाजन काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणत आहेत की, या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याना पत्र लिहिणार आहे.

त्यामुळे आगामी काळात या प्रमोद महाजन हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होऊन, हत्येमागचं खरं कारण समोर येतं का, हे पाहावं लागेल.